का आटपाट नगरात एक गरीब ब्राह्मण रहात होता.. कनौजचा - घाशीराम सावळदास!...
- राज काझी
का आटपाट नगरात एक गरीब ब्राह्मण रहात होता.. कनौजचा - घाशीराम सावळदास!... बायको, मुलीच्या तोंडी दोन घास तरी पडावेत म्हणून दारिद्र्याने पिचलेल्या घाशीरामने शेवटी पुण्याची वाट धरली. पुण्यातही साजेसं काही हाती लागलं नाही म्हणून नायकिणींच्या वस्तीत, बावन्नखणीत गुलाबी नायकिणीकडं गाण्यात झील धरण्यापासून खरकटी भांडी घासण्यापर्यंत पडेल त्या कामाची चाकरी त्याने पत्करली.
उत्तर पेशवाईच्या त्या काळात बावन्नखणीत मोठी बहार अन् बरकत होती. यथातथातल्यांपासून मानमरातबीतल्यांपर्यंतच्या समस्तांचा राबता मोठाच!.. नित्याच्या रंगसमयी खुद्द नाना फडणवीस एकदा मेण्यातून गुलाबीच्या घरी पायउतार झाले आणि मदाने की मद्याने कोण जाणे कसा; पण स्वारींचा पाय मुरगळला.
कधी नव्हे ती घाशीरामाची खूषनशिबीच म्हणायची की, तो त्या क्षणी जवळ होता. चपळाईने सामोरं येत त्याने श्रीमंतांचा तळपाय आपल्या तळहाती झेलला, पाठीवरही वागवला. प्रसन्न होऊन श्रीमंतांनी गळ्यातली मोत्याची सर घाशीरामला बक्षिसी फेकली !.. पण गुलाबी नायकिणीने ती त्याला लाभू दिली नाही. बऱ्याबोलाने नाही दिली तर बळाने काढून घेतली व मारहाणीनंतर त्याला रस्त्यावर टाकून दिलं.
पुढं ‘रमण्या’च्या आशेने पुण्याच्या अन्य ब्राह्मणांच्या रांगेत तोही उभा असताना त्याच्यावर चोरीचा आळ आला आणि नाहक पुन्हा बेहिशोबी मार खावा लागला. कोतवाली कोठडीत तर छळ-जुलमाची हद्द झाली. पुण्याच्या वेशीबाहेर फेकला गेल्यावर तो आक्रंदून उठला – ‘‘आऊंगा..
आऊंगा पुणेमे फिरसे आऊंगा.. हूँ कनौजका बम्मन लेकिन अब हो गया हूँ शूद्र.. अब हूँ मैं शैतान. अंदरसे शैतान बाहरसे सुव्वर!.. मेरे साथ सबको सुव्वर बनाऊंगा..’’ तळतळत त्याने प्रतिज्ञाच केली – ‘‘इस पुणेको सुव्वरोंका राज बनाऊंगा ! ’’
पुण्यातल्या ब्राह्मणांना धडा शिकवण्यासाठी हाती सत्ता हवी हे पक्कं गाठीशी बांधून घाशीराम पुन्हा परतला. नानांच्या भेटीवेळी बक्षिसी गमावली असली तरी एक गोष्ट त्याने नामी हेरली होती, नानांचा बाईलवेडेपणा !
घाशीराम सूडाच्याकामी आपल्या पोटच्या पोरीला वापरतो. नानांच्या बुभुक्षित नजरेस पडावी म्हणून तो कोवळ्या अन् देखण्या ललितागौरीला गणपती आगमनाप्रसंगी वाड्यावर नेतो. त्याचा हा बाण वर्मी लागतो.
गौरीच्या दर्शनाने घायाळ नाना तिच्या संगासाठी वेडेपिसे होतात. त्यांना या ‘खिंडी’त गाठून घाशीराम पुण्याची कोतवाली आपल्या नावे लिहून घेतो आणि बदल्यात आपली मुलगी त्यांच्या हवाली करतो. बेभान मनात सूड आणि हातात कोतवालीचा आसूड असलेला घाशीराम पुण्याला वेठीसच धरतो. नवनवे निर्बंध लादत सरसकट सर्वांचं जगणं मुश्कील करून सोडतो.
बाहेरख्यालीपणावर अंकुश ठेवण्याच्या नावाखाली रात्री-अपरात्री स्वतःच्याच बिऱ्हाडी नवरा-बायकोलाही आपले संबंध वैध सिद्ध करण्याची वेळ येते. बाळंत होण्यापासून प्रेत जाळण्यापर्यंतचं पुण्याचं अवघं जिणं घाशीराम आपल्या अमलाखाली आणतो. एव्हाना स्वतःही सत्तामदाच्या अमलाखाली गेलेला घाशीराम एकेकाळी आपल्यावरही गुजरल्या तशाच प्रसंगाची जीवघेणी वेदना विसरत एका पोरगेलेशा ब्राह्मणाला चोरीचा आळ खोटा सिद्ध करण्यासाठी ‘दिव्या’चा पेटता गोळा तळहातावर घ्यायला लावतो.
आपल्यावरच्या जुलमांना अटकाव घालण्यासाठी तडफडण्याची पाळी आता पुण्यावर येते.. आणि तशी संधीही लवकरच येते.परगावच्या कुणा ब्राह्मणांकडून अजाणतेपणी काही चूक घडते आणि त्यांना कोठडीत डांबलं जातं.
अन्न-पाणी-हवेविना गुदमरून ते मृत्युमुखी पडतात. नानासाहेबांकडे याची दाद व घाशीरामच्या देहदंडाची मागणी केली जाते. त्याच वेळी नानासाहेबांच्याही समोर उभ्या प्रसंगातून बाहेर पडायची ही आयती वाट चालून येते.
कोवळ्या वयाच्या गर्भारपणात ओढवलेलं गौरीचं मरण विनासायास मार्गी लागतं. नाना घाशीरामच्या मृत्यूचं फर्मान जारी करतात. चवताळल्या पिसाळल्या जमावासमोर टाकला गेलेला घाशीराम भयंकर विटंबनेनंतर दगडांनी चेचून मारला जातो. तिकडे नानासाहेब आपल्या सातव्या लग्नाच्या बोहल्यावर चढण्याच्या तयारीत असतात.
एका विशिष्ट सामाजिक, राजकीय परिस्थितीची ही निर्मिती आहे; कधीही आणि कुठंही घडू शकणारी... ‘घाशीराम’ ही एक वृत्ती असते, जिला जन्माला घालण्याची गरज वेळप्रसंगी ‘नानासाहेबां’सारख्या राजकारण्यांना पडत असते आणि प्रस्थापित समाजही त्यासाठी उपयोगी पडतो. कुठल्याही काळ किंवा संस्कृतीत हे घडू शकणारं..
इंदिरा गांधी व भिंद्रानवालेंपासून बुश आणि लादेनपर्यंत याची प्रचिती जग घेत आलं आहे ! म्हणूनच ‘घाशीराम’ हे केवळ एक नाटक किंवा रूपक राहिलं नाही, ते एक ‘सोशिओ पोलिटिकल मिथ’ बनलं.
कालाबाधित आशयसामर्थ्यामुळेच आज पन्नास वर्षांनंतरही हे नाटक कालबाह्य ठरलं नाही; पण ते विस्मृतीतही गेलं नाही याचं श्रेय निःसंशय त्याच्या प्रयोगसामर्थ्याचं ! १९७२ मध्ये १६ डिसेंबरला पुण्यात राज्य नाट्यस्पर्धेत ‘पीडीए’ने हे नाटक सादर केलं.
प्राथमिक आणि अंतिम फेरीतही परीक्षकांनी नाटकाला अगतिकपणाने पहिलं नाकारत दुसरं बक्षीस दिलं. कारण तोवरच्या नाटकांच्या रूढ आकृतिबंधांना मोडून पाडणाऱ्या या नाटकाने सामान्य आकलनाला आणि रूढ मूल्यमापनालाही आव्हान दिलं होतं !
‘घाशीराम’ लेखनापासूनच वेगळं होतं. वेगळ्या अवकाशातलं आणि संकेतांपलीकडच्या शैलीतलं. केवळ छत्तीस पानांच्या संहितेत अनेक कंस होते आणि त्यातल्या रंगसूचना दिग्दर्शकासाठी काही अलौकिक नाट्यानुभवाच्या निर्मितीसाठी आव्हान देणाऱ्या होत्या.
नाटककार तेंडुलकरांची अभिव्यक्ती अमूर्त अनवट होतीच; पण दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेलांनी त्यातली अनोखी दृश्यात्मकता आपल्या श्रेष्ठतम रंगप्रज्ञेने मंचावर ती संपूर्ण साकार केली. मानवी भिंतीतून प्रकटणाऱ्या रेखीव व प्रवाही विरचना आणि लोककला व लोकसंगीताचा प्रभावी वापर यामुळे मंचावरच्या नजाऱ्यांची नजरबंदी आणि संगीताचं संमोहन हे संयुग मंत्रमुग्ध करणारं ठरलं.
‘घाशीराम’चं तेंडुलकरांचं लेखन, डॉ. जब्बार पटेलांचं दिग्दर्शन, नानाच्या भूमिकेतला डॉ. मोहन आगाशेंचा अभिनय, ‘घाशीराम’ रमेश टिळेकर, मोहन गोखलेंनी हृदयविदारक केलेला ‘दिव्या’चा प्रसंग... नाटकाचं आणखी एक प्रबळ सामर्थ्य ठरलेलं भास्कर चंदावरकरांचं संगीत; रवींद्र साठे, चंद्रकांत काळे यांची गायकी, श्रीराम रानडेंचा ठसकेबाज ‘सूत्रधार’..
कृष्णदेव मुळगुंदांनी दिलेला पदन्यास.. नाटकाची उच्च तांत्रिक बाजू आणि चोख निर्मितीमूल्यं... सतीश आळेकर, नचिकेत पटवर्धन, समर नखाते, श्रीधर राजगुरू, आनंद मोडक यांचं योगदान... या सगळ्यांवर चर्चा करून त्यातल्या कारागिरी, कौशल्याचा आलेख मांडणं किंवा त्यातली अगणित सौंदर्यस्थळं उलगडू जाणं, हा एखाद्या किंवा काही मोजक्या लेखांच्या आवाक्यातलं नाहीच.
(डॉ. श्यामला वनारसेंनी यावर ‘घाशीराम कोतवाल : एक अभ्यास’ या एका स्वतंत्र पुस्तकात अत्यंत जाणकारीने लिहिलं आहे.) ‘घाशीराम’चा आशय हा सार्वकालिक व सार्वत्रिक आहे, हे आज पन्नास वर्षांनीही पदोपदी जाणवत राहतं आणि पन्नास वर्षांनीही ते आपल्या मनात जिवंत आहे ते त्याच्या अविस्मरणीय प्रयोगांनी. डॉ. जब्बार पटेल व त्यांच्या सहकाऱ्यांनी उभा केलेला ‘घाशीराम’चा प्रयोग हा मराठी रंगकलेचा उत्तुंग सार्वभौम आविष्कार आहे.
मराठीच नव्हे तर भारतीय रंगभूमीच्या नोंदीने ‘घाशीराम’वर जेवढं आजवर लिहिलं गेलं आहे, तेवढं ते इतर कुठल्याच नाटकाच्या वाट्याला आलं नसावं. अर्थात, त्यामागे कलाबाह्य कारणंही अधिक आहेत. ‘घाशीराम’च्या जन्मापासूनच ते वादळ निर्माण करीत आलं... कलात्मक, सामाजिक आणि राजकीयही!
नाटकात पेशवाईचं एकांगी आणि विशेषतः नानासाहेब फडणवीसांचं विकृत चित्रण आहे, या आरोपामुळे वादळं उसळत गेली. या वादातून खुद्द प्रयोगकर्ती संस्था ‘पीडीए’ फुटली. (अर्थात, या अमृतमंथनातूनच ‘थिएटर अॅकॅडमी’ हा श्रेष्ठतम रंगोन्मेष मराठी रंगभूमीला लाभला! )
नाटकाच्या पहिल्या परदेशवारीवेळी हे वादळ रौद्र आणि देशव्यापी बनलं. नंतरचा घटनाक्रम अभूतपूर्व आणि अविस्मरणीय होता. जागतिक रंगभूमीवर भारतीय रंगकलेचा ध्वज उन्नत उभारून ‘घाशीराम’ने एक अभिमानास्पद इतिहास घडवला.
‘स्विस क्लॉक’सारखी वैश्विक दर्जाची कुशल कारागिरी, असं वर्णन करूनच परदेशी माध्यमं थांबली नाहीत, तर ‘घाशीराम’ अवघ्या पश्चिमात्य रंगभूमीलाही ‘इन्स्पिरेशन’ ठरावंसं असल्याचंही त्यांनी ठणकावून सांगितलं!
तसा वस्तुपाठ तर भारतीय रंगभूमीलाही ‘घाशीराम’ने आपल्या लोककला-लोकसंगीताच्या नाट्यपूरक वापरातून व देखण्या दृश्यात्मकतेतून दिला. मराठी रंगभूमीलाही खरंखुरं संगीत नाटक बहाल केलं. युवा आणि हौशी स्पर्धात्मक मराठी रंगभूमीलाही पुढे अनेक वर्षं पुरेल अशी शैली आणि ऊर्जा दिली.
‘थिएटर अॅकॅडमी’ला ‘घाशीराम’ने केवळ जन्मच नाही दिला, तर देशापरदेशांत मोठा लौकिक व गाठीला आर्थिक बळही उभारून दिलं. त्यातून पुढे होऊ शकलेल्या उपक्रमांमधून प्रयोगशील मराठी रंगभूमीवर एक अख्खी पिढी उभी राहिली, हे ‘घाशीराम’चं योगदान अधिक ‘ऐतिहासिक’ आहे!
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.