Girls and Women sakal
सप्तरंग

संवाद

मुलींनी अडनिड्या वयात घेतलेले निर्णय हे नेहमी बरोबरच असतात, असं नाही. गेल्या काही वर्षांत मुलं त्यांच्या भावना व्यक्त करण्यासाठी कधी इंटरनेटच्या जाळ्यात अडकतात.

अवतरण टीम

- रूपाली चाकणकर, rchakankar95@gmail.com

मुलींनी अडनिड्या वयात घेतलेले निर्णय हे नेहमी बरोबरच असतात, असं नाही. गेल्या काही वर्षांत मुलं त्यांच्या भावना व्यक्त करण्यासाठी कधी इंटरनेटच्या जाळ्यात अडकतात, तर कधी थोड्याशा ओळखीतच एखाद्या व्यक्तीला सर्वस्व मानतात. आपण मुलींना चांगलं शिक्षण देतो आहे; पण शरीरात होणारे बदल, आकर्षण याबाबत स्पष्ट मार्गदर्शन करत नाही, बोलत नाही. संवादाचा अभाव राहतो...

काही दिवसांपूर्वीची घटना. सकाळी भेटायला आलेली बरीच मंडळी होती, प्रत्येकाशी बोलून सगळे गेल्यावर मलाच बाहेर पडायचे होते. शेवटी दोन कॉलेजच्या विद्यार्थिनी होत्या त्यांच्याशी बोलतच गेटमधून बाहेर पडणार, तेवढ्यात ‘रमा’ तिच्या दोन-तीन मैत्रिणींसोबत खूप उत्साहाने, आनंदाने हातात पेढ्याचा बॉक्स घेऊन आली. दहावीचा निकाल लागला होता. ९२% गुण मिळाले होते. नेहमी आईसोबत असणारी रमा आज मैत्रिणींसोबत आली होती. जशी किलबिल करत आली, तशी गेलीही.

पहिल्यांदा तुमच्याकडे आले, अजून बरेच जणांना पेढे द्यायला जायचे म्हणत ती बाहेरही पडली. त्यानंतर दोन-चार महिन्यांनी रमाच्या आई बचत गटाच्या मीटिंगमध्ये भेटल्या होत्या. नवीन कॉलेज, नवीन कॅम्पस, कॅन्टीन, नवीन मित्र-मैत्रिणी, दररोज रंगीबेरंगी ड्रेस, यामुळे ती खूप खुश आहे, असं त्या सांगत होत्या. कॉलेजला जाण्या-येण्याचा वेळ आणि कॉलेज यातच तिचा दिवस जातो... लेकीचं कौतुक करताना त्याही खुश होत्या.

मुलीच्या शिक्षणासाठी त्यांनी स्वतःचा सगळा वेळ दिला होता. तिच्या लहानपणापासून बारकाईने लक्ष ठेवून, तिचे क्लास, तिच्या वेगवेगळ्या परीक्षा, अभ्यास, तिची हौस... या सगळ्यात त्यांनी स्वतःकडे फार लक्ष दिले नाही. तिच्या सोयीनुसार उरलेला वेळ त्या इतर कामासाठी देत. थोडक्यात रमा म्हणजे त्यांचे जग. एकंदर छान चाललं होतं त्यांचं. दोन्ही मायलेकी मजेत होत्या.

नंतर मी माझ्या व्यापात होते. दौरे, आयोगाच्या जनसुनावणीने या कालावधीत आमची फारशी निवांत भेट झाली नाही. मध्यंतरी रमाच्या आईचा एक मेसेज अभिनंदनासाठी येऊन गेला. धन्यवाद म्हणत प्रतिसाद दिला. इतकंच चार-सहा महिन्यातील संभाषण. गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही आमची ‘आरोग्यवारीची’ तयारी होती.

आयोग कार्यालयातून व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून पुणे, सातारा, सोलापूर या जिल्हाधिकारी व संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा सुरू होती. त्या वेळी रमाच्या आईचा सातत्याने कॉल येत होता. मीटिंगमध्ये कॉल घेता येईना. मी मेसेज केला, नंतर करते म्हणून; पण त्या सातत्याने कॉल करत होत्या. मी मीटिंगमध्ये कॅमेरा ऑफ करून बाजूला आले आणि कॉल घेतला. एकदम घाबरलेल्या आणि रडक्या आवाजात त्या मला म्हणाल्या, रमा घरातून पळून गेली आणि कदाचित त्या बेशुद्ध झाल्या. कारण फोनवर दुसरी महिला बोलत होती, बराच गोंधळाचा आवाज येत होता, रडारड चालू होती.

मला क्षणभर सुचेनाच. रमा आणि रमाच्या आईचा चेहरा क्षणात डोळ्यासमोर तरळून गेला. तातडीने पोलिस स्टेशनला फोन करून कळविले. तोपर्यंत तक्रार करायला सांगितली. सगळ्या मित्र-मैत्रिणींना फोन सुरू झाले. नातेवाईकांकडे शोधाशोध सुरू. इकडे रमाच्या आईला हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. मुलगी घरातून पळून गेली, ही गोष्टच त्यांना मुळी सहन होणारी नव्हती. ती घरात चिठ्ठी लिहून गेली होती.

मी आयोगाच्या कार्यालयातून बाहेर पडले होते. मुंबईहून पुण्याला निघाले होते. प्रवासात सतत फोन चालू होते. दोन तासांत पोलिसांनीच सांगितले, तिने एका मुलाबरोबर लग्न केल्याचे फोटो पाठवले आहेत आणि ‘‘मी माझ्या मर्जीने विवाह करत आहे, दोन दिवसांपूर्वीच माझे वय १८ वर्षे पूर्ण झाल्यामुळे मी सज्ञान आहे आणि मला आता या क्षणी माझे आई-वडील किंवा इतर नातेवाईकांना भेटायचे नाही, बोलायचे नाही, तसा प्रयत्न त्यांनीही करू नये.’’ हा तिचा मेसेज धक्कादायक होता.

हल्ली माझ्याकडे दररोज एकतरी केस अशी येते. त्यामुळे साधारण सतरा वर्षे आठ-नऊ-दहा-महिने, सतरा वर्षे ११ महिने, मुलींचे प्रेमप्रकरण पळून जाण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. रमा आणि तिचे कुटुंब फार सुशिक्षित; पण माहिती घेतल्यावर तिने ज्या मुलाशी लग्न केले तो सातवी शिकलेला, ना नोकरी, ना घर. वडील दारू पिऊन आईला मारहाण करणारे... काय पाहिलं असेल हिने? प्रेम आंधळं असतं; पण इतकं की जन्म देणारे आई-वडील क्षणात वैरी वाटतात.

इतकी हुशार मुलगी. डॉक्टर होण्याचं तिचं स्वप्न तिनं अर्धवटच सोडलं. पुढच्या आयुष्याचं काय? ती शिक्षण पूर्ण करेल का? तिच्या करिअरचं काय? ज्या आत्मविश्वासाने ती तिच्या आईकडे राहत होती तो आत्मविश्वास तिला तिने निवडलेल्या घरात मिळेल का? ज्या वातावरणात लहानाची मोठी झाली, त्याच्या परस्पर विरुद्ध वातावरण, राहणीमान, विचारसरणी यात ती किती टिकेल? एखाद्या क्षणी आपण चुकलो, असं लक्षात आल्यानंतर ती पुन्हा मागे फिरण्याचं‌ धाडस करेल?

प्रेमविवाह किंवा मुलींनी स्वतःच्या पसंतीने आयुष्याचा जोडीदार निवडणे याला माझा अजिबात विरोध नाही. माझं म्हणणं इतकंच आहे की, अडनिड्या वयात घेतलेले निर्णय हे नेहमी बरोबरच असतात, असं नाही. आपण ज्याला प्रेम समजतोय ते कदाचित शारीरिक आकर्षण असेल, वाढत्या वयासोबत शरीरात होणारे बदल किंवा संवादासाठी कोणीतरी हवं असणं, असेही असू शकते. गेल्या काही वर्षात छोटी कुटुंब, आई-वडील दोन्ही अर्थार्जनासाठी बाहेर पडलेले असताना मुलं त्यांच्या भावना व्यक्त करण्यासाठी माध्यम शोधत असतात.

कधी इंटरनेटच्या जाळ्यात अडकतात, तर कधी थोड्याशा ओळखीतच एखाद्या व्यक्तीला सर्वस्व मानतात. आपण मुलींना चांगलं शिक्षण देतो आहे, त्यांच्या करिअरचा विचार करतो, त्यांना काय करू नये, हे सांगत असतो; पण शरीरात होणारे बदल, आकर्षण याबाबत स्पष्ट मार्गदर्शन करत नाही, बोलत नाही. इकडे संवादाचा अभाव राहतो आणि मग एखाद्या दिवशी घरी वेगळी असलेली मुलगी बाहेरच्या जगात वेगळेच निर्णय घेते, असं दिसून येतं. घरच्यांच्या संवादासोबतच आपल्या शिक्षण व्यवस्थेमध्ये, महाविद्यालयीन जीवनात मुलींचंच नव्हे, तर मुलांचंही समुपदेशन होणं गरजेचं आहे.

नुकत्याच आपल्या आजूबाजूला झालेल्या दोन दुर्दैवी घटना इथे सांगतेय. त्यांचा संबंध इथे जोडणे कदाचित अतिशयोक्ती वाटेल; पण शांतपणे विचार केला, तर लक्षात येईल- आज घडणाऱ्या एखाद्या घटनेची पाळंमुळं जुन्या छोट्याशा गोष्टीत रोवलेली असतात. जूनमध्येच मुंबईत दोन घटना घडल्या. चर्चगेटला होस्टेलमध्ये राहणाऱ्या मुलीचा अत्याचार करून झालेला खून आणि मिरा-भाईंदरमध्ये ‘लिव्ह इन’मध्ये राहणाऱ्या महिलेची निर्घृण हत्या.

चर्चगेटच्या घटनेत पीडित मुलीने आरोपीकडून आधीसुद्धा त्रास झालेला असताना कुणाला त्याबद्दल सांगितलं नाही. त्यामुळेच आरोपीची हिंमत झाली आणि छेडछाडवरून अत्याचार करण्यापर्यंत त्याची मजल गेली. या घटनेत होस्टेलमध्ये राहत असल्याने घाबरून कदाचित मुलीने प्रशासनाला याबाबत माहिती दिली नाही; मात्र आपल्या हॉस्टेलमध्ये मुलींना काय अडचणी आहेत, याची माहिती प्रशासनानेही वेळोवेळी करून घ्यायला हवी होती.

मिरा-भाईंदरच्या केसमध्ये सरस्वती वैद्यची ज्या प्रकारे हत्या झाली तो क्रूरपणा एका दिवसात आलेला नसेलच. गेली काही वर्षे सतत तिची होणारी ओढाताण, एकाकीपणा, आर्थिकदृष्ट्या अवलंबून असणे, बोलायला-सांगायला जवळच कोणी नाही, यातूनच सरस्वती आरोपी सानेचे अत्याचार सहन करत राहिली. तिला मदत करणारं कोणीच नव्हतं, या भावनेतून ती त्याच घरात राहिली आणि शेवटी तिथेच तिचा करुण अंत झाला.

या दोन्ही घटना वेगळ्या जरी असल्या, तरी त्यांची अखेर ही महिलेच्या आयुष्याची शोकांतिका होण्यातच आहे. यात केवळ त्यांच्या कुटुंबाचा किंवा त्यांचा दोष नाही, तर समाज म्हणून आपण त्यांच्याशी बोलण्यात, त्यांना धीर देण्यात कमी पडतोय, हा आपलाही दोष आहे. घेतलेले निर्णय चुकू शकतात, त्यांना पश्चात्ताप होतो. अशा वेळी त्यांना समजून घेणारं, त्यांच्या चुका पोटात घालून आधार देणारं कोणीतरी असणं गरजेचं आहे; नाहीतर त्या अन्याय सहन करत राहतात आणि त्याचा शेवट दुर्दैवी होतो. हेच श्रद्धा वालकरच्या बाबतीतही घडलं होतं.

कुठल्याही नात्यात संवाद असायला हवा आणि जर जमत नसेल, तर महिलेला योग्य वेळी बाहेर पडता आलं पाहिजे, त्यासाठी तिच्याशी संवाद झाला पाहिजे. तिला आधार मिळाला पाहिजे. महिला एकट्या पडतात आणि नंतर हिंसेला बळी पडतात, असेच साधारण दिसून येत आहे. अनेकदा महिला आपल्यावर होणाऱ्या अन्यायाबद्दल बोलायलासुद्धा घाबरतात, अशा वेळी समाज म्हणून संवादाची तयारी असायला हवी.

आपल्या मुलांशी या सगळ्याबाबतसुद्धा संवाद साधणे गरजेचे आहे. आठवी ते बारावीच्या मुलांसाठी शालेय जीवनात समुपदेशनाचा समावेश करणे आवश्यक आहे. महिलांना त्यांच्यासाठी असलेले कायदे, हेल्पलाइन, कौन्सिलिंग सेंटर याच्याबद्दल सतत माहिती देणे गरजेचे आहे.

श्रद्धा वालकर, चर्चगेट होस्टेल, मिरा-भाईंदर या घटनांकडे एकेक म्हणून न पाहता या सगळ्या एकमेकांशी संबंधित आहेत असं पाहा. या सगळ्यांचे मूळ संवादाच्या अभावात आहे. या घटना मीडियामुळे जगासमोर आल्या; पण अशा अनेक महिला घरामध्ये कुचंबणा सहन करत आहेत. त्यांच्या आयुष्यात काहीतरी दुर्दैवी होईपर्यंत, त्याची बातमी होईपर्यंत थांबायला नको. यात समाज म्हणून आपलीसुद्धा जबाबदारी आहे, हे लक्षात घेऊन आपल्याला पुढे जायला हवं. पालक आणि मुलांमध्ये ‘संवादा’ची दारे सताड उघडी राहू देत, विसंवादाच्या घुसमटाने नाती आणि माणसं संपणार नाहीत. चला ‘प्रेमाचा’ संवाद साधू या!

(लेखिका राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष असून, गेली सोळा वर्षे सामाजिक आणि राजकीय क्षेत्रांत कार्यरत आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Georai Crime : बुधप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

Bharat Global Developers : बोनस आणि स्टॉक स्प्लिटचा डबल धमाका, कोणता आहे हा शेअर ?

Belrise Industries IPO Launch : बेलराईज इंडस्ट्रीज आणणार 2150 कोटीचा आयपीओ, डिटेल्स जाणून घ्या...

Udgir Assembly Elecion Result : पंचवीस टेबल, २६ राऊंडमध्ये होणार मतमोजणी; बारा वाजेपर्यंत ट्रेंड हाती येणार

Ramchandra Ingawale : राजकारणाचा नुसता चिखल झालाय; भूगावमधील १०९ वर्षीय रामचंद्र इंगवलेंची व्यथा

SCROLL FOR NEXT