चंद्रशेखर भारती यांच्या ‘पुलवामा’ या कादंबरीला पार्श्वभूमी आहे ती पुलवामा येथे केंद्रीय राखीव सुरक्षा दलाच्या बाविसाव्या तुकडीवर झालेल्या आत्मघातकी हल्ल्याची.
- राजीव जोशी, joshrajiv@gmail.com
चंद्रशेखर भारती यांच्या ‘पुलवामा’ या कादंबरीला पार्श्वभूमी आहे ती पुलवामा येथे केंद्रीय राखीव सुरक्षा दलाच्या बाविसाव्या तुकडीवर झालेल्या आत्मघातकी हल्ल्याची. या घटनेमागील सूत्रधारांचा शोध घेणं, ही कादंबरीची मुख्य थीम आहे. दहशतवादी संघटनांद्वारा देशात चालणाऱ्या घातपाताच्या कारवाया, त्याचं स्वरूप, गुप्तहेर संघटनांचं कार्य, निरपराध लोकांना वाचवण्यासाठीची कार्यपद्धती कथानकाच्या माध्यमातून ओघवत्या शैलीत मांडण्याचा प्रयत्न कादंबरीत केला गेला आहे.
जागतिकीकरणामुळे राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय संबंधांचाही परिणाम समाजघटकांवर होऊ लागलाय. अलीकडे युद्ध जमिनीवर कमी आणि आकाशात, पाण्यात किंबहुना जैविक पातळीवर लढली जातायत, म्हणूनच प्रयोगशाळेत निर्माण केलेल्या जैविक संशोधनामुळे कोरोनासारख्या महामारीचा प्रभाव, प्रसार जगभर झाला. त्यात कोट्यवधी माणसं बळी पडली. अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले. मानवी जीवन अस्थिर करून सोडणं ही वाढती मानसिकता भयभीत करून सोडणारी आहे.
चंद्रशेखर भारती यांची ‘पुलवामा’ ही पहिलीच कादंबरी आहे. या कादंबरीला पार्श्वभूमी आहे ती पुलवामा येथे केंद्रीय राखीव सुरक्षा दल (सीआरपीएफ)च्या बाविसव्या तुकडीवर झालेल्या आत्मघातकी हल्ल्याची. या हल्ल्यात चाळीस जवान शहीद झाले होते. या घटनेमागील सूत्रधारांचा शोध घेणं ही कादंबरीची मुख्य थीम आहे. दहशतवादी संघटनांद्वारे देशात चालणाऱ्या घातपाताच्या कारवाया, त्याचं स्वरूप, गुप्तहेर संघटनांचं कार्य, निरपराध लोकांना वाचवण्यासाठीची कार्यपद्धती कथानकाच्या माध्यमातून ओघवत्या शैलीत मांडण्याचा प्रयत्न कादंबरीत केला गेलेला आहे.
आत्मघातकी हल्ल्याची बातमी येताच रॉमधील सर्व अधिकाऱ्यांना तातडीने रॉच्या मुख्यालयात बोलावून घेतलं जातं, अगदी सुट्टीवर असलेल्या आवेशलाही. धावतपळत रॉचे चीफही तेथे पोहचतात. घटनेचा आढावा, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारासह खुद्द पंतप्रधानांकडून घेतला जातो, त्यानुसार आवेशच्या नेतृत्वाखाली प्रशिक, संजना आणि रफिक यांची टीम कामाला लागते. दरम्यान मुंबईत सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ, सायबर गुन्हेतज्ज्ञ डॉ. प्रभाकर बर्वे यांच्या घरावर दहशतवादी हल्ला करतात. डॉ. बर्वे त्यांच्या ड्रायव्हरसह आपल्या बंगल्यावर पोहोचतात तेव्हा हल्ल्याची घटना घडत असते. हल्लेखोर दोन चिनी असतात.
