Humanity Sakal
सप्तरंग

कोरोनाने जोपासलेलं माणूसपण!

कोरोनामुळे अनेकांचे जीवलग नातेवाईक, मित्रपरिवार हिरावून नेले. जमिनीपासून चार फुटांवर चालणाऱ्याला जमिनीवर आणले. अनेक गोष्टी हिरावून नेणारा कोरोना एक गोष्ट मागे ठेवून गेला, तो म्हणजे ‘माणूसपण...’

अवतरण टीम

कोरोनामुळे अनेकांचे जीवलग नातेवाईक, मित्रपरिवार हिरावून नेले. जमिनीपासून चार फुटांवर चालणाऱ्याला जमिनीवर आणले. अनेक गोष्टी हिरावून नेणारा कोरोना एक गोष्ट मागे ठेवून गेला, तो म्हणजे ‘माणूसपण...’

- रूपाली चाकणकर rchakankar95@gmail.com

कोरोनामुळे अनेकांचे जीवलग नातेवाईक, मित्रपरिवार हिरावून नेले. जमिनीपासून चार फुटांवर चालणाऱ्याला जमिनीवर आणले. अनेक गोष्टी हिरावून नेणारा कोरोना एक गोष्ट मागे ठेवून गेला, तो म्हणजे ‘माणूसपण...’ कोरोना संपला तरी आमच्यासारख्यांच्या ‘मायबापां’साठी मुलाचं लग्न ५० लोकांमध्येच करायचा निर्णय कायम ठेवा. सरकारच्या या निर्णयामुळे माझा ‘बाप’ खूप दिवसांनी हसताना दिसतोय. अशा असंख्य बापांच्या कष्टाला बळ मिळू दे, असे मराठवाड्याच्या भगिनीने पाठवलेलं पत्र वाचून गहिवरून आलं.

कधीही नाव न ऐकलेल्या महाभयंकर आजाराने तोंड वर काढले होते. सुरुवातीला अनेक अडचणी होत्या. त्या प्रत्येक संकटाचा सामना आपण सर्वजण करत होतो. दररोज नवीन समस्या, दररोज त्यावर उपाय शोधून उद्याच्या आव्हानांना तोंड द्यायला सारेच सज्ज. होय, मी कोरोनाच्या महामारीबद्दल बोलतेय. पहिल्या लाटेचा यशस्वी सामना करून दुसऱ्या टप्प्यातील लढाईला महाराष्ट्र सज्ज होता.

दररोज येणारे मेसेज, पत्र, मेल यामुळे प्रत्येक भागातील आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील माहिती समजत होती, त्यांच्या अडचणी समजत होत्या. अनेकांची जवळची माणसं सोडून गेली होती. आलेले मेसेज काय असतील, कोण गेल्याची बातमी असेल, याची तर आता भीतीच वाटत होती. आजही अनेक मेसेज आले, पत्र आले होते. त्यातील पत्रांना उत्तर देताना एक पत्र मराठवाड्यातून आले होते. ‘गोपनीय’ म्हणून लिहिले होते. पत्र उघडले आणि वाचताना अंगावर अक्षरशः शहाराच आला.

मराठवाड्यातून एका मुलीने हे लिहिलेले पत्र समाजाची विदारकता मांडणारे होते. पत्रात लिहिले होते की, ‘‘ताई, मला सरकारपर्यंत आमच्या समस्या मांडायच्या आहेत, तिथपर्यंत मी पोहोचू शकत नाही; पण तुमच्यापर्यंत पोहोचून किमान तुम्ही आमच्या समस्या सरकार दरबारी मांडाल, ही अपेक्षा म्हणून हा पत्रप्रपंच. मी एका शेतकरी कुटुंबातील मुलगी, आम्ही तीन भावंडे. मी मधली. एक मोठी बहीण, एक लहान भाऊ. मोठ्या ताईचे दोन वर्षांपूर्वी लग्न झालं. घरची थोडी शेतजमीन, आई-वडील ती कसतात. मोठ्या बहिणीच्या लग्नासाठी आई-वडिलांनी पै-पै साठवली होती; पण लग्न जमवताना समोरची मंडळी खूप मागणी करत राहिले. लग्न चांगलंच करून दिलं पाहिजे, जेवण व्यवस्थित पाहिजे, मानपान चांगला झाला पाहिजे, मुलीच्या अंगावर दागिने जास्तच पाहिजे. आई-वडिलांनी पोटाला चिमटे घेऊन आमचे शिक्षण केले. त्यातून बचत केली; पण जमलेल्या पैशांचा हिशोब आणि लग्नाचा हिशोब यात डोंगरदरीचा विरोधाभास. चांगलं स्थळ पैशामुळे तुटायला नको म्हणून वडिलांनी जमीन सावकाराकडे गहाण ठेवली आणि ताईचे लग्न करून दिले.’’

