saptrang sakal
सप्तरंग

जिंदगी वसूल ; ऐतिहासिक वास्तू आणि ‘काराकोरम हायवे’

आपलं प्रतिबिंब कशात तरी शोधतो आणि सकारात्मकपणे विकसित होण्याच्या दृष्टीने वाटचाल करू लागतो.

प्रज्ञेश मोळक (pradnyesh.molak@gmail.com)

बघता बघता मागील वर्षांसारखं हे ही वर्ष संपत आलंय. शेवटचे दोन महिने राहिले असले तरी कोरोनामध्येच हे वर्ष गेलं. कोरोनानंतरचं जग वेगळं असेल असं सुरुवातीला आपण फक्त म्हणायचो. परंतु या वर्षात आपल्या सर्वांना ते प्रकर्षाने जाणवलं. आपल्या घरात, मित्र परिवारामध्ये किंवा नातेवाईकांमध्ये कोणी ना कोणी शालेय मुलं आहेतच. त्यांचे गेल्या दीड वर्षातील आयुष्य कसं झालंय ते आपण पाहतोय. ती मुलं जे अनुभवतायत ते कदाचित आपण समजू शकत नाही. त्यांची शिक्षण पद्धतच बदलून गेलीये. त्यांच्याबरोबर आपल्यालाही तंत्रज्ञान नव्या प्रकारे अवगत करावं लागलं. शालेय मुलांचे इथून पुढचे प्रश्न फार वेगळे असतील. आपण सर्व त्या प्रश्नांना सकारात्मक पद्धतीने स्वीकारू आणि ते सोडवू अशी आशा बाळगुया. दीड - दोन वर्षे मुले घरातून फार वेळा बाहेर जाऊ शकले नाहीत. पण आता नक्कीच त्यांना फिरायला घेऊन जाण्याचे प्रयोजन करा.

‘‘ तुम्ही किती शिक्षित आहात हे मला सांगू नका, तुम्ही किती प्रवास केलात ते सांगा,” असं मोहम्मद पैगंबर यांनी कुराणामध्ये लिहून ठेवलंय. किती सोप्या शब्दात मोठं सार सांगितलाय त्यांनी, हो ना? शिक्षण महत्त्वाचे आहे का? तर ते आहेच पण त्याबरोबर मुलांना प्रवासाची गोडी लावा. त्यांना घराबाहेर घेऊन जा. ते मोठे होत असताना त्यांना त्यांचे एकटे फिरु द्या. प्रवास करताना आपण घर सोडून बाहेर पडतो तेव्हा आपण घराबद्दल अधिक शिकतो. प्रवास करताना आपण कुठे तरी थांबतो, आपलं प्रतिबिंब कशात तरी शोधतो आणि सकारात्मकपणे विकसित होण्याच्या दृष्टीने वाटचाल करू लागतो. लहानपणापासून प्रवासाची गोडी लागली तर पुढील काळात मुलं चांगली माणसं होतील यात शंका नाही. आपण सर्वजण जर सामाजिक भान ठेवून जगलो तर जग किती सुंदर होईल, असो... जग काय आपल्या एकट्याला बदलता येणार नाही परंतु आपण तर आपल्यापुरते बदलू शकतो ना...

या बदलाचे, सामाजिक भान जपण्याचे व मैत्री टिकवण्याचे एक उदाहरण गेल्या रविवारी भारत विरुद्ध पाकिस्तानच्या क्रिकेट सामन्यात आपल्याला पाहायला मिळालं. पाकिस्तानचा विजय झाला आणि त्याच मिनिटाला विराट कोहली आणि बाबर अझामची गळा भेट खूप काही सांगून आणि शिकवून गेली. खेळ... खेळ असतो! आपण सर्वांनी त्याकडे खिलाडू वृत्तीने बघितले पाहिजे.

भारत व पाकिस्तानकडे कायम जगाचे लक्ष राहिले आहे. २०१८ मध्ये मी अटारी - वाघा बॉर्डर म्हणजेच भारत - पाकिस्तान सीमेवर प्रतिष्ठित परेड बघण्यासाठी गेलो होतो. परेड पाहताना देशाबद्दल राष्ट्रप्रेम व अभिमान असणे स्वाभाविक होते. पण त्याच वेळेला दोन्ही देशातील काही नागरिकांनी किंवा प्रवाशांनी त्या बॉर्डरच्या रस्त्यावरुन या देशातून त्या देशात प्रवेश केला. मला ते पाहून फारच भारी वाटलं. ‘By Road’ बॉर्डर क्रॉस करणं काय असतं हे प्रवासी म्हणून आपण कधी ना कधी अनुभवायलाच पाहिजे. मी असा अनुभव काही वेळा घेतलाय. परेडच्या अगोदर ज्या प्रवाशांनी ये-जा केली ते पाहून माझं पाकिस्तानबद्दलचे कुतूहल अधिक वाढले. त्यादिवसापासून मला पाकिस्तानला जायची इच्छा निर्माण झालीये. अजून इच्छा पूर्ण नाही झाली परंतु लवकरच होईल... बघूयात!

साहसी व हटके प्रवाशांसाठी पाकिस्तान हा देश अफलातून आहे. राजकीय अस्थिरता आणि वरवर न संपणारी बंडखोरी, यामुळे बेभान जगणाऱ्या प्रवाशांनीच येथे गेले पाहिजे. अन्यथा कधी काय होईल सांगता येत नाही. पाकिस्तान सरकारने देशाच्या अनेक भागात पर्यटकांनी सशस्त्र रक्षकासह प्रवास करावा असा आदेश दिला आहे. भारतीय फक्त व्यवसाय, धार्मिक यात्रा किंवा व्हिजिटर व्हिसासाठी पात्र आहेत. व्हिजिटर व्हिसा भारतीयांना धार्मिक पर्यटनासाठी पाकिस्तानमधील १५ स्थळांना भेट देण्याची परवानगी देतो. पाकिस्तानमध्ये तुमचे जवळचे कुटुंब सदस्य किंवा मित्र असल्यास तुम्हाला तीन महिन्यांसाठी आणि जास्तीत जास्त पाच शहरांना भेट देऊ शकता व यासाठी व्हिजिटर व्हिसा मंजूर केला जातो. १७५ देशातील नागरिक व्हिसासाठी परवानगी मागू शकतात व त्यातील ५० देशांच्या नागरिकांना ‘Visa on Arrival’ची मुभा आहे.

पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद असून या देशाची लोकसंख्या बावीस करोड इतकी आहे. उर्दू आणि इंग्रजी तेथील प्रमुख भाषा आहेत. कराची, लाहोर, पेशावर, मुल्तान, फैसलाबाद, कुएट्टा, मुझफ्फराबाद व सैल्कोट ही काही या देशातील मुख्य शहरं. मोएंजोदारो (Moenjodaro) येथील पुरातत्व अवशेष, तक्षिला (Taxila), तख्त-ए-बहीचे बौद्ध अवशेष (Buddhist Ruins) आणि सहर-ए-बहलोल येथे शेजारील शहराचे अवशेष, लाहोरमधील किल्ला आणि शालीमार गार्डन्स, माकली - थट्टा येथील ऐतिहासिक वास्तू आणि रोहतास किल्ला अशी सहा जागतिक वारसा ठिकाणं पाकिस्तानमध्ये आहेत.

२००४ पासून पाकिस्तान सरकारने अजून २६ ठिकाणं जागतिक वारसा यादीत घेतली जावीत म्हणून मागणी केली आहे. पाकिस्तानमध्ये बघण्यासारखे काय असेल ? असा प्रश्न जर तुम्हाला पडत असेल तर येथे पाहण्याजोगी अविश्वसनीय ठिकाणं आहेत; उध्वस्त शहरे, मंत्रमुग्ध करणाऱ्या मशिदी, आकर्षक आदिवासी संस्कृती, इराणचे राज-युगाचे अवशेष आणि विस्मयकारक हिमालयीन दृश्ये, तसेच काराकोरम हायवे हा जगातील एक महान प्रवास करण्याजोगा रस्ता आहे.

