अगॅथोक्लस राजाचं नाणं Sakal
सप्तरंग

खुणा संस्कृतीच्या: अफगाणिस्तानातील नाण्यांवर संकर्षण आणि वासुदेव

सन १९७० मध्ये फ्रेंच पुरातत्त्वज्ञ पॉल बेर्नार्द हे उत्तर अफगाणिस्तानातील ‘अई खानुम’ या ठिकाणी असलेल्या २२०० वर्षांपूर्वीच्या ग्रीकनगराचं उत्खनन करत होते.

सकाळ वृत्तसेवा

अफगाणिस्तान हे आता एक मुस्लिमराष्ट्र आहे. मात्र, भारतीय संस्कृती, भारतीय धर्म एकेकाळी तिथपर्यंत पोहोचला होता हे तिथल्या प्राचीन स्थापत्य, मूर्ती, विविध अवशेष यातून आपल्याला कळतं. अफगाणिस्तानात सापडलेल्या आणि भारतीय इतिहासाच्या दृष्टीनं एका महत्त्वाच्या नाण्याविषयी या लेखात माहिती घेऊ या.

सन १९७० मध्ये फ्रेंच पुरातत्त्वज्ञ पॉल बेर्नार्द हे उत्तर अफगाणिस्तानातील ‘अई खानुम’ या ठिकाणी असलेल्या २२०० वर्षांपूर्वीच्या ग्रीकनगराचं उत्खनन करत होते. उत्खनन करताना त्यांना अगॅथोक्लस नावाच्या ग्रीक राजाची चांदीची सहा नाणी एका मातीच्या मडक्यात ठेवलेली सापडली. या नाण्यांचं एक वैशिष्ट्य म्हणजे, या नाण्यांच्या एका बाजूला अगॅथोक्लस राजाचं नाव ग्रीक लिपीत, तर नाण्याच्या दुसऱ्या बाजूला त्याचं नाव ‘रजिने अगथुक्लयेस’ असं प्राकृत भाषेत आणि ब्राह्मी लिपीत लिहिलेलं आहे.

अगॅथोक्लस राजा अंदाजे इसवीसनपूर्व १८० ते इसवीसनपूर्व १७० या दहा वर्षांच्या काळात (आजपासून २२०० वर्षांपूर्वी) राज्य करत होता. या राजानं अफगाणिस्तानातील बाल्ख (बॅक्ट्रिया) किंवा काबूलच्या आसपासच्या प्रदेशात आणि त्याला जोडून असणाऱ्या गांधारप्रदेशात (सध्याचा उत्तर पाकिस्तान) राज्य केलं. हिंदुकुश पर्वताच्या दक्षिणेच्या भागात राज्य करताना या ग्रीक राजांनी हळूहळू स्थानिक प्राकृत भाषेला आणि खरोष्टी व ब्राह्मी लिपींना आपल्या नाण्यांवर स्थान दिलं.

अगॅथोक्लस राजाच्या या नाण्यांचं भारतीय इतिहासात अनन्यसाधारण महत्त्व आहे. कारण, या नाण्यांवर संकर्षण (बलराम) आणि वासुदेव (कृष्ण) या भारतीय देवतांच्या अंकनाचा सर्वात जुना पुरावा आढळतो. अगॅथोक्लसच्या या नाण्यांबद्दल प्राचीन भारताच्या इतिहासाचा अभ्यास करणाऱ्या विदेशी आणि भारतीय अभ्यासकांना, विद्यार्थ्यांना माहीत असतं; परंतु त्यापलीकडे इतर व्यक्तींपर्यंत ही माहिती सहसा पोहोचत नाही.

अगॅथोक्लसच्या या चांदीच्या नाण्याच्या एका बाजूला डाव्या हातात मुसळ व उजव्या हातात नांगर घेतलेली आणि कमरेला तलवार असलेली प्रतिमा ही संकर्षण (बलराम) या देवतेची आहे. या नाण्याच्या दुसऱ्या बाजूला, उजव्या हातात शंख आणि डाव्या हातात मोठं चक्र घेतलेली प्रतिमा ही वासुदेव (कृष्ण) या देवतेची आहे. या देवतांच्या दंडावरून पुढ्यात घेतलेलं लांब वस्त्र आहे. या दोन्ही प्रतिमांमध्ये कानांत गोलाकार कुंडलं दिसतात, तर त्यांच्या मस्तकावर छत्रदेखील दाखवण्यात आलेलं आहे.

