आपल्यामध्ये असलेली धार्मिक विभागणी ही केवळ धर्माधारित आहे की जाताधारित, हे कोडे आपल्याला अजून सुटलेले नाही. आज आहे त्या व्यवस्थेत ते सुटायची सोयही नाही; पण ऐेंशी-नव्वदच्या दशकातील पिढीने ती कोडी ‘आत्मपॅम्फ्लेट’ सांगतो त्या भाषेत सोडवायचा प्रयत्न केला असता तर केवळ ‘भावांनो...’ या एका शब्दात सारे समाजसुख सामावले गेले असते.
धार्मिक दंभाच्या, सामाजिक अनियंत्रणाच्या आपल्या रचनेत समाजाच्या फुटक्या डोळ्यात अंजन घालण्याचे काम हा चित्रपट करतो. मात्र ते अतिशय अवघड काम करताना कुठेही विद्वेशाची, अविवेकाची गरज पडत नाही.
भारतीय समाजव्यवस्थेतला एक गट कायम धार्मिक दृष्टिकोनातून समाजव्यवस्थेची मांडणी करण्याचा प्रयत्न करीत राहिला आहे. या गटाला हा देश एका विशिष्ट धर्माच्याच सांस्कृतिक चौकटीत बसवायची इच्छा होती आणि आहे. त्यासाठी त्यांनी आयुष्यभर प्रयत्न केले. धार्मिक आधारावर देशाची विभागणी करण्याचा प्रयत्न केला. येथे मोठ्या संख्येने हिंदूंचे वास्तव्य आहेच.
ते कुणी नाकारण्याचे कारणच नाही; पण त्यातील काही मोजक्या जाती सोडल्या, तर इतरांना हिंदू धर्मात काय स्थान आहे, हे विचारले तर ही धार्मिक संकल्पना मांडणाऱ्यांची पंचाईत होते. त्यांना उत्तर देता येत नाही. एवढेच नाही, तर आजवर हिंदुत्व म्हणजे नेमके काय, हेदेखील कुणाला नेमकेपणाने सांगता येत नाही.
हिंदुत्व आणि भारतीयत्व ही एक संकल्पना आहे की निराळी, याबाबतही या गटात संभ्रम आहे. तोच संभ्रम लोकांच्या मनात निर्माण करायचा आणि त्याचा राजकीय हेतूने वापर करून आपले सत्ताहित जोपासायचा या गटाने कायम प्रयत्न केला. त्यात त्यांना यशदेखील आले.
गेल्या पन्नास-साठ वर्षांतील राजकारण आणि समाजकारण याच प्रकारच्या सांस्कृतिक संभ्रमात पोसले गेले. त्यातून येथे अनेक वैचारिक गट तयार झाले; पण गटच ते. त्यामध्ये एकप्रकारचे विखुरलेपण आहे. त्या विखुलेपणातून विरोधाने जन्म घेतला आणि विरोधातून वैमनस्य निर्माण झाले. या गटांना आपण वैचारिक गट असे म्हणतो; मात्र ते वैचारिक आहेत की आत्मस्तोमातून निर्माण झालेले कट्टरतावादी, हे नेमकेपणाने सांगता येत नाही.
कारण त्यांच्या काम करण्याच्या पद्धती निराळ्या आहेत. लोकशाही नावाच्या व्यवस्थेने निर्माण केलेल्या प्रश्नांमधून या अनेक गटांची निर्मिती झाली. काहींना त्या प्रश्नांची उत्तरे गवसली तर काही अजूनही प्रश्नांच्या गुंत्यात आहेत. ज्यांचे प्रश्न धार्मिक आहेत, त्यांना कुठल्याही मुद्द्यांवर विवेकी एकमत करता आले नाही. त्यांचा साधा विचारही तर्कशुद्ध शेवटापर्यंत येऊ शकला नाही.
कायम प्रश्नांच्या गुंत्यात अडकणाऱ्या आपल्या याच गटाला तर्कशुद्ध ज्ञानार्जन करायचे असेल, तर त्यांनी फक्त ९३ मिनिटे द्यावीत. गेल्या अनेक वर्षात सोडवता आले नाहीत, ते प्रश्न सहज सुटतील. गुंते सुटे होत जातील. विरोधाची जळमटे नाहीशी होतील. क्लेशदायक विचारांना विवेकाचे कोंब फुटतील आणि धार्मिक हिंसेचे मळभ हवेत विरून जाईल. हे सर्व काही शक्य आहे. आज ते तुम्हाला कठीण वाटत असेल कदाचित; पण त्या ९३ मिनिटांनंतर ते अवघड सोपे वाटायला लागेल; पण त्यासाठी तुम्हाला ‘आत्मपॅम्फ्लेट’ पाहावा लागेल.
