School Girl Sakal
सप्तरंग

घे भरारी...

कॉलेजमध्ये जाऊन मुलींशी संवाद साधण्याचं ‘स्वच्छंदी भरारी अभियान’ काही दिवसांपासून सुरू केलं होतं.

अवतरण टीम

कॉलेजमध्ये जाऊन मुलींशी संवाद साधण्याचं ‘स्वच्छंदी भरारी अभियान’ काही दिवसांपासून सुरू केलं होतं.

- रूपाली चाकणकर rchakankar95@gmail.com

समाजामध्ये वावरताना मुलींना अनेक अडचणी येतात. काही छेडछाडीचे प्रसंग घडतात; पण सांगू शकत नाही. काय करावं, असे प्रश्न उभे राहतात. त्यांच्या मनात असलेलं त्यांनी रितं करावं म्हणून शाळा-कॉलेजमध्ये जाऊन मुलींशी संवाद साधण्याचं ‘स्वच्छंदी भरारी अभियान’ काही दिवसांपासून सुरू केलं होतं. याच अभियानांतर्गत एका मुलीने तिची आपबिती सांगितली आणि माझ्या पायाखालची जमीनच सरकल्याचा भास झाला. त्या मुलीच्या आपबितीची ही गोष्ट...

कॉलेजमध्ये जाऊन मुलींशी संवाद साधण्याचं ‘स्वच्छंदी भरारी अभियान’ काही दिवसांपासून सुरू केलं होतं. या उपक्रमात शाळा-शाळांत जायचं, मुलींना त्यांच्या सुरक्षिततेबाबत जागरूक करणारा माहितीपट दाखवायचा, सोबत स्थानिक पोलिस, बीट मार्शल, समुपदेशक असायचे. गप्पांच्या माध्यमातून त्यांना त्यांच्या अवतीभोवतीच्या परिस्थितीची जाणीव करून द्यायची. मुली सांगत असलेल्या शंकांचं समाधान करायचं, त्यांचे प्रश्न, समस्या ऐकायच्या, त्या सोडवण्याचा प्रयत्न करायचा. मुलींसाठी असलेल्या १०९८ या टोल फ्री नंबरची माहिती द्यायची, असं या अभियानाचं स्वरूप होतं. जवळजवळ शंभर ते सव्वाशे शाळांमध्ये जाऊन या सगळ्या मुलींशी संवाद साधला होता.

त्यादिवशी चार शाळांमध्ये जायचं होतं. त्या सगळ्या पुणे शहरातल्या शाळा; पण अंतर थोडंसं लांबचं होतं म्हणून घाई होती, ताण होता. मुलींचा फार वेळ घ्यायचा नाही. दिलेल्या वेळेत कार्यक्रम झाला पाहिजे, ही त्यामागची मानसिकता. म्हणून घरातूनच लवकर बाहेर पडले. दहा वाजता पहिला कार्यक्रम होता. माझी सर्व टीम सज्ज होती.

ज्या शाळेमध्ये मुलींची संख्या जास्त आहे, तिथे आम्हाला वेळ लागतच होता. काही शाळांमध्ये मुलं- मुली एकत्र होते. त्यांच्याशी आम्ही संवाद साधायचो; पण कदाचित त्या मुलींवर दडपण असायचं, त्या बोलायला बुजायच्या, तरी आम्ही त्यांना स्वतंत्र बसवून घेत त्यांच्याशी बोलायचो, तरी फारसे प्रश्न येत नाहीत, हे जाणवलं. मुलींच्याच शाळेमध्ये मात्र मुली बिनधास्त असायच्या, मोकळेपणाने बोलायच्या.

एक शाळा करून आम्ही दुसऱ्या शाळेत आलो. शाळेत आल्यानंतर मुख्याध्यापिकांनी स्वागत केलं. चला चहा घेऊ थोडा वेळ म्हणत, त्यांच्या केबिनकडे वळलो. चहा ही औपचारिकता होती, त्यानिमित्ताने थोडासा आढावा घेता येत होता. मुख्याध्यापिकांच्या केबिनला बसून विचारलं, कार्यक्रमाची सगळी तयारी झाली का? तर, त्या ‘हो’ म्हणाल्या. आमच्या मुली फार उत्सुक आहेत तुम्हाला भेटायला, असंही त्यांनी सांगितलं. चहा झाल्यावर हॉलमध्ये गेले. जवळ-जवळ हजार ते बाराशे मुलींनी हॉल भरलेला. त्यांनी जोरदार टाळ्यांनी स्वागत केलं. मुख्याध्यापकांनी प्रस्तावना केली, आम्ही कशासाठी आलो आहोत, काय करणार आहोत, कार्यक्रमाचे नियोजन काय हे मुख्याध्यापिका सांगत होत्या. तोपर्यंत सवयीने माझी नजर समोर बसलेल्या मुलींवर फिरत होती.

