विमानानं मी कोलंबियाची राजधानी, बोगोटामध्ये पोहोचलो. नेहमीप्रमाणे बॉक्समधून सायकलची चाकं आणि अन्य भाग जोडून सायकल चालवण्यासाठी तयार केली.
- एस. नितीन nonviolenceplanet@gmail.com
विमानानं मी कोलंबियाची राजधानी, बोगोटामध्ये पोहोचलो. नेहमीप्रमाणे बॉक्समधून सायकलची चाकं आणि अन्य भाग जोडून सायकल चालवण्यासाठी तयार केली. सायकल घेऊन विमानानं प्रवास करणे हे कठीण आणि खर्चिक आहे. त्यामुळं मला विमान प्रवास जास्त आवडत नव्हता. या आधीचा विमानप्रवास मी दक्षिण कोरिया ते अमेरिका हा दहा महिन्यांपूर्वी केला होता आणि तो एक माझ्यासाठी कठीण प्रवास होता. त्या प्रवासात माझी सायकल मला खूप परिश्रमाने वाचवता आली होती, त्याबद्दल मी मागच्या एका भागात लिहिलेले आहे. जेव्हा बोगोटा विमानतळावर मी सायकल जोडत होतो, तेव्हा लोकांनी माझ्याकडे जास्त लक्ष दिले नाही. कोलंबिया या देशात जगातील उत्कृष्ट सायकलपटू आहेत, त्याची कारणे म्हणजे इथे असलेली भौगोलिक परिस्थिती. इथे समुद्रसपाटीपासूनची उंची जास्त आहे आणि सोबत खूप सारे चढ-उतार आहेत. या भागात शक्तिशाली सायकलपटू तयार होतात.
फुटबॉल खेळानंतर सायकलिंग हा कोलंबियामधील सर्वांत लोकप्रिय खेळ आहे. मी सायकल घेऊन बोगोटा शहराकडे निघालो. वाटेत मला एक वडापावसारखा गाडा दिसला. तो विक्रेता हा एम्पानाडाआ हा कोलंबियातील प्रसिद्ध पदार्थ विकत होता. त्यात मक्याचे पीठ आणि काही भाज्या वापरल्या जातात, जसे वडापावमध्ये आपण वापरतो. मी मस्त असे दोन एम्पानाडाआ खाल्ले. त्या तरुण विक्रेत्यांशी बोलताना समजले की तो व्हेनेझुएलामधील आहे.
त्याच्या देशात राजकीय आणि आर्थिक अस्थिरता निर्माण झाली, त्यामुळे हिंसाचार वाढला, अन्नाच्या कमतरतेमुळे लोकांचे पाच ते सहा किलो वजन कमी झाले होते. त्याचवेळी देशातील कुत्रे आणि मांजरांची संख्या कमी झाली होती. याचा अर्थ लोकांनी या पाळीव प्राण्यांचा वापर आपले पोट भरण्यासाठी केला. अशा बिकट परिस्थितीत लाखो लोकांनी आपला देश सोडला. ते जवळच्या देशात पैसे कमवण्यासाठी गेले. त्यात ब्राझील, कोलंबिया, चिली, अर्जेंटिना आणि इक्वेडोर या देशांचा समावेश होता.
मी तिथे असताना साधारण दहा लाख लोकांनी आपला देश सोडला होता आणि यात मोठ्या संख्येने युवक दिसत होते. या स्थितीत तो विक्रेता आणि त्याचा एक भाऊ सहा महिन्यांपूर्वी कोलंबियात आला होता. पुढे सायकल यात्रेत मला काही लोक दिसले, जे व्हेनेझुएलाचे होते. हाती पैसा नव्हता. हातात एक छोटी बॅग होती, त्यात काही कपडे आणि रोजच्या जगण्यासाठी लागत असलेल्या वस्तू. मी दोघांना भेटलो. ते नुकतेच कोलंबियाला आले होते. त्यांना विचारले, ‘‘कुठे जाणार आहात?’’, ते म्हणाले, ‘‘चिली या देशात जात आहोत.’’ मी विचारले, ‘‘चिली का?’’ तर त्यांनी सांगितले, ‘‘चिली हा आर्थिकदृष्ट्या मजबूत देश आहे आणि तिथे काम केल्यावर चांगले पैसे मिळतात.’’ प्रवासासाठी ते मिळेल ते वाहन वापरत होते आणि कुठलं वाहन मिळालं नाही तर चालत जात होते. मी विचारले, ‘‘जेवणाचं काय करता?’’ तर त्यांनी सांगितले की, ‘‘येथील लोक त्यांना जेवणाची मदत करतात.’’ मी त्यांना माझ्या परीने शक्य अशी काही मदत केली आणि ते पुढे गाडीने निघाले. आपल्या मागे सोडलेल्या परिवारासाठी पैसे पाठवण्यासाठीची त्यांची ही धडपड होती.