भारताची स्वातंत्र्याची चळवळ असो किंवा सोवियत क्रांतीचा रोमहर्षक पट, दोन्ही ठिकाणी एक गोष्ट कायम आहे. या क्लेशदायक हुकूमशाही राजवटीचा शेवट येण्यासाठी तिथल्या नेत्यांना, सर्वसामान्य लोकांना खुप मोठ्या प्रमाणात स्वार्थत्याग करावा लागला. त्या त्यागाचे फलित म्हणजेच त्या त्रासापासून स्वातंत्र्य, असा त्याचा अर्थ; पण स्वार्थत्यागातून आलेले स्वातंत्र्य टिकवताना तुम्हाला सत्तेची लालसा वाटायला लागली की ते लोक पुन्हा तुमच्या स्वातंत्र्यावरच बंधने आणायला लागतात.
त्याचे मूळ तुमच्या जातीत आणि धर्मात शोधायला लागतात. पुढच्या पिढीसाठी जो समाजरचनेचा पाया त्यातून रचला जात असतो, तोच धार्मिकतेवर आधारलेला असला, की मग इतर गोष्टींचा विचारच करण्याची गरज पडत नाही. पिढी भरकटली जाते. विवेकशून्य होते. ‘आत्मपॅम्फ्लेट’मध्ये लेखकाने ही सर्व जातकोडी फार भाबडेपणाने सोडवण्याचा एक अचाट प्रयत्न केला आहे. आजवरच्या कित्येक लेखकांना, समाजवादी म्हणवणाऱ्यांना, तत्त्वचिंतकांना जे जमले नाही, ती धार्मिकतेची पोलादी भिंत या एका चित्रपटाने आपल्या छातीवर अत्यंत नेटाने पेलली आहे.
आपल्यामध्ये असलेली धार्मिक विभागणी ही केवळ धर्माधारित आहे की जाताधारित, हे कोडेसुद्धा आपल्याला अजून सुटलेले नाही. आज आहे त्या व्यवस्थेत ते सुटायची सोयही नाही; पण ऐेंशी-नव्वदच्या दशकातील पिढीने ती कोडी ‘आत्मपॅम्फ्लेट’ सांगतो त्या भाषेत सोडवायचा प्रयत्न केला असता तर केवळ ‘भावांनो...’ या एका शब्दात सारे समाजसुख सामावले गेले असते.
एकंदरीतच काय, तर आपल्या पूर्वीपासून असलेल्या आणि आपण निर्माण केलेल्या अशा दोन्ही प्रश्नांची उत्तरे आपल्यालाच शोधायची असतात. त्यासाठी विवेक असावा लागतो. मुळात आपण एकमेकांशी कुठल्या ना कुठल्या तरी धाग्यात बांधलेले आहोत, याची जाणीव असायला लागते. परेश यांनी या कथेत आपली प्रेमकथा आणि मैत्री या दुहेरी संबंधांच्या मर्मबंधातून सामाजिक संवेदनेची जाणीव सुदृढ करण्याचा प्रयत्न केला आहे.
लोकांना गोष्टी समजावून सांगायच्या असतील तर त्या साध्या सोप्या असाव्या लागतात. त्यासाठी गोष्ट लागते पण त्या गोष्टीचा पट हा सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक व्यवस्थांच्या फुटपट्टीत बसवण्याचे काम अवघड असते. त्यातही धार्मिक गुंता सोडवणे, हे तर मोठे महाकठीण काम; पण परेश यांनी पुन्हा एकदा आपल्या आशयघन मांडणीतून स्वत:चे वेगळेपणे सिद्ध केले आहे.
धार्मिक दंभाच्या, सामाजिक अनियंत्रणाच्या आपल्या रचनेत समाजाच्या फुटक्या डोळ्यात अंजन घालण्याचे काम हा चित्रपट करतो. मात्र ते अतिशय अवघड काम करताना कुठेही विद्वेशाची, अविवेकाची गरज पडत नाही. तुमच्या मनातल्या अंतरंगावर घटनांचा पट उलगडत अत्यंत मर्मभेदी संवेदनांची छाप सोडली जाते.
