Women Sakal
सप्तरंग

अस्तित्वाची जाणीव

वडिलांनी लग्न करून दिलं आणि राधिका सासरी आली. तिथे सर्व जबाबदाऱ्या सांभाळतानाही मारहाण, अपमान, अवहेलना सहन करत होती. अत्याचार करणाऱ्याबरोबरच तो सहन करणाराही गुन्हेगारच असतो.

अवतरण टीम

वडिलांनी लग्न करून दिलं आणि राधिका सासरी आली. तिथे सर्व जबाबदाऱ्या सांभाळतानाही मारहाण, अपमान, अवहेलना सहन करत होती. अत्याचार करणाऱ्याबरोबरच तो सहन करणाराही गुन्हेगारच असतो.

- रूपाली चाकणकर rchakankar95@gmail.com

वडिलांनी लग्न करून दिलं आणि राधिका सासरी आली. तिथे सर्व जबाबदाऱ्या सांभाळतानाही मारहाण, अपमान, अवहेलना सहन करत होती. अत्याचार करणाऱ्याबरोबरच तो सहन करणाराही गुन्हेगारच असतो, याची तिला जाणीव करून दिली. तिला अस्तित्वाची जाणीव झाली आणि स्वबळावर उभी राहिली. अशा अनेक राधिका आहेत, ज्यांच्यात जग जिंकण्याची ताकद आहे. प्रचंड ऊर्जा आहे. त्यांनी कोणाचे बांधील होऊन अन्याय सहन करू नये. ताठ मानेने, सन्मानाने जगावे. त्यासाठी गरज आहे स्वतःमधील ‘स्वत्वाला’ शोधण्याची...

जनसुनावणी असल्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारामध्ये त्यादिवशी प्रचंड गर्दी होती. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात अनेक अत्याचाराच्या घटना घडतात. काहींना वाचा फुटते, काही अबोल राहतात. काहींना न्याय मिळतो, काही अन्यायाच्या विरोधात लढा लढत राहतात. काहींच्या वेदनेवर खपली धरली जाते, तर काही वेदना रक्तबंबाळ होऊन वाहतच राहतात. आयोगाच्या अध्यक्ष पदावर काम करत असताना हे प्रकर्षाने जाणवले होते. प्रत्येक घटनेला न्याय मिळतच असेल, असं नाही. कारण आमचा आवाज यासाठी आक्रोश करतच नाही आणि म्हणून प्रश्न उभा राहतो, आपल्या वेदनेला संवेदना होतच नसतील का? होतात वेदनाही आणि जाणवतात संवेदना. कदाचित त्यांना शब्दाच्या रूपाने मांडून कायद्याने सोडवायला आम्ही पुढे येत नसू. म्हणून आमचे प्रश्न शेवटपर्यंत प्रश्नच राहतात उत्तराच्या शोधात. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून, वाड्या-वस्त्यांतून, आदिवासी पाड्यांतून ही वेदना आमच्यापर्यंत पोहोचू शकणार नाही, पण आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचू शकतो म्हणून सुरू केला ‘आयोग आपल्या दारी’ उपक्रम!

अनेक जिल्ह्यांमध्ये वर्षानुवर्षे न्यायाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या भगिनींना तात्काळ न्याय मिळवून देणे ही आमची भूमिका.

त्या दिवशीही अनेक केसेस घेऊन आलेल्या महिला भगिनींची गर्दी झाली होती. त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न मी करत होते. ‘राधिका’ तिच्या पतीसह माझ्यासमोर येऊन बसली. पती मारहाण करतो, अशी तिची तक्रार होती. प्रचंड ताण आणि नैराश्य तिच्या चेहऱ्यावर जाणवत होते. दोघांचे ऐकून घेतले. त्यांचे व त्यांच्या परिवाराचे समुपदेशन होणे गरजेचे आहे, असे वाटले. ती केस समुपदेशन केंद्राकडे पाठवली. सकाळी अकरा वाजता सुरू झालेल्या सुनावण्या सायंकाळी सहा वाजेपर्यंत सुरू होत्या. अनेकांना तात्काळ न्याय मिळाल्याचे समाधान होते. नंतर काही गावांतील संस्थांना भेटी द्यायच्या होत्या म्हणून बाहेर पडले, पण इतक्या धावपळीतही राधिका डोळ्यांसमोरून जात नव्हती. अतिशय सुंदर सावळा तेजस्वी रंग, डोळ्यात आत्मविश्वासाची चमक, स्वतःच्या मनगटावर विश्वास ठेवणारी वाटली. बोलण्यात खरेपणा वाटत होता. शब्दांना सत्याची धार होती; पण सासरच्या त्रासामुळे हतबल वाटली. संस्थांना भेटी दिल्यानंतर प्रवासात माझ्यासोबत असलेल्या अधिकाऱ्यांना तिचा पेपर परत काढून माहिती विचारली. शिक्षणात हुशार असणारी राधिका सर्वसामान्य कुटुंबात वाढली.