तुम्हाला कोलंबिया या देशाबद्दल नक्कीच उत्सुकता असेल, त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे, ‘पाब्लो एस्कॉबर!’ काही लोकांना माहीतही असेल की, हा होता ‘कोकेनचा राजा!’ एक जगप्रसिद्ध कोलंबियन ड्रग लॉर्ड आणि अमली दहशतवादी. त्याच्यावर खूप पुस्तके, चित्रपट आणि माहितीपट आहेत आणि जगप्रसिद्ध गायिका शकिरा जिचे प्रसिद्ध असं ‘वाका वाका’ गाणे फुटबॉल विश्वकपसाठी गायिले होते, तीदेखील या देशाची. कोलंबिया हा देशाचे नाव इटालियन प्रवासी ख्रिस्तोफर कोलंबस यांच्या नावावरून देण्यात आले. ते पहिले युरोपिअन, जे जहाज घेऊन अमेरिका खंडात आले होते. स्पॅनिश लोक १४९९ मध्ये ला गुआजिरा येथे प्रथम आले आणि १६व्या शतकाच्या मध्यापर्यंत ग्रॅनडाचे नवीन राज्य स्थापन करून, त्यांनी या प्रदेशाच्या काही भागांमध्ये वसाहत केली. २० जुलै १८१० रोजी या देशाने स्पॅनिश साम्राज्यापासून स्वातंत्र्य मिळवले. स्पॅनिश इथे येण्यापूर्वी कोलंबियामध्ये मुइस्का, क्विम्बाया आणि तैरोना यासह विविध स्थानिक लोक राहत होते. १९६०च्या दशकापासून, देशाला कमी-तीव्रतेचा सशस्त्र संघर्ष आणि राजकीय हिंसाचाराचा सामना करावा लागला. या दोन्ही गोष्टी १९९० च्या दशकात वाढल्या. त्यामुळे कोलंबिया देश म्हणजे हिंसा आणि अमली पदार्थ असे समीकरण बनले आहे आणि या देशाचे नाव ऐकून लोक घाबरतात.
या देशातली स्थिती २००५ पासून सुधारली आहे आणि याचा अनुभव म्हणजे मी खूप आरामात इथे प्रवास केला. कोलंबिया मला खूप गतिमान दिसला. तो काही वर्षांत दक्षिण अमेरिकेतील महत्त्वाचा देश असेल. इथे ७० भाषा बोलल्या जातात. स्पॅनिश भाषा सर्वत्र बोलली जाते. या देशाची लोकसंख्या ४.९ करोड आहे. कोलंबिया हा सर्वोच्च जैवविविधता असलेला देश आहे, ज्यामध्ये क्षेत्रफळानुसार प्रजातींचे प्रमाण सर्वाधिक आहे. ९० टक्के लोक ख्रिश्चन आहेत आणि ४.७ टक्के लोकसंख्या नास्तिक आहे आणि एक महत्त्वाची बाब म्हणजे ३.५ टक्के लोक देवावर विश्वास ठेवण्याचा दावा करतात, परंतु विशिष्ट धर्माचे पालन करत नाहीत. कोलंबियन कॉफी ही जगप्रसिद्ध आहे, सोबत अवाकाडो या फळाचेही पीक घेतले जाते.
बोगोटा हे कोलंबियाचे सर्वांत मोठे शहर आहे, त्याची लोकसंख्या ८० लाख एवढी आहे. बोगोटा शहरात मी बरेच दिवस राहिलो. पहिले २-३ दिवस माझ्या शरीराला इथल्या वातावरणाशी जुळण्यासाठी लागले. हे शहर समुद्रसपाटीपासून २ हजार ६४० मीटर उंच आहे आणि अँडीज पर्वताच्या रांगेवर आहे. शहराच्या बाजूला डोंगर आहेत. हजारो वर्षांपूर्वी इथे एक तळे होते. खूप उंचीवर असल्यामुळे ऑक्सिजनचे प्रमाण कमी आहे. मी पहिल्यांदा एवढ्या उंचीवर आलो होतो. त्यामुळे माझे शरीर खूप वेगळ्या प्रकारे वागत होते. पहिले तीन दिवस फक्त झोप लागत होती आणि सोबत अशक्तपणा जाणवत होता.
मी शहरातील हॉस्टेलमध्ये राहत होतो, जिथे मी जगभरातील प्रवासी पर्यटकांना भेटलो. हॉस्टेल हे माझे आवडते ठिकाण आहे. इथे खूप सारे मित्र बनतात. हॉस्टेल म्हणजे स्वस्तात राहण्याचे ठिकाण, जिथे एका रूममध्ये ६ ते ८ लोक राहतात आणि त्यामध्ये एक स्वयंपाकघर असते, जिथे आपण स्वयंपाक करू शकतो. भारतीय जेवण जगात प्रसिद्ध आहे आणि लोकांना ते खूप आवडते. त्यामुळे खूप ठिकाणी मी होस्टेलच्या मित्रांसाठी जेवण बनवले. दक्षिण अमेरिकेत अशी खूप चांगली हॉस्टेल विकसित झाली आहेत. या खंडात खूप सारे युरोपातील तरुण-तरुणी प्रवास करतात, त्यात विशेषकरून एकटे एक-दोन वर्ष फिरतात. मी भारतीय दूतावासाला संपर्क केला आणि त्यांनी मला भेटण्यासाठी बोलविले. किशन लाल हे अधिकारी मला भेटले. ते हरियानामधील होते आणि त्यांचा स्वभाव खूपच प्रेमळ होता. त्यांनी माझ्या राहण्याची व्यवस्था केली. किशनजी माझे खूप चांगले मित्र बनले. आम्ही सोबत महात्मा गांधीजींच्या पुतळ्याला भेट दिली. हा पुतळा एका महाविद्यालयाच्या आवारात होता आणि सोबत छोटा कार्यक्रम केला. त्यांच्या सहकार्याने पुढची योजना आखली. या देशात माझे तीन दिवस येथील स्थानिक जमातीच्या लोकांच्या सान्निध्यात गेले, जिथे मला खूप शिकता आले, त्याबद्दल पुढे लिहीनच. आशा आहे, आपण दिवाळी आनंदात साजरी केली असेल. भेटू पुढच्या भागात.
(सदराचे लेखक जगभर सायकलने भ्रमंती करणारे असून, महात्मा गांधी यांच्या विचाराचा प्रसार करतात.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.