- केतन पुरी, ketan.author@gmail.com
रॉबर्ट गिल आणि त्याच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाविषयी याआधीच्या लेखात आपण माहिती घेतली होती. आता थोडं इतिहासात डोकावण्याचा प्रयत्न करू या. अजिंठ्याच्या निर्मितीचे दोन मुख्य टप्पे आहेत. एक आहे हीनयान काळातील, इसवी सन पूर्व पहिले ते इसवी सन पहिले शतक. तर दुसरा आहे थेट पाचव्या शतकातील वाकाटक राजा हरिषेनच्या काळातील.
पहिल्या टप्प्यात लेणी क्र. ९, १०, १२, १३ आणि १५-अ यांची निर्मिती झाली. अभ्यासकांच्या मते, ही लेणी सामूहिक कार्यातून तयार झाली असावी. या काळात लेणी निर्मितीची प्रक्रिया सुरळीत चालू होती. पण पुढील तीनशे -चारशे वर्ष ही प्रक्रिया मंदावली, थांबली. पण लोकांचं, उपासकांचं येणं-जाणं सुरूच होतं.
चिनी प्रवासी ‘फा हिआन’नं त्याच्या भारत दौऱ्यात अजिंठ्याच्या लेणींना भेट दिली होती. त्यानं नोंदवून ठेवलंय, की इथं अजूनही लोकं येतात, वास्तव्य करतात. त्यानंतर सुरू झाला अजिंठ्याचा सुवर्णकाळ. वाकाटक सम्राट हरिषेनचं लक्ष या भागाकडं गेलं. त्यानं आपल्या सढळ हातांनी हे अद्भुत विश्व निर्माण करण्यास प्रोत्साहन दिलं.
ओडिशा, आंध्र प्रदेश, छत्तीसगड, महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि गुजरातचा दक्षिण भाग आणि काहीसा कर्नाटकाचा भाग त्याच्या अधिपत्याखाली होता. हरिषेन बलाढ्य होता, संपन्न होता. अजिंठ्यासारख्या ठिकाणी लेणीनिर्मितीचा निर्णय त्यानं घेतला, पण त्याला काही अडचणींचा सामना करावा लागणार होता. त्या परिसरात राज्य करणारा ऋषीक प्रदेशाचा राजा उपेंद्रगुप्त आणि अश्मक राज्याचा राजा त्याच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पात नक्कीच अडथळा आणणार होते.
लेणी क्र. १७, १८, १९, २० या उपेंद्रगुप्तच्या प्रोत्साहनामुळं निर्माण झाल्या. २६ क्रमांकाची लेणी अश्मकांमुळं निर्माण झाली. चौथ्या क्रमांकाची लेणी एका धनाढ्य व्यापाऱ्यामुळं निर्माण झाली. हीनयान काळात पाच लेणी आधीच निर्माण झाल्या होत्या.
इसवी सन ४६० च्या आसपास हरिषेन गादीवर आला. तो काळच वेगळा होता. वाकाटक तेव्हा आपल्या वैभवाच्या शिखरावर होते. गुप्त साम्राज्यासोबत वाकाटकांच्या एका शाखेचे वैवाहिक संबंध होते. गुप्त साम्राज्याला भारताचा सुवर्णकाळ म्हणतात. पण, वाकाटकांचा काळ हाच ''सुवर्णकाळ’ होता अशी मांडणी करणारे अनेक अभ्यासक आहेत. या विधानाला समर्थन देण्यासाठी अजिंठा फार कारणीभूत ठरलं. कारण वाकाटकांच्या सत्तेला उतरती कळा लागली आणि भारताचे हे सुवर्णयुग लोप पावले.
डॉ. स्पिंकच्या मते, हरिषेनाचा मंत्री वराहदेव आपल्या संपूर्ण सामर्थ्यासह अजिंठ्याला उतरला आणि आजूबाजूचे राज्यकर्ते अस्वस्थ झाले. राजसत्ता एकमेकांना भिडण्याच्या शक्यता निर्माण झाल्या. उपेंद्रगुप्तनं हरिषेनासोबत राजकीय युती केली. दोघांनी मिळून अजिंठ्याला लेणींची निर्मिती करायला सुरुवात केली. फार जोमानं काम सुरू होतं. पण अचानक बाजूच्याच प्रदेशात असलेले अश्मक आक्रमक झाले. त्यांचं आणि वाकाटकांचं युद्ध झालं.
इसवी सन ४७२ साली या प्रदेशात झालेल्या मोठ्या युद्धामुळं अजिंठ्याचे कलाकार प्रदेश सोडून निघून गेले. लेणींचं काम थांबलं. त्या सर्व कारागिरांना, कलाकारांना हरिषेनानं आपल्या प्रतिनिधीच्या प्रदेशात पाठवले. तिथं बागच्या लेणींचं काम सुरू होतं. वर्ष-दीड वर्ष ते कलाकार तिथे राहिले. अजिंठ्याची परिस्थिती पूर्ववत होईपर्यंत... पण कालांतराने ते परत आले एका अद्भुत गोष्टीची निर्मिती करण्यासाठी.
अजिंठ्याला भिंती रंगवण्यात येऊ लागल्या, अविश्वसनीय चित्रे काढल्या जाऊ लागली. अजिंठा नैसर्गिक रंगांनी सजू लागलं. दुसरीकडं अश्मकांनी लेणी क्र. २६ ची निर्मिती करण्याची सुरुवात केली. पण लवकरच हरिषेनाचं दुर्दैवी निधन झाले. अजिंठ्याच्या निर्मितीचा वेग मंदावला. त्याचा मुलगा गादीवर आला. पण अश्मकांनी त्याचं वर्चस्व झुगारून दिले. स्वतःचं प्राबल्य वाढवलं. पण या राजकीय संघर्षामुळं अजिंठ्याचं महत्त्व लोप पावू लागलं.
काही बौद्ध भिक्खू, व्यापारी वगैरे लोक अजूनही अजिंठ्याच्या छायेत मुक्काम करत होते. लेणी निर्मिती व्हावी, म्हणून शक्य असेल तेवढ्या धनानं त्यांनी मदत केली. पण हा प्रयत्न फार काळ टिकला नाही. त्यानंतर अजिंठ्याला कोणत्याही बुद्धप्रतिमेची निर्मिती झाली नाही.
अजिंठ्याच्या शिला लेखांमधून सुद्धा आपल्याला तत्कालीन राजकीय परिस्थितीची आणि लेणीच्या निर्मितीची गोष्ट लक्षात येते. लेणी क्र. १६ मध्ये असलेला वराहदेवाचा शिलालेख महत्त्वाचा आहे. या लेणीचा मुख्य देणगीदार तो होता. वराहदेव सम्राट हरिषेनाचा प्रधान होता. त्या शिलालेखात विंध्यशक्ती, प्रवरसेन, रुद्र (?) सेन, देवसेन यांसारख्या राजकीय व्यक्तींच्या नावाचा उल्लेख आहे. सोबतच हरिषेनाचे अतिशय सुंदर वर्णन आले आहे.
लेखात लिहिले आहे, “हरिषेन, ज्याचे डोळे कमळाप्रमाणे सुंदर आहेत, दुःखाचे नाश करणारा, कामासारखा सुंदर, कुंतल, अवंती, कलिंग, कोसल, त्रिकुट, लता, आंध्र यांसारख्या प्रदेशावर राज्य करणारा...” सोबतच, या विहाराविषयी शिलालेखात लिहिलं आहे, ‘‘राजा आणि प्रजेचा प्रिय असलेला, त्याने आपल्या प्रसिद्धीच्या, धार्मिकतेच्या, गुणवत्तेच्या आणि सद्गुणांच्या किरणांनी तेजस्वीपणे प्रदेशाचा कारभार सांभाळला.
आयुष्य, तारुण्य, संपत्ती हे क्षणभंगुर आहे ह्या गोष्टी लक्षात घेऊन त्याने उत्तम तपस्वींनी राहावे म्हणून हे भव्य निवासस्थान तयार केले. इंद्राच्या मुकुटाप्रमाणे तेज धारण केलेला, सर्व ऋतूंमध्ये सुप्रसिद्ध सुखसोयींचा आनंद घेणारा आणि जोवर सूर्याची किरणे या पृथ्वीवर येतात तोवर ही गुहा निष्कलंक आहे. असो, आनंद घ्या...’’
हे विहार फार सुंदर आहे, भव्य आहे. हरिषेनाच्या मृत्यूनंतर वराहदेव अस्वस्थ झाला. आपली, आपल्या परिवाराची सुरक्षा लक्षात घेता त्याने आपला संपूर्ण परिवार महिष्मती साम्राज्यात पाठवून दिला. लेणी क्र. १७ मधील उपेंद्रगुप्तचा लेखसुद्धा महत्त्वाचा आहे. शिलालेखात लिहिलं आहे, ‘‘संपूर्ण पृथ्वीला स्तूप आणि विहारांनी सुशोभित केले आहे.
विपुल प्रमाणात संपत्ती खर्च केल्यामुळे (कोणत्याही मोजमापाशिवाय) कोणत्याही माणसाला कल्पना करता येणार नाही अशी लेणी निर्माण करण्यात आली. स्नेहभावाने भरलेल्या सभागृहात, जोपर्यंत सूर्य आपल्या किरणांनी अंधार दूर करतो, तोपर्यंत सद्गुणी लोकांची प्राप्ती करत राहा...’’
ह्या लेखांमुळं लेणींच्या आश्रयदात्यांची, त्यांच्या राजकीय कर्तृत्वाची माहिती आपल्याला मिळते. वाकाटक सम्राट हरिषेन, त्याचा मंत्री वराहदेव, अजिंठ्याचा स्थानिक शासक उपेंद्रगुप्त, शेजारी असलेले अश्मक यांच्या सढळ देणगीतून आणि महत्त्वाकांक्षेमुळं हे अविश्वसनीय विश्व निर्माण झालं. आता अजिंठ्याच्या लेणींची क्रमवार माहिती पुढच्या भागात.
(लेखक पुरातत्त्व विषयाचे अभ्यासक असून लोकसंस्कृती तसंच प्राचीन-मध्ययुगीन भारतीय इतिहास हे देखील त्यांच्या अभ्यासाचे विषय आहेत.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.