इस्लामाबाद येथील फैसल मशिदीत तीन लाख लोक बसतील एवढी जागा आहे. कराची ही आर्थिक व औद्योगिक राजधानी आहे असं म्हंटलं तर वावगं ठरणार नाही. हुंझा व्हॅली, बाल्टीट किल्ला, स्कार्डू, मुर्री, कलाशा व्हॅली, थार व चोलीस्तान वाळवंट आणि सुंदर समुद्रकिनारपट्टी बघण्यासारखी ठिकाणं आहेत. एवढंच काय तर पाकिस्तानमध्ये K२ सह ७००० मीटर वरील अनेक पर्वत शिखरे असून, ती जगभरातील साहसी आणि गिर्यारोहकांना आकर्षित करतात.

पाकिस्तानला २०२० साठी ‘सर्वोत्तम हॉलिडे डेस्टिनेशन’ म्हणून स्थान देण्यात आले आणि २०२० साठी जगातील तिसरे-सर्वोच्च संभाव्य साहसी ठिकाण म्हणून ही घोषित करण्यात आले. मटन बिर्याणी व चिकन काराही (Karahi) पाकिस्तानात प्रसिद्ध खाद्यपदार्थ आहेत. कवाल्ली आणि सुफी म्युझिक हे लाहोरमधील दाता दरबार (Data Darbar) येथे आवर्जून व अनुभवलं पाहिजे. जरी पाकिस्तानला जाणं अवघड वाटत असले तरीही, काही धोरणात्मक नियोजनासह, अधिक काळजी घेऊन तिथे प्रवास करणे आणि मोहक इस्लामिक सभ्यता शोधणे पूर्णपणे शक्य आहे.

थोडक्यात काय मित्रांनो, तर भारत – पाकिस्तान हा कायम अस्मितेचा व संवेदनशील विषय राहिला आहे. दोन देशांमधलं पर्यटन वाढलं, द्वेषाचे रुपांतर मैत्रीमध्ये झालं तर जग अधिक सुंदर होईल. जगण्याची नवी उर्जा मिळेल व तिथल्या अनेक स्थानिकांशी मैत्री होईल आणि जगभरात शांतता पसरवण्यात आपणही खारीचा वाटा उचलतोय याचा निश्चितच आनंद व समाधान वाटेल. हे सर्व आपण आत्मसात केलं तरच पुढील पिढीपर्यंत पोहोचवू शकतो. थोडक्यात काय तर शिक्षण चालूच राहील, कोण किती शिकलाय यामुळं फारसा काही फरक पडत नाही. पण प्रवासातून आपल्याला अधिक माणूसपण प्राप्त होतं आणि हेच माणूसपण किंवा माणुसकीचे धडे आपण पुढील पिढीसाठी द्यायला पाहिजे. बघा... थोडा ‘हटके विचार’ केला तर आणि तरच ‘जिंदगी वसूल’ होते बरं का...!

-प्रज्ञेश मोळक

pradnyesh.molak@gmail.com

(सदराचे लेखक ‘बजेट ट्रॅव्हलर ’ असून ‘डू इट युवरसेल्फ’ पद्धतीचे पर्यटक आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harshvardhan Patil: पवारांची साथ मिळूनही हर्षवर्धन पाटलांसाठी निवडणूक सोप्पी नाही? घरातूनच बसला धक्का

BJP With Mns: शिवडीत मनसेच्या बाळा नांदगावकरांना भाजपचे समर्थन, आशीष शेलारांनी केली घोषणा

Pune News : नव्या पाहुण्यासाठी हवा सरकारी दवाखाना; खासगीपेक्षा अधिक पसंती, अडीच वर्षांत ६९ हजार प्रसूती

Sakal Podcast: अमेरिकेत ट्रम्प येणार की हॅरिस? ते अर्जुन तेंडुलकर CSK च्या जर्सीत दिसणार?

आपापल्या उमेदवारांसाठी ‘हे’ १७ बडे नेते सोलापुरात! पंतप्रधान मोदी, राहुल गांधी, शरद पवार, योगी, रेवंथ रेड्डी, सिद्धरामय्या, उद्धव व राज ठाकरे, ओवैसी यांच्या प्रचारसभा, वाचा...

SCROLL FOR NEXT