संगणकावर सायबर संशोधनाचे काम करणाऱ्या डॉक्टरांच्या दोन सहकारी इंजिनिअर यांची हत्या केली जाते. संगणकाची चाळणी करतात. डॉक्टर व त्यांचा ड्रायव्हर रणधीर आपल्याजवळील पिस्तुलाने चिनी हल्लेखोरांना मारतात. डॉ. बर्वेंच्या मागावर असणाऱ्या इतर मारेकऱ्यांना चुकवण्यासाठी डॉ. बर्वे व त्यांचा ड्रायव्हर तेथून गोव्यात जातात. मित्राकडे लपून राहतात. या दरम्यान आवेश, समीर, संजना इंदिरा गांधी विमानतळावर जाणाऱ्या कासीम नावाच्या दहशतवाद्याला जिवंत पकडतात. कासीमकडून श्रीनगर येथे राहणाऱ्या व दहशतवाद्यांना रसद पुरवणाऱ्या खलीलची माहिती मिळते.
याच चौकशीच्या दरम्यान त्यांना त्वरित मुंबईकडे जाण्याचे आदेश येतात, इकडे डॉ. बर्वे यांच्या मुंबईच्या युरेका बंगल्यावरील हल्ल्याच्या बातम्या सतत हायलाईट होत असताना, आपल्या हातून मारल्या गेलेल्या चिनी हल्लेखोरांमुळे स्वतःला दोषी मानतात. याची चौकशी करण्यासाठी परत मुंबईच्या युरेका बंगल्यावरील हल्ल्याची प्राथमिक चौकशी करून आवेश, संजना, प्रशिक आणि टीमचं श्रीनगर येथील ग्रीनव्हिला बंगल्यात थरारकपणे प्रवेश करणं, हे प्रसंग लेखक प्रभावी भाषेत मांडताना कथानक पुढे नेतो.
खरं तर दहशतवाद्यांच्या कारवायांची मोठी चेनच यानंतर घडत जाते, वाचकांना खिळवून ठेवते. रॉच्या टीमचं धाडसाने पाकिस्तानात जाणं, विषाणू तयार करण्याच्या गुप्त जागेत प्रवेश करणं, संजनाचा नातेवाईक असणाऱ्या संजय दुबे या पोलिस अधिकाऱ्याचे दहशतवाद्यांशी संबंध असणं, संजनाचा घातपातात अपघात हे सर्व थरारक आहे. या कादंबरीत जशा दहशतवाद्यांच्या कारवाया आहेत, तसेच आवेश आणि संजनाचे नाजूक, पण अव्यक्त भावनिक संबंध आहेत, डॉ. बर्वेंना या प्रकरणातून बाहेर काढण्यासाठी त्यांचा ड्रायव्हर रणजीत गायकवाड आपल्या विभक्त पत्नीचा संदर्भ देतो, ती नामांकित वकील असते. कायदेशीर मदत करता करता, सल्ला-मसलतीच्या दरम्यान त्या दोघांनाही पुन्हा एकत्र येण्याची निकड भासू लागते. हे सर्व प्रसंग रेखाटत असताना मूळ विषय आणि दहशतवादी कारवाया यांची तीव्रता कोठेही कमी होत नाही.
या दहशतवादी कारवायांचं फलित काय, बर्वे यांच्या बंगल्यावर झालेल्या हल्ल्याचे काय आणि त्यातून उकलत जाणाऱ्या दहशतवादी कारवाया यांना आपल्या रॉ आदी संघटना, सरकार किती जबाबदारीने, कशा प्रकारे मुकाबला करतात हे मुळातच सामान्य नागरिकांना कळणं अशक्यच आहे. लेखकाने आपल्या कल्पनेने आणि वर्तमानपत्रातील तपशिलावरून हा सर्व वृतांत कादंबरीच्या स्वरूपात वाचकांसमोर अत्यंत ओघवत्या भाषेत मांडलाय आणि म्हणूनच पुलवामा कादंबरीत लेखक वाचकाला खिळवून ठेवू शकला आहे. समकाळाला भेडसावणाऱ्या विषयाला, देशाला आणि सर्व जगाला व्यापून असणाऱ्या धार्मिक उच्छाद व दहशतवाद या विषयाला चंद्रशेखर भारती यांनी हात घातला, हे कौतुकास्पद आहे, यात शंका नाही.
कादंबरी : पुलवामा
लेखक : डॉ. चंद्रशेखर भारती
प्रकाशक : संवेदना प्रकाशन
मुखपृष्ठ : संतोष घोंगडे
पृष्ठसंख्या : २४०
मूल्य : ३५० रुपये
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.