अगॅथोक्लसच्या दुसऱ्या एका नाण्यावर भारतीय वेशातील एका स्त्रीदेवतेचं अंकन आहे. ही देवता म्हणजे एकानंशा (सुभद्रा) किंवा लक्ष्मी असावी असं संशोधकांचं मत आहे.

भारतीय ग्रंथांतील वर्णनानुसार, वासुदेव (कृष्ण) या देवतेच्या हातात शंख, चक्र असतं, तर हातात मुसळ आणि नांगर घेतलेली प्रतिमा ही संकर्षण (बलराम) या देवतेची असते. अगॅथोक्लसच्या या नाण्यांवर देवतांची नावं दिलेली नसली तरी या देवतांच्या हातातील आयुधं आणि चिन्हं यांवरून बेर्नार्द यांनी या प्रतिमा वासुदेव आणि संकर्षण यांच्या असल्याचं मत १९७३ मध्ये मांडलं. अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि भारत या देशांच्या प्राचीन इतिहासावर काम करणाऱ्या अनेक विदेशी आणि भारतीय संशोधकांना बेर्नार्द यांचं हे मत मान्य आहे.

अगॅथोक्लसच्या नाण्यांवर असलेल्या संकर्षण आणि वासुदेव यांच्या या प्रतिमा आपल्यासमोर उपलब्ध असलेल्या भारतीय देवतांच्या सर्वात प्राचीन प्रतिमा आहेत. याआधीच्या प्रतिमा कदाचित लाकूड, माती अशा नष्ट होणाऱ्या माध्यमात घडवल्या गेल्या असतील, त्यामुळे त्यांचे पुरावे आपल्याला मिळत नाहीत. या नाण्यांच्या आधीच्या शंभर/दोनशे वर्षांच्या काळातील ग्रंथांतून देवतांच्या प्रतिमांचा फक्त उल्लेख मिळतो.

राजा ज्या देवतेचा भक्त असेल त्या देवतेची किंवा स्थानिक पूजनीय देवतेची प्रतिमा राजाच्या नाण्यांवर दाखवली जात असे, हे भारतीय उपखंडातील इतर नाण्यांच्या उदाहरणांवरून लक्षात येतं. अगॅथोक्लस राजा हा स्वतः वासुदेव आणि संकर्षण या देवतांचा भक्त नसेल असं जरी मानलं तरी या देवता त्यांच्या मूर्तिस्वरूपात पूर्व अफगाणिस्तान, उत्तर पाकिस्तानातील गांधारप्रदेशात २१०० वर्षांपूर्वी पूजल्या जात होत्या हे मात्र नक्की. अगॅथोक्लसची संकर्षण-वासुदेवाचं अंकन असलेली ही नाणी गांधारप्रदेशातील तक्षशिलानगरातील टांकसाळीत पाडली असावीत, असंही बेर्नार्द यांचं मत आहे.

वासुदेवाचा ग्रीक भक्त हेलिओडोरस

अगॅथोक्लसच्या राज्यकालाच्या अंदाजे ६० वर्षांनंतर हेलिओडोरस या नावाचा वासुदेवाचा एक ग्रीक भक्त मध्य प्रदेशातील विदिशा इथं आला होता. विशेष म्हणजे, हा हेलिओडोरस गांधारप्रदेशातील तक्षशिलेहूनच आलेला होता!

