हैतीच्या इस्तेएर गावाचा एक रहिवासी क्लॅर्विओस नारसिसे हा त्याच्या मृत्यूनंतर २० वर्षांनी आपल्या गावात पोहचला. १९८२ मधली ही घटना. हे आक्रीत पाहून गावात आणि परिसरात एकच खळबळ उडाली.
- राहुल हांडे handerahuk85@gmail.com
हैतीच्या इस्तेएर गावाचा एक रहिवासी क्लॅर्विओस नारसिसे हा त्याच्या मृत्यूनंतर २० वर्षांनी आपल्या गावात पोहचला. १९८२ मधली ही घटना. हे आक्रीत पाहून गावात आणि परिसरात एकच खळबळ उडाली. ज्याचा दफनविधी गावातील लोकांनी स्वतः केला होता, तो माणूस २० वर्षांनी त्यांच्यासमोर येऊन उभा राहतो, ही गोष्ट कोणाचीही गाळण उडवू शकते. गावकरी धक्क्यातून सावरल्यानंतर नारसिसेने आपल्या मृत्यूची आणि परत येण्याची जी कहाणी सांगितली, ती अचंबित करणारी होती.
नारसिसेने सांगितलं, ‘एक दिवस माझी प्रकृती अचानक बिघडली. माझ्या बहिणीने मला दवाखान्यात भरती केलं. माझी प्रकृती खालावत चालली होती. मला वाटत होतं की, माझी फुप्फुसं निकामी झाली आहेत आणि माझ्या हृदयाने काम करणं बंद केलं आहे. त्याचबरोबर माझ्या पोटात प्रचंड दाह होत होता. अचानक मला जाणवलं की, माझं शरीर थंड पडलं आहे. डॉक्टरांनी मला मृत घोषित केलं आणि माझं मृत्यू प्रमाणपत्र बनवून माझ्या बहिणीकडे दिलं. हॉस्पिटलमध्ये माझे काही मित्र आले होते आणि ते शोक प्रकट करत होते, मला हे सर्व काही समजत होतं.
मात्र, माझ्यात हालचाल करण्याची किंवा बोलण्याची शक्तीच उरली नव्हती. दिवस मावळण्यापूर्वी मला दफन करण्यात आलं. माझ्यावर टाकल्या गेलेल्या मातीचा आवाजदेखील मी ऐकला होता. रात्री दोन माणसांनी माझी कबर खणली आणि मला बाहेर काढलं. त्यांनी कबर पुन्हा होती तशी करून दिली. मला दोरखंडाने बांधून एका शेतात नेण्यात आलं. तिथे शंभरपेक्षा अधिक लोक काम करत होते. ते सर्व झोम्बी वेठबिगार होते. जगासाठी आम्ही सर्वजण मृत होतो. जादूटोणा करणारे तांत्रिक आम्हाला रात्रं-दिवस काही अमली पदार्थ देत होते, त्यामुळे आमची बुद्धी आणि विवेक यांनी काम करणं बंद केलं होतं. अशी दोन वर्षं गेली. एके दिवशी शेताचा सुपरवायझर मजुरांना अमली पदार्थांची मात्रा देण्यास विसरला, त्यामुळे शुद्धीत आलेल्या आम्हाला स्वतःच्या अवस्थेची जाणीव झाली आणि आम्ही विद्रोह केला.
आम्ही त्या सुपरवायझरची हत्या केली व तेथून पलायन केलं. तेथून पळाल्यावर माझी वैद्यकीय तपासणी करण्यात आली, तेव्हा डॉक्टरांनी निष्कर्ष काढला की, मला खाण्यातून टेट्रोडॉक्सिन व ब्युफोटॉक्सिन ही रसायनं दिल्यामुळे मी कोमाच्या अवस्थेत गेलो होतो. त्यानंतर मला मृत घोषित करणं, दफन करणं आणि झोम्बी म्हणून वेठबिगारी करून घेणं हा सर्व प्रकार घडला. मी मुक्त झालो तरी गावाकडे परतलो नाही, कारण माझा भाऊ अजून जिवंत होता. माझा भाऊसुद्धा या प्रकारात सहभागी असल्याने, तो मला धोका करू शकत होता.’
नारसिसेच्या ह्या कथेतून आज भयपटांच्या जगात धुमाकूळ घालत असलेलं ‘झोम्बी’ हे समकालीन भूत आपलं लक्ष वेधून घेतं. या घटनेची सत्यासत्यता किंवा त्याच्यातील सत्याचं प्रमाण याबरोबरच झोम्बी ही संकल्पना आणि तिचा विविधांगी वापर याविषयी अनेक प्रश्न मनात निर्माण होतात.