वेगवेगळ्या शाळांतून १००च्या वर कार्यक्रम झाले होते. एव्हाना एका गोष्टीची सवय झाली होती. शाळेमध्ये कार्यक्रम सुरू झाला की, माझ्यासोबतचे बीट मार्शल आणि समुपदेशक मुलींशी संवाद साधायचे, त्यावेळेस मी सगळ्यांचे चेहरे न्याहाळायचे, कारण आता पुस्तक वाचण्याऐवजी चेहरे वाचण्याची सवय लागली होती. पुस्तक वाचून इतरांचे अनुभव कळत होते, पण हे चेहरे वाचून आता माणसं कळत होती, यांचे नवे अनुभव वाचता येत होते. मी कार्यक्रम सुरू होण्यापूर्वीच विद्यार्थिनी कोणत्या इयत्तेमधल्या, हे विचारून घेतलं होतं. त्या अनुषंगाने मग संवाद साधता यायचा.

सगळ्या चेहऱ्यांकडे पाहत असताना साधारण सगळ्या मुलींमध्ये उत्सुकता, नवीन काय कळणार असे हावभाव होते. पण माझी नजर सतत आल्यापासून एका मुलीकडे जात होती. त्यात थोडे हरवल्याचे भाव होते. आठवीतल्या वर्गातली दुसऱ्या रांगेत बसलेली ही मुलगी. एक-दोनदा अधूनमधून तिचे डोळे भरून आलेले तिने पुसलेही, पण ती एवढ्या वेळामध्ये कोणाशी बोलली नाही, हसली नाही. प्रचंड उलथापालथ तिच्या मनामध्ये चालू असेल असं वाटत होतं; पण ती आतून इतकी उद्‍ध्वस्त झालेली असेल तितकी ती बाहेरून शांत दाखवायचा कदाचित प्रयत्न करत होती, हेही जाणवत होतं.

माझ्यासोबत असणारे समुपदेशक आणि बीट मार्शल यांचं मुलींशी बोलणं झाल्यानंतर मी बोलायला उभी राहिले. वातावरण जरा हलकंफुलकं व्हावं म्हणून अगदी मोकळेपणाने मुलींशी बोलायचे. एक-दोन चांगले गमतीशीर विनोद सांगायचे आणि आम्ही का आलो, कशासाठी आलो, येण्यामागचे उद्दिष्ट काय, हे सांगायचो. त्यामुळे मुली मोकळ्या व्हायच्या. हे आमच्यासाठी आलेत, कोणीतरी आमची काळजी घेणारे आहे, काळजीने विचारणारे आहे, या भावनेने त्या जरा खुलायच्या.

समाजामध्ये वावरताना या मुलींना अनेक प्रश्न असतात, त्याचा त्रास होतो. शाळेत, क्लासला जाताना काही छेडछाडीचे प्रसंग घडतात. कोणीतरी त्रास देणारं असतं, कधी-कधी बाहेरचं कोणी नसतं, घरातलं जवळचं असतं; पण सांगू शकत नाही. काय करावं, असे प्रश्न डोळ्यांसमोर उभे राहतात. या सगळ्या दिवसांमध्ये आपल्यासोबत कोणीतरी संवाद साधण्यासाठी असावं, हे निश्चितपणे त्यांना वाटतं. पण आयुष्यात कदाचित कोणीच असे मिळत नाही की त्याच्यापाशी आपण मोकळेपणानं बोलावं.

मैत्रिणींना सांगितलं तर त्या हसतील, शिक्षकांशी बोललो तर त्यांचा धाक असतो, त्यांच्याशी कसं बोलणार? आई-वडिलांना सांगितलं तर ते शाळा बंद करतील. मग सांगायचं कुणाला? फार घुसमट होत असते आणि कदाचित अशा या दोलायमान अवस्थेमध्ये माझ्या या ‘स्वच्छंदी भरारी’ने अनेकींना जगण्याचं बळ दिलं, ही माझी प्रेरणा होती.

मुलीकडे पाहिल्यानंतर ज्यावेळेस मी बोलायला सुरुवात केली, त्यावेळेस तिचे डोळे भरून आले होते; पण जसजसं मी इतर शाळेतल्या मुलींचा अनुभव सांगत होते, तसतसं ती रडायला लागली. तिला काहीतरी सांगायचं आहे, हे जाणवत होतं. इतर मुलींसमोर तिला जास्त ताण यायला नको म्हणून मी माझ्या बीट मार्शलला खुणावलं आणि तिला शेजारच्या रूममध्ये घेऊन जायला सांगितलं. माझं मुलींशी बोलून झाल्यानंतर त्यांच्या अनेक प्रश्नांना आम्ही एकत्रितरीत्या उत्तरं दिली. ज्या मुली बोलू शकत नव्हत्या, त्यांनी चिठ्ठीतून प्रश्न मांडले, त्याची उत्तरे आम्ही दिली. माझं या मुलींशी बोलून झाल्यानंतर मी शेजारच्या रूममध्ये असलेल्या त्या मुलीकडे गेले, बीट मार्शल तिला काहीतरी समजावून सांगत होते.

