पुण्यातील एका महाविद्यालयात त्याला अकरावीसाठी प्रवेश मिळाला खरा; पण महाविद्यालयातील वसतिगृहातील प्रवेशासाठी उशीर झाल्याने तिथं प्रवेश मिळू शकला नाही. भाड्याने खोली घेणं त्याला शक्य नव्हतं, कारण एकवेळच्या जेवणासाठीसुद्धा त्याच्याकडं पैसे नसायचे; आणि इतर वसतिगृहांनीही त्याला प्रवेश नाकारला.
‘सकाळ सोशल फाउंडेशन’च्या अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या सामाजिक उपक्रमांसाठी ‘ सोशल फॉर अॅक्शन ’ हा ऑनलाइन वेबसाइट स्वरूपात नवा प्लॅटफॉर्म सुरू करण्यात आला आहे. या वेबसाइटला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला. त्यातूनच स्वयंसेवी संस्था आणि देणगीदार यांना एकत्र आणण्यासाठी ‘सोशल फॉर अॅक्शन’ हा क्राउड फंडिंगसाठी नवीन डिजिटल प्लॅटफॉर्म ही संकल्पना उदयास आली. या उपक्रमातून एका स्वयंसेवी संस्थेची माहिती दिली जाते. तंत्रज्ञानाच्या मदतीने दिव्यांग विद्यार्थ्यांना कौशल्याधिष्ठित व व्यवसायाभिमुख शिक्षण व प्रशिक्षण देऊन आणि स्वावलंबी बनवून समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी एका अंध तरुणाने सुरू केलेल्या ‘नॅशनल असोसिएशन फॉर द वेल्फेअर ऑफ फिजिकली चॅलेंज्ड’ (NAWPC) या संस्थेविषयी...
दहावीच्या परीक्षेत चांगले गुण मिळवून, उच्च शिक्षणाचं स्वप्न पाहिलेला अहमदनगर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील एका सर्वसामान्य कुटुंबातील एक महत्त्वाकांक्षी तरुण पुण्यात शिक्षणासाठी आला होता. पुण्यातील एका महाविद्यालयात त्याला अकरावीसाठी प्रवेश मिळाला खरा; पण महाविद्यालयातील वसतिगृहातील प्रवेशासाठी उशीर झाल्याने तिथं प्रवेश मिळू शकला नाही. भाड्याने खोली घेणं त्याला शक्य नव्हतं, कारण एकवेळच्या जेवणासाठीसुद्धा त्याच्याकडं पैसे नसायचे; आणि इतर वसतिगृहांनीही त्याला प्रवेश नाकारला. एका बाजूला शिक्षणाची उमेद आणि तळमळ, तर दुसऱ्या बाजूला राहायचं कुठं हा यक्ष प्रश्न. या चक्रव्यूहात एखादा खचून जाऊन, गावाकडं परत गेला असता; पण नाउमेद होणं त्याला माहीतच नव्हतं. पुणे रेल्वे स्थानकाचा फलाट क्रमांक एक त्याला राहण्यासाठी चांगला पर्याय दिसला. सुरुवातीचे काही दिवस याच फलाटावर आसरा घेत त्याने आपलं महाविद्यालयीन शिक्षण सुरू केलं.
त्या तरुणाला इतर वसतिगृहांत प्रवेश नाकारला जाण्याचं कारण म्हणजे, तो तरुण अंध होता, उगाच त्याची जबाबदारी नको, असाच एकूण नकारामागील भाव असायचा. त्या तरुणाचं नाव राहुल देशमुख... रेल्वे स्थानकाच्या फलाटावर राहून येईल त्या परिस्थितीला तोंड देत महाविद्यालयीन शिक्षण घेण्याचा हा संघर्ष राहुलला खूप काही शिकवून गेला. अनेक कष्ट व यातना सोसाव्या लागल्या आणि या संवेदनेतून राहुलला नवी वाट दिसून आली.