मोठ्या बहिणीनंतर मधली राधिका आणि छोटा भाऊ अशी ही भांवडे. थोडी शेती गहाण ठेवून मोठ्या बहिणीचे घरच्यांनी लग्न लावून दिले. राधिकाची बारावी झाली की तिचेही लग्न गावातच ओळखीच्या नातेवाईकांमध्ये करून दिले. मुलाला मात्र शिकून मोठे करायचे, कारण तो ‘म्हातारपणाची काठी’ आहे, हे मानणाऱ्यांच्या बुद्धीची मला कीव वाटली.

राधिकाचे नव्याचे नऊ दिवस सरले. शाळेत हुशार, चुणचुणीत राधिका घरही चांगलं सांभाळायची; पण हळूहळू घरच्यांनी माहेरून एकेक वस्तू आणण्यासाठी तगादा लावला होता. तिने विरोध केला की तिला मारहाण व्हायची. सहनशीलता संपल्याने तिने आयोगाकडे तक्रार केली होती आणि स्वतः भेटायलाही आली होती. तिच्या केसकडे मी वैयक्तिक लक्ष देत होते. तिच्या आणि तिच्या परिवाराचे समुपदेशन तीन वेळा झाले होते. मुळात हुंडा घेणे आणि देणे हा कायदेशीर गुन्हाच. त्यासाठी किती आणि कशी शिक्षा होऊ शकते, इथपासून तुरुंगाचा प्रवास तिच्या सासरच्या मंडळींना कडक भाषेत सांगितला होता. त्यात तिला मानसिक व शारीरिक मारहाणीचे गुन्हे, यामुळे शिक्षेत वाढ होणार. त्यावर तिचा परिवार बिचकला. त्यानंतर सासरची मंडळी थोडी नरमली होती. तिच्यासोबत आयोग आहे, याचीही फार मोठी धास्ती त्यांनी घेतली होती. हे सगळं ती मेसेज करून कळवते मला. आता पहिल्यासारखा त्रास देत नाही; पण अधूनमधून कुरबुर चालू असते.

ती एक दिवस ऑफिसला भेटायला आली. समाधान व्यक्त केलं. तुमच्यामुळे त्रास कमी झाला म्हणाली, पण माझं समाधान होईना. तिला विचारलं, ‘‘तू शिक्षण घेऊन काय केलं? तुझ्या हुशारीचं काय? असंच जगायचं मार खात? आज नवरा मारतो, उद्या सासू-सासरे मारणार, परवा मुलं मोठी झाली की हात उगारणार. हेच का तुझं आयुष्य?’

क्षणभर तिच्या चेहऱ्याची भावमुद्राच बदलली‌. आपण ज्याला आपली संसाराची रीत समजत होतो तो तर अन्यायच आहे, पण तो अन्याय करणारी माणसं आपल्यामुळेच धीट होत गेली, याची तिला जाणीव झाली.

काय कमी आहे तुझ्यात? देवाने आरोग्य संपन्न शरीर दिलं. दोन हात, दोन पाय, हे जग पाहण्यासाठी सुंदर डोळे, ज्ञान घ्यायला बुद्धिमत्ता, तरीही तू हतबल? कशासाठी, कुणापुढे आणि का? ती फक्त ऐकत होती; पण चेहऱ्यावर प्रचंड अस्वस्थता जाणवत होती. क्षणभर शांत बसली, डोळे भरून आले. कदाचित आजपर्यंत सहन केलेला मार, अत्याचार, अपमान, वेदना आठवल्या असतील. राधिका, तू पण या गुन्ह्यात तितकीच अपराधी आहेस, जितकी तुझी सासरची मंडळी!

ती सांगू लागली, ‘‘मी लग्न करून सासरी आले. त्यांच्या घरातील सून झाले. पत्रिका जुळावी म्हणून माझं नाव बदललं. वडिलांच्या जागी नवऱ्याचं नाव लागलं. आडनाव बदललं. माहेरचं घर सोडून सासरच्या घरात आले. माझे नातेवाईक मागे टाकून सासरच्या नातेवाईकांना माझं मानलं. सून म्हणून आले तशी घरात सर्वांना आनंदी ठेवायचं, प्रत्येकाच्या आज्ञा पाळायच्या, स्वतःची कितीही हेळसांड झाली तरी. इतकं सगळं करूनही मी अजूनही या घरातील सदस्य नाही. ज्या माहेरच्या घरासाठी आता ‘माहेरवाशीन’ आहे. तिथून मी सासरच्या लोकांसाठी मानपानाच्या नावाखाली चैनीच्या वस्तू मागायच्या, का आणि कशासाठी?’

