१९७४ मध्ये प्रदर्शित झालेल्या बासू चॅटर्जी दिग्दर्शित ‘रजनीगंधा’ चित्रपटाने इतिहास घडवला. आपल्या वेगळ्या कथानकाने प्रचलित समाज व्यवस्थेलाही धक्का दिला. अमिताभ बच्चन आणि राजेश खन्ना यांचा इंडस्ट्रीत बोलबाला असताना अमोल पालेकर अन् विद्या सिन्हा असे नवे उदयोन्मुख चेहरे दिले. २० सप्टेंबर २०२४ रोजी ‘रजनीगंधा’ला ५० वर्षे पूर्ण झाली. आज ५० वर्षांनंतरही ‘रजनीगंधा’ सिनेमाचा दरवळ रसिकांच्या रोमारोमात कायम आहे. त्यानिमित्त अशा सदाबहार सिनेमाच्या आठवणींचा कोलाज...
‘रजनीगंधा’साठी फायनान्सचा प्रश्न सुटला होता. दुसरा महत्त्वाचा टप्पा सुरू झाला तो म्हणजे, या सिनेमाच्या कास्टिंगचा. संजय या मुख्य भूमिकेसाठी बासूंची पहिली पसंती अमिताभ बच्चन हीच होती. तोपर्यंत अमिताभ सुपरस्टार म्हणून नावारूपास आले नव्हते. नवीनच्या रोलसाठी बासूंनी शशी कपूर यांना ऑफर दिली. शशी कपूर यांनी नवीनच्या भूमिकेसाठी होकार दिला; परंतु मोबदल्यात चित्रपट वितरणाचे हक्क देण्याची अट ठेवली. बासू त्यासाठी राजी झाले नाहीत.
१९७४ मध्ये प्रदर्शित झालेल्या बासू चॅटर्जी यांच्या ‘रजनीगंधा’ चित्रपटाचा सुगंध नावाप्रमाणे ५० वर्षांनंतरही दरवळतो आहे. २० सप्टेंबर २०२४ रोजी ‘रजनीगंधा’ला ५० वर्षे पूर्ण झाली. सिनेमाची कथा होती प्रसिद्ध हिंदी लेखक मनू भंडारी यांची. त्या कथेवर आधारित या धाडसी चित्रपटाने तेव्हाच्या प्रचलित समाज व्यवस्थेला धक्का देण्याचे काम केले होते.
या सिनेमाने अमोल पालेकर, दिनेश ठाकूर आणि विद्या सिन्हा यांना ओळख मिळवून दिली. राजेश खन्ना व अमिताभ बच्चन यांच्या काळात मिडल रोड सिनेमाची मुहूर्तमेढ ‘रजनीगंधा’ने रचली. सुरुवातीला वितरकाअभावी लटकलेला हा सिनेमा पुढे जाऊन सुपरहिट झाला. असंख्य पुरस्कारासह समीक्षकांचे लक्षही या चित्रपटाने वेधून घेतले.
‘सारा आकाश’ आणि ‘पिया का घर’ चित्रपटांच्या यशामुळे बासू चॅटर्जी यांचे नाव एव्हाना बॉलीवूडमध्ये पोहोचले होते. व्यंगचित्रकार, पटकथा लेखक ते दिग्दर्शक असा प्रवास केलेल्या बासू चॅटर्जी यांच्या दोन्ही चित्रपटांनी सिने-समीक्षकांचे आणि चोखंदळ प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले होते. साधीसोपी स्टोरी टेलिंग ट्रिटमेंट ही बासू यांच्या दिग्दर्शनाची खासियत.
या दोन चित्रपटांच्या यशानंतर लेखक मनू भंडारी यांच्या ‘यही सच है’ या पुस्तकावर आधारित सिनेमा काढण्याची तयारी बासुदांनी सुरू केली. ‘पिया का घर’चे चित्रीकरण सुरू असताना बासूंची पटकथा तयार होती. निर्माता शोधण्याचे काम सुरू होते. एका मित्राच्या मध्यस्थीतून अमेरिकेत इलेक्ट्रॉनिक इंजिनियर असलेल्या सुरेश जिंदाल यांच्यासोबत मुंबईत बासूंची भेट घडवून आणण्यात आली. जिंदाल यांनी बासू चॅटर्जी यांच्या ‘पिया का घर’ चित्रपटाची समीक्षा वाचली होती.
