जवळपास अडीच महिने सुरू असलेली ‘टाटा आयपीएल’ स्पर्धा अंतिम टप्प्यात आली आहे. पुढच्याच रविवारी चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर स्पर्धेचा अंतिम सामना खेळवला जाईल. दुसरीकडे भारतीय संघाला ‘टी-२०’ विश्वचषकाचे वेध लागले असतील. ‘टाटा आयपीएल’च्या बाद फेरीत पोहोचलेल्या अंतिम चार संघांत जे खेळाडू नसतील ते अमेरिकेकडं रवानाही झाले असतील. त्याचवेळी भारतीय क्रिकेट संघाच्या पुढच्या प्रशिक्षकाचा शोधही सुरू असेल.
म्हणजेच एकाच वेळी बऱ्याच महत्त्वाच्या गोष्टी पुढील काही दिवसांमध्ये घडणार आहेत. ‘टाटा आयपीएल’ स्पर्धेच्या बाद फेरीतील निकाल असो वा ‘टी-२०’ विश्वकरंडक स्पर्धेसाठी झालेली भारतीय संघाची निवड असो किंवा नव्या प्रशिक्षकाचा शोध असो, सगळ्याचा विचार केल्यावर निर्णय घेणाऱ्यांना म्हणजेच धोरण ठरवणाऱ्या मंडळींना आवर्जून सांगावेसे वाटते, की काळ बदलला आहे. आता तरी चाल बदला. आवर्जून हा सौम्य शब्द झाला पण धोरण ठरवणाऱ्यांना भानावर आणण्यासाठी अगदी ओरडून हे सांगावं वाटतंय, आता तरी जागे व्हा.
टाटा आयपीएल स्पर्धेच्या गुणतालिकेवर हा लेख लिहिताना नजर टाकली तर शेवटच्या क्रमांकावर मुंबई इंडियन्सचा संघ दिसतो आहे. यंदाच्या स्पर्धेत मुंबई इंडियन्स संघाचे सर्वच आडाखे सपशेल चुकले. रोहित शर्माच्या जागी हार्दिक पंड्याला अगदी हाताला धरून पकडून आणण्याचा संघ मालकांचा निर्णय चांगलाच बूमरँग झाला. योग्य संवादाविना झालेला हा निर्णय ना संघातील बाकी खेळाडूंना झेपला ना मुंबई इंडियन्स संघाच्या चाहत्यांच्या पचनी पडला.
पहिल्या सामन्यापासून संघाच्या कामगिरीवर त्याचा विपरीत परिणाम झाला. पहिल्या १३ सामन्यांत तब्बल ९ वेळा मुंबई इंडियन्स संघाला पराभव पत्करावा लागला. खेळ ढासळत गेला तसं संघ निवडीचे निर्णय अत्यंत अस्थिर झालेले दिसले. मोजके काही फलंदाज सोडले तर प्रत्येक सामन्यात फलंदाजीच्या क्रमवारीत बदल झालेले बघायला मिळाले.
हार्दिक पंड्याच्या बाबतीत सगळेच फासे उलटे पडले. फलंदाज, गोलंदाज आणि कर्णधार म्हणून हार्दिकला कोणताच ठसा उमटवता आला नाही. मुंबई संघ चालक यातून काही शिकतील की आम्ही करतो तेच बरोबर असे ठासून सांगत राहणार?
नेमकं या उलट चेन्नई सुपर किंग यांच्याबाबतीत घडलं. स्पर्धा चालू होण्याअगोदर अगदी काही दिवसच महेद्रसिंह धोनीनं कर्णधारपदाची धुरा ऋतुराज गायकवाडच्या हाती सोपवली. पण त्यामुळं ना संघ मालक गडबडले ना संघातील खेळाडू. इतकंच नाही तर चेन्नई सुपर किंगच्या चाहत्यांनी धोनीचा निर्णय मान्य करून ऋतुराजला संपूर्ण पाठिंबा दिला. चांगली बाब म्हणजे तीन प्रमुख गोलंदाज दुखापतीनं जायबंदी होऊनही संघाचा खेळ बऱ्यापैकी चांगला झाला, ज्यामध्ये ऋतुराजचीही फलंदाजी सातत्याने चमकली.
क्रिकेट हा असा खेळ आहे जिथं खेळाडूचं वैयक्तिक यश-अपयश कोणाच्या पदरी का पडतं याला नक्की कारण नसतं. चांगली कामगिरी करायला सगळेच खेळाडू जिवापाड प्रयत्न करतात पण कोणाला यश मिळतं आणि कोणाच्या पदरी निराशा येते याचं स्पष्ट कारण देता येत नाही. एका बाजूला हार्दिक पंड्या खेळाडू आणि कर्णधार म्हणून पूर्णपणे अपयशी ठरत असताना भारतीय निवड समितीने ‘टी-२०’ विश्वकरंडकसाठी संघ निवड जाहीर करताना हार्दिक पंड्याला नुसतं संघात घेतलं नाही तर त्यालाच उपकर्णधार केलं.
