Chemistry Book sakal
सप्तरंग

मानवी मनाचा शोध

रामदास खरे यांचा ‘केमिस्ट्री’ हा पहिलाच कथासंग्रह असूनही त्यांनी एखाद्या तरबेज गूढकथाकाराप्रमाणे प्रत्येक कथेचे कथासूत्र मांडले आहे.

अवतरण टीम

रामदास खरे यांचा ‘केमिस्ट्री’ हा पहिलाच कथासंग्रह असूनही त्यांनी एखाद्या तरबेज गूढकथाकाराप्रमाणे प्रत्येक कथेचे कथासूत्र मांडले आहे.

- रमेश सावंत rameshns12@gmail.com

रामदास खरे यांचा ‘केमिस्ट्री’ हा पहिलाच कथासंग्रह असूनही त्यांनी एखाद्या तरबेज गूढकथाकाराप्रमाणे प्रत्येक कथेचे कथासूत्र मांडले आहे. त्यांनी या कथांमधील पात्रे आणि घटना यांची रहस्ये कथेच्या निवेदनाच्या दरम्यान शाबूत ठेवून कौशल्याने गुंफली आहेत. परंपरागत गूढकथांपेक्षा वेगळ्या असलेल्या निवेदन शैलीमुळे नव्या पिढीतल्या वाचकांनादेखील या कथा मोहून टाकणाऱ्या आहेत.

मानवी मनात दडलेले विचार आणि भावना या केवळ सामान्य माणसांना नव्हे, तर मानसशास्त्रज्ञांनादेखील विस्मयचकित करणारे असतात. याचा प्रत्यय अनेकदा माणसांच्या जीवनात घडणाऱ्या गूढ घटना आणि प्रसंग बघताना येतो. मानवी मनाचे असे रहस्यमय वागणे आणि त्याच्या जीवनातील घटनांचे गूढ उलगडत नाही. असे असले तरी माणसांच्या विचित्र वागणुकीच्या आणि स्वभावाच्या कहाण्या सांगणाऱ्या गूढकथा रंजकतेच्या पलिकडे जाऊन रसिकांना खुणावत असतात. वाचकांना असलेले गूढकथेचे आकर्षण हे काही लेखकांना गूढकथा लिहिण्यासाठी प्रेरित करते. गूढकथेच्या याच ओढीने मुळातून कवी आणि चित्रकार असलेल्या रामदास खरे यांनी गेल्या दशकात लिहिलेल्या गूढकथा काही दिवाळी अंकातून प्रसिद्ध झाल्या.

त्याचे संकलन करून नुकताच प्रकाशित झालेला ‘केमिस्ट्री’ हा त्यांचा पहिला कथासंग्रह आहे. या संग्रहातील डझनभर गूढकथांपैकी ‘विहीर’ या दीर्घकथेचा अपवाद सोडल्यास बाकीच्या गूढकथा या लघुकथा आहेत. त्यामुळे लेखकाने कथेतील परिसराचे अनावश्यक पाल्हाळ न लावताही या कथा वाचकांच्या मनाची पकड सैल होऊ देत नाहीत. या कथांपैकी बहुतेक कथांचा परिसर ग्रामीण म्हणजेच कोकणातील असल्याने या कथांतील गूढ कथानक आणखीच रहस्यमय झालेला दिसते.

या कथासंग्रहाची पाठराखण प्रख्यात कथा-कादंबरीकार आणि साहित्य अकादमी युवा पुरस्कारविजेते प्रणव सखदेव यांनी केली आहे. स्वत: रामदास खरे यांनी आपल्या मनोगतात सांगितल्याप्रमाणे, त्यांना पूर्वीपासूनच गूढतेचे आकर्षण होते. त्यातून त्यांचे गाव आणि आजोळ तळकोकणात असल्याने तेथील लोकजीवन, निसर्ग आणि परिसर यांच्या बाबतीतील अनेक गूढ वाटणाऱ्या गोष्टी या कथा लिहिण्यासाठी प्रेरित करत होत्या. त्यामुळे खरे यांच्या या गूढकथा मानवी मनोव्यापाराचे विश्लेषण करत नसल्या, तरी या कथांची पात्रे, कथासूत्र, घटना आणि त्यातला गूढरम्य परिसर वाचकांना वेगळ्या गूढ आणि रम्य प्रदेशात घेऊन जातात.

‘केमिस्ट्री’ या पहिल्याच कथेत लेखक निवेदकाच्या रूपाने ‘हनी ट्रॅप’च्या जाळ्यात अडकलेल्या एका प्रोफेसरवर गुदरलेला प्रसंग प्रभावी रूपात सादर केला आहे. कथेचे चित्रण विविध तुकड्यात केल्याने कथानक पुढे जात असताना वाचकांची उत्सुकता ताणली जाते. त्यामुळे कथेच्या शेवटच्या भागात दुसरा प्रोफेसर असलेला निवेदक त्या पीडित प्रोफेसरच्या जागी स्वत:ची कल्पना करतो आणि भयाकूळ होतो. ‘बर्ड फीडर’ या कथेत लेखकाने एका सोसायटीत येत असलेल्या दोन कबुतरांचा वापर करून त्यांच्या संवादातून कथानक रंजक आणि रहस्यमय केलेले दिसते.

या कथेची सुरुवात दोन कबुतरांच्या संवादाने झाली असली तरी पुढे ही कथा त्या सोसायटीत राहणाऱ्या आनंदराव आणि त्यांची पत्नी मैथिली यांच्यातील बिघडलेल्या संबंधाशी येऊन पोचते. अर्थात या कथेचा शेवटदेखील विस्मयकारक आणि अनपेक्षित आहे. दोन वेगवेगळ्या कालखंडात घडलेल्या घटना आणि पात्रांची अतिशय बेमालूम सांगड घालून लिहिलेली ‘कालखंड’ ही लघुकथा गूढतेचे नवे रूप दाखवून देते. ही कथा वाचताना कुणाही सूज्ञ वाचकाच्या अंगावर शहारे आल्याशिवाय राहणार नाहीत. या कथेत कोकणात चर्चिला जाणारा ‘भूते आणि भुताटकी’ हा विषय लेखकाने प्रसंगानुरूप हाताळला आहे.

माणसांना पडणारी स्वप्ने आणि त्यांचा मानवी मनावर असलेला प्रभाव किती प्रबळ असतो, हे दाखविणाऱ्या ‘तळ्याकाठी’ या कथेचे कथानक सिक्कीमच्या गंगटोक शहराजवळील ‘पेलिंग’ या रमणीय तळ्याभोवती चित्रित केलेले आहे.

निवेदक या नात्याने कथासूत्र बांधताना लेखकाने ‘स्वप्न’ या विषयाशी संबंधित आख्यायिका आणि समजुती या कथेच्या ओघात जरा जास्तच प्रमाणात निवेदन केल्या आहेत. असे असले तरी वास्तव आणि स्वप्न या दोघांचा मिलाफ करून लिहिलेली ही कथा वाचकांना बुचकळ्यात टाकणारी झाली आहे. माणसांचे जीवन हवेत झुलणाऱ्या एखाद्या झुल्यासारखे असते याचा प्रत्यय ‘झुला’ या कथेतून येतो. ही कथा सलील, त्याची दिवंगत पत्नी मोहिनी आणि परवीन नावाची बारबाला यांच्या त्रिकोणी जीवनात घडलेल्या प्रसंगांशी निगडित आहे. या त्रिकोणात झुल्यासारखा झुलणाऱ्या सलीलचे जीवन कोणते वळण घेते हे कथेच्या शेवटी रंजकतेने चित्रित केले आहे.

‘गाऱ्हाणे’ या लघुकथेत लेखकाने कोकणातील गाऱ्हाणे, देवराई, आणि तिथल्या ग्रामीण परिसराचा उत्तम वापर करून कथासूत्र रहस्यमय आणि रंजक बनविले आहे. ‘अल्बम’ या कथेत सायकल चालविताना अचानक अपघात होऊन मरण पावलेल्या मुलाच्या दुर्दैवी आणि शोकमग्न आजीची विदारक कहाणी आहे. ‘सिग्नल’ या कथेत मकरंद या युवकाची आणि त्याच्या कुटुंबाच्या वाताहतीची कहाणी सांगताना लेखक निवेदकाच्या भूमिकेतून मकरंदचा जो शोध घेतो, तो या कथेतून वाचताना वाचकाच्या मनाचा ताबा घेणारा आहे.

या संग्रहातील ‘विहीर’ या दीर्घकथेत ‘नारायण भुवन’ या गूढकथेचे कथासूत्र मनोहर, त्याची आई मंगलाताई, पत्नी रोहिणी आणि मनोहरचा मुलगा अमित यांच्या भोवती वर्तुळाकार फिरते. मनोहर आणि रोहिणी या दाम्पत्याला मूल होत नसल्याने मंगलाताई चिंतेत असतात आणि पुढे त्याचे रूपांतर मानसिक तणावात होते. खरे तर ही कथा एखाद्या चित्रपटातील फ्लॅशबॅक तंत्राप्रमाणे लिहिली गेली आहे. इतर कथांप्रमाणेच या कथेतही लेखकाने वाचकांची उत्सुकता चाळवलेली आहे जिचा शेवट भयचकित करणारा आहे.

‘डेबिट-क्रेडिट’ ही कॉर्पोरेट जगातली म्हणजे बॅंकेत अधिकारीपदावर असणाऱ्या सिद्धार्थ आणि त्याचे बॉस अय्यर यांची कथा आहे. या कथेत कॉर्पोरेट जगातले तणाव आणि कौटुंबिक समस्या यांची सांगड घालताना सिद्धार्थची झालेली कुतरओढ पुढे विस्मयकारक घटनेत रूपांतरित होते. ‘ॲब्स्ट्रॅक्ट’ ही कथा नावाप्रमाणेच ॲब्स्ट्रॅक्ट शैलीतील चित्राप्रमाणे गुंतागुंत असलेली आहे. खरे हे स्वत: चित्रकार असल्याने त्यांनी ही कथा विविध रंजक घटना, त्यांच्या रहस्यमय छटा आणि शब्दांचे फटकारे देऊन रंगविलेली दिसते.

संक्षेपात सांगायचे तर रामदास खरे यांचा हा कथासंग्रह पहिलाच असूनही त्यांनी एखाद्या तरबेज गूढकथाकाराप्रमाणे प्रत्येक कथेचे कथासूत्र मांडले आहे. असे करत असताना त्यांनी या कथांमधील पात्रे आणि घटना यांची रहस्ये कथेच्या निवेदनाच्या दरम्यान शाबूत ठेवून कौशल्याने गुंफली आहेत. खरे यांच्या या गूढकथा त्यांच्या परंपरागत गूढकथांपेक्षा वेगळ्या असलेल्या निवेदन शैलीमुळे नव्या पिढीतल्या वाचकांनादेखील मोहून टाकणाऱ्या आहेत. या गूढकथांच्या माध्यमातून मराठी साहित्य क्षेत्राला रामदास खरे यांच्यासारखा एक उमदा, परंतु वेगळ्या शैलीचा कथाकार मिळाला आहे.

गूढकथासंग्रह : केमिस्ट्री

लेखक : रामदास खरे

प्रकाशक : डिंपल पब्लिकेशन

पृष्ठसंख्या : १०४

मूल्य : रुपये १६०

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah : राज्यात १६० पेक्षा जास्त जागांवर महायुतीचा विजय निश्चित..! : अमित शाह

Yogi Adityanath : काँग्रेसमध्ये इंग्रजांचे ‘जिन्स’, पक्षाकडून जात, भाषेवरून देशात फूट : योगी आदित्यनाथ

Women’s Asian Champions Trophy: गतविजेत्या भारतीय महिला संघाचे घवघवीत यश; जपानवर मात करत गाठलं अव्वल स्थान

Priyanka Gandhi : भाजप सरकारचा महाराष्ट्राशी भेदभाव! प्रियांका गांधी यांचे गडचिरोलीतील सभेत टीकास्त्र

मतदान कर्मचाऱ्यांना यंदा भत्ता मिळणार ऑनलाईन! ट्रायल पेमेंटसाठी आज 1 रुपया पाठवला जाईल; बॅंक खात्यांची होईल खात्री अन्‌ बुधवारपासून उर्वरित रक्कम मिळणार

SCROLL FOR NEXT