Clap Sakal
सप्तरंग

गोष्ट एका ‘ताली’ची!

ट्रान्सजेंडर सामाजिक कार्यकर्त्या गौरी सावंत यांचा जीवनपट असलेली ‘ताली’ ही वेबसीरिज १५ ऑगस्ट रोजी ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होत आहे.

अवतरण टीम

- रवि जाधव

ट्रान्सजेंडर सामाजिक कार्यकर्त्या गौरी सावंत यांचा जीवनपट असलेली ‘ताली’ ही वेबसीरिज १५ ऑगस्ट रोजी ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होत आहे. ही वेबसीरिज तृतीयपंथी लोकांसाठी झटणाऱ्या, त्यांच्यासाठी सतत काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या गौरी सावंत यांच्या जीवनावर आधारित आहे. अभिनेत्री आणि मिस युनिव्हर्स सुष्मिता सेन यामध्ये गौरी सावंत यांची भूमिका साकारत आहे. या वेबसीरिजच्या मेकिंगची गोष्ट...

गौरी सावंत यांच्यासारख्या प्रेरणादायी आणि प्रभावशाली व्यक्तिमत्त्वावर बायोग्राफी करायला मिळणं, ही खरंच माझ्यासाठी खूप भाग्याची गोष्ट होती. लॉकडाऊन संपल्यानंतर मला ‘ताली’ या प्रोजेक्टसाठी निर्माता कार्तिक निशानदार याने विचारणा केली.

योगायोग असा की त्यावेळी अगदी दोन दिवसांपूर्वीच मी गौरी सावंत यांना टीव्हीवर एका कार्यक्रमात बोलताना ऐकले होते. तेव्हाच मला जाणवले होते की, गौरी सावंत यांचे एकूणच व्यक्तिमत्त्व फार प्रभावी आहे. त्या खूप स्पष्ट आणि परखडपणे आपली मते लोकांपुढे मांडतात. त्याआधी काही दिवसांपूर्वीच त्यांची एक जाहिरातसुद्धा मी पाहिली होती, तेव्हाही खूप प्रभावित झालो होतो.

कार्तिकशी बोलत असताना त्या सर्व गोष्टी माझ्या डोळ्यापुढे येऊन गेल्या. अशा व्यक्तीवर बायोग्राफी करणे म्हणजे कुठेतरी त्यांच्या कामाला पाठबळ दिल्यासारखे आहे; त्यामुळे मी लगेच या प्रोजेक्टसाठी होकार दिला. माझा सर्वात आवडता लेखक क्षितिज पटवर्धन याने ही बायोग्राफी लिहिली होती. तो खूप अभ्यासपूर्ण पद्धतीने लिहिणारा लेखक आहे. त्यामुळे दिग्दर्शक म्हणून मी फार निश्चिंत होतो. या संहितेचे पहिले वाचन झाले त्या क्षणी आपण एका आव्हानात्मक प्रोजेक्टचा एक महत्त्वाचा भाग आहोत, याची जाणीव झाली.

gauri sawant

एलजीबीटीक्यू समुदायातील लोक हे फार हळवे असतात. लहानपणापासून स्वतःशीच झगडत आणि बऱ्याच गोष्टींचा सामना करत ते मोठे झालेले असतात. त्यामुळे त्यांच्या भावना कुठेही दुखावल्या जाणार नाहीत, हे ध्यानात ठेवूनच काम करायचे होते. एलजीबीटीक्यू समुदायात बऱ्याच वेगवेगळ्या रुढी आणि परंपरा असतात.

लिंग बदलाची शस्त्रक्रिया, नामकरण सोहळा, ते कोणत्या देवीची पूजा करतात अशा अनेक लहान-लहान गोष्टींचा अभ्यास आम्ही करत गेलो. पुण्यातल्या भवानी पेठेत गौरी सावंत यांचा जन्म झाला आहे. मग त्या वेळचे वातावरण कसे होते, गौरीचे आई-बाबा, बहीण हे सगळे कसे होते, हे आम्ही जाणून घेतले.