राहुल देशमुख यांनी अंध-अपंग गटातून शिक्षण न घेता खुल्या गटातून घेऊन बारावी, पदवी व पदव्युत्तर पदवी प्राप्त केली आहे. तसंच, प्रत्येक परीक्षेत गुणवत्ता यादीत नाव झळकावलं आहे. अंध-अपंगांच्या कल्याणासाठी व त्यांच्या भविष्यासाठी आपण काहीतरी करू या, या भावनेतून आणि तळमळीतून राहुलने १९९९ मध्ये काम सुरू केलं, तेव्हा तो स्वतः बारावीत शिकत होता. हा स्वतः अंध आणि बारावीत शिकणारा मुलगा सामाजिक काम कसं करू शकेल? या अनेकांच्या प्रश्नास त्याला त्या वेळी सामोरं जावं लागलं.
अंधत्व व अपंगत्वामुळे आलेल्या मर्यादा साहाय्यभूत तंत्रज्ञानाच्या मदतीने दूर करून, विद्यार्थ्यांना स्वावलंबी बनवून समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी नॅशनल असोसिएशन फॉर द वेल्फेअर ऑफ फिजिकली चॅलेंज्ड (NAWPC) या संस्थेची स्थापना राहुलने केली. संस्थेअंतर्गत काम सुरू झालं. अंध व अपंग विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण देऊन, त्यांच्या क्षमतेनुसार करिअर घडविता यावं यासाठी विद्यार्थ्यांना संस्थेच्या माध्यमातून महाविद्यालयीन शिक्षणाबरोबर आवश्यक ते तंत्रज्ञानात्मक आणि व्यवसायाभिमुख शिक्षण व प्रशिक्षण देण्यात येतं. मागील २२ वर्षांत संस्थेत दाखल झालेले अंध, अपंग आणि कर्णबधिर असे एकूण १६५० विद्यार्थी संस्थेतून योग्य शिक्षण व प्रशिक्षण घेऊन यशस्वीपणे बाहेर पडले आहेत. आज हे सर्व विद्यार्थी स्वबळावर व स्वकर्तृत्वावर उत्तम आयुष्य जगत असून, विविध क्षेत्रांत चांगलं यश संपादन करत आहेत.
NAWPC संस्थेत महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील प्रामुख्याने शेतकरी, मजूर यांची मुलं महाविद्यालयीन आणि अन्य अभ्यासक्रमांच्या शिक्षणासाठी येतात. नेत्रहीनांकडं पाहण्याचा ग्रामीण भागातील पालकांचा दृष्टिकोन आजही नकारात्मकच आहे. अशा मुलांना शिक्षण देऊन काय उपयोग, असाच पालकांचा प्रश्न असतो. अशा विद्यार्थ्यांचं भवितव्य घडवायचं आणि तेही केवळ समाजातील दानशूर व्यक्ती आणि संस्थांच्या मदतीवर, असं राहुलने निश्चित करून, अविरतपणे काम करण्याचं ठरवलं आणि ते काम २२ वर्षं अखंडितपणे सुरू आहे. पालकांच्या गरीब परिस्थितीमुळे व अडचणींमुळे अशा विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा खर्च संस्थेला करावा लागतो. या विद्यार्थ्यांना संस्थेत विनामूल्य प्रवेश दिला तरच पालक आपल्या मुलांना संस्थेत पाठवतात. सर्वसामान्य मुलांप्रमाणे ही मुलंही शिकू शकतात, आपल्या पायावर उभी राहू शकतात, हे ओळखून संस्था कोणाकडूनही कोणतंही शुल्क घेत नाही. विद्यार्थ्यांच्या प्रवेशाबाबत विद्यार्थ्यांना कोणताही खर्च करावा लागत नाही. विद्यार्थ्यांना हवं ते शिक्षण दिलं जाईल, फक्त विद्यार्थ्यांनी शिक्षणप्रक्रियेत मनापासून सहभागी झालं पाहिजे, एवढीच संस्थेकडून अट घातली जाते.
