- रूपाली चाकणकर, rchakankar95@gmail.com
‘आपण फक्त २५ जणांच्या व्हाॅट्सॲप ग्रुपवर सध्या बोलतोय; पण आपल्या दहावीच्या बॅचच्या सर्वच मुलींना एकत्र करून शाळेतच गेट-टुगेदर केले तर?’ अनुराधाने फोनवर विचारलेल्या या प्रश्नाला मी होकार दिला आणि साऱ्या वर्गमैत्रिणींची युद्धस्तरावर शोधाशोध सुरू झाली. एकेक करून मैत्रिणी व्हाॅट्सॲप ग्रुपवर यायच्या आणि ‘रयत’मधील त्या दिवसांच्या आठवणींत घेऊन जायच्या... या आठवणींसह बालपणीच्या दोस्ती दुनियेतील अल्लड, अवखळ झोक्यावर ‘एक झोका सुखाचा’ म्हणत झुललो, तो क्षण अविस्मरणीयच...
अनुराधाचा फोन खणखणला. मी एका कार्यक्रमातच होते. उचलता येईना म्हणून मेसेज केला, नंतर करते म्हणून. कार्यक्रम संपून गाडीत बसल्याबसल्या तिला कॉल केला. अनुराधा माझी वर्गमैत्रीण. लहानपणातील प्रत्येक व्यक्ती आपलीशी वाटते. निरागस आणि निखळ आठवणी. कायम हवेहवे वाटणारे बालपण आनंदाचा ठेवा. ती वाटच पाहत होती. मला म्हणाली, ‘‘अगं रूपाली आपण फक्त २५ जणांच्या व्हाट्सॲप ग्रुपवर सध्या बोलतोय; पण आपल्या दहावीच्या बॅचच्या सर्वच मुलींना आपण एकत्र करून शाळेतच गेट-टुगेदर केले तर?’ मी क्षणात तिला ‘हो’ म्हणाले, पण हे गेट-टुगेदर नुसतं म्हणायला सोपं होतं.
कारण आमची १९९६-९७ ची साधना शाळेतील बॅच. मागील २६ वर्षांत पुलाखालून खूप पाणी गेलं होतं. दहावीनंतर फार संपर्क राहिला नव्हता. लग्नानंतर ज्या पुण्यात होत्या, त्याच थोड्याफार संपर्कात होत्या. काही दुसऱ्या राज्यांत, तर काही थेट परदेशातही स्थायिक झालेल्या. मी ‘हो’ म्हणाले आणि सगळ्यांचे नंबर गोळा करण्यापासून युद्धपातळीवर शोधमोहीम सुरू झाली. त्यासाठी मोबाईल आणि त्यावरचा गुगलचा ‘जादुई चिराग’ आमच्या मदतीला होता.
एकमेकांचे नंबर शोधत, ओळख काढत, नातेवाईकांना विचारत, दोन-तीन महिन्यांत जवळजवळ सगळी दहावीची बॅच आमच्या नियोजन टीमच्या ‘पठ्ठ्यांनी’ व्हाट्सअॅप ग्रुपवर गोळा केली. फोन करून ग्रुपमध्ये ॲड केले की सगळ्याजणी त्या वर्गमैत्रिणीला ‘आधी तुझा फोटो पाठव’ असा मेसेज करत. कारण इतक्या वर्षांनंतर ओळखणे म्हणजे तारेवरची कसरत होती.
आता जवळजवळ सगळ्यांनीच वयाची चाळिशी पार केलेली. त्यामुळे मुलांचे शिक्षण, घराच्या जबाबदाऱ्या यातून थोड्या स्थिरावलेल्या. स्वतःचा संसाराचा जम बसवलेला. त्यामुळे साहजिकच भरपूर वेळ आता त्या देऊ शकत होत्या. वेळ नसला तरी आवर्जून वेळ काढत होत्या. सगळ्या बालपणीच्या आठवणी आणि त्या आठवणीतील सवंगडी यांना प्रत्यक्ष भेटण्याची ओढ होती.
‘दोस्तीच्या दुनियेतील मस्तीने’ तयारीला वेग धरला होता. पुन्हा अनुराधाने फोन करून माझी १३ मे तारीख घेऊन शाळेत अकरा ते दोन या वेळेत शिक्षकांसह भेटण्याचे नियोजन युद्धपातळीवर सुरू केले. कामाच्या व्यग्रतेमुळे मला शाळेचा ग्रुप फार पाहता यायचा नाही, पण मलाही प्रत्येकीला भेटण्याची प्रचंड उत्सुकता होती. ग्रुपमध्ये २४ तास चर्चा चालत. कारण परदेशातील मैत्रिणींकडे दिवस असताना आपल्याकडे रात्र आणि पहाट. आपला दिवस म्हणजे त्यांची रात्र. त्यामुळे ‘२४ तास सेवा’ या व्रताप्रमाणे कायम चर्चा, त्यातून कामांची विभागणी, मिनीट टू मिनीट प्रोग्राम आखला जात होता.