मी गेल्यानंतर बीट मार्शलने मला सांगितले, ‘ताई, तुम्हाला धक्का बसेल.’ मी म्हटलं, ‘काय झालं?’ त्या म्हणाल्या, ‘ही किरण (नाव बदलेले आहे). आज तिने अक्षरशः तिच्या बॅगमध्ये सुसाईड नोट लिहून आणली आहे.’ माझ्या पायाखालची जमीनच सरकली. ‘म्हणजे... आज ही काय आत्महत्या करणार होती?’ बीट मार्शल म्हणाले, ‘हो... ती आज आत्महत्या करणार होती!’

मी किरणच्या शेजारी बसले. तिच्या पाठीवरून हात फिरवून काय झालं म्हणून विचारलं. आता तिच्या भावनांचा बांध फुटला होता. मोकळेपणाने ती रडायला लागली. तिला मनसोक्त रडू दिलं. मनमोकळे होईपर्यंत. जे काय बोलायचं ते बोल म्हणून सांगितलं. रडून झाल्यावर दोन मिनिटं शांत बसली. पाणी पिल्यानंतर मोठा श्वास घेऊन तिने बोलायला सुरुवात केली.

तिने सांगितलं, ‘मी खेडेगावातली. पहिलीपासून शाळेत पहिला नंबर; पण घरची परिस्थिती बेताची. गावातील भावकी लवकर लग्न करायचा तगादा लावायची. म्हणून आई-वडिलांनी इकडे मला शहरात काका-काकूंडे दोन वर्षांपूर्वी पाठवलं. पण मी ज्या दिवसापासून इकडे काकूकडे आले, त्या दिवसापासून काकांची माझ्यावरती वाईट नजर, अगदी आल्यानंतर पाचव्या दिवसापासूनच त्यांनी माझ्या शरीराला घाणेरडे स्पर्श करायला सुरुवात केली. मी विरोध करायचे तर मला मारायचे. नंतर नंतर तर त्यांनी माझ्यावर बळजबरी केली. मला धक्काच बसला. दोन-तीन दिवस तापाने फणफणलेले. काकूला सांगायचा प्रयत्न केला तर काकूचं वागणं मला विचित्र वाटलं. वाटलं की काकूही यात साथ देते की काय? तिला कळत नाही का? आपला नवरा काय करतो ते? तिला सांगितलं तर तिने ऐकून न ऐकल्यासारखं करून माझाच राग राग करायला सुरुवात केली. घरातली सगळी कामे मी करते. अभ्यासालाही वेळ मिळत नाही. शाळेच्या डब्यामध्ये घरात काही शिल्लक असेल तर डबा देते. नाही तर कधी-कधी डबाही नसतो.

खूप वेळा या घरातून बाहेर पडायचा प्रयत्न केला, पण घरी जाऊन आई-वडिलांना काय सांगू? असह्य होतंय हे सगळं. आज दोन वर्षे झाली, मी सहन करते. मी कोणाशी बोलू शकत नाही. मैत्रिणींना सांगितलं तर त्यांचा विश्वास बसणार नाही. त्या माझ्यापासून लांब जातील. कोणी मला जवळही बसू देणार नाही. शिक्षकांना सांगितलं तर ते पालकांना बोलावून घेतील. त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळेल. कोणाशी बोलू मी, काय बोलू...! अस्वस्थ होतंय मला, जगणं असह्य झालंय. प्रचंड त्रास होतोय. त्या घाणेरड्या माणसाच्या वासनांध नजरेची माझी मलाच लाज वाटायला लागली, किळस वाटायला लागली. म्हणून मी आज चिठ्ठी लिहिली. नाही जगायचं मला, होती माझी खूप स्वप्नं... विरली ती सगळी.

मोठं अधिकारी व्हायचं होतं मला. खूप मोठं व्हायचं होतं. खूप शिकायचं होतं. मला वाटत नाही मी शिकेन, खूप मानसिकता बिघडली आहे. माझं अभ्यासात लक्ष लागत नाही. फारसा वेळही मिळत नाही अभ्यासासाठी, नाही जगावं वाटत आता.’’

क्षणभर थांबली, पुन्हा रडू लागली.

