references to fact creation of caves sculptures and paintings at Ajanta during Vakataka Satavahana Harishena Sakal
सप्तरंग

अजिंठ्याचं सुवर्णयुग

सर्वसाधारणपणे राजा आणि राजघराण्याच्या कालखंडानुसार लेण्यांच्या निर्मितीचा काळ सांगितला जातो.

सकाळ वृत्तसेवा

अजिंठा इथल्या गुहा, त्यांतली शिल्पं आणि चित्रं यांची निर्मिती वाकाटक, सातवाहन, हरिशेन यांसारख्या अनेक राजवटींमध्ये सुरू झाली अशा स्वरूपाचे संदर्भ आढळून येतात.

‘आर्किऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया’च्या अभ्यासानुसार, साधारणतः आठशे वर्षं लेण्यांच्या निर्मितीचं काम या वेगवेगळ्या कालखंडांत झालं. लेण्यांची निर्मिती केल्यानंतर शिल्पनिर्मिती व सर्वात शेवटी चित्रांची निर्मिती करण्यात आली.

लेणी क्रमांक १० ची निर्मिती सर्वात प्रथम झाली असा अंदाज आहे. मात्र, याबाबत कुठंही नेमक्या लिखित नोंदी उपलब्ध नाहीत. सर्वसाधारणपणे राजा आणि राजघराण्याच्या कालखंडानुसार लेण्यांच्या निर्मितीचा काळ सांगितला जातो.

त्या काळातल्या संदर्भांनुसार अजिंठा हे ‘सिल्क रूट’वरचं महत्त्वाचं ठिकाण असल्याचे उल्लेख सापडतात. या ‘सिल्क रूट’वरून अफगाणिस्तानापर्यंत जाण्याचे मार्ग होते. या मार्गानं त्या काळात व्यापार चालत असे व वस्तूंची देवाणघेवाण होत असे.

अजिंठा लेण्यांची जागा ही अतिशय सुंदर निसर्ग असलेली आहे. या लेण्यांच्या शेजारून वाघोरा नावाची नदी वाहते, त्यामुळं पर्यटनासाठी ही जागा अतिशय महत्त्वाची होती. या ठिकाणचा जो डोंगर आहे तो बेसॉल्ट या दगडाचा आहे. या दगडाच्या टॉपोग्राफीचा अभ्यास करून दोन हजार वर्षांपूर्वी छिन्नी व हातोडी यांच्या साह्यानं लेण्यांची निर्मिती झाली.

त्या काळात दगड फोडणारे उत्तम कारागीर, वास्तुरचनाकार, चित्रकार, शिल्पकार आदींनी एकत्रितरीत्या हे काम केलेलं आहे. या सर्व कलाकारांनी प्रत्यक्षात त्या त्या काळात उपस्थित असलेल्या गोष्टीच चित्रित केलेल्या आहेत. अजिंठा ‘जातककथे’त कोणत्याही प्रकारची वेगळी फँटसी किंवा चित्रकाराच्या कल्पनेतलं चित्रण आपल्याला बघायला मिळत नाही. जे चित्रित केलं गेलं आहे ते त्या काळात अस्तित्वात होतं.

जागतिक दर्जाचं, हजारो वर्षं टिकणारं काम आपण करत आहोत याची त्या प्रत्येकाला जाणीव होती, असं म्हणता येईल. जे दिसतं, जसं दिसतं तसंच चित्रात रंगवणं यांत त्यांची खासियत होती. त्यामुळं या सर्व चित्रकलेत वास्तुकला, वेशभूषा, अलंकरण यांसारखे अनेक विषय सूक्ष्मतेनं रेखाटलेले आढळतात.

अजिंठा इथं ३० गुंफा असून क्रमांक १, २, ९, १०, १६, १७ या चित्रे असलेल्या प्रमुख लेण्या असून, बाकी काही लेण्यांमध्ये भिंतीवर किंवा छतावर चित्रे काढलेली, रेखाटनं केलेली आढळतात.

प्राचीन भारतीय संस्कृतीमधले चित्रकलेचे संदर्भ शोधताना अजिंठ्याचं सुवर्णयुग मोठ्या दिमाखात समोर येतं. प्रचंड अंधाऱ्या गुहेनं जपून ठेवलेली ही चित्रं अभ्यासण्यासाठी लेणी क्रमांक १ मधल्या ‘महाजनक/जातक’ या मोठ्या आकाराच्या चित्राची चर्चा या सदरातून करू.

‘राजा जनक राजेशाही जीवनाचा त्याग करण्याची कल्पना मांडतो,’ हा विषय चित्रकारांनी चितारताना ते या घटनेचे जणू काही प्रत्यक्ष साक्षीदारच असावेत असं आरेखनाच्या बारकाव्यांवरून वाटत राहतं.

निसर्गसहवासात वनात राहिलेला राजा अनेक दिवसांनंतर दरबारात येणार म्हणून त्याच्या स्वागतासाठी संगीत-नृत्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे...प्रत्येक कलाकार आपापलं कौशल्य सादर करत आहेत...दोन तरुणी बासरीसह असून,

दोन तरुणी टाळ वाजवून नाद निर्माण करत आहेत...दोन तरुणी चर्मवाद्य वाजवत असून, एका तरुणीच्या हाती तंतुवाद्य आहे. एक सुंदर नर्तिका आपलं नृत्यकौशल्य दाखवत आहे. हा संगीताचा अभूतपूर्व सोहळा राजा बसलेल्या दरबारासमोरच्या जागेत एका भव्य छताखाली साजरा होत आहे.

त्याचं छत पिवळसर रंगाचं असून त्यावर अनेक त्रिमितीय चौकोनी कोनाडे आहेत. बाहेरच्या दृश्यभागावर काळसर रंगानं, उलट्या पताका असाव्यात, तशी नक्षी चितारलेली आहे. या चित्रात त्या काळातली वास्तुरचना आपल्याला अनुभवता येते. वास्तुरचनेतलं छत चारही कोपऱ्यांवर असलेल्या स्तंभावर पेललेलं आहे.

चित्रातल्या वास्तुरचनेनुसार छताच्या खाली व स्तंभाच्या आत संगीतकार्यक्रम सुरू आहे; असं असायला पाहिजे होतं; परंतु प्रत्यक्षात मात्र उभ्या स्तंभामुळं दृश्य झाकलं जातं. ते रेखाटण्यासाठी व्यत्यय येतो, तसंच दृश्याचं सौंदर्य कमी व्हायला नको; म्हणून तो स्तंभासमोरच्या बाजूस चितारला नाही.

हे चित्रकारानं घेतलेलं मोठं कल्पक स्वातंत्र्य आहे; पण ही संकल्पना चित्रातलं सौंदर्य वाढवणारी असून विषयासाठी सूचक असावी किंवा अगोदर संगीतसमारोहाचं चित्रण झालं असावं आणि नंतर वास्तूची, छताची रचना चित्रित केलेली असावी. परिणामी, स्तंभ चितारण्यास जागा उरली नसावी, असाही अंदाज करता येतो.

चित्रकारानं वाद्यवृंद वर्तुळाकार आकृतिबंधात चितारला आहे. संपूर्ण चित्रात सर्व वादकांना (Conductor) मार्गदर्शन करणारा कुणीही संगीतदिग्दर्शक नाही. सर्व संगीतवादक गोलाकार बसून एकमेकांच्या साथीनं ताला-सुरात वाद्य वाजवत आहेत व त्या गोलाकार रचनेच्या आत नर्तिका नितांतसुंदर नृत्य-अदा पेश करत आहे.

सगळेच वादक उभे राहून वाजवत असते तर नर्तिकेवर ओव्हरलॅप होऊन रसभंग झाला असता. नर्तिका वादकांच्या मागं झाकली गेली असती म्हणून तिच्यासमोरचे वादक जमिनीवर बसलेले आहेत व बाकीचे उजवीकडं-डावीकडं उभे राहून वादन करत आहेत.

सूरवाद्यं-नादवाद्यं-तालवाद्यं यांचा सुंदर मेळ या चित्रात दिसत आहे. हे सगळं जिवंत सादरीकरण आहे, म्हणून दोन्ही बासरीवादकांनी डाव्या कमरेत एकाच वेळी वाकून चर्मवाद्याचा ठेका घेतला, असं प्रत्यक्ष दिसतं, तर मान थोडी डावीकडं तिरकी करून बासरीची बाजू जमिनीला समांतर न जाता वरच्या बाजूस अधिक उचलून बासरीतून दीर्घ व वरच्या टिपेचा सूर लावला गेला आहे. म्हणजे, आवाजाची पातळी अधिक आहे, असं दिसतं.

त्यासाठी अधिक श्वास घेऊन तो नियंत्रित करण्यावर त्यांचं कौशल्य जाणवतं. नजरेच्या रोखावरून ते आपल्या सुरावर एकाग्र होत आहेत, असं दिसून येतं. चर्मवाद्यांचा आवाज अधिक असल्यामुळं टाळ वाजवणाऱ्या वादकांनी टाळ कमरेजवळ न धरता काहीसा वर,

कानांजवळ धरला आहे. इतर वाद्यांच्या आवाजात त्याचा आवाज यावा किंवा त्याची आवर्तनसंख्या (वाजवण्याची गती) जास्त असावी. आपल्या संगीतात तल्लीन असलेला असा हा वाद्यवृंद. प्रत्येक जण आपापल्या कामात आहे. आपल्या कामातून आनंद घेत आहे आणि देतही आहे...

रंगसंगती वाद्य-त्यांचं वेगळेपण, त्यांचा आकार, आधुनिकता, वाद्य वाजवण्याच्या पद्धती अशा कितीतरी बाबी त्या काळच्या समाजजीवनात राजाश्रयाला होत्या, याचा हा समृद्ध पुरावा आहे.

भारतीय वाद्यप्रकारांत बासरी व टाळ समाविष्ट आहेत; परंतु इथं चर्मवाद्य हे ढोलक नसून Bongo- ड्रम या प्रकारचं वाद्य - जे आज आपल्याला आफ्रिकी जमातीत दिसून येतं - तसं वाद्य इथं आहे. हे वाद्य ढोलकासारखं जमिनीवर आडवं ठेवून न वाजवलं जाता उभ्या अवस्थेत वापरलं जातं.

हे वाद्य आकाराच्या व आवाजाच्या पातळीनुसार धीरगंभीर अथवा कर्कश आवाजाच्या पातळीत मिळतं. चित्रात हे वाद्य वाजवणारी व्यक्ती राहणीमान, शारीरिक देहयष्टी, तसंच गडद रंगकांती व वेशभूषेवरून आफ्रिकी वंशातली आहे असं प्रत्यक्षात दिसतं.

प्रश्न पुढंच आहे : अजिंठ्यातले चित्रकार आफ्रिकेत जाऊन हा संगीतप्रकार बघून आले होते की आफ्रिकेतल्या वाद्यवृंदानं अजिंठ्यात संगीतसमारोह केला? याच स्वागत-संगीतकार्यक्रमात राजा जनक याचं मन रमत नव्हतं; हे दरबारात कुजबुज झाल्यामुळं राणीच्या लक्षात आलं; म्हणून राणी शिवली हिनं राजाला प्रश्न विचारला. इथून पुढं जातककथा सुरू होते...

(लेखक हे रिसर्च फोटोग्राफर व रिस्टोरेशन आर्टिस्ट, तसंच ‘अजिंठा कलासंस्कृती’चे प्रतिनिधी आणि राज्य शासनाच्या ‘सांस्कृतिक धोरण समिती’चे सदस्य आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde Resignation: CM एकनाथ शिंदे यांचा राजीनामा , बनणार काळजीवाहू मुख्यमंत्री, कोणते अधिकार कमी होणार ?

Satara Election Results : 'जयकुमार तुमचा तो शब्द अखेर खरा ठरला'; आमदार गोरेंचं कौतुक करत असं का म्हणाले फडणवीस?

"कोण किशोर कुमार ?" आलियाच्या प्रश्नाने रणबीरला बसला धक्का ; म्हणाला...

Latest Marathi News Updates : मिलिंद नार्वेकर पोहोचले वर्षा बंगल्यावर, राजकीय चर्चांना उधाण

Constitution Day 2024 : संविधान दिन साजरा करताय ? आधी आपल्या जबाबदाऱ्या जाणून घ्या

SCROLL FOR NEXT