संस्थेत प्रवेश देताना विद्यार्थी व त्यांच्या पालकांची सविस्तर मुलाखत घेतली जाते. मुलाखतीतून मुलाचा कल कोणत्या क्षेत्रात आहे ते लक्षात घेतलं जातं आणि तशाच प्रकारचं तंत्रज्ञानात्मक आणि व्यवसायाभिमुख शिक्षण महाविद्यालयीन शिक्षणाबरोबर विद्यार्थ्यांना दिलं जातं. नेत्रहीन व दिव्यांग मुला-मुलींसाठी महाराष्ट्रातील पहिल्या संगणक प्रशिक्षणाची सोय संस्थेत आहे. नेत्रहीन विद्यार्थ्यांसाठी विशेष वसतिगृह संस्थेमार्फत चालवलं जातं. २५ अंध विद्यार्थी या वसतिगृहाचा लाभ घेत आहेत. या वसतिगृहात विद्यार्थ्यांना दूध, नाश्ता व दोनवेळच्या जेवणाची उत्तम अशी मोफत सोय आहे.
संस्थेकडून विद्यार्थ्यांना मासिक आणि वार्षिक शिष्यवृत्ती दिली जाते. विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी रिक्रिएशन सेंटरची संस्थेअंतर्गत स्थापना केली आहे. त्याचबरोबर स्पर्धा परीक्षांचे व बँकांच्या परीक्षांचे वर्ग संस्थेत चालतात. तसंच, संस्थेत विद्यार्थ्यांसाठी संगीताचे वर्ग, इंग्रजी संभाषणाचे वर्ग, व्यक्तिमत्त्व विकास प्रशिक्षणाचे वर्ग व योगवर्ग चालवले जातात. १५० विद्यार्थी संस्थेत असं विविध प्रकारचं शिक्षण घेत आहेत. संस्थेतून शिक्षण घेऊन बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांना संस्थेतील शिक्षणाचा व प्रशिक्षणाचा चांगला फायदा झाल्याची शेकडो उदाहरणं आहेत. अनेक विद्यार्थी बँकांमध्ये चांगल्या पदावर नियुक्त झाले आहेत. अनेक जण शासकीय सेवांमध्ये रुजू झाले आहेत. बरेच जण प्राध्यापक, शिक्षक झाले असून, काही जण UPSC देऊन IAS, IRS झाले आहेत.
भूपेंद्र कच्छवा हा खानदेशातील एका छोट्याशा खेड्यातील शेतकरी कुटुंबातील नेत्रहीन मुलगा संस्थेच्या वसतिगृहात राहिला, संस्थेत संगणक प्रशिक्षण घेतलं, बी.ए.पर्यंत शिक्षण केलं आणि तो आज स्टेट बॅंक ऑफ इंडियामध्ये अधिकारी म्हणून काम करत आहे. भूपेंद्र त्याच्या कुटुंबात एकटाच अंध नाही, तर त्याची एक बहीण आणि एक मोठा भाऊदेखील अंध आहे. प्रवीणने त्याच्या मोठ्या भावानेदेखील NAWPC संस्थेतूनच संगणक प्रशिक्षण घेतलं आणि आज बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये उच्च अधिकारी म्हणून कार्यरत आहे. वैशाली ही भूपेंद्रची बहीणदेखील संस्थेची विद्यार्थिनी असून, संस्थेत शिकली व आज भारतीय डाक खात्यामध्ये ती कार्यरत आहे. अशी अनेक अंध-दिव्यांग मुलं-मुली, ज्यांनी संस्थेच्या उपक्रमांचा मोफत लाभ घेतला व स्वतःचं आयुष्य उज्ज्वल बनवलं, ते आज चांगल्या पद्धतीने यशस्वीपणे वेगवेगळ्या ठिकाणी कार्यरत असून, आपल्या आयुष्यात ते आत्मनिर्भर झाले आहेत. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध स्पर्धा, सहलींचं आयोजन, सर्व सण-उत्सवांचं आयोजन, आरोग्य शिबिरं असे नानाविध वार्षिक उपक्रम संस्था हाती घेत असते.
राहुल देशमुख यांची डोळस पत्नी देवता अंदुरे-देशमुख यांचा उल्लेख केला नाही, तर संस्थेची ओळख अपूर्ण राहील. देवता मूळच्या बीड जिल्ह्यातील एका सुखवस्तू कुटुंबातल्या. पुण्यातल्या स. प. महाविद्यालयात राहुल आणि देवता हे दोघे कला शाखेच्या एकाच वर्गात शिकत होते. वर्गमित्र म्हणून झालेल्या ओळखीचं रूपांतर जिवलग मैत्रीत झालं. राहुल यांची तळमळ आणि अनेक गुण देवता यांना भावले. तसंच, राहुल यांनी संस्थेमार्फत उभं केलेलं काम आणि कामाची तळमळ पाहताना व अनुभवताना देवता त्यांच्या कामात रमल्या. व्यवस्थापनशास्त्राचं (MBA) शिक्षण पूर्ण झाल्यानंतर एका नामांकित कंपनीत देवता यांची नोकरी सुरू होती. पुढं राहुल देशमुख जेव्हा बँक ऑफ इंडियासोबत काम करू लागले, तेव्हा संस्थेचं काम मागे पडू नये, या जाणिवेतून देवता यांनी स्वतःची नोकरी सोडली आणि मागील १३ वर्षांपासून राहुल यांच्याबरोबरीने देवता पूर्णवेळ संस्थेचं काम पाहत आहेत.राहुल देशमुख यांच्या कार्याबद्दल व सामाजिक योगदानाबद्दल त्यांना आतापर्यंत राष्ट्रीय व स्थानिक पातळीवरील ३५ हून अधिक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे. संस्थेअंतर्गत नेत्रहीन विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह चालवलं जातं. सध्या २५ विद्यार्थी वसतिगृहात राहत आहेत; पण संस्थेची स्वतःची जागा नसल्यामुळे वसतिगृहाची सुविधा अधिक दिव्यांग विद्यार्थ्यांना गरज असूनही संस्था देऊ शकत नाही. नेत्रहीन विद्यार्थिनींच्या निवासाची व्यवस्था झाली तर अनेक अभ्यासक्रम व उपक्रम सुरू करता येतील. संस्थेला कोणतंही शासकीय अनुदान नाही, तसंच संस्थेअंतर्गत सर्व प्रकल्प व उपक्रम विनामूल्य चालवले जातात. त्यामुळे सर्व उपक्रमांच्या खर्चासाठी निधी उभारण्याचं राहुल व देवता यांच्यापुढं मोठं आव्हान आहे.
कशी कराल मदत
पुणे येथील ‘नॅशनल असोसिएशन फॉर द वेल्फेअर ऑफ फिजिकली चॅलेंज्ड (NAWPC)’ या संस्थेला आपलं कार्य व उपक्रम जास्तीत जास्त दिव्यांग विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी सामूहिक मदतीची व निधीची गरज आहे. सकाळ माध्यम समूहाच्या ‘सोशल फॉर अॅक्शन’ या डिजिटल क्राउड फंडिंगच्या प्लॅटफॉर्मवर ‘नॅशनल असोसिएशन फॉर द वेल्फेअर ऑफ फिजिकली चॅलेंज्ड (NAWPC)’ या संस्थेच्या उपक्रमाची माहिती मिळेल. समाजातील दानशूर व्यक्ती, माहिती-तंत्रज्ञान कंपन्या, सीएसआर कंपन्या व परदेशी-भारतीय नागरिक https://socialforaction.com/ या वेबसाइटला भेट देऊन, ‘नॅशनल असोसिएशन फॉर द वेल्फेअर ऑफ फिजिकली चॅलेंज्ड (NAWPC)’ या संस्थेअंतर्गत चालविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती घेऊन, ‘डोनेट नाऊ’ या बटनवर क्लिक करून थेट वेबसाइटद्वारे देणगी देऊ शकतात. या क्राउड फंडिंगद्वारे देणगी देणाऱ्या प्रत्येक देणगीदारास देणगीची पावती व ८० जी हे प्राप्तिकरात ५० टक्के सवलतीचं प्रमाणपत्र मिळेल. या अभियानाच्या माध्यमातून पाच हजार व त्यापुढील देणगी देणाऱ्या देणगीदारांची नावं पुढील भागात प्रसिद्ध केली जातील. अधिक माहितीसाठी संपर्क : ८६०५०१७३६६
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.