आज तिच्याशी मोकळेपणाने बोलायचं ठरवून पुढच्या शाळेमध्ये कदाचित यायला उशीर होईल, असा निरोप पुढे पाठवून दिला. किरणला जवळ घेतलं, विश्वासाने मिठीत घेऊन सांगितलं, ‘आम्ही तुझ्यासाठीच आलोय, काही प्रश्न असेल, काही मदत असेल तर निश्चितपणे आम्ही करू. तुझी स्वप्नं पूर्ण कर, त्या स्वप्नांचा पाठलाग कर, तुझ्या या यशाच्या रस्त्यामध्ये असे हे ‘महिषासुर’ येत राहतील. त्यांचा नायनाट करायला तू सक्षम आहेस. आम्हीही तुझ्यासोबत आहोत. तू काळजी करू नकोस. हे ऐकून तिला थोडंसं हायसं वाटलं असेल. ती सांगू लागली.

‘ताई, तुम्ही मला जर यातून बाहेर काढलं, माझी कुठेही राहायची व्यवस्था केली, तर मी काम करेन आणि शिक्षण घेईन. माझ्या आई-वडिलांना कळू देऊ नका; पण या नराधम काकाला शिक्षा करा. तुम्ही मदत केली तर मी खरंच खूप अभ्यास करेल.’ आता कुठे थोडीशी तिच्या बोलण्यामध्ये जरा जिद्द वाटत होती.

तिला आश्वस्त केलं की, ‘सगळी मदत मी करेन. तुझ्या शिक्षणात खंड पडू देणार नाही. तुला त्रास देणाऱ्यालाही नक्की शिक्षा होईल. मी आणि माझी सगळी टीम तुझ्यासोबत आहे.’

तिच्या चेहऱ्यावरचे भाव बदलत होते, ती शांत होत होती आणि पुन्हा आत्मविश्वास निर्माण झाल्याने ती पुन्हा तिच्या स्वप्नांकडे वळल्यासारखी वाटत होती.

तिच्याशी बोलून मी निघाले; पण लगेचच सगळी यंत्रणा कामाला लावली. काही दिवसांतच तिच्या काकाविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक झाली. किरणच्या आई-वडिलांचंही समुपदेशन केलं. जिल्ह्यातल्याच मुलींच्या हॉस्टेलमध्ये तिची राहायची, शिक्षणाची व्यवस्था लावली. तिला शिष्यवृत्ती मिळावी यासाठी मार्गदर्शन मिळवून दिलं. या घटनेला दोन वर्षे झाली... किरणचं शिक्षण सुरळीत सुरू आहे. ती उपजतच हुशार होती; पण मधल्या या दुर्दैवी अनुभवांनी होरपळून गेली होती. सुरक्षित वातावरण मिळाल्यावर ती अभ्यासाकडे लक्ष देऊ लागली. आजही अधूनमधून तिच्याशी संपर्क होतो, कटू अनुभव विसरून पुन्हा नवीन आयुष्य जगू लागलीय. पंखांमध्ये नवं बळ घेत ‘स्वच्छंद भरारी’साठी सज्ज झालीय.

अशा आजूबाजूला अनेक किरण आहेत, त्यांनी वाईट गोष्टी वेळीच ओळखून त्यावर मात करत मनातल्या स्वप्नांना गरुडभरारीचे पंख देण्यासाठी ‘तिने’ सज्ज व्हावे. प्रामाणिक कष्ट करत राहिले तर सावली यश बनून बरोबर येईल.

म्हणून सांगावसं वाटतं, ‘ऐरण होशील तेव्हा घाव सोस,

पण हातोडा होशील तेव्हा घाव घालायला विसरू नकोस’

दरिया की कसम मौजों की कसम

यह ताना बना बदलेगा

तू खुद को बदल, तू खुद को बदल

तब ही तो जमाना बदलेगा...

तू चुप रहकर जो सहती रही तो

क्या यह जमाना बदलेगा...

तू बोलेगी मुंह खोलेगी

तब ही तो जमाना बदलेगा

(लेखिका राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष असून, गेली सोळा वर्षे सामाजिक आणि राजकीय क्षेत्रांत कार्यरत आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: छत्रपती संभाजीनगरमध्ये मतमोजणीसाठी भाजपचे प्रतिनिधी मतमोजणी केंद्रावर दाखल

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुंबईत नक्की कोण मारणार बाजी? वाचा एका क्लिकवर

Chopda Assembly Election 2024 Result Live: चोपडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीत काटे की टक्कर..!

Islampur Assembly Election 2024 Results : जयंत पाटील विरुध्द निशिकांत पाटील

Erandol Parola Assembly Election 2024 result live : एरंडोल पारोळ्यात कोण मारणार बाजी?

SCROLL FOR NEXT