अंदाजे इसवीसनपूर्व ११० मध्ये या हेलिओडोरसनं उभारलेला दगडी गरुडस्तंभ साधारणपणे २१३० वर्षं झाली तरी आजही सांचीजवळ असलेल्या विदिशा या गावात उभा आहे. ‘या स्तंभावर ब्राह्मी लिपीत आणि प्राकृत भाषेत एक लेख कोरलेला आहे. या लेखाचा अर्थ पुढीलप्रमाणे आहे : देवाधिदेव वासुदेवाचा हा गरुडस्तंभ, दिय याचा पुत्र तक्षशिलेहून आलेल्या भागवत हेलिओदोर (हेलिओडोरस) यानं उभारला. (हेलिओदोर हा) महाराज काशीपुत्र भागभद्र यांच्याकडे त्यांच्या चौदाव्या राज्यवर्षी आलेला महाराज अंतलिकित (ग्रीक राजा अँटिअल्कायडस) यांचा यवन (ग्रीक) दूत आहे.’

या लेखात हेलिओडोरसनं स्वतःला यवनदूत म्हणून संबोधलं आहे. तुर्कस्तानातील ‘आयोनिया’ या प्रदेशातील ग्रीकांना प्राचीन इराणी साम्राज्यातील राजे ‘यवन’ म्हणून ओळखत होते. यावरून प्राचीन भारतातदेखील ग्रीकांना ‘यवन’, ‘योन’ अशा नावांनी ओळखलं जात असे. विदिशेच्या गरुडस्तंभावरील या लेखात हेलिओडोरसचे वडील दिओस यांच्या ग्रीक नावाचं ‘दिय’, तर हेलिओडोरस या नावाचं ‘हेलिओदोर’ हे भारतीय रूप येतं. विदिशेच्या या स्तंभासमोरच्या जागेत उत्खनन केल्यावर तिथं २१०० वर्षांपूर्वीच्या एका लंबवर्तुळाकार आकाराच्या मंदिराचे अवशेष सापडले होते.

गांधारप्रदेशातील तक्षशिलेहून आलेला व ग्रीक असलेला हेलिओडोरस स्वतःला भागवत म्हणजे वासुदेवाचा भक्त म्हणवून घेतो. विदिशा इथल्या वासुदेवाच्या मंदिरासमोर गरुडध्वज उभारून त्यावर लेखही कोरून घेतो, हे तो केवळ राजदूताचं कर्तव्य म्हणून करत नव्हता. गांधारप्रदेशात त्या काळात प्रचलित असणाऱ्या संकर्षण-वासुदेव पंथाच्या प्रभावामुळे तक्षशिलेहून आलेला हेलिओडोरसदेखील वासुदेवाचा भक्त होता हे नक्की. अर्थात्, संकर्षण-वासुदेव इत्यादी देवतांच्या पूजनाची परंपरा त्या काळात फक्त गांधारप्रांतातच नव्हे तर मथुरेलाही होती.

सध्याच्या अफगाणिस्तान आणि पाकिस्तान या देशांच्या प्रदेशातील प्राचीन ग्रीक राजे, तिथले काही ग्रीक रहिवासी यांची भारतीय समाजात हळूहळू एकरूप होण्याची प्रक्रिया आजपासून २१०० वर्षांपूर्वी सुरू झालेली होती हे वरील उदाहरणांवरून लक्षात येतं.

पूर्व अफगाणिस्तानात आणि पाकिस्तानातील गांधारप्रांतात साधारणपणे २००० वर्षांपूर्वीच्या समाजात इराणी, ग्रीक, भारतीय यांशिवाय मध्य आशियातून स्थलांतर करत आलेले शक, कुशाण इत्यादी विविध रहिवासी होते. त्यामुळे या प्रदेशात इराणी, ग्रीक देवतांबरोवरच भारतीय देवताही पूजल्या जात होत्या, तसंच इथं बौद्ध स्तूप आणि विहारदेखील होते. विविध नाणी, मूर्ती, पुरातत्त्वीय स्थळं, शेकडो शिलालेख यांच्या पुराव्यातून दिसणारी गांधारप्रदेशातील ही बहुपेडी सामाजिक आणि धार्मिक परिस्थितीदेखील यासंदर्भात लक्षात घेतली पाहिजे. सध्याच्या उत्तर पाकिस्तानात असणाऱ्या प्राचीन गांधारप्रांतातील हिंदू आणि बौद्