saathi haath badhana movie sakal
सप्तरंग

साथी हाथ बढाना...

एकीचं बळ मोठं असतं ही शिकवण आपल्याला मिळत आली आहे. एका वृद्ध शेतकऱ्यानं मृत्युसमयी आपल्या चार मुलांना जवळ बसवून त्यातल्या एकाला एक काठी दोन्ही हातांनी मोडायला सांगितली.

डॉ. कैलास कमोद kailaskamod1@gmail.com

साथी हाथ बढाना, साथी हाथ बढाना

एक अकेला थक जायेगा, मिलकर बोझ उठाना

साथी हाथ बढाना...

एकीचं बळ मोठं असतं ही शिकवण आपल्याला मिळत आली आहे. एका वृद्ध शेतकऱ्यानं मृत्युसमयी आपल्या चार मुलांना जवळ बसवून त्यातल्या एकाला एक काठी दोन्ही हातांनी मोडायला सांगितली. त्यानं ती सहज मोडून दाखवली. मग त्या शेतकऱ्यानं चार काठ्या एकत्र बांधून त्या मोडायला सांगितल्या. तेव्हा मात्र कुणीही त्या मोडू शकला नाही.

‘तुम्ही चौघं भाऊ एकत्र राहिलात तर तुम्हाला कुणीही सहजासहजी हरवू शकणार नाही,’ असा संदेश त्या शेतकऱ्यानं आपल्या मुलांना काठ्यांच्या उदाहरणातून दिला. ही नीतिकथा आपण शालेय जीवनात वाचली आहे. ‘गाव करील ते राव काय करील’ ही मराठी म्हणसुद्धा गावकऱ्यांच्या संघटित शक्तीचं महत्त्व पटवून देते.

पन्नास आणि साठच्या दशकात अतिशय लोकप्रिय असलेलं ‘साथी हाथ बढाना...’ हे गीतही नेमका हाच संदेश आपल्याला देऊ पाहतं.

पन्नासचं दशक. नुकतंच स्वातंत्र्य मिळालं होतं. देश-उभारणी करताना रस्ते, वीज, पाणी अशा पायाभूत सुविधा सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचवणं आवश्यक होतं. ब्रिटिशांनी त्या थोड्या प्रमाणात जरी उभारल्या होत्या तरी त्या फक्त त्यांच्या सोईपुरत्या आणि मोठ्या शहरांपुरत्या सीमित, म्हणजेच अल्प, होत्या. देश-उभारणीच्या कार्याबाबत केवळ सरकारवरच अवलंबून न राहता सर्वसामान्य जनतेनंही या कार्याला हातभार लावला पाहिजे; जेणेकरून लोकांमध्ये देशाविषयी आत्मीयता निर्माण होईल आणि रोजगारनिर्मितीही होईल.

अशा विचारानं धनंजयराव गाडगीळ यांच्यासारख्या समाजधुरिणांनी सहकाराची कल्पना पुढं आणली. ‘एकमेकां साह्य करू, अवघे धरू सुपंथ’ या उक्तीनुसार, श्रमसंस्कृतीला महत्त्व दिलं गेलं. याकामी तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी देशातले वकील, आर्किटेक्ट, डॅाक्टर, विचारवंत, लेखक अशा समाजातल्या सगळ्या घटकांना बरोबर घेत देश-उभारणी सुरू केली. साहजिकच तत्कालीन लेखन, कविता, चित्रपट अशा माध्यमांमधूनही श्रमसंस्कृतीला पूरक अशी निर्मिती होऊ लागली. तशा प्रकारच्या कथा प्रकाशित होऊ लागल्या, त्यातलीच ही एक कथा...

एका शेठजींनी गावात मोठी मोटारगाडी (बस) आणली. ती कमी पैशांत अनेक माणसांची वाहतूक करू लागली. गावातल्या टांगेवाल्यांवर रिकामं बसण्याची वेळ त्यामुळं आली.

‘ही मोटारगाडी गावात नको’ अशी विनंती बेकारीची कुऱ्हाड कोसळलेल्या त्या टांगेवाल्यांनी शेठजींना केली. घोडागाडीचा वेग आणि मोटारगाडीचा वेग यांची तुलना होऊ शकत नाही असा युक्तिवाद करत शेठजींनी मोटारगाडी आणि घोडागाडी यांच्या शर्यतीची कल्पना मांडली. घोडागाडी जिंकली तर मोटारगाडीची सेवा बंद केली जाईल असं घोषित करण्यात आलं.

गावातला हुन्नरी युवक शंकर यानं ते आव्हान स्वीकारलं तेव्हा इतर सगळे घोडागाडीवाले आणि गाववाले त्याला दूषण देऊ लागले. या विसंगत शर्यतीत घोडागाडी जिंकणं शक्य नाही अशीच गाववाल्यांची धारणा होती आणि ती खरीसुद्धा होती; पण शंकरच्या मनात काही वेगळाच बेत होता. शर्यत एका महिन्यानंतर होणार होती. आपल्या गावातून दुसऱ्या गावाकडं जाणारा मोटारगाडीचा एक रुंद रस्ता आहे, तशीच जंगलातून खाचखळग्यांतून जाणारी एक पायवाटसुद्धा आहे आणि ते अंतर अगदीच ‘शॉर्टकट’ आहे...

महिन्याभराच्या काळात ती पायवाट घोडागाडी धावण्याइतपत रुंद केली तर आपण ही शर्यत जिंकू शकतो असा विश्वास त्याच्या ठायी होता...पण हे रुंदीकरण करणार कोण, अशी शंका उपस्थित केली गेली तेव्हा ‘आपण सगळे श्रमदान करून हा रस्ता बांधू’ असं शंकरनं सुचवलं. सुरुवातीला त्याच्या या आवाहनावर नाखूश असलेले गावकरी हळूहळू श्रमदानासाठी तयार झाले. कारण, अनेक टांगेवाल्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न सुटणार होता. श्रमदान सुरू झालं आणि एकीचं बळ दाखवत गावकरी गाऊ लागले : ‘साथी हाथ बढाना...’

एकटादुकटा माणूस थकू शकेल; पण अनेकांनी बोजा उचलला तर तो उचलणं सहज शक्य आहे. माणसांच्या मोठ्या समूहानं निश्चय केला तर समुद्र हटवून त्यातून रस्ता करण्याची शक्ती त्या मनुष्यबळात आहे. मोठमोठे डोंगर फोडून, पर्वतालासुद्धा नमवून रस्ता करण्याची शक्ती मनुष्यबळात आहे असं विशद करताना गीतकार साहिर लुधियानवी लिहितात -

हम मेहनतवालों ने जब भी मिलकर कदम बढाया

सागर ने रस्ता छोडा, परबत ने सीस झुकाया

फौलादी है सीने अपने, फौलादी है बाहें

हम चाहें तो पैदा कर दें, चट्टानों में राहें

मेहनत हीच आपल्या हातावरची भाग्योदयाची रेषा आहे. ती नाकारण्याचं काही कारण नाही. आपण मेहनत करू. कालपर्यंत ‘इतरांसाठी’ मेहनत केली. आज स्वत:साठी करू, असंही गावकरी म्हणतात. (कालपर्यंत ‘इतरांसाठी’, हा संदर्भ ब्रिटिश राजवटीला अनुषंगून आहे. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर केवळ दहाच वर्षांनी हे गीत लिहिलं गेलं असल्यानं हा संदर्भ चपखल आहे). ‘सत्याच्या मार्गावर चालून ध्येयप्राप्तीपर्यंत जाऊ’ असा गावकऱ्यांचा निर्धार आहे.

मेहनत अपनी लेख की रेखा, मेहनत से क्या डरना...

कल गैरों की खातिर की, आज अपनी खातिर करना...

अपना सुख भी एक है साथी, अपना दुख भी एक

अपनी मंझिल सच की मंझिल, अपना रस्ता नेक

‘थेंबे थेंबे तळे साचे’ याचा प्रत्यय देत मोहरीच्या एकेका कणापासून पर्वत बनू शकतो. आपण सगळे एकत्र आलो तर आपलंही नशीब आपण घडवू शकतो असा विश्वास गावकरी व्यक्त करतात.

एक से एक मिले तो कतरा बन जाता है दरिया

एक से एक मिले तो ज़र्रा बन जाता है सहरा

एक से एक मिले तो राई बन सकती है परबत

एक से एक मिले तो इन्साँ बस में कर ले किस्मत

गीतामध्ये दिली गेलेली उदाहरणं आणि शब्दांचा वापर यांतून एकीचं महत्त्व अधोरेखित केलं गेलं आहे. गाण्यातल्या प्रत्येक कडव्यातल्या प्रत्येक ओळीतून साहीर लुधियानवी यांच्या उत्तुंग प्रतिभेचा प्रत्यय येतो. या जगात जे जे काही निर्माण झालं आहे ते ते माणसाच्या श्रमातूनच. ‘धनिकांची बंधनं किती काळ कष्टकऱ्यांना बंधनात ठेवू शकतील? ती झुगारून द्या,’ असं आवाहन ते या शेवटच्या पंक्तीतून करतात.

कब तक मेहनत के पैरों में दौलत की ज़ंजीरें?

हाथ बढ़ाकर छीन लो अपने सपनों की ताबीरें

या आवाहनातून अर्थातच साहिर यांची आणि दिग्दर्शक बी. आर. चोपडा यांचीही साम्यवादी विचारसरणी स्पष्ट होते.

‘साथी हाथ बढाना, साथी रे’ असा कोरसचा अतिशय खुबीनं वापर करत नायक-नायिकेच्या तोंडी हे गाणं देऊन, गाण्यातल्या शब्दांना साजेसा जोश देण्यात संगीतकार ओ. पी. नय्यर यशस्वी झाले आहेत.