या बैठकीत बासू यांनी जिंदाल यांच्यासमोर तीन चित्रपटांच्या कथा ठेवल्या; परंतु त्यांना पसंत पडली ती मनू भंडारी यांची कथा. आपला देश एवढा पारंपरिक, रूढीवादी आहे की तो एका मुलाच्या प्रेमात असलेली मुलगी दुसऱ्या पुरुषाचा विचार करू शकते अशी कल्पनाही भारतीय समाज पचवू शकणार नाही. या पारंपरिक विचारापासून देशाला आझाद करण्यासाठी अशा कथानकाची गरज असल्याचे जिंदाल यांनी म्हटले. त्याच वेळी सायनिंग अमाऊंटचा ट्रॅव्हलर चेकही बासूंच्या हाती सोपवला. बाकी बासूंची टीम तयार होतीच.
१९७० मधील सिनेमातील नायिका एक तर ‘मेरा पती मेरा परमेश्वर’ म्हणणाऱ्या होत्या किंवा शहरी नायिका, ज्यांची आधुनिकता तंग आणि कमी कपड्यापुरती मर्यादित होती. याउलट बासूंच्या सिनेमातील नायिका करियरवर भर देणाऱ्या, नोकरी करणाऱ्या आणि स्वतंत्र विचाराच्या होत्या. ‘रजनीगंधा’ची नायिका दीपा ही अशीच एक व्यक्तिरेखा होती. पहिल्या प्रियकरासोबत ब्रेकअप झाल्यानंतर दीपा दुसरा नायक (संजय)च्या प्रेमात पडते.
मात्र, काही वर्षांनंतर नोकरीच्या निमित्ताने पहिल्या नायकासोबत तिची गाठभेट होते. मग तिच्या मनात जोडीदार म्हणून नक्की कुणाची निवड करावी, याची घालमेल सुरू होते. सत्तरच्या दशकात असा विचारही सिनेमातून दाखवला जात नव्हता.
‘रजनीगंधा’साठी फायनान्सचा प्रश्न आता सुटला होता. दुसरा महत्त्वाचा टप्पा सुरू झाला तो म्हणजे, या सिनेमाच्या कास्टिंगचा. संजय या मुख्य भूमिकेसाठी बासूंची पहिली पसंती अमिताभ बच्चन हीच होती. तोपर्यंत अमिताभ सुपरस्टार म्हणून नावारूपास आले नव्हते. नवीनच्या रोलसाठी बासूंनी शशी कपूर यांना ऑफर दिली. विद्या सिन्हा म्हणजेच दीपाच्या रोलसाठी शर्मिला टागोर हे नाव बासूंच्या मनात होते.
शशी कपूर यांनी नवीनच्या भूमिकेसाठी होकार दिला; परंतु मोबदल्यात चित्रपट वितरणाचे हक्क देण्याची अट ठेवली. बासू त्यासाठी राजी झाले नाहीत. कुठल्या तरी कारणावरून शर्मिला टागोर यांनी भूमिका करण्यास नकार दिला. टागोर यांच्यानंतर अपर्णा सेन यांना ऑफर दिली गेली. मात्र, बासू चॅटर्जींचा एकही सिनेमा न बघितल्यामुळे दीपाची भूमिका अत्यंत सर्वसाधारण असल्याचे सेन यांना वाटले. पुढे या भूमिकेसाठी मल्लिका साराभाईंना विचारले गेले.
मात्र, एमबीएच्या परीक्षेमुळे त्यांनीही नकार दिला. दरम्यान, बासू यांचा ‘पिया का घर’ सिनेमा अपर्णा सेन यांनी बघितला. त्यानंतर बासूंशी संपर्क साधून त्या सिनेमा करण्यास तयार झाल्या. दीपाच्या भूमिकेसाठी अपर्णा सेन यांना पैशाऐवजी फियाट गाडी (त्या वेळची किंमत ३२ हजार रुपये) देण्याचे ठरले. मात्र, नवीनच्या भूमिकेसाठी समित भांजा यांची निवड करण्याचे बासूंच्या मनात घोळत होते.
त्या निवडीवर आक्षेप घेण्यात आल्यामुळे कंटाळून बासूंनी अपर्णा सेन यांना ‘रजनीगंधा’मधून बाहेर काढले. मुख्य भूमिकेसाठी अमोल पालेकर यांची निवड करण्याचे बासूंनी फार पूर्वी ठरवले होते. सत्यदेव दुबे यांच्या ‘आधे अधुरे’ नाटकातील पालेकर यांचा अभिनय बासूंना आवडला होता.
जे. जे. स्कूल ऑफ आर्टचे पदवीधर असलेले पालेकर त्या वेळी बँक ऑफ इंडियात काम करायचे. पार्ट टाईम म्हणून मराठी-हिंदी नाटकांत काम करत असत. खरे तर ‘पिया का घर’ सिनेमात बासूंना अमोल पालेकर यांना घ्यायचे होते; परंतु निर्माते ताराचंद बडजात्या यांच्या मुलाने त्यांचा चेहरा हिरोसाठी अत्यंत साधारण असल्याचे सांगितल्याने बासूंचा नाइलाज झाला.
अमोल पालेकर यांना ‘रजनीगंधा’तील मुख्य भूमिकेची ऑफर देण्याची कहानी मनोरंजक आहे. बासू चॅटर्जी, निर्माते सुरेश जिंदाल व अमोल पालेकर यांची पहिली बैठक जहांगीर आर्ट गॅलरीतील ‘समोवर’ रेस्टॉरंटमध्ये झाली. त्या बैठकीत तिघेही एकमेकांसोबत फार बोलले नाहीत. बासूंनी थोडक्यात सिनेमाची कथा सांगितली. नंतर कंटाळा करत, अमोल पालेकर यांच्याकडे पटकथा सोपवत ‘यार ये तुम पढ लो’ असे सांगितले.
एवढी जबरदस्त पटकथा लिहिणारा माणूस कथा सांगण्यासाठी एवढा कंटाळा का करतो, असा प्रश्न पालेकर यांना त्या वेळी पडला होता. नवीनच्या भूमिकेसाठी सत्यदेव दुबे यांच्याच नाटकात काम करणाऱ्या दिल्लीस्थित दिनेश ठाकूर यांची निवड झाली. दीपाच्या भूमिकेसाठी अनेक पर्याय शोधून थकलेल्या बासू चॅटर्जी यांनी एका मासिकात प्रकाशित झालेल्या फोटोवरून विद्या सिन्हा यांची निवड केली. अमोल पालेकर व दिनेश ठाकूर अशा कसलेल्या नाट्यकलावंतांवर विद्या सिन्हा यांना प्रशिक्षण देण्याचे काम सोपवण्यात आले.
चित्रपटाची स्टारकास्ट निश्चित झाल्यानंतर प्रत्यक्ष चित्रीकरणाला सुरुवात झाली. मूळ कथेत कानपूर, कोलकाता ही दोन शहरे दाखवली गेली आहेत. मात्र, बासूंच्या चित्रपटात कानपूरऐवजी दिल्ली आणि कोलकात्याऐवजी मुंबई दाखवले गेले. बासूंच्या मुंबईतील वरळीच्या फ्लॅटमध्ये काही शॉट घेतले गेले.
दुसऱ्या टप्प्याचे चित्रीकरण दिल्लीत झाले. दिल्लीच्या डिफेन्स कॉलनीतील विजय राही यांच्या घरात चित्रीकरण करण्यात आले. याच फ्लॅटच्या बाल्कनीत दीपा ही संजयसाठी वाट पाहताना दाखवली गेली आहे. दोन महिन्यांच्या आतच ‘रजनीगंधा’चे चित्रीकरण संपले.
बासू चॅटर्जी यांना संगीताची चांगली जाण होती. ‘आनंद’ (१९७०) आणि ‘मेरे सपने’ (१९७१) चित्रपटांचे संगीत सुपरहिट ठरल्यानंतर सलील चौधरी हे यशाच्या शिखरावर होते. ‘रजनीगंधा’साठी संगीताची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली गेली. कवी योगेश यांच्यावर गीतांची जबाबदारी आली. सलीलदांच्या मुंबईतील पेडर रोडवरील फ्लॅटमध्ये एका बैठकीत चित्रपटाचे संगीत, धून निश्चित करण्यात आली.
शीर्षक गीतासाठी बासूंनी योगेश यांना गाण्याची पार्श्वभूमी समजावून सांगितली. त्यानुसार योगेश यांनी गाणे लिहिले; परंतु त्याची लांबी जास्त झाल्याचे बासूंचे मत पडले. एका इराणी रेस्टॉरंटमध्ये बसून योगेश यांनी ‘रजनीगंधा फूल तुम्हारे’ या गाजलेल्या गाण्याचा अंतरा लिहिला. या सिनेमात केवळ दोन गाणी होती; पण ती कथानक पुढे घेऊन जाणारी होती.
सलील चौधरी यांनी ‘मेरे भैया’साठी (१९७२) सेक्सोफोन आणि विंड इन्स्टुमेंटसह एक धून तयार केली. ‘रजनीगंधा’साठी हीच धून वापरली गेली. ‘कई बार यू ही देखा है’ हे गाणे त्यांनी एका बंगाली सिनेमासाठी तयार करून ठेवले होते. ती वापरली गेली.
कौन सी गंधा?
दोन महिने आणि सात लाखांच्या बजेटमध्ये तयार झालेला ‘रजनीगंधा’ चित्रपट प्रदर्शनासाठी तयार होता. मात्र, ‘रजनीगंधा’ नावामुळे तो घेण्यास वितरक उत्सुक नव्हते. एक तर, सिनेमातील मुख्य चेहरे नवे होते, कोरी पाटी असलेले... केवळ दोन गाणी, त्यामुळे कुणी जोखीम घ्यायला तयार नव्हते. ‘किस की गंधा, कौन सी गंधा’ असे प्रश्न वितरक विचारत. त्या नावावरून कलात्मक सिनेमाची दुर्गंधी येते, अशी टिप्पणीही एका वितरकाने केली.
त्यामुळे तयार होऊनही ‘रजनीगंधा’चे रिल्स पडून होते. शेवटी राजश्री फिल्मने सिनेमाच्या वितरणाची तयारी दाखवली. मंत्रालयासमोरच्या आकाशवाणीतील शासकीय थिएटरमध्ये या चित्रपटाची स्क्रिनिंग ठेवली गेली. पहिलाच शो हाऊसफुल झाला. थिएटरमध्ये दर्शकांचा प्रतिसाद बघता ‘रजनीगंधा’ यशस्वी होईल यावर शिक्कामोर्तब झाले होते. त्याप्रमाणे मुंबईसह देशभरात ‘रजनीगंधा’ हाऊसफुल होता. हिंदी चित्रपटासाठी ‘स्मशान शांतता’ समजल्या जाणाऱ्या मद्रास शहरातही ‘रजनीगंधा’ २५ आठवडे चालला, त्यातच चित्रपटाचे यश सामावले होते.
‘रजनीगंधा’ सुपरहिट होण्यामागे अनेक कारणे होती. त्यातील मुख्य कारण म्हणजे, संगीत... पन्नास वर्षे उलटून गेली तरी त्यातील दोन्ही गाण्यांचा गोडवा रसिकांच्या ओठांवर आजही कायम आहे. लता मंगेशकर यांनी गायलेले ‘रजनीगंधा फूल तुम्हारे’ गाणे ‘बिनाका गीतमाला’वर कित्येक महिने पहिल्या क्रमांकावर होते. प्रियकरासाठी रजनीगंधाचे फूल घेऊन वाट पाहणारी विद्या सिन्हा महिलांसाठी एक आदर्श ठरली होती.
या गाण्याने सलील चौधरी यांना ‘आनंद’ सिनेमानंतर ‘बिनाका गीतमाला’च्या लिस्टवर आणले होते. ‘कई बार यू ही देखा है’ या मुकेश यांनी गायलेल्या गाण्याला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. मुकेश यांना मिळालेला हा एकमात्र राष्ट्रीय पुरस्कार होता. या गाण्यात सिनेमाचे सार सामावले होते. नायिकेच्या मनातील अस्वस्थता त्यातून व्यक्त करण्यात आली आहे. गायकांची निवड करताना निर्मात्यांचे बजेट कमी झाले होते. मुकेश यांनी या गाण्यासाठी केवळ एक हजार रुपये मानधन घेतले.