‘‘लेक सुखात नांदावी, म्हणून आई-बापांनी मनाला न पटणाऱ्या गोष्टीही आनंदाने स्वीकारल्या; पण अजून दोन वर्षांनंतरही सासरच्या मंडळींच्या एक-एक मागण्या चालूच आहेत. ताईंचं बाळंतपण, दिवाळी, दसरा जावयाचा मानपान, एक ना अनेक, न संपणारी अतृप्त आत्म्यांची मागणी... त्यात सावकाराकडचं कर्ज फेडता येईना, म्हणून गहाण ठेवलेली जमीन द्यावी लागली. आता जी थोडी जमीन शिल्लक आहे, त्यात काय पीक घेणार? आई-वडील दोघेपण दुसऱ्याच्या शेतात मजुरी करतात. कसंबसं घर चालवतात. आम्ही दोघेही आता शिक्षणासाठी जास्त हट्ट करत नाही. आम्हीही कोणाच्यातरी शेतात काम करून हातभार लावतोय. दिवसेंदिवस वडील चिंतेत दिसतात. कधी उगाचंच डोळे भरून आल्यासारखं वाटताना, कोणाचं लक्ष नाही पाहून पटकन डोळे पुसतात. पहिल्यासारखे फारसे बोलत नाहीत. काही सांगितलं तर ऐकतात की नाही, हे समजत नाही; पण नुसतेच हम्म.. हम्म... म्हणतात. गेल्या आठवड्यात माझ्यासाठी एक स्थळ आलं. त्याचीही त्यांना काळजी असणार. कोरोनामुळे तर अजूनच अवघड झालं. कित्येक रात्री आम्ही बाजरीच्या पिठवणीवर काढलेत. माझ्या लग्नासाठी कुठून खर्च करणार? आजूबाजूच्या बातम्या ऐकल्या की काळजात धस्स होतं, ठोकाच चुकतो काळजाचा. कर्जामुळे वडील आत्महत्या तर करणार नाहीत ना?’’

‘मी आणि माझा भाऊ सारखे वडिलांच्या मागावर असतो. हल्ली कशातच लक्ष लागत नाही; पण आता सरकारने या कोरोनामध्ये निर्णय घेतला आहे. ५० लोकांमध्ये लग्न करायचं. ही बातमी ऐकल्यापासून वडील जरा आनंदी वाटतात. बोलायला लागले आमच्यासोबत... स्थळ पाहायला पाहुणे येऊन गेले, ५० लोकांमध्येच लग्न करायचे ठरले. गावच्या मंदिरात लग्न होणार आहे. आईचे दागिने विकलेत; पण कमी खर्चात लग्न होतेय म्हणून आई-वडील दोघेही खूश आहेत. कर्ज घ्यावं लागणार नाही. पुढच्या आठवड्यात लग्न आहे. हे सगळं ताई तुम्हाला सांगायची धडपड यासाठीच की कोरोनाने जवळची माणसे नेली, अनेक आजार दिले, रोजगार गेले, बेरोजगारी वाढली, मुलगा आई-वडिलांच्या अंत्यविधीला जाऊ शकला नाही, ते विधी सरकारी कर्मचाऱ्यांनी केले, अशी परिस्थिती... मुलं परदेशात असतील तर वृद्ध आई-वडील घरात अडकून पडले; पण अनेकांनी मदतीचे हात पुढे करत एकमेकांना सावरले. या कोरोनाने तर जमिनीपासून चार फुटांवर चालणाऱ्या माणसाला जमिनीवर आणले. अनेक गोष्टी हिरावून नेणारा कोरोना एक गोष्ट मागे ठेवून गेला, तो म्हणजे ‘माणूसपण...’ तुमच्या तिजोरीतील पैशाला किंमत राहिली नाही; पण वेळेला उपयोगी पडणारा माणूस हा लाखमोलाचा ठरला. आमच्यासारख्या दुष्काळी भागात राहणारी लोकं ज्यांचे कर्जामुळे, हुंड्यामुळे कित्येक जीव गेलेत, घरे उद्‍ध्वस्त झालीत. घरातला कर्ता माणूस गेला की जग खायला उठतं. म्हणून माझी विनंती आहे, जरी कोरोना संपला तरी आमच्यासारख्यांच्या ‘मायबापां’साठी मुलाचं लग्न ५० लोकांमध्येच करायचा निर्णय कायम ठेवा. मी कोरोनाचे आभार मानते, माझ्यासारख्या लेकींना हा खूप मोठा आधार आहे. माझा ‘बाप’ मला खूप दिवसांनी हसताना दिसतोय. अशा असंख्य बापांच्या कष्टाला बळ मिळू दे.’’

