Insulin 
सप्तरंग

इन्शुलिनची शताब्दी!

राहुल गोखले saptrang@esakal.com

लिओनार्ड थॉम्प्सन या मधुमेह असणाऱ्या चौदा वर्षांच्या कॅनडियन मुलाला जगातील पहिलेवहिले इन्शुलिन १९२२ च्या जानेवारीत टोचण्यात आले. या मुलाचे वजन होते अवघे पासष्ट पौंड आणि मधुमेहामुळे तो कोमात जाण्याची आणि त्यातून त्याचा मृत्यू ओढविण्याची शक्यता दाट होती. अशा स्थितीत त्याला इन्शुलिन टोचण्यात आले. अर्थात त्या पहिल्या इंजेक्शनमध्ये शुद्धता कमी असल्याने त्याची परिणामकारकता कमी होती. मात्र अधिक शुद्ध इन्शुलिनचे इंजेक्शन त्याच मुलाला पुन्हा काही दिवसांत टोचण्यात आले. इन्शुलिनची किमया सर्वांच्या दृष्टीस पडली. लिओनार्डची प्रकृती सुधारली आणि पुढे तो इन्शुलिनच्या आधाराने तेरा वर्षे जगला. त्याचा मृत्यू झाला तो न्यूमोनियाने. इन्शुलिनची शरीरातील निर्मिती बाधित झाली की केवळ मधुमेहच जडतो असे नाही; त्याचे विपरीत परिणाम पूर्ण शरीरावर होऊ लागतात आणि डोळ्यापासून हृदयापर्यंत सर्वच अवयवांवर त्याचे विपरीत परिणाम दिसायला लागतात. रुग्णाच्या जिवावर देखील बेतू शकते. तेंव्हा अशा कोट्यवधी रुग्णांसाठी इन्शुलिनचा शोध म्हणजे नवसंजीवनी ठरली आहे. त्या शोधाचे शताब्दी वर्ष यंदा जगभर साजरे होत आहे. 

विज्ञान जगतातील जे महान शोध मानले जातात त्यात इन्शुलिनच्या शोधाचाही समावेश आहे. फ्रेडरिक बॅंटिंग, चार्ल्स बेस्ट, जे जे मॅकलॉइड आणि जेम्स कॉलिप यांना या शोधाचे श्रेय जाते. टोरोंटो विद्यापीठाचा पदवीधर असणारा बॅंटिंग आपल्या एका व्याख्यानासाठी काही टिपणे काढीत होता. व्याख्यान स्वादुपिंड या विषयाशी निगडित असल्याने त्याच्या डोक्यात यावरील संशोधनाची एक कल्पना चमकून गेली आणि त्याने डॉ एफ जी म्युलर यांचा सल्ला मागितला. म्युलर यांनी बॅंटिंगला जे जे मॅकलॉइड यांची भेट घेण्याची सूचना केली. 

मॅकलॉइड हे मूळचे स्कॉटलंडचे असले तरी टोरोंटो विद्यापीठात ते शरीरविज्ञान विषयाचे प्रमुख म्हणून कार्यरत होते आणि कर्बोदकांचे चयापचय हा त्यांचा संशोधनाचा प्रमुख विषय होता. आपल्या कल्पनेवर आधारित प्रयोग करण्यासाठी संशोधन सुविधा टोरोंटो विद्यापीठात मिळावी म्हणून बॅंटिंगने मॅकलॉइड यांना विनंती केली. मॅकलॉइड सुरुवातीस राजी नव्हते; पण उन्हाळ्यात बॅंटिंगने काय ते प्रयोग करावे एवढी मुभा मॅकलॉइड यांनी दिली. ते साल होते १९२१. सुरुवातीचे प्रयोग हे कुत्र्यांमधून इन्शुलिन मिळवायचे आणि मधुमेही स्थिती असणाऱ्या कुत्र्यांमध्ये ते टोचून त्याच्या परिणामाचे निरीक्षण करायचे या स्वरूपाचे होते. कालांतराने अन्य काही प्राण्यांचा वापर त्यासाठी करण्यात आला. बॅंटिंग करीत असलेल्या संशोधनात त्याचा प्रमुख सहायक होता चार्ल्स बेस्ट. हा एका डॉक्टरचा पुत्र होता आणि टोरोंटो विद्यापीठात अध्ययन करीत होता. वास्तविक मॅकलॉइडने बॅंटिंगला सहायक म्हणून दोन विद्यार्थी दिले. मात्र बॅंटिंगला एकच सहायक हवा होता. तेंव्हा नाणेफेक करून त्यातून निवड झाली ती बेस्टची. बेस्ट विद्यार्थी होता; पण त्याची त्या क्षेत्रातील जाण अफाट होती. हे सर्व प्रयोग केवळ क्लिष्ट होते असे नाही तर वेळखाऊही होते; मात्र बॅंटिंग आणि बेस्ट यांनी परिश्रमपूर्वक हे प्रयोग केले आणि जेंव्हा त्या प्रयोगांची उत्साहवर्धक निरीक्षणे मॅकलॉइडला सांगण्यात आली तेंव्हा त्यालाही त्या संशोधनात स्वारस्य निर्माण झाले.

मॅकलॉइड हा विद्वान संशोधक होता आणि त्यामुळे प्रयोगांना अचूक दिशा कशी द्यायची हे काम त्याने चोखपणे बजावले. त्या तिघांच्या जोडीला जेम्स कॉलिप आला. एका पाठ्यवृत्तीवर तो प्रवास करीत असताना त्याला बॅंटिंग आणि बेस्ट यांच्याबरोबर काम करण्याचे निमंत्रण मिळाले.  