भूत-पिशाच्च या संकल्पना प्राचीन काळापासून माणसाला ईश्वराप्रमाणेच आकर्षित करत आलेल्या आहेत. विशेषतः आधुनिक काळात चित्रपटांनी लोककथा, दंतकथा इत्यादींमधील भूतांना विविध काळात, विविध रूपांत साकार केलं. तत्पूर्वी साहित्यात काही प्रमाणात ही भूतं नाचायला सुरुवात झाली होती. त्यानंतर दूरदर्शन मालिका, कॉमिक्स, कार्टून्स यांमध्येदेखील भूतांचा संचार वाढला. या सर्व मनोरंजन प्रकारांमध्ये विविध प्रकारांची व नावांची भूतं विविध काळात सेलिब्रिटी ठरली आहेत. काळानुरूप भयरसाची निर्मिती करण्यासाठी भूतांचा अवतार व वर्तन बदलत गेलं. आजचा काळ भूत कुळातील झोम्बींचा आहे. झोम्बी हा शब्द सर्वप्रथम १८१९ मध्ये ब्राझिलियन कवी रॉबर्ट साउथी यांच्या काव्यात ‘झुम्बी’ नावाच्या आफ्रो-ब्राझिलियन बंडखोर नेत्यासंदर्भात आलेला आहे. ऑक्सफर्ड इंग्लिश डिक्शनरीनुसार या शब्दाची उत्पत्ती मध्य आफ्रिकेतील कोंगो भाषेत झालेली आहे. झोम्बी या संकल्पनेचा उगम मात्र हैती बेटांवरील ‘वूड’ नावाच्या धार्मिक आस्थेत आढळतो.
‘किमबुंडू-ते-पोर्तुगीज’ शब्दकोशाच्या आधीच्या आवृत्तीत झोम्बी म्हणजे आत्मा आणि नंतरच्या आवृत्तीत जिंवत माणसांना त्रास देण्यासाठी पृथ्वीवर भटकणारा आत्मा अशी व्याख्या केलेली दिसते. हैतीयन लोककथा व हैतीयन वूड धर्माच्या संकल्पनेनुसार झोम्बी हे एक मृत शरीर आहे, जे विविध पद्धतींद्वारे पुनरुज्जीवित केलं जातं. १९२९ मध्ये डब्लू. बी. सीब्रूक यांच्या ‘द मॅजिक आयलंड’ ह्या कादंबरीमुळे हैतीयन झोम्बी सर्वप्रथम पाश्चात्त्य जगासमोर आले.
विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात १९६८ मध्ये जॉर्ज ए. रोमेरो यांचा ‘नाइट ऑफ द लिव्हिंग डेड’ हा डेव्हिड मॅथसेन यांच्या ‘आय एम लिजेंड’ (१९५४) या कादंबरीपासून प्रेरित चित्रपट झळकला आणि झोम्बी पडद्यावर चालू लागले. मात्र चित्रपटात या भूतांचा उल्लेख ‘झोम्बी’ असा करण्यात आलेला नव्हता. १९७४ मध्ये जॉर्ज रोमेरो यांनी आपल्या चित्रपटाच्या सिक्वेलमध्ये एका संवादात सर्वप्रथम ‘झोम्बी’ शब्द वापरला. मायकेल जॅक्सनने १९८३ मध्ये आपल्या एका म्युझिक व्हिडिओ थ्रिलरमध्ये झोम्बी संकल्पनेचा समावेश केलेला दिसतो. यानंतर काही काळ झोम्बी शांत होते. १९९० च्या दशकात ‘रेसिडेंट इव्हिल’ आणि ‘द हाउस ऑफ द डेड’ या व्हिडिओ गेम्समुळे झोम्बी पुन्हा सक्रिय झाले. त्यानंतर बायो झोम्बी (१९९८)आणि व्हर्सेस (२०००) सारख्या कमी बजेटच्या आशियायी चित्रपटांनी झोम्बीची सुनामी आली, जिच्यामध्ये इतर भूतं वाहून गेली. हैतीचे झोम्बी मराठीतील झोम्बिवली चित्रपटामार्फत मराठी मातीत वावरू लागले.
आज झोम्बी आधुनिक कलेच्या विविध दालनांमध्ये विविध रूपांत वावरताना दिसतात. अनेकवेळा झोम्बी समानतेसाठी संघर्ष करणाऱ्या गटांसाठी पर्याय म्हणून वापरले जातात, तसंच रोमँटिक नातेसंबंध, लैंगिक मुक्ती व सामाजिक बंधनं तोडण्याचं रुपक म्हणून दाखवले जातात. कारण झोम्बी अज्ञात शक्तीच्या अधीन असतात आणि सामाजिकतेपासून मुक्त असतात. कलात्मक क्षेत्रात आज झोम्बी केवळ भयरसाच्या निर्मितीसाठी वापरले जात नाहीत, तर अन्याय, शोषण, असमानता इत्यादीविरुद्ध संघर्षाचं प्रतीक म्हणूनदेखील वावरताना दिसतात. याचं कारण हैतीच्या कृष्णवर्णीयांच्या शोषणात सापडतं. हैतीच्या वूड धार्मिक संकल्पनेत व लोककथांमध्येदेखील वाईट व चांगले अशा दोन्ही प्रकारच्या झोम्बींचं दर्शन होतं. हैतीच्या लोकांना तीनशे वर्षं ज्या अमानवी गुलामीचा सामना करावा लागला, त्या दुःखांवरचा उतारा म्हणून झोम्बी निर्माण झाले; परंतु शोषितांच्या या कल्पनेचा उपयोग शोषकांनीदेखील करून घेतला. कारण झोम्बी अत्यल्प अन्नावर अथक काम करू शकतात, याची जाणीव आपल्याला क्लॅर्विओस नारसिसे याच्या कथेतून झाल्याशिवाय राहत नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.