ek bhakari tin chuli novel sakal
सप्तरंग

रडायचं नाही, लढायचं!

देवा झिंजाड यांची ‘एक भाकर तीन चुली’ कादंबरी सध्या चर्चेत आहे. अवघ्या ४० दिवसांत तिच्या तीन आवृत्त्या प्रकाशित झाल्या आहेत.

अवतरण टीम

- रावसाहेब कुवर

देवा झिंजाड यांची ‘एक भाकर तीन चुली’ कादंबरी सध्या चर्चेत आहे. अवघ्या ४० दिवसांत तिच्या तीन आवृत्त्या प्रकाशित झाल्या आहेत. तब्बल ४२४ पानांची ही कादंबरी आहे. ‘रडायचं नाही लढायचं!’ असे आत्मभान ही कादंबरी देते.

कुठून आणायचे आता पुन्हा,

शिव शाहू फुले आंबेडकर

काहीतरी केलं पाहिजे,

काहीतरी केलं पाहिजे

सगळं उलथवून टाकलं पाहिजे...

असे देवा झिंजाड ‘सगळं उलथवून टाकलं पाहिजे’ या त्यांच्या खूप गाजलेल्या कवितासंग्रहात का म्हणतात हे त्यांची ‘एक भाकर तीन चुली’ ही कादंबरी वाचताना अधिक प्रकर्षाने पानोपानी जाणवत राहिले. स्वत:च्या अस्तित्वावर घाला घालू पाहणाऱ्या पुरुषप्रधान समाजव्यवस्थेविरोधात दंड थोपटून दिवस-रात्र लढणारी एक करारी स्त्री ही या कादंबरीची नायिका आहे.

ती प्राणांतिक भोगवटा नशिबी आलेल्या अगणित शोषित स्रियांचे प्रतिनिधित्व करणारी आहे, असे मला वाटते. लेखक सुरुवातीलाच भूमिका स्पष्ट करताना म्हणतात, ‘‘आयुष्यातल्या पहिल्या अंघोळीपासून शेवटच्या अंघोळीपर्यंत ज्या स्त्रियांच्या वाट्याला संघर्ष आला, परवड आली, अवहेलना आली तरीही त्या न हारता न डगमगता लढतच राहिल्या, अशा माझ्या आईसह जगातल्या सगळ्याच लढाऊ स्त्रियांना समर्पित.’

पारू नावाच्या एका अबलेच्या शोषणाची आणि तिने योद्धा बनून दिलेल्या चिवट लढ्याच्या जिद्दीची ही चित्तथरारक करुण; पण अफाट प्रेरणादायी कहाणी आहे. बाईपणाच्या जगण्याची परवड कुठल्याही कालखंडात कधीही थांबली नाही अन् अजूनही थांबायचे नाव घेत नाही. पुरुषप्रधान संस्कृतीचा प्रचंड पगडा समाजमनावर अजूनही कायम आहे.

म्हणूनच ही कादंबरी वाचताना भूतकाळासोबत समकालीन समाजातील व्यक्तिरेखांचे संदर्भही डोळ्यासमोर चलचित्रपटाप्रमाणे सरकत जातात इतकी ती प्रवाही आहे. एवढी मोठी कादंबरी; पण कुठेही ती अजिबात कंटाळवाणी वाटत नाही हे लेखनशैलीचे यश आहे. एका पुरुष लेखकाने अतिशय ताकदीने लिहिलेली ही स्त्रीवादी गोष्ट आहे. त्यातील संवाद वाचून लुप्त होत चाललेले अस्सल नगर जिल्ह्याच्या बोलीभाषेतले शब्द पुन्हा एकदा मराठी साहित्यात मोलाची भर घालतील, असे वाटते.

पुनर्विवाह पाप समजल्या जाणाऱ्या काळात अत्यंत बिकट आर्थिक परिस्थिती असलेल्या अशिक्षित पारूच्या वाट्याला अशा विवाहाच्या अग्निदिव्यातून जावे लागणे आणि त्यासाठी समाजातील खलप्रवृत्तींशी संघर्ष करत मार्गक्रमण करत अखेरपर्यंत संघर्षरत असणे ही इतकी सोपी गोष्ट नक्कीच नव्हती. पारूची सहनशीलता, तिची चिकाटी आणि जिद्द असामान्य आहे. चकित करणारी आहे.

आजच्या पिढीच्या तरुणींनी आदर्श घेण्यासारखी आहे. पहिल्या पानापासून कादंबरीची तृतीय पुरुषी निवेदनशैली आहे. मात्र, ४२४ पैकी तब्बल २६० पाने संपल्यावर जेव्हा कादंबरीची निवेदनशैली प्रथम पुरुषी एक वचनी होते तेव्हा वाचकाला प्रचंड धक्का बसतो.

डॉ. आ. ह. साळुंखे म्हणतात, ‘‘या संघर्षात कुठेही त्यांनी (लेखकाने) आपली संवेदनशीलता बोथट होऊ दिली नाही वा मनात, शब्दात कडवटपणा येऊ दिला नाही.’ या एका वाक्यात कादंबरीच्या यशाचे गमक आहे, असे मला वाटते. कारण आईच्या आणि स्वतःच्या एकूण आयुष्यावर झालेल्या अन्यायाकडे तटस्थपणे पाहत लेखक म्हणून कलाकृती निर्माण करण्यासाठी प्रचंड संयम असणे अत्यंत आवश्यक आहे, अन्यथा कादंबरीची लय बिघडून ती भरकटू शकली असती. देवा झिंजाड यांना त्यासाठी सॅल्यूटच केला पाहिजे. चरित्र आत्मचरित्र, आत्मकथा अशा स्वरूपाच्या जिवंत कथानकाला कादंबरीच्या आकृतिबंधात बांधण्याचे संयत कसब त्यांनी दाखवले आहे.

अपवाद प्रत्येक बाबतीत असला तरी भाऊबंदकीची विकृत मनोवृत्ती हा भारतीय समाजाला लागलेला शाप आहे. पोटच्या मुलाच्या, मुलीच्या किंवा रक्ताच्या चुलत भावाच्या मुलीच्या आयुष्यात आलेल्या अनपेक्षित संकटांच्या वेळी त्यांना साथ देणे सोडून जुनाट परंपराच्या नावाने कोणतीही दया-माया न दाखवता त्यांचा छळ करणे ही अघोरी मनोवृत्ती आहे. ती पारूच्या आजूबाजूला असणाऱ्या अनेक नातलगांमध्ये ठासून भरलेली आहे.

दु:खामागून दु:ख आणि संकटापासून संकटांची अखंडित मालिका पारूच्या आयुष्यात आली; पण ती कधी हरलीच नाही... कधी डगमगली नाही. आपण कादंबरी वाचत पुढे जातो तसतसे वाटायचे, एवढी संकटे आल्यावर ही आता आत्महत्या करेल, मग आत्महत्या करेल; पण ती अजिबात हरत नाहीच. सत्शील पापभीरू माणसांचा तात्पुरता का असेना आधार तिला मिळत गेला आणि ती लढत राहिली. ती जगाला दाखवून देते की, परिस्थिती कितीही बिकट आली तरी, ‘रडायचं नाही लढायचं.’

ही कादंबरी वाचत असताना वाचकांना हुंदके दाटून येतात, नकळत पानावर अश्रूंचे थेंब टपकतात. कादंबरी वाचल्यावर एक मात्र लक्षात येते अन् ते म्हणजे, पारूच्या आयुष्यात आलेल्या अनेक संकटांशी दिलेल्या चिवट झुंजींची ही संघर्षगाथा समाजातील असंख्य शोषित महिला वर्गासाठी एक प्रेरणास्रोत आहे. ही कादंबरी वाचून अशी एक जरी शोषित स्त्री संकटाशी दोन हात करण्यासाठीच्या संघर्षाकरिता सिद्ध झाली तरी ते या कादंबरीचे मोठे यश असेल.

बऱ्याच वर्षांनी मराठी साहित्यामध्ये सकस अन् दर्जेदार कादंबरी आली आहे. खरे तर आमचे तरुण लेखक आजच्या सोशल मीडियाग्रस्त काळात एवढे दीर्घ लेखन करायला धजावत नाहीत; पण देवा यांनी तब्बल आठ वर्षे अन् ८५० तास कष्ट घेऊन ही कादंबरी लिहिली आहे अन् हे सगळे नोकरी करून...

अगदी काळीज पिळवटून टाकणाऱ्या दुःखभोगाची ही गोष्ट केवळ महिलांनीच नव्हे; तर रंजल्यागांजल्या, हतबल झालेल्या प्रत्येक शोषित घटकांना लढण्यासाठी प्रेरणा देत राहील. म्हणूनच ही कादंबरी प्रत्येकाने अवश्य वाचावी. दोन महिन्यांत सहा राज्यस्तरीय पुरस्कार मिळवणाऱ्या या कादंबरीच्या प्रभावी कथानकाने खूप दिवसांनी इतके जाडजूड पुस्तक वाचण्यासाठी मला जाणीवपूर्वक वेळ काढायला भाग पाडले.

कादंबरी : एक भाकर तीन चुली

लेखक : देवा झिंजाड

प्रकाशक : न्यू इरा पब्लिशिंग हाऊस

पृष्ठसंख्या : ४२४

किंमत : ४५०

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महाविकास आघाडी सरकार स्थापन करेल; शिवसेनेच्या (UBT) नेत्याचा दावा

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting:

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

Versova Assembly Constituency Result: भारती लव्हेकर विरुद्ध हारून खान

SCROLL FOR NEXT