इन्शुलिन वेगळे करण्यात यश येत असले तरी ते शुद्ध स्वरूपात मिळविणे हे गरजेचे होते कारण तसे झाले तरच ते मानवी रुग्णांवर विपरीत परिणाम न करता उपयुक्त ठरणार होते. कॉलिपवर ती जबाबदारी टाकण्यात आली. या चौघा संशोधकांची जिद्द, चिकाटी, कल्पकता आणि ज्ञान यामुळे इन्शुलिन वेगळे करण्यात आणि ते मधुमेही रुग्णांना टोचण्याच्या अवस्थेत आले. 

इन्शुलिन किंवा स्वादुपिंडाचा अर्क (पँक्रॅऍटीक एक्स्ट्रॅक्ट) मग अनेकांना देण्यात आला. टेडी रायडर हा पाच वर्षांचा रुग्ण मुलगा पहिल्या काही लाभार्थींपैकी एक होता. तो पुढे या इन्शुलिनच्या साह्याने एकाहत्तर वर्षे जगला. लक्षावधी मधुमेही रुग्णांना जीवनदान देणाऱ्या या इन्शुलिनच्या क्रांतिकारक शोधाचा सन्मान म्हणून १९२३ चे वैद्यकशास्त्राचे नोबेल पारितोषिक बॅंटिंग आणि मॅकलॉइड यांना जाहीर झाले. तथापि बॅंटिंगने ते पारितोषिक स्वीकारण्यास नकार दिला. याचे कारण त्या सन्मानार्थींमध्ये बेस्ट आणि कॉलिप यांच्या नावांचा समावेश नव्हता. श्रेयासाठी चढाओढ स्वाभाविक मानली जाण्याच्या काळात श्रेय सर्वांना मिळाले पाहिजे हा बॅंटिंगचा युक्तिवाद आणि भूमिका विरळाच. तथापि पारितोषिक समितीने बॅंटिंगची मागणी पूर्ण केली नाही. अखेर बॅंटिंगने पारितोषिक स्वीकारले; मात्र त्यातील निम्मी रक्कम त्याने स्वतः बेस्टला दिली. त्यावरून प्रेरणा घेऊन मग मॅकलॉइडने आपल्या पारितोषिकातील निम्मी रक्कम कॉलिपला दिली. मधुमेहाशी निगडित संशोधनात सहभागी संशोधकांमधील नात्यातील हे माधुर्य आणि त्याग अनोखा. 

या शोधानंतर साहजिकच इन्शुलिनची निर्मिती कारखान्यात मोठ्या प्रमाणावर कशी करायची याची चर्चा सुरु झाली. तेंव्हा या चौघांना मिळालेले अमेरिकन पेटंट त्यांनी टोरोंटो विद्यापीठाला प्रत्येकी अवघ्या एक डॉलरला विकून टाकले. ''इन्शुलिनवर माझा हक्क नाही, ते साऱ्या जगाचे आहे'' असे बॅंटिंगने म्हटले हेही दुर्मिळ. या संशोधनानंतर हे चौघेही आपापल्या वेगळ्यावगेळ्या वाटेने पुढे गेले. बॅंटिंगचा १९४१ मध्ये इंग्लंडला जात असताना विमान अपघातात मृत्यू झाला. 

जगभरात मधुमेहाचे पन्नासेक कोटी रुग्ण आहेत. पैकी सुमारे आठ कोटी रुग्ण भारतात आहेत. मधुमेहाचा विपरीत परिणाम डोळ्यांच्या, मूत्रपिंडाच्या, हृदयाच्या साधारण क्रियाशीलतेवर होत असतो. कधी अंधत्वही येऊ शकते. काहीदा जखम विकोपाला जाऊन पाय किंवा पायाचा काही भाग कापावा लागतो. तेंव्हा मधुमेहाची गंभीरता लक्षात येईल अशीच. सर्वच मधुमेहींना इन्शुलिन घ्यावे लागते असे नाही. मात्र ज्यांच्या शरीरात इन्शुलिन तयार होण्याची क्रियाच मंदावली किंवा थंडावली आहे अशा लक्षावधींसाठी इन्शुलिन म्हणजे जीवनदानच. या इन्शुलिनच्या शोधाची शताब्दी म्हणूनच जगभरात साजरी केली जात आहे. कारण या शोधाने गेल्या शंभर वर्षांत कोट्यवधींचे प्राण वाचविले आहेत असे नव्हे तर त्यांचे आयुष्य वाढविले आहे. असे शोध साजरे करणे म्हणजे त्या संशोधकांचा गौरव असतोच; पण एका अर्थाने मानवाने त्यांना दिलेली कृतज्ञतापूर्वक मानवंदना देखील असते.

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मालाडमध्ये भाजपाचे उमेदवार विनोद शेलार आघाडीवर

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: राहुरी विधानसभा मतदारसंघात प्राजक्त तनपुरे ३४९ मतांनी आघाडीवर

Maharashtra Assembly Election Result : महायुती सत्तास्थापनेजवळ; महाविकास आघाडीचीही कडवी झुंज

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Maharashtra Assembly 2024 Result : फडणवीस की पटोले; ठाकरे की शिंदे; काका की पुतण्या? इथे पाहा सर्वांत वेगवान आणि अचूक निकाल LIVE Video

SCROLL FOR NEXT