‘रजनीगंधा’मधील दोन्ही गाणी मुंबई आणि दिल्ली शहरांची वेगवेगळी ओळखही सांगते. ‘रजनीगंधा फूल तुम्हारे’मध्ये पारंपरिक भारतीय वाद्यांचा वापर केला गेला. ‘कई बार...’मध्ये मुंबई स्टाईल पाश्चिमात्य संगीताचा विशेषतः ट्रम्पेटचा वापर करण्यात आला. या गाण्यासाठी राष्ट्रीय पुरस्कार प्रत्यक्षात दिला गेला तेव्हा मुकेश यांचे निधन झाले होते.
‘सकाळ’सोबत बोलताना दिवंगत मुकेश यांचा मुलगा नितीन मुकेश यांनी ‘कई बार यू ही देखा है’ हे त्यांचे सर्वात आवडते आणि सर्वात नावडते गाणे असल्याचे सांगितले होते. कारण तो पुरस्कार घ्यायला पप्पा हयात नव्हते. मला तो पुरस्कार घ्यावा लागला होता, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या होत्या.
‘रजनीगंधा’ खऱ्या अर्थाने बॉलीवूडमधील गेम चेंजर सिनेमा होता. केवळ साडेसात लाखांचे बजेट असलेल्या चित्रपटाने पारंपरिक हिरोची व्याख्याच बदलून टाकली होती. १९७४ पासून राजेश खन्ना यांचे बॉक्स ऑफिसवरील साम्राज्य अस्ताला आले होते. ‘अँग्री यंग मॅन’ अमिताभ बच्चन त्यांची जागा घेत होते. ‘बॉबी’ सिनेमातून एक नवा चॉकलेटी हिरो ऋषी कपूर अवतरला होता.
मात्र, त्या काळात ‘रजनीगंधा’ने आपले अस्तित्व उमटवले. अमोल पालेकर, विद्या सिन्हा हे रातोरात मोठे स्टार झाले. राजेश खन्ना यांचा रोमान्स आणि अमिताभ बच्चन यांची ॲक्शन, मोठमोठे डॉयलॉग अमोल पालेकर यांच्या वाट्याला आले नाहीत.
मात्र, ‘रजनीगंधा’मुळे समांतर सिनेमाची नवीन वाट आखली गेली आणि अमोल पालेकर हा ‘कॉमन मॅन’चा हिरो म्हणून समोर आला. नवीनची भूमिका करणाऱ्या दिनेश ठाकूर यांना तर लग्नासाठी शेकडो टेलिफोन, पत्रे यायला लागली. दुसरे म्हणजे नायिकेला मिळवण्यासाठी नायक अतिशय देखणा, गर्भश्रीमंत किंवा पीळदार शरीरयष्टीचा असण्याची गरज नाही, हा नवा विचार या सिनेमाने रुजवला.
‘रजनीगंधा’ने उत्कृष्ट चित्रपटासाठी फिल्मफेअर पुरस्कार पटकावला, तेही प्रवेशिका न भरता. बासू चॅटर्जींना सर्व स्तरातून पत्रे यायला लागली. त्यातील एक पत्र पाकिस्तानमधून आले होते. या पत्रात एका महिलेने लिहिलेले, ‘बासुदा तुम्ही किती परखड सत्य दाखवले आहे. आम्हा सर्व जणींचे कॉलेजमध्ये एक प्रेम होते. मात्र, लग्न दुसऱ्याच मुलासोबत झाले.’ ९० टक्के मध्यमवर्गीयांची हीच कहानी होती.
‘रजनीगंधा’चे बॉक्स ऑफिसवरील यश मात्र बासू चॅटर्जी कधीच एन्जॉय करू शकले नाही, असे ‘बासू चॅटर्जी ॲण्ड मिडल ऑफ द रोड सिनेमा’ पुस्तकाचे लेखक अनिरुद्ध भट्टाचारजी यांनी सांगितले. कारण नेमका त्याच वेळी बासूंचा ‘उस पार’ हा सिनेमा पैशाअभावी डब्यात गेला होता.
५० वर्षांनंतर ‘रजनीगंधा’ चित्रपटाशी संबंधित अमोल पालेकर वगळता विद्या सिन्हा, दिनेश ठाकूर, बासू चॅटर्जी, मनू भंडारी, निर्माते सुरेश जिंदाल हे सर्व जण आज हयात नाहीत. मात्र, चित्रपटातील प्रत्येक पात्र आणि व्यक्तिरेखा रजनीगंधाप्रमाणे प्रेक्षकांच्या मनात आजही दरळतो आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.