मी चड्डीत शू करणे बंद केले आणि भारताने वर्ल्डकप जिंकला, हे सांगताना नव्वदीच्या दशकात एका नव्या युगाकडे भारताची वाटचाल होत असल्याचे लेखक सूचित करतो. सचिनच्या क्रिकेटमधील पदार्पणाची तो मोठ्या शिताफीने आपल्या प्रेयसीने आपला हात पकडण्याशी सांगड घालतो.
वैयक्तिक आयुष्य जगताना आपल्या आयुष्य पटलावर घडणाऱ्या घटना, घडामोडी आपल्या आयुष्याशी किती सुसंगत असतात, त्याचे कसे अर्थ काढले जातात; किंबहुना त्यातून प्रश्नच निर्माण केले जात असताना लेखक मात्र प्रत्येक घटनेतून स्वत:चे समाजाकडे बघण्याचे वेगळेपण अधोरेखित करतो.
कथेतील पात्राच्या नावाच्या क्रमानुसार परीक्षेला बसण्याची जागा त्याच्या प्रेयसीच्याच वर्गात येणार असते; मात्र बेंडे आणि गोखलेंच्या मध्ये दामले येतात, हा एक संवाद कित्येक वर्षाच्या जाती-धर्मांच्या लढायांच्या मुस्काटात सणसणीत चपराक हाणतो. दलित की नवबौद्ध, म्हणजे जात की धर्म हा पेचसुद्धा चित्रपटात अत्यंत विस्मयकारकरीत्या चितारण्यात आला आहे.
लेखकाने आपण कुठल्या प्रकारच्या व्यवस्थेचे चित्रण करतो आहोत, याचा नीट विचार करून ही कथा रचलेली असावी. त्यामुळे त्यातून द्यायचा तो योग्य सामाजिक संदेश दिला गेला आहे. योग्य वयात प्रश्नांची योग्य उत्तरे मिळाली किंवा शोधली गेली, तर त्याचा किती सकारात्मक परिणाम होऊ शकतो, हे परेश यांनी फारच उत्तमरीत्या दाखवून दिले.
मागे स्वातंत्र्यचळवळीतही समाज ढवळून निघाला होता ना, असा एकूण किती वेळा समाज ढवळून निघतो, हा चित्रपटातील संवाद फारच मर्मभेदी आहे. आपण ज्या समाजात राहतो, वावरतो तो समाज कसा आहे, त्यात होणाऱ्या घटनांचे पडसाद कसे उमटतात, त्यातून काय संदेश घ्यायचा किंवा द्यायचा असतो आणि त्यातही मानवी नात्यांची वीण घट्ट असली, तर त्यावर किती चांगला उपाय शोधला जाऊ शकतो, हे या चित्रपटातून ठसवले जाते.
माझ्यासारख्या एवढ्याशा माणसाचे चरित्र, आत्मचरित्र नसते, हे मला माहिती आहे. त्यामुळे हे चरित्र नसून ‘आत्मपॅम्फ्लेट’ आहे हे सुरुवातीलाच स्पष्ट होते. चित्रपट पाहण्यापूर्वी मात्र हे शीर्षक तुमच्या मनात घोळ घालते. असंख्य प्रश्न उपस्थित करते; चित्रपट सुरू झाल्यानंतर मात्र त्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर मिळायला सुरुवात होते. आपल्याला जात किंवा धर्माच्या रंगात रंगवणारी मेंढुरपाक कृती हे या चित्रपटातला परमोच्च बिंदू ठरतो.
जन्मापासून मृत्यूपर्यंत आपण कुठल्या जाती, धर्मात कसे अडकतो किंवा अडकवले जातो त्या विलक्षण कृतीला लेखकाने मेंढुरपाक नाव दिले आहे. ते अत्यंत समर्पक आहे. लेखकाचा जन्म होतो आणि जनता पार्टीचे सरकार पडते... परेश यांच्या कथाकथनाच्या हटके अंदाजाने हा चित्रपट तुमची कथा आणि सामाजिक घटनांशी कायम संगत करत असतो. योग्य वयात जर या सामाजिक घटनांचा आपल्याला योग्य अर्थ लावता आला किंवा त्यामागची कारणे समजली, तर आयुष्य किती सुकर होऊ शकते, हे या चित्रपटाने फारच विस्मयकारकरीत्या मांडले आहे.
rahulgadpale@gmail.com
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.