श्रीमंत पटवर्धनांच्या आश्रयाने उभ्या राहिलेल्या ‘सीता स्वयंवर’चे प्रयोग श्रीमंतांच्या पश्चातही भावे आपल्यापरीने ‘शाकुंतल’च्या शुभारंभाच्या प्रयोगापर्यंतसुद्धा गावोगाव करत होतेच.
‘पंचतुंड नररुंड मालधर..पार्वतीश आधी नमितो..’ उच्चरवात उठणारे ‘सं. शाकुंतल’च्या नांदीचे हे शब्द आणि सूर निनादत आसमंतातल्या धूपगंधात मिसळत असताना, एकतीस ऑक्टोबर अठराशे ऐंशीच्या त्या रात्री किर्लोस्कर संगीत मंडळींच्या त्या गायक कलाकारांनाच काय खुद्द नांदीकार अण्णासाहेबांनाही हे विधिलिखित ज्ञात नसावं की, एका अनंत युगाचा हा आरंभक्षण आहे.
नटेश्वराला साद घालणारी ही नांदी मराठी रंगभूमीच्या प्राणप्रतिष्ठेचा विधिमंत्रच ठरली... त्या आधी पाच नोव्हेंबर अठराशे त्रेचाळीसच्या दिवशी विष्णुदास भावेंनी सांगली मुक्कामी ‘सीता स्वयंवर’च्या प्रयोगाने याची मुहूर्तमेढ रोवली होती.
श्रीमंत पटवर्धनांच्या आश्रयाने उभ्या राहिलेल्या ‘सीता स्वयंवर’चे प्रयोग श्रीमंतांच्या पश्चातही भावे आपल्यापरीने ‘शाकुंतल’च्या शुभारंभाच्या प्रयोगापर्यंतसुद्धा गावोगाव करत होतेच.
मंचीय नाटकाची गोडी मराठी मुलूखभर निर्माण करत भावेंनी एकापरीने ‘शाकुंतल’ च्या अनुकूल स्वागताची तजवीजच करून ठेवली होती असंच म्हणावं लागेल. अण्णासाहेब किर्लोस्कर, बरोबरीने त्यांचं शिष्यत्व मानणारे गोविंद बल्लाळ देवल,
पुढे श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर, कोल्हटकरांचे मानसशिष्य राम गणेश गडकरी, भार्गव विठ्ठल अर्थात मामा वरेरकर आदी दिग्गजांनी मृच्छकटिक, शारदा, मूकनायक, मानापमान, विद्याहरण, संशयकल्लोळ, स्वयंवर, पुण्यप्रभाव, एकच प्याला, भावबंधन,
राजसंन्यास, हाच मुलाचा बाप, संन्याशाचा संसार, भूमिकन्या सीता, सत्तेचे गुलाम... अशी एकासरस एक नाटकं देत संगीत रंगभूमीचे इमले उंच केले. संगीत नाटक लोकप्रिय केलं ते अर्थात त्यातल्या अवीट गोडीच्या पदांनी. गोविंदराव टेंबे, भास्करबुवा बखले, रामकृष्णबुवा वझे, मा. दीनानाथ, मा. कृष्णराव, केशवराव भोळे, केशवराव भोसले, छोटा गंधर्व...
अशी त्या गायक कलावंत मानकऱ्यांची मांदियाळी मोठी आहे; पण आख्यायिका बनून राहिले ते बालगंधर्व! मराठीच नव्हे तर भारतीय रंगभूमीवर बालगंधर्वांचं नाव अजरामर आहे ते त्यांच्या सौंदर्यसंपन्न स्त्रीप्रतिमेने व स्वर्गीय स्वरप्रतिभेने!
शंभर वर्षांनंतरही त्यांच्यावर तरुण पिढीला चित्रपट काढावासा वाटतो आणि तोही लोकांना भावतो, हे जनमानसावर आजही कायम असलेलं त्यांचं गारुडच की! नाटकं रचली जात असताना गाण्यांबरोबरच कथानकांची निवडही सुरुवातीपासूनच लोकआवडीचा विचार करूनच केली गेली.
सर्वसामान्य माणसाच्या मनावर पूर्वप्रभाव असणारे, आकर्षण असणारे पौराणिक विषयच मुख्यतः आधी होते, पुढे ते क्रमाने ऐतिहासिक, सामाजिक व कौटुंबिक होत गेले. पुष्पा भावे म्हणतात तसं, पौराणिक आवरणातही आधीही कौटुंबिक नाटकच होतं!