संपूर्ण पत्र वाचून सरकारच्या निर्णयाचे समाधान वाटले. कोरोनामुळे एक समाधानकारक निर्णय झाला होता. खरेतर लग्न हा प्रत्येक मुलीसाठी आयुष्यातला सुंदर क्षण, संस्मरणीय असा... अनेक स्वप्न मुली आपल्या लग्नाबद्दल रंगवत असतात; पण ते करताना आपल्या आई-वडिलांची परवड होऊ नये, मुलीकडचे म्हणून अपमान होऊ नये, अशी त्यांची मनस्वी इच्छा असते. लग्न हे दोन जीवांचे, कुटुंबाचे मिलन होत असताना त्यात व्यवहारच होत असेल आणि तो एका कुटुंबाला उद्ध्वस्त करणार असेल, तर त्याला अर्थ राहत नाही.

स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सवी वर्ष आपण साजरे करत आहोत. आतापर्यंत आम्ही महिलांच्या आत्मसन्मानासाठी खूप योजना आणल्या. ८ मार्च रोजी जागतिक महिला दिनाला तिचे पोवाडे, कविता, कथा यावर संवादाचे कार्यक्रम झाले. सगळ्या क्षेत्रांत ती बाजी मारतेय, कर्तृत्व सिद्ध करतेय, नेतृत्वाला धार देतेय, अन्यायाविरुद्ध तुटून पडते, तिला दिलेल्या तिच्या अवकाशात गगनभरारी घेते; पण दुसरीकडे अजूनही तिचा लग्नाच्या बोहल्यावर बाजार मांडला जातो. तिची किंमत ठरवली जाते; पण आता आम्ही याविरोधातही लढतोय. समाज शिक्षणानेच नव्हे, तर विचाराने, वर्तनाने साक्षर व्हावा यासाठी प्रयत्न करत आहोत. कोविडने आपल्याला अनेक गोष्टी नव्याने शिकवल्या, जगण्याकडे पाहण्याचा वेगळा दृष्टिकोन दिला, माणसाची किंमत माणसाला कळली. असे असताना जेव्हा आपण नव्याने जगणं सुरू करत असताना जर काही वाईट प्रथा, चालीरिती सोडून नव्याची, न्यायाची कास धरू शकलो तर यापेक्षा मोठा धडा असणार नाही. लग्नसंस्थेचे पावित्र्य जपत त्याचा बाजार होणं थांबवू या. त्याची सुरुवात तुमच्या-आमच्या घरापासून करू या...

कितीतरी मुली असती सुंदर । परि हुंड्यासाठी राहती कुवार ।

तैसाचि मुलांचा व्यवहार । जातींत भासे कित्येक ॥

ऐसी वाईट पडली प्रथा । तेणें व्यभिचार वाढले सर्वथा ।

हें महापाप असे माथां । समाजाच्या ॥

- वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज

(लेखिका राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष असून, गेली सोळा वर्षे सामाजिक आणि राजकीय क्षेत्रांत कार्यरत आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुण्यात विजयी मिरवणूक काढण्यास सक्त मनाई; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: शायना एन सी सिद्धिविनायकाच्या दर्शनाला पोहोचल्या

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

Versova Assembly Constituency Result: भारती लव्हेकर विरुद्ध हारून खान

SCROLL FOR NEXT