या सगळ्या व्यक्तिरेखांचा अभ्यास केला. मनात फक्त एकच गोष्ट होती ती म्हणजे जे आहे ते प्रेक्षकांना खरे वाटले पाहिजे. गौरीला स्वतःला बघताना हे जाणवत राहायला हवे की, ती तिची गोष्ट आहे आणि ही दक्षता आम्ही कायम घेत होतो.

मी जेव्हा या प्रोजेक्टशी जोडला गेलो, तेव्हा पहिल्याच दिवशी गौरी सावंतच्या मुख्य भूमिकेत अभिनेत्री सुष्मिता सेन असणार आहेत, ते ऐकून प्रचंड आनंद झाला. कारण गौरी आणि सुष्मिता या दोघींमध्ये मला बऱ्याच गोष्टींमध्ये साम्य जाणवते. गौरीसारखीच सुष्मितासुद्धा एक खूप धैर्यवान स्त्री आहे. सुष्मितानेसुद्धा इथपर्यंत पोहोचण्यासाठी आयुष्यात प्रचंड लढा दिला आहे. तिच्या वागण्यात, बोलण्यात, चालण्यात एक वेगळीच कमांड आहे.

दुसरे म्हणजे गौरी सावंत यांना आयुष्यात आई व्हायचे होते. त्यांना स्वतःची मुले हवी होती. त्याचप्रमाणे सुष्मितानेही सुपरस्टार असताना तिच्या करिअरच्या सुरुवातीच्याच काळात, वयाच्या अवघ्या २४व्या वर्षी दोन मुली दत्तक घेतल्या आणि यात सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे गौरी सावंत हिला आयुष्यात एक सुंदर स्त्री बनायचे होते आणि सुष्मिता सेन तर मिस युनिव्हर्स आहेत.

गौरी सावंत या एक स्त्री म्हणून उदयाला येण्यापूर्वी त्यांची ओळख गणेश सावंत अशी होती. त्यामुळे या संपूर्ण प्रक्रियेत सर्वांत आव्हानात्मक गोष्ट होती ती म्हणजे, सुष्मिता सेन यांना पुरुष बनवणे म्हणजेच गणेश सावंत बनवणे. त्यासाठी आम्हाला सुष्मिताबरोबर वर्कशॉप करावे लागले.

एका स्त्रीला चेहऱ्यावर दाढी लावायची आहे, पुरुषासारखे चालायचे आहे, बोलायचे आहे, ते जेवढे तिच्यासाठी आव्हानात्मक होते, तेवढेच आमच्यासाठीही होते. कारण बघताना ते खरे वाटायला हवे, ते कुठेच बनावट वाटू नये, याकडे आम्ही विशेष लक्ष देत होतो. यासाठी सुष्मितानेही प्रचंड मेहनत घेतली आहे.

अनेकदा तिच्यावर आम्ही वेगवेगळ्या मेकअप टेस्टस् करून पाहिल्या. एक मुलगा म्हणून वावरताना चालायचे कसे, वळायचे कसे, डोळ्यांमध्ये किंवा चेहऱ्यावर कसे हावभाव हवेत याबरोबरच तिने जवळजवळ तीन महिने तिच्या आवाजावर काम केले. प्रोमो बघून अनेकांच्या आम्हाला प्रतिक्रिया आल्या की, हा गौरीचा आवाज वाटतोय; पण खरं तर तो सुष्मिताचाच आवाज आहे. तिने तो अखंड मेहनतीने कमावलाय.

सुष्मिता ही आताच्या काळातली भारतातील एक सर्वोत्तम अभिनेत्री आहे. स्क्रीप्टचासुद्धा अगदी बारकाईने ती अभ्यास करते. फक्त स्वतःचेच नाही, तर समोरच्या व्यक्तीचेही संवाद तिला पाठ असतात. वेळेच्या बाबतीत तिच्यापेक्षा वक्तशीर आणखीन कोणालाच मी पाहिले नाहीये. जगातल्या एका सुंदर स्त्रीने ट्रान्सजेन्डरची भूमिका स्वीकारणे, ही सोपी गोष्ट नव्हती.