या ग्रुपमधून दोन चांगल्या गोष्टी घडल्या. एक म्हणजे आमची वर्गमैत्रीण अर्चना जगताप हिचा अपघाती मृत्यू झाल्यावर सगळ्या वर्गमैत्रिणींनी पैसे गोळा करून तिच्या दोन्ही मुलांच्या नावाने एफडी करत, सगळ्यांनी त्यांच्या संपूर्ण शिक्षणाची जबाबदारी घेतली. विशेष म्हणजे परदेशात असलेली शीतल मुथा ही आमची मैत्रीण, तिच्या वडिलांना तिने शाळेत पाठवून मदत देऊन त्या मुलांचे पालकत्व स्वीकारले. दुसरी घटना म्हणजे योजना नायडू आमची वर्गमैत्रीण.
नोकरी करते. अगदी पंधरा-वीस दिवसांपूर्वीच ऑफिसला जाताना बसस्टॉपवर तिला एक दहा-बारा वर्षांचा मुलगा ‘बुड्डी के बाल’ विकताना दिसला. तिने त्याची चौकशी केली. विशेष म्हणजे त्याने त्याच्या आईचा नंबर देऊन त्यावर कॉल करायला सांगितला. सुरुवातीला कोणीच कॉल उचलेना, तोपर्यंत तिचीही बस आली. ती बसमध्ये बसून गेल्यावर पाच मिनिटांत त्या मुलाने दिलेल्या नंबरवरून कॉल आला. पलीकडून एक महिला बोलत होती. योजनाने मुलाचे वर्णन करून काय घडले ते सांगितले. ती माऊली रडू लागली, कारण ती त्या मुलाची आई होती. दोन महिन्यांपासून तो मुलगा बेपत्ता होता. योजनाला काही सुचेना. तिने तातडीने आमच्या शाळेच्या ग्रुपमध्ये मेसेज केला.
मुलाचा फोटो आणि त्याच्या आईचा नंबर दिला. योगायोगाने मी प्रवासात असल्याने मेसेज लगेच पाहिला. तो मेसेज तातडीने कंट्रोलला पाठवून शोध घ्यायला सांगितले. तातडीने पोलिस हडपसर भागात पोहोचले; पण त्यावेळी तेथे कोणीच नव्हते. माझा पाठपुरावा सुरू होता. आत्ता पाच-सहा दिवसांपूर्वी तो मुलगा तर पोलिसांना सापडलाच; पण त्याच्यासोबत अजून दहा-बारा मुले सापडली. आरोपीवर गुन्हा दाखल झाला आणि कायद्याची प्रक्रिया पूर्ण करून कुटुंबाकडे रवाना केली.
या दोन्ही घटना तशा पाहिल्या तर फार संवेदनशील आहेत. केवळ व्यक्ती नाही तर त्यांचे कुटुंब आणि संपूर्ण आयुष्य यांना न्याय देणारे. पर्यायाने ‘जगण्याचा आत्मविश्वास’ देणारे.
मैत्रिणींचे फोन सतत येत होते. सगळ्यांना कमालीची उत्सुकता होती. आपली मैत्रीण फक्त टीव्हीवर दिसते, प्रत्यक्षात भेटीसाठी आता तासांचे काऊंटडाऊन सुरू झाले. तुकड्यांनुसार ड्रेसकोड, वर्गात जाऊन बेंचवर काढायचे फोटो... सर्वच तयारी पूर्ण झालेली. आता वाट पाहत होत्या १३ तारखेची. शेवटी ती उजाडली. कार्यक्रमासाठी सासुरवाशिनी माहेरी दाखल झालेल्या. अनेकांनी ऑफिसला पत्र पाठवून सुटी घेतलेली. विशेष म्हणजे त्यावेळचे सगळेच शिक्षक होते.
शाळेत गेटपासूनची रांगोळी, सजावट, जेवणाचा बेत, शिक्षकांसोबत माझाही सत्कार करत वर्गमैत्रिणींनी प्रेमाने माझ्यासाठी स्वतः काढलेले स्केच मला भेट दिले. इतक्या वर्षांच्या राजकारणात, कोणत्या ना कोणत्या निमित्ताने, कोणाला ना कोणाला छोटी-मोठी मदत करता आली होती, त्याचा उल्लेख करत मैत्रिणीने सुंदर मनोगत व्यक्त केले. स्टेजवर जाण्यापूर्वीच मुख्याध्यापिकांना मी विनंती केली होती की, मला समोर मैत्रिणींमध्ये बसू द्यावे, पण कालेकर ताई म्हणाल्या, तुम्ही आजच्या प्रमुख पाहुण्या तर आहातच; पण आमच्या संस्थेच्या समन्वयक समितीच्या सदस्यदेखील आहात. त्यामुळे माजी विद्यार्थिनी म्हणून ठीक आहे; पण संस्थेचे पदाधिकारी म्हणून तुम्ही स्टेजवरच बसावे.
नाईलाजाने व्यासपीठावर बसले; पण सगळं लक्ष समोरच्या मैत्रिणींत. शाळेतील वर्ग, बेंच, दरतासाला ‘जागी’ करणारी भली मोठी घंटा, फळ्यावरचे सुंदर सुविचार, कार्यानुभवाचे तास, कबड्डी, खो-खोची प्रमुख म्हणून जल्लोषात जिंकलेल्या स्पर्धा, विज्ञान प्रदर्शनात शाळेत पटकाविलेली बक्षिसे, सांस्कृतिक कार्यक्रमांत नृत्यात घेतलेला सहभाग, लोकनेते शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या उपस्थितीत १९९६-९७ ला झालेल्या शाळेचा नामविस्तार, प्रयोग शाळेतील कितीतरी वेळा फसलेले प्रयोग आणि या सगळ्यांमधून धमाल करत शाळेत पहिल्या पाचमध्ये पटकावलेले नंबर...
साऱ्या आठवणी काल घडल्यासारख्या डोळ्यांसमोरून तरळत होत्या. त्या वेळच्या माझ्या मुख्याध्यापिका गिरेताई, साळुंखे ताई, पलीकडे माझ्या वायदंडे ताई, वालेकर सर आणि कुदळे ताई, जाधव सर, बुद्रुक ताई आणि उपाध्ये सर, झिरपे सर, झागडे सर... सारे गुरुवर्य आणि आम्ही विद्यार्थिनी आज तब्बल २६ वर्षांनंतर एकत्र आलो होतो... भावनांचा कल्लोळ इतका होता की, अक्षरशः सारखे डोळे भरून येत होते. माझे तर शब्दच हरवून गेले होते.
त्यावेळी शिक्षकांनी घडविले म्हणूनच आज ‘घडू शकलो’. त्या प्रत्येक शिकवणीची आज ‘संस्काराची शिदोरी’ झाली होती. मातीच्या घड्याला आकार देण्याचे काम या ‘रयत’ने केले म्हणून सर्वच विद्यार्थिनी आपापल्या क्षेत्रात नावलौकिक मिळवून परदेशातही भरारी मारू शकल्या. अभिमानच नाही तर गर्व आहे मला मी ‘रयत’ची विद्यार्थिनी असल्याचा. कार्यक्रम संपत असतानाच कालेकर ताईंची सूचना थोडी बाजूला सारून भारतीय बैठकीत मुलींमध्ये जाऊन बसले आणि मुलींनी एकच गल्ला केला... आता आम्ही सगळेच एक होतो... पराकोटीचा आनंद होता त्या प्रत्येकीच्या चेहऱ्यावर!
आमची वर्गमैत्रीण आयोगाची अध्यक्ष आहे, हाच अभिमानाचा भाव प्रत्येकीच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता. किती बोलू आणि काय काय बोलू असं प्रत्येकीचं झालं होतं... फोटो आणि गळाभेट... एका डब्यात जेवणारा आमचा घोळका.. घट्ट मिठी मारत अक्षरश: पापण्या ओलावत होत्या.. आभाळातही न मावणारा आनंद मनात साठवण्याचा केविलवाणा प्रयत्न करत होते... पण मला पुढे कार्यक्रमाला निघायचे असल्याने सर्वांची परवानगी घेऊन बाहेर पडले, पुन्हा लवकर भेटण्याचे वचन देऊन. आमच्या नियोजन टीमने सर्वांनाचा एकत्र आणत मैत्रीची घट्ट वीण पानगळीनंतरच्या उमलणाऱ्या सोनचाफ्याच्या सुगंधासारखी सुवासित केली होती.
आजचा माझा हा दिवस खूप ताणविरहित होता, आठवणींचा होता आणि सगळ्यात विशेष म्हणजे ज्यांनी ‘घडविले’ त्यांच्या सहवासातील होता. एकसुरात ‘प्रार्थना’ म्हणताना याच मैदानावरच्या मातीत रांगेत उभे राहत होतो... आज कितीही आकाशाला गवसणी घातली तर जमिनीवर पाय याच मातीमुळे राहत असतील. हीच आमच्या ‘रयत’ची शिकवण. ‘वटवृक्ष’ हे आमच्या रयत शिक्षण संस्थेचे बोधचिन्ह म्हणून प्रकर्षाने जाणवले, या स्पर्धेच्या जगात टिकत असताना, स्पर्धा करताना, वडाच्या झाडाच्या पारंब्यांसारखे आपण सारेच अथांग जगभर विस्तारीत गेलो; पण जमिनीत खोलवर रुजलेली पाळेमुळे म्हणजेच आमची ही संस्था व शिक्षक आणि आमचे प्रारब्ध म्हणजे त्यांचा आम्हाला लाभलेला हा घट्ट ऋणानुबंध. प्रत्येकालाच त्याच्या धकाधकीच्या जीवनात थोडे तरी क्षण निखळ हास्य आणि आनंदाचा शिडकावा करणारे असावे, असं वाटत असेल तर बालपणीच्या दोस्तीच्या दुनियेतील अल्लड, अवखळ, झोक्यावर ‘एक झोका सुखाचा’ म्हणत झुलू या, मैत्रीच्या धाग्यासोबत!
(लेखिका राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष असून, गेली सोळा वर्षे सामाजिक आणि राजकीय क्षेत्रांत कार्यरत आहेत.)
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.