राजपूत शैलीअंतर्गत किशनगढ या चित्रशैलीचा परिचय गेल्या आठवड्यातल्या भागात आपण करून घेतला. या वेळच्या लेखात बुंदी शैली, मेवाड शैली, कोटा शैली, जोधपूर (मारवा) शैली आदी चित्रशैलींविषयी जाणून घेऊ. बुंदी शैली : बुंदी ही त्या वेळच्या राजस्थान संस्थानाची राजधानी होती. कोटा शहराच्या वायव्येला असलेलं हे शहर. या शहरात मीना जमातीच्या वसाहती होत्या. या जमातीचा प्रमुख बुंदा हा होता आणि त्यावरूनच या शैलीला ‘बुंदी शैली’ असं नाव पडलं. या ठिकाणी निर्माण झालेली ही शैली सतरावं ते एकोणिसावं शतक या कालावधीत विकसित होत गेली. राजस्थानातल्या भौगोलिक प्रदेशानुसार अनेक शैली इथं निर्माण झाल्या. त्यातल्या ‘बुंदी’ आणि ‘कोटा’ या चित्रशैलींमध्ये स्त्री-पुरुष यांची रेखाटनं प्रामुख्यानं दिसून येतात. या शैलीत व्यक्तिचित्रणात तपकिरी रंगाची जागा गुलाबी रंगानं घेतली. चेहऱ्यावरचं शेडिंग जाऊन ते सहजतेनं रंगवणं, पार्श्वभूमी एका सपाट रंगाऐवजी अनेक रंगच्छटांनी रंगवणं अशी काही वैशिष्ट्यं विकसित झाली.
कोटा इथला राजा रामसिंह (दुसरा) यांच्या कारकीर्दीत या शैलीचं झगमगतं पर्व निर्माण झालं. ‘चंद्रकोर पाहणारं प्रेमी युगुल’ हे या शैलीतलं महत्त्वाचं चित्र. या चित्रात पाना-फुलांनी बहरलेल्या वृक्ष-वेली आहेत. या चित्राच्या पार्श्वभूमीला गडद चमकदार हिरवा रंग वापरण्यात आला आहे.
मध्यभागी एका चौरंगावर प्रेमी युगुल उभं राहून चंद्राच्या नाजूक कोरीकडं बोट दाखवून ती पाहत आहे असा या चित्रातला प्रसंग आहे. ‘राधाकृष्ण-भेट’ या चित्रात ब्रिज भाषेतल्या काव्यपंक्तींचा उल्लेख आढळतो. राधेला पाहून मोहित झालेल्या कृष्णाची अवस्था या चित्रात वर्णन करण्यात आली असून चुणीदार धोतर, सोनेरी मुकुट अशा वेशातला कृष्ण इथं दर्शवण्यात आला आहे. दासींमध्ये उभ्या असलेल्या राधेच्या दर्शनानं मोहित झालेल्या कृष्णाच्या हातातल्या कमळाच्या पाकळ्या उत्कृष्ट पद्धतीनं चितारलेल्या आढळतात.
मेवाड शैली : मेवाड हे राजस्थानातल्या चित्रशैलीचं प्रमुख केंद्र मानलं जातं. मेवाडचा राजा राणा कुंभ हा संगीताचा मोठा जाणकार होता. त्यांनी अनेक गायकांना आणि वादकांना राजश्रय दिला. चित्रकलेप्रमाणेच संगीतही त्यांच्या विशेष आवडीचं होतं.
संत मीराबाई ही त्यांच्याच राज्यातली. ती आपली भजनं स्वतःच गात असे. मीराबाईच्या अमोघवाणीतून उमटलेलं कृष्णलीलांचं वर्णन आणि कृष्णाविषयीची भक्ती या काव्य-चित्रांतून प्रतीत होते. संगीत-गायन-वादनाबरोबरच चित्रकलेच्या दृष्टीनं मेवाड शैली अशा प्रकारे समृद्ध होत गेलेली दिसते.
या शैलीवर जैनकलेचा प्रभाव जाणवतो. स्थूल शरीर, बाकदार नाक, विशाल डोळे, छोटी हनुवटी ही पुरुषचित्रणाची वैशिष्ट्यं, तर स्त्रीचित्रणात मीनाकृती डोळे, धारदार नाक, श्यामलवर्ण ही वैशिष्ट्यं जाणवतात. या शैलीचं मुख्य केंद्र जयपूर हे होतं. तिथं वैष्णव धर्माचा प्रभाव होता. भागवतपुराणाचे सचित्र ग्रंथ याच काळात निर्मिले गेले. उदयपूरमधल्या शहाबादी नावाच्या चित्रकारानं काढलेली अनेक चित्रं इथं पाहायला मिळतात. सन १६४८ मध्ये चित्तोडचे चित्रकार मोहन यांनी रामायणाची सचित्र प्रत रेखाटली. ही प्रत सध्या मुंबईच्या ‘छत्रपती शिवाजीमहाराज वस्तुसंग्रहालया’त पाहायला मिळते. ‘रागमाला’, ‘चित्रमाला’ अशी अनेक चित्रं दिल्लीच्या संग्रहालयात पाहायला मिळतात. भक्तिरसाबरोबरच त्या वेळच्या संस्कृतीचं दर्शन, तसंच युद्धचित्रे, राजेराजवाडे, महाल यांचं चित्रण या शैलीत आढळतं
कोटा शैली : कोटा हे शहाजहानच्या काळात एक स्वतंत्र राज्य होतं. राजा हरिवंशसिंह यांचा मुलगा माधवसिंह यांनी कोटा हे स्वतंत्र राज्य निर्माण केलं. सतराव्या ते एकोणिसाव्या शतकाच्या अखेरपर्यंत ही शैली विकसित झाली. यावर राजस्थानी शैलीचा, मुघल शैलीचा प्रभाव दिसून येतो. वास्तव घटना, ऐतिहासिक व धार्मिक प्रसंग आदी या शैलीचे चित्रविषय आहेत. भावनांची सखोलता हे या चित्रांचं वैशिष्ट्य. कोटा शैलीनं राजस्थानी चित्रशैलीत वेगळं स्थान निर्माण केलं आहे.
जोधपूर (मारवा) शैली : जोधपूर ही त्यागाची आणि बलिदानाची भूमी म्हणून ओळखली जाते. ही भूमी विस्तृत वाळवंटात पसरलेली आहे. सन १७६० ते ८० या कालखंडात राजपूत शैलीवरचा मुघलप्रभाव संपुष्टात आला आणि त्यातूनच जोधपूर शैलीची निर्मिती झाली. राजा निहालचंद हे उत्तम कलाकार होते. त्यांनी देव-देवतांची अनेक चित्रं रंगवली आहेत. सरळ नाक, कमलदलासारखे डोळे, निमुळती हनुवटी ही वैशिष्ट्यं निहालचंद यांनी रेखाटलेल्या ‘राधा’ या त्यांच्या चित्रात पाहायला मिळतात. पुढं महाराजा मानसिंह यांच्या कारकीर्दीत जोधपूर शैली परिपक्व झाली व तिला वैभवही प्राप्त झालं. जोधपूरपासून काही अंतरावर मानसिंह यांनी बांधलेलं ‘महामंदिर’ हे या शैलीचं उत्तम उदाहरण आहे. या मंदिराच्या भिंतीवर अनेक सुंदर चित्रं पाहायला मिळतात. साजश्रृंगार केलेल्या स्त्री-पुरुषांच्या आकृती, राम-कृष्ण, शिवपुराण, नायक-नायिका भेद, रागरागिणी अशा अनेक विषयांवरील चित्रांची निर्मिती या काळात झाली. महालातल्या चित्रांमध्ये नक्षीकाम, भिंतीच्या विटा, षटकोनी आणि चौरस नक्षी असे आलंकारिकतेचे अनेक नमुने इथं पाहायला मिळतात. लालसर तपकिरी, निळा, नारंगी असे रंग या चित्रांमध्ये मुक्तहस्तानं वापरलेले दिसतात. कृष्णभक्ती, तसंच प्रेम, श्रद्धा, विश्वास या मूल्यांचा उत्तम संगम या शैलीत पाहायला मिळतो. या विविध शैलींमुळं राजस्थानी (राजपूत) शैलीचं चित्रकलेच्या इतिहासातलं महत्त्वपूर्ण योगदान अधोरेखित होतं.
(लेखिका ह्या कोल्हापूरमधल्या कनिष्ठ महाविद्यालयात इंग्लिशच्या अधिव्याख्यात्या असून, भारतीय सौंदर्यशास्त्राच्या अभ्यासक आहेत, तसंच कोल्हापूरमधल्याच एका कलासंस्थेच्या सचिव आहेत.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.