कुदळ, खोरं/फावडं, पहार, पाट्या, धुम्मस अशा अवजारांचा ध्वनी संगीतातून परावर्तित होतो हेही विशेष. लोकगीताच्या चालीवरच्या या गीतात गायक महंमद रफी यांनी उत्कृष्टतेची परमावधी गाठली आहे. त्यांनी ठिकठिकाणी घेतलेले पॅाजेस आणि गाण्याच्या सुरुवातीला, तसंच शेवटी घेतलेली दीर्घ लकेर खास दाद देण्याजोगी. आशा भोसले यांनी चांगली साथ देत गाण्याची उंची वाढवली आहे.

ग्रामीण युवक शंकर याचा उत्साह दिलीपकुमारच्या चेहऱ्यावर आणि देहबोलीतून ओसंडून वाहतो. हातात फावडं घेऊन गाण्याची, झटपट चालण्याची त्याची तऱ्हा काही निराळीच. नखरेबाज वैजयंतीमाला त्या श्रमदानातूनसुद्धा आपलं पदलालित्य दर्शवते. इतर सहकारी कलाकार गीताच्या वेगाशी, आशयाशी योग्य ती बरोबरी साधतात. रस्त्यासाठी राबणाऱ्या श्रमिकांमध्ये पुरुषांबरोबर महिलांचाही समावेश करून दिग्दर्शक चोपडा हे समानतेचा संदेश देऊ पाहतात. श्रमिक ग्रामस्थ स्त्री-पुरुष, त्यांची वेशभूषा आणि त्यांचं वागणं-बोलणं अगदी नैसर्गिक वाटतं. शेवटी शेवटी रस्ता पूर्ण करून ते सगळे रांगेनं चालत जातात तेव्हाचं दृश्य विलोभनीय. एका शंकरनं सुरुवात केल्यावर त्याची मैत्रीण जोडीला आली...मग दुसरा, मग तिसरा असं करत करत मोठा जथा तयार होतो व देश-उभारणीत लोक मोठ्या संख्येनं सहभागी होतात...

इगतपुरीच्या परिसरातल्या खडकाळ-डोंगराळ भूमीची गाण्याच्या पार्श्वभागासाठी केलेली निवड अगदी उचित अशीच आहे.

गाण्याचे आवेशपूर्ण बोल, त्यांना दिली गेलेली आवेशपूर्ण चाल, कलाकारांचा अभिनय, समूहशक्तीची ताकद, परिसरातलं वातावरण या सगळ्याचं अतिशय दृश्यमान चित्रीकरण अनुभवी दिग्दर्शक बी. आर. चोपडा यांनी अशा रीतीनं केलं आहे की, गाण्यामुळं निर्माण होणारा आवेश केवळ पडद्यावर न राहता तोच आवेश श्रोत्यांमध्ये आणि प्रेक्षकांमध्येही संचारतो.

आधुनिक विज्ञानामुळं तंत्रज्ञान जसजसं प्रगत होत गेलं तसतशी नवनवीन यंत्रं अवतरू लागली. यंत्रचलित ट्रॅक्टर जसजसा शेतात संचार करू लागला तसतसा लाकडी नांगर व लाकडी बैलगाडी मोडीत निघू लागली. बैलांचंही काम कमी होऊ लागलं. यंत्रानं माणसाची सोय केली; पण त्याबरोबरच मनुष्यबळाचा वापर कमी होऊ लागल्यानं माणसांचा रोजगार कमी होऊ लागला.

महात्मा गांधीजींनी ‘चरखा’ हे प्रतीक घेऊन सूतकताईच्या माध्यमातून कापसापासून सूत तयार करण्याचं काम करायला भारतीय माणसाला शिकवलं, त्याचं कारण हेच होतं की, या देशातल्या बेरोजगार हातांना काम मिळावं. चरख्यानं बऱ्यापैकी यश त्या काळात मिळवलंसुद्धा. तरीही कालौघात यांत्रिक टेक्स्टाईल-उद्योगामुळे चरखा आपोआप मागं पडत गेला. आधुनिकता, यंत्रबळ आणि मनुष्यबळाची योग्य ती सांगड घालून पुढं देशाची वाटचाल करावी लागेल हाच संदेश होता १९५७ च्या ‘नया दौर’ या चित्रपटाचा.

(लेखक हे हिंदी सिनेगीतांचे अभ्यासक-समीक्षक, तसंच ‘गाने अपने अपने’ या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत. ‘गुनगुना रहे है भँवरे’ हे याच विषयावरचं पुस्तक त्यांच्या नावावर आहे.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rickshaw meter fraud Video: रिक्षाच्या मीटरमध्ये कसा होते फ्रॉड? मुंबई पोलिसांचा लाईव्ह डेमो, क्षणात ओळखा फसवेगिरी

India vs Oman: भारताची विजयी हॅट्ट्रिक; Asia Cupच्या उपांत्य फेरीत धडक

Pune Crime : रविवार पेठेतील ज्वेलर्सच्या दुकानातून पावणेदोन कोटींचे दागिने चोरी

Pune Crime : पाषाण, सदाशिव पेठेतील ज्येष्ठ नागरिकांची ७० लाखांची फसवणूक

Pune Helmet mandatory: पुणे विभागात हेल्मेटसक्ती! विभागीय आयुक्तांचे निर्देश; दुचाकीवर मागे बसणारालाही नियम पाळावा लागेल

SCROLL FOR NEXT