हा निर्णय कळण्यापलीकडचा होता. वेगवान गोलंदाज आणि अष्टपैलू खेळाडू म्हणून जास्त पर्याय नसल्यानं हार्दिकला संघात घेणं एक वेळ मान्य केलं तरी त्याला उपकर्णधार करणं पटलं नाही. बऱ्याच क्रिकेट चाहत्यांनी शंका विचारून दाखवली की आयपीएल स्पर्धेत मुंबई इंडियन्स संघात झालेल्या नाट्याचा परिणाम भारतीय संघावर तर होणार नाही ना?
या चिंतेमागे कारण साधे होते की रोहित शर्मा आणि हार्दिक पंड्या कर्णधार आणि उपकर्णधार म्हणून एकत्र नांदतील ना? उत्तर देताना मी इतकेच सांगेन, की रोहित शर्माची भारतीय संघावर कर्णधार म्हणून असलेली पकड मजबूत आहे आणि दोनही खेळाडू इतके परिपक्व नक्कीच आहेत की झाल्या गोष्टींचा परिणाम ते भारतीय संघावर होऊन देणार नाहीत.
वेगळा संघ वेगळे प्रशिक्षक हवेत
इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाने कसोटी आणि मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये वेगळा संघ, वेगळे प्रशिक्षक या विचारांनी काम कधीच चालू केलं आहे. काळानुरूप तशी गरज आहे. जोस बटलरला कसोटी संघापासून दूर ठेवत इंग्लंडच्या एक दिवसीय आणि टी-२० संघाची जबाबदारी दिली गेली. तीच गोष्ट ऑस्ट्रेलियानं करताना तुफान यश संपादन केलेल्या पॅट कमिन्सला नव्हे तर टी-२० संघाची धुरा मार्शच्या हाती दिली आहे. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया संघासाठी वेगळे प्रशिक्षकही नेमले गेले आहेत. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला असाच विचार करणं गरजेचं आहे.
वेळापत्रकावर नजर टाकली तर दिसतं की वर्षातील जवळपास आठ महिने भारतीय संघ दौर्यावर असतो. प्रशिक्षक म्हणून तीन संघांवर नजर ठेवत त्यांना मार्गदर्शन करणं आणि प्रचंड प्रमाणात प्रवास करत घरापासून आठ महिने लांब राहणं कोणत्याच प्रशिक्षकाला सोपे नाही. दुसरी अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे कसोटी क्रिकेट आणि मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये आता सुस्पष्ट बदल झाले आहेत.
एक दिवसीयपेक्षा टी-२० क्रिकेट झपाट्याने बदलले आहे. संयम राखत खेळपट्टीवर उभं राहण्याचा सल्ला फलंदाजाला देणारा प्रशिक्षक लगेच रूप बदलून टी-२० क्रिकेटमध्ये बेदरकारपणे फटकेबाजी करायचा सल्ला कसा देऊ शकेल? कसोटीत ज्याला गोलंदाजाला गुड लेंग्थ टप्पा दिशा पकडून गोलंदाजी करणं म्हणतात तोच टप्पा टी-२० क्रिकेटमध्ये गोलंदाजीसाठी मारक ठरताना दिसतो आहे.
याचाच अर्थ स्पष्ट आहे, की एकाच प्रशिक्षकाला तीनही क्रिकेट प्रकारात प्रभावी काम करणं शक्य होणार नाही. खेळाच्या अर्थकारणात होणारे बदल ओळखून त्यावर काम करून क्रिकेट जगतावर राज्य करणार्या बीसीसीआयला प्रत्यक्ष खेळात झालेले बदल दिसत असले, तरी त्यावर काम करायला इतका वेळ का लागतो आहे हेच समजत नाही.
आयपीएलचा अंतिम सामना २६ तारखेला मध्यरात्री संपेल आणि नंतर अमेरिकेला प्रवास करून घड्याळ्याच्या काट्यांबरोबर शरीराचे घड्याळ बदलून क्रिकेटची तयारी करून पाच जूनला म्हणजेच म्हणजेच मोजून दहा दिवसांत भारतीय संघाला टी-२० विश्वकरंडकाचा पहिला सामना खेळायचा आहे.
अडीच महिने आयपीएल स्पर्धा खेळताना सामन्यांबरोबर कराव्या लागलेल्या प्रवासानं खेळाडू थकलेले असणार. त्याच थकव्यातून बाहेर येऊन टी-२० विश्वचषक स्पर्धेत प्रभावी कामगिरी करायचं आव्हान आयपीएलमध्ये खेळलेल्या सगळ्याच खेळाडूंना पेलावे लागणार आहे. तोच सारा थरार अनुभवायला मी अमेरिका आणि वेस्ट इंडिजला जाणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.