‘मग विचारला का नाही हा प्रश्न? का विचारला नाही हा जाब? का विचारला नाही या हुंड्याचा अर्थ?

का विचारले नाहीस तू हे सारे प्रश्न? आज तू सहन करते, उद्या तुझ्या मुलीला हेच सहन करावे लागेल, त्याला दोषी तूच असशील. आज तू आवाजच उठवला नाही तर उद्याच्या या सगळ्या अपराधाची ‘वाटेकरी’ तूच असशील. आज आम्ही तुझ्यासोबत आहोत, पण प्रत्येक वाईट क्षणांना असूच असं नाही, तुझी लढाई तुलाच लढायची आहे.’’ मी तिला तिच्या कर्तव्याची जाणीव करून देत होते.

एकेक शब्द ऐकून ती गंभीर होत गेली. ‘‘मी कोणाच्याही अपराधाची वाटेकरी नसेल’’, म्हणत खूप निश्चयाने ती नमस्कार करून निघून गेली.

बारावीनंतर राहिलेले शिक्षण पूर्ण करता-करता घराशेजारी खानावळ सुरू केल्याचे तिने कळविले. शाळा-कॉलेज जवळ असल्याने तिला चांगला फायदा होऊ लागला. चार पैसे जवळ साचू लागले. मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी स्वतः घेतली. खाणावळीचं थोड्या दिवसांत छोट्या हॉटेलमध्ये रूपांतर झालं. हॉटेलच्या उद्‌घाटनासाठी मला आमंत्रण द्यायला सहकुटुंब आली. खूप कणखर वाटली. तिच्या चेहऱ्यावर प्रचंड आनंद होता. भेटताक्षणी घट्ट मिठी मारली. इतका बदल कसा, असं विचारलं तर म्हणाली, ‘‘आयुष्य जगत होते, पण कोणी ‘अस्तित्वा’ची जाणीव करून देणारे भेटलेच नाही. आपलं नशीबच असं म्हणत जगत होते. मारहाण, अपमान, अवहेलना सहन करत होते; पण तुम्ही भेटलात आणि आपणही स्वतःच्या अस्तित्वाने जगू शकतो याची खात्री पटली. जिद्दीने कामाला सुरुवात केली.

प्रत्येक गोष्टीला विरोध होत गेला; पण आपण प्रामाणिकच काम करत होतो. मग हे विरोध का पत्करायचे? म्हणून जिद्दीने आयुष्याच्या संघर्षाला सामोरे जायचे आणि जिंकायचेच ठरविले. राहिलेले शिक्षण सुरू केले, खानावळ सुरू करून छोट्या व्यवसायाला सुरुवात केली. आता छोटंसं हॉटेल सुरू करत आहे. आपल्याकडे स्वतः कमावलेला पैसा असेल तर आत्मविश्वासाला धार येते. घरातल्यांना तुम्ही सांगितल्यापासून नीट राहतात, ते सगळे आज सोबत आलेत, हीच माझ्या कष्टाची पावती.’

खूप समाधान वाटले आताच्या राधिकाला पाहून. अनेक राधिका आहेत, त्यांना या निमित्ताने आवर्जून सांगायचे आहे. तुमच्यात जग जिंकण्याची ताकद आहे, स्वतःमध्ये प्रचंड ऊर्जा आहे. कोणाचे तरी बांधील होऊन अन्याय सहन करू नका. ताठ मानेने, सन्मानाने जगा. गरज आहे स्वतःमधील ‘स्वत्वाला’ शोधण्याची. चला, हातात हात घालून गवसणी घालू यशाला. आम्ही सोबत आहोत!!

(लेखिका राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष असून गेली सोळा वर्षे सामाजिक आणि राजकीय क्षेत्रांत कार्यरत आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi यांची उपस्थिती; काँग्रेस प्रचाराचं रणशिंग फुंकणार! 'या' जिल्ह्यात पहिली रॅली काढणार

Palakkad Train Accident: केरळमध्ये एक्स्प्रेसच्या धडकेत 4 सफाई कर्मचाऱ्यांचा मृत्यू! पलक्कडमध्ये घडली भीषण घटना

Rohit Sharma च्या घरी नवा पाहुणा येणार! Ritika चा तो फोटो अन् समालोचक हर्षा भोगलेंचं ते विधान...

Sports Bulletin 2nd November : भारताची न्यूझीलंडविरूद्ध विजयाच्या दिशेने वाटचाल ते भारताला ऑस्ट्रेलियात पहिल्या पराभवाला सामोरे जावे लागणार

Video : महाराष्ट्रातील 'या' मंदिरात चक्क वाटला जातोय नोटांचा प्रसाद! कुठंए हे मंदिर? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT