खतरे में हैं! sakal
सप्तरंग

खतरे में हैं!

खतरे में हैं! कधी मुस्लिम. कधी हिंदू. कधी जात. कधी जिल्हा... आपल्या लहानपणापासून काही ना काही खतरे में आहेच. मोठं झाल्यावर लक्षात येतं, की पृथ्वीवर मानवजात विकसित होत गेली तशी ही खतरे में हैं गोष्टीची सुरुवात झालीय.

अवतरण टीम

डायरी

अरविंद जगताप

jarvindas30@gmail.com

खतरे में हैं! कधी मुस्लिम. कधी हिंदू. कधी जात. कधी जिल्हा... आपल्या लहानपणापासून काही ना काही खतरे में आहेच. मोठं झाल्यावर लक्षात येतं, की पृथ्वीवर मानवजात विकसित होत गेली तशी ही खतरे में हैं गोष्टीची सुरुवात झालीय. माणसामुळे पृथ्वीवरचा निसर्ग आणि एकूण एक प्राणी खतरे में आले... पण खतरे में हैं अशी बोंब कायम माणूस नावाचा प्राणी मारत आला. निसर्गाची नासधूस करून पुन्हा निसर्ग धोक्यात आहे, अशी बोंब माणूसच मारू शकतो; पण विकासासाठी निसर्गाचा वापर थोडा समजू शकतो. माणसाला माणसापासून धोका आहे ही गोष्ट मात्र नियोजनपूर्वक केली जाते. कुणाला तरी आपला धर्म वाढवायचा असतो. कुणाला तरी आपला पक्ष वाढवायचा असतो. कुणाला तरी आपला व्यवसाय वाढवायचा असतो आणि मग अमक्या लोकांना तमक्या लोकांपासून धोका आहे, ही खेळी सुरू होते. मोसाद आणि हमासमधला संघर्ष जगाच्या दृष्टीने धर्माचा असतो; पण खेळ वेगळाच असतो. डोनाल्ड ट्रम्प आणि इलॉन मस्क बाहेरून आलेल्या लोकांमुळे अमेरिकेला धोका आहे, असं सांगतात त्यात एक वेगळाच राजकीय डाव असतो. अशा वेळी हरिशंकर परसाई यांचं म्हणणं पटू लागतं. ते म्हणतात, जर कुणी अंधाराची खूप भीती दाखवत असेल तर समजून जा की तो तुम्हाला त्याच्या कंपनीची ‘टॉर्च’ विकण्याचा प्रयत्न करतोय. परसाई सांगतात ते योग्यच आहे. एरवी इतरांच्या आयुष्यातल्या अंधाराची कोण कशाला चिंता करतोय? पण आपण आपल्या आजूबाजूला अशी अंधाराची भीती दाखवणारे खूप बघतो. ते कधी उजेड यावा म्हणून प्रयत्न करत नाहीत. अंधारावर बोलत राहतात. तुम्ही राहता त्या भागात अंधार असेल तर चोरांचं फावतं आणि मेंदूत अंधार असेल तर भोंदू लोकांचं फावतं.

एक जुनी गोष्ट आहे. रेल्वे, बस नसणाऱ्या काळात व्यापारी गाढवावर आपला माल वाहून न्यायचे. रात्री जंगलात झाडाखाली मुक्काम असायचा. असेच दोन व्यापारी गाढवाच्या पाठीवर आपला माल बांधून निघाले होते. चालता चालता रात्र झाली. व्यापाऱ्यांनी एका झाडाखाली गाढव बांधले. स्वयंपाकाच्या तयारीला लागले. अचानक दुरून घोड्यांचा आवाज येऊ लागला. व्यापारी अनुभवी होते. दोघांच्या लक्षात आलं, की दरोडेखोर येताहेत. दोघांनी घाबरून गाढवांना सोडलं. त्यांना निघण्याची घाई करू लागले; पण गाढवांना रात्री बंधनात राहायची सवय होती. दोरी सोडली तरी ते काही जागचे हलेनात. व्यापारी संतापले. चोर आलेत म्हणू लागले; पण गाढवांना चोराची काय भीती? गाढवांनी विचार केला की, चोर आल्यावर काय करतील? माल घेऊन जातील. म्हणजे झालं तर ओझं हलकंच होईल. मग आपण टेन्शन कशाला घ्यायचं? गाढव एका जागी उभं राहिलं. व्यापारी वैतागले. त्यांनी पुन्हा गाढवाना चोरांची भीती दाखवली. पुन्हा गाढवांनी विचार केला, जर चोराच्या भीतीने आपण व्यापाऱ्यांसोबत पळालो तर पुढे व्यापारी आपल्यावर दया येऊन आपल्या पाठीवरचं ओझं कमी करतील का? शक्यच नाही. मग आपण कशाला या व्यापाऱ्यांच्या आगे बोंबलत पळायचं? गाढव तसंच उभं राहिलं. व्यापारी पळून गेले. चोरांच्या कारणाने का होईना गाढव आपल्या फायद्याचा विचार करू लागले आणि त्यांचा फायदा झाला. ओझं वाहण्यापासून सुटका झाली. जर गाढव पण चोराची भीती डोक्यात ठेवून पळाले असते तर पाठीवरच्या ओझ्यातून कधीच सुटका झाली नसती... जगभर हेच चालू आहे. नवनवीन सरकारं येतात. कुठली तरी भीती दाखवून नवनवे कर लादतात; पण माणूस गाढवाएवढा शहाणा होत नाही. त्याला भीती दाखवली की तो खचतो आणि ओझं वाहू लागतो, पिढ्यान् पिढ्या, शतकानुशतके.

जगात कुठेही बघा. देवाच्या नावाने देणग्या दिल्या जातात. एरव्ही आपल्या देवाला पैसे देण्याएवढा माणूस कधीच मोठा झाला नसता. केवळ भीतीपोटी त्याला वाटू लागतं, की आपण देवाला पैसे द्यावेत. देवाला पैशांची गरज नसते हे प्रत्येकाला माहीत आहे; पण आपला मेंदू माणसाचा आहे. पैसे दिल्याशिवाय काम होत नाही, ही आपली मानसिकता आहे. माणूस भयंकर प्राणी आहे. मरणाची भूक लागल्यावर त्याला देवाची आठवण होण्याऐवजी खूपदा चोरीची आठवण होते. राग आल्यावर किती लोकांना देवाची आठवण होते? संकटात असल्यावर माणसाला देवाची आठवण होते आणि इथेच व्यापार सुरू होतो. खरं तर ज्या त्या धर्मातल्या लोकांनी विचार करायला पाहिजे, की आपण देवाकडून घेतो आणि देवाला देतो किती? विसंगती ही आहे की माणसं सतत देवाला काही न काही देण्याचा प्रयत्न करत असतात. अगरबत्ती, नारळ, धूप, अंगारे, दक्षिणा आणि काय काय... पण खरी गरज असते देवाकडून घेण्याची. प्रत्येक धर्मातल्या देवाकडून घेण्यासारख्या खूप गोष्टी आहेत; पण तसं होताना दिसत नाही. कारण माणसाला देवाकडून सद्‍गुण घ्यायचे नसतात. त्याला फक्त आशीर्वाद हवा असतो. मला सुखी ठेव. माझ्या कुटुंबाला सुखी ठेव. यापलीकडे मागणी सरकत नाही. माझ्या देशाला सुखी ठेव. या जगाला सुखी ठेव, असं फार कुणी बोलत नाही. कारण ती उंची गाठायला थेट संत ज्ञानेश्वर किंवा तुकाराम असावं लागतं. जो जे वांछील तो ते लाहो... सहज येत नाही हे. अशी माणसं सहसा होत नाहीत.

आपण सामान्य माणसं घाबरत घाबरत जगत असतो आणि आपली भीती कुणाच्या तरी व्यापाराचं साधन होते. खूप देश आपल्या शेजारी देशाची भीती दाखवत सैन्य वाढवत राहतात. शस्त्रं विकत घेत राहतात. दिवाळखोर होतात. जसं पाकिस्तानचं झालंय. खूप देशांत धर्माची भीती दाखवली जाते आणि वास्तव हे असतं, की त्या देशातले लोक धर्मामुळे कमी आणि रस्त्यातल्या खड्ड्यामुळे जास्त मरत असतात; पण रस्त्यातल्या खड्ड्यावर तेवढं बोललं जात नाही. युद्धापेक्षा जास्त रस्त्यावरच्या अपघातात माणसं मरण पावतात; पण त्याबाबत म्हणावं तेवढं बोललं जात नाही. राजकीय सभा, राजकीय आंदोलनांना कायम होणारी गर्दी हे बेरोजगारीचं लक्षण आहे; पण ही गोष्ट लक्षातही घेतली जात नाही. राजकीय पक्ष आपल्याला एकमेकांची भीती दाखवत राहतात. जे सत्तेत आहेत ते म्हणतात विरोधक देशद्रोही आहेत; पण देशद्रोही लोकांना शिक्षा करण्याची सत्ताधारी लोकांची हिंमत का होत नाही? देशद्रोहाचे पुरावे का सापडत नाहीत? मतदान करताना कायम कुठली तरी भीती दाखवली जाते. नाही तर काहीतरी वाईट होईल म्हणून मतदान करा, असं सांगितलं जातं. पण, काहीतरी चांगलं होईल म्हणून कधी मतदान करणार आहोत आपण? हे सत्तेत येवोत किंवा ते सत्तेत येवोत. जनता कायम खतरे में कशी काय असते? साधी मशिदीतल्या भोंग्यावर, धार्मिक उत्सवातल्या अनावश्यक डीजेवर बंदी आणण्याची हिंमत असलेलं एक हिंमतवान सरकार अजून येत नाही. खतरे में हैं सांगणारेच वर्षानुवर्षे दिसत राहतात. या माणसांना कधीतरी भीती दाखवायची भीती वाटली पाहिजे; पण असं होत नाही. अशा वेळी एक जुना प्रकार आठवतो. विजेच्या खांबाला जीभ लावली की जोरात मुंग्या येतात, असं सांगायची मोठी पोरं. मग लहान पोरं तो खेळ करून बघायचे. ते इतरांना सांगायचे. मुंग्या यायच्या; पण त्या कशा येतात बघायला पोरं एकदा तरी जीभ लावून बघायची. तसा प्रत्येक पक्षाचा झटका आपण दर निवडणुकीत अनुभवत असतो. रेल्वेच्या रुळावर नाणं ठेवलं की ते कसं चपटं होतं ते बघायची हौस असते मुलांना. खूप मुलं ते करून बघतात. मुलांचं ठीकय; पण आपली कमाई भरमसाट कर देऊन अर्धी करायची हौस मोठमोठ्या नागरिकांना पण असते. म्हणून तर दर पाच वर्षाला मतदान करतो आपण.

(लेखक चित्रपट लेखक, गीतकार, दिग्दर्शक आणि ‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमाचे पत्रलेखक आहेत.)

रेल्वेच्या रुळावर नाणं ठेवलं की ते कसं चपटं होतं ते बघायची हौस असते मुलांना. खूप मुलं ते करून बघतात. मुलांचं ठीकय; पण आपली कमाई भरमसाट कर देऊन अर्धी करायची हौस मोठमोठ्या नागरिकांना पण असते. म्हणून तर दर पाच वर्षाला मतदान करतो आपण.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ZIM vs PAK: १४६ धावांचे लक्ष्य एकट्याने चोपल्या ११३ धावा! २२ वर्षीय पाकिस्तानी फलंदाजाची हवा

Medical Research : जगातले श्रीमंत लोक शोधतायेत अमर होण्याचे औषध, उंदरावर केलेला प्रयोग

Rohit Pawar: रोहित पवारांचा डायहार्ड फॅन! मताधिक्य कमी-जास्त होत असल्यानं हार्टअटॅकनं आणखी एका कार्यकर्त्याचा मृत्यू

Astro Tips : नव्या जोडप्याची बेडरूम कोणत्या दिशेला असावी? दोघांमध्ये कलह होत असतील तर...

Virat Kohli याला आमची नाही, तर आम्हाला त्याची गरज...; जसप्रीत बुमराह नक्की काय म्हणाला, वाचा

SCROLL FOR NEXT