सुष्मिताने या भूमिकेसाठी होकार देणे, ही खरंच खूप मोठी आणि उल्लेखनीय गोष्ट आहे. संपूर्ण वेळ सेटवर असताना सुष्मिता फक्त आणि फक्त गौरी सावंत म्हणूनच वावरत होती. ती कायम त्याच भूमिकेचा विचार करत असायची. एवढेच नाही, तर शूटिंगनंतरही बऱ्याचदा ती फोन करून मला काही गोष्टी विचारायची.

डबिंगच्या वेळीही गौरी एखादा विशिष्ट शब्द कसा उच्चारेल किंवा हे वाक्य कसे म्हणेल अशा फार बारीक-बारीक गोष्टींकडे सुष्मिताने लक्ष दिले. त्यामुळे या वेबसीरिजमध्ये खूप जास्त डिटेलिंग झाले आहे. अशा बायोग्राफीसाठी असे डिटेलिंग फार गरजेचे असते. या कामासाठी सुष्मिताने स्वतःला पूर्णपणे समर्पित केले होते आणि तिचे काम खरंच थक्क करणारे झाले आहे.

गौरीच्या बालपणातली तिची भूमिका अभिनेत्री कृतिका देव हिने साकारली आहे. तिनेही फार अप्रतिम काम केले आहे. सुव्रत जोशी हा गौरीचा मानलेला मुलगा दाखवण्यात आला आहे. नंदू माधव यांनी गौरीच्या वडिलांची भूमिका साकारली आहे. ऐश्वर्या नारकर यांनी गौरीची आई साकारली आहे. हेमांगी कवी हिने गौरीच्या बहिणीचे काम केले आहे. त्यामुळे सुष्मिताच्या समोर हे असे अप्रतिम कलाकार असल्याने त्यांची अभिनयातली देवाणघेवाण फार उत्तमपणे व्हायची आणि कलाकारांमधली ती खरंच खूप महत्त्वाची गोष्ट असते.

सुष्मिता आणि गौरीची पहिली भेट मला आठवतेय. तो एक अविस्मरणीय क्षण होता. विशेष म्हणजे गौरी कधीही कोणाला भेटायला गेली की ती त्यांच्यासाठी ग्लुकोज बिस्किटचा पुडा घेऊन जाते. त्यामुळे त्यावेळीही तिने सुष्मिताला ‘खाऊन घे.. ताकद येईल’ असे म्हणत ग्लुकोज बिस्किटचा पुडा दिला होता.

गौरीने आल्या आल्या सांगितले की, तिच्या आयुष्यावर एक बायोग्राफी येतेय म्हटल्यावर तिच्या डोळ्यासमोर सुष्मिताचा चेहरा आला. आम्हालाही ते ऐकून खूप आनंद झाला होता. त्या पहिल्या भेटीच्या दिवशीच गौरीने सुष्मिताला साईबाबांचे लॉकेट असलेली एक रुद्राक्षाची माळ दिली आणि ती गळ्यात घालायला सांगितली.

त्यानंतर गौरीने सुष्मिताच्या डोक्यावर हात ठेवत तिला आशीर्वादही दिला; आणि गौरीने दिलेले ते साईबाबांचे लॉकेट ‘गौरी सावंत’ या व्यक्तिरेखेत आल्यानंतर सुष्मिताने अखंड वेबसीरिजभर गळ्यात घातलेले आहे. त्यामुळे ते लॉकेट म्हणजे एक जबाबदारी असल्यासारखे वाटायचे आणि त्या लॉकेटच्या रूपात गौरी कायम आमच्यासोबत आहे, असे आम्हाला वाटायचे.

गौरी ही अत्यंत शुद्ध अंतःकरणाची आणि बिनधास्त व्यक्ती आहे. ती मनात काहीच ठेवत नाही. जे आहे ते तोंडावर बोलून मोकळी होते. गौरी जेव्हा आम्हाला तिच्या आयुष्याच्या चढ-उतारांबद्दल, तिने अनुभवलेल्या अडचणींबद्दल, तिच्या अस्तित्वाच्या लढ्याबद्दल सांगत होती, तेव्हा अक्षरश: आमच्या अंगावर काटे उभे राहत होते. तिचा स्वतःचा आश्रम आहे.

ती अनेक अनाथ मुलांचा सांभाळ करते. त्यादरम्यान, तिला अनेक अडचणी येत असतात. ती जेव्हा या सर्व गोष्टींबद्दल सांगते, तेव्हा आपल्याला जाणवते की, ती काय परिस्थितीतून जातेय; पण तिच्या चेहऱ्यावर आपल्याला ते कधीच जाणवत नाही. आमच्यासाठी तिच्या अडचणींविषयी ऐकणेही फार कठीण होते; पण ती मात्र ते सर्व अनुभव आम्हाला हसत-खेळत सांगत होती. असा अनुभव मला नटरंगच्या वेळीही आला होता.

कारण तमाशातले कलाकारही असेच असतात. आयुष्यात कितीही अन्याय झाला असला, तरी त्याबद्दल इतरांना सांगताना ते कायम हसत असतात. गौरीची आणखीन एक गोष्ट म्हणजे, एखाद्या प्रोमो शूटसाठी वगैरे ती आली की, तिचे लक्ष कायम तिच्या घड्याळाकडे असायचे. तिला कायम घरी लवकर जायचे असायचे, कारण तिला कायम मुलांची ओढ लागलेली असायची. त्यांची काळजी असायची; त्या वेळी तिच्यातले ते आईपण अगदी ठासून दिसायचे.

असे संवेदनशील विषय मांडताना गाण्यांना मी फार महत्त्व देतो. कारण गाण्यांमधून अत्यंत प्रभावीपणे आपल्याला अनेक गोष्टी लोकांपर्यंत पोहोचवता येतात. ‘ताली’मध्येसुद्धा एकूण सहा गाणी आहेत. क्षितिज पटवर्धन यानेच ती गाणी लिहिली आहेत, अमित राज याने त्या गाण्यांना संगीत दिले आहे. स्वानंद किरकिरे, जावेद अली अशा नामवंत गायकांनी ती गाणी गायली आहेत. सर्वच गाणी अत्यंत प्रेरणादायी आहेत. पार्श्वसंगीत मंगेश धाकडे याने केले आहे.

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्यावर ‘मै अटल हूँ’ हा आगामी बायोग्राफी चित्रपट लवकरच मी घेऊन येणार आहे. यामध्ये प्रसिद्ध अभिनेते पंकज त्रिपाठी हे अटलजींची भूमिका साकारत आहेत. अशा मोठमोठ्या कलाकारांबरोबर काम करताना मला खूप काही शिकायला मिळाले आहे.

(लेखक ‘ताली’ या वेबसीरिजचे दिग्दर्शक असून, नटरंग, बालगंधर्व, बालक पालक अशा चित्रपटांमधून वेगवेगळे संवेदनशील विषय त्यांनी प्रभावीपणे मांडले आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महायुतीची जोरदार मुसंडी; २०० हून अधिक जागांवर आघाडी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: अंधेरी पूर्व विधानसभेत मुर्जी पटेल आघाडीवर

Karad South Assembly Election 2024 Results : कराड दक्षिणमध्ये पृथ्वीराज चव्हाणांना मोठा धक्का; अतुल भोसलेंनी घेतली 'इतक्या' मतांनी आघाडी

Sanjay Raut : हा जनतेचा कौल नसून, लावून घेतलेला निकाल; संजय राऊतांचा रोख कोणाकडे?

Amit Thackeray Maharashtra Assembly Election : अमित ठाकरे पहिल्यांदाच निवडणुकीत उतरले अन् तिरंगी लढतीच्या चक्रव्यूहात अडकले; ठाकरे ब्रँडचं काय होणार?

SCROLL FOR NEXT