ऐतिहासिक नाटकांसंदर्भातही ‘दिवाणखान्यातला शिवाजी’ अशी मल्लिनाथी पुढे ‘रायगडाला जेव्हा जाग येते’वरही झालीच की! दुसरीकडे वरेरकरांच्या ‘भूमिकन्या सीता’ या नाटकात सीतेने थेट रामाला प्रश्न केलेले लोकांना आक्षेपार्ह वाटले होते. (व्यावसायिक नाटक म्हणजे प्रेक्षकप्रिय की प्रेक्षकशरण? हा प्रश्न बुद्धिवादी अभ्यासकांच्या चिंतेचा कायमच विषय राहिला आहे!)
स्त्री कलावंतांनाच स्त्री भूमिकांत पाहण्यासाठी रसिकांना एकोणीसशे तेहतीसपर्यंत ‘नाट्य मन्वन्तर’ची ‘आंधळ्यांची शाळा’ रंगभूमीवर येण्याची वाट पाहावी लागली. ज्योत्स्ना भोळेंनी हे मन्वन्तर घडवलं.
पुढे ‘घराबाहेर’मधून आचार्य अत्रेंनी परखड स्त्रीवादी भूमिकाही घेतली व त्याही पुढे ‘लग्नाची बेडी’त रंगभूमीवरची ‘रश्मी’फेम स्त्रीप्रतिमा केवळ धाडसीच केली नाही, तर त्यातून स्त्री वर्चस्वाची चुणूकही दाखवली!
मात्र, त्या काळाच्या पुढेमागेच बाळ कोल्हटकरांची नवाक्षरी शीर्षकांची संस्कारी नाटकंही येत राहिली, ज्यांत गडकऱ्यांच्या सिंधूचा सोसण्याचा व त्यागाचा वसा घेणारी ताई होती. गंमत अशी की, मराठी नाट्यरसिकांनी एकाच वेळी या दोन्ही प्रकारच्या नाटकांना भरभरून प्रतिसाद देत समाज अभ्यासकांना बुचकळ्यात पाडलं!..
आणिक तिढा म्हणजे, अत्रे गडकऱ्यांना गुरू मानत, तर कोल्हटकर ‘छोटे गडकरी’ मानले जात! एकोणीसशे चाळीसच्या दशकात व पुढेही आचार्य अत्रेंनी मराठी रंगभूमीला वैविध्यपूर्ण पिंड व समकालीन भान असणारी नाटकं दिली. अखिल भारतीय नाट्यविश्वात चमत्कार घडवणारं ‘तो मी नव्हेच’ लिहून आणि निर्माण करून त्यांनी आणखी एक इतिहास घडवला.
सत्य प्रकरणावर आधारित कथानक, कोर्टरूम ड्रामाचा घाट, फिरता रंगमंच आणि क्षणाक्षणाला वेगवेगळ्या रूपांत रंगभूमीवर अवतरणारा लखोबा लोखंडे अर्थात नटवर्य प्रभाकर पणशीकर... हे असं अलौकिक रसायन जमून असं एक नाटक उभं राहिलं की, हजारो प्रयोगांनंतर, कित्येक दशकांनंतर आजही ते अस्तित्वात आहे.
याच प्रभाकर पणशीकरांनी पुढे ‘नाट्यसंपदा’ काढली व मराठी व्यावसायिक नाटक महाराष्ट्रात गावोगावी पोहोचवलं. नाट्यसंपदेतूनच पुढे मोहन वाघांनी ‘चंद्रलेखा’ काढली व मराठी रंगभूमीला अधिक दिमाखदार केलं... वसंत कानेटकर ही हुकमी व्यावसायिक यशाची किल्ली आणि लेखणी या दोन्ही संस्थांच्या नाटकांमधून मराठी रंगभूमीला गवसली...
त्याचवेळी विजय तेंडुलकर ही एक विलक्षण प्रतिभा तोपर्यंत व्यवस्थित बाळसं धरलेल्या समांतर चळवळीने मराठी रंगभूमीला बहाल केली होती !... या दोघांनी मराठी नाटकाला उंचीही दिली आणि खोलीही!
तुडुंब भरलेल्या नाट्यगृहात ‘...आणि डॉ. काशिनाथ घाणेकर’ टाळ्यांच्या गजरात ही निवेदकाची घोषणा निनादण्याचाही हाच तो काळ. रसिकांचं बालगंधर्वांएवढंच अतोनात प्रेम लाभलेला मराठी रंगभूमीचा पहिला ‘सुपरस्टार’! गारंबीचा बापू, रायगडाला जेव्हा जाग येते, अश्रूंची झाली फुले, गुंतता हृदय हे... एकेक नाटक रसिकांच्या मर्मबंधात ठेवणीला आहे आजही.
कानेटकरांनी संगीत रंगभूमीलाही वर्ज्य मानलं नव्हतं. ‘मत्स्यगंधा’ आणि ‘मीरा मधुरा’ ही संगीतप्रधान पण सकस कथाबीज, वेधक रचना व प्रभावी संवाद असलेली नाटकं देत संगीत रंगभूमीला काळाबरोबर ठेवण्याचा प्रयत्न नक्कीच केला...
विद्याधर गोखलेंनीही ‘मंदारमाला’, ‘पंडितराज जगन्नाथ’, ‘सुवर्णतुला’, ‘मेघमल्हार’ ‘स्वर सम्राज्ञी) अशी संगीत नाटकं दिली, तर ‘कट्यार काळजात घुसली’सारखं अमाप गाजणारं संगीत देणाऱ्या जितेंद्र अभिषेकींनी ‘लेकुरे उदंड जाहली’सारखा वेगळा सांगीतिक प्रयोगही केला.
सत्तरीचं दशक उगवण्याच्या काहीसं आधीच व्यावसायिक रंगभूमीसाठी काही आश्वासक किरणं दिसू लागली होती. ‘रंगायन’च्या माध्यमातून मराठी रंगभूमीसाठी वेगळी वाट, प्रगत दिशा धुंडाळण्याचा ध्यास घेतलेल्या विजया मेहता या मोहन तोंडवळकरांच्या ‘कलावैभव’साठी व्यावसायिक नाटक करू लागल्या होत्या.
त्याच सुमारास डॉ. श्रीराम लागूनींही व्यावसायिक रंगभूमीवर येण्याचा निर्णय घेतला होता (‘काचेचा चंद्र’ या नाटकात नायिकेला खांद्यावर घेऊन झाल्यावर व्यावसायिक नाटकांची जबाबदारी हलकी नसल्याचं त्यांना पदार्पणातच जाणवलं असणार!).
एकोणीसशे सत्तरच्या डिसेंबरमध्ये ‘नटसम्राट’ आलं आणि बहात्तरच्या डिसेंबरात ‘घाशीराम कोतवाल’चा पहिला प्रयोग झाला.. इथून व पुढे कदाचित तुमच्या माझ्या पिढीच्या आठवणीतला काळ सुरू होतो. प्रत्यक्ष पाहिलेला, अनुभवलेला... (या सदरात गेल्या साधारण पन्नास वर्षांतील संस्मरणीय नाटकांची नोंद व त्याविषयीच्या गप्पा असतील, पुढच्या लेखापासून....)
त्या आधीचं सगळं अर्थातच ऐकिवाच्या काठावरचं होतं! पण आता इतिहासात उरलेली, ‘सीता स्वयंवर’पासून प्रकटलेल्या मराठी रंगभूमीची आजवरची ही एकशे ऐंशी वर्षं मराठी संस्कृतीलाही ऐश्वर्य बहाल करणारी आहेत हे नक्की!
अण्णासाहेब किर्लोस्करांनी भावेंच्या या जोपासनेचं पुढे सोनंच केलं. ‘शाकुंतल’ गाजवत पुढे दोनच वर्षांत ‘सं. सौभद्र’ आणत मराठी रंगभूमीला यशाच्या आणखी वरच्या शिखरावर नेलं. ‘सौभद्र’च्या पदांची गोडी आज आसपास दीडेकशे वर्षांनीही तितकीच टिकून आहे.
भले कुणी काहीही म्हणो; पण मराठी रंगभूमीच्या रथाचं सारथ्य संगीत नाटकांनीच प्रदीर्घ काळ यशस्वीपणे केलं हे निर्विवादच. ‘सौभद्र’नंतर उणेपुरे आठेक दशकांचा काळ संगीत नाटक मराठी रंगभूमीवर आपला वरचष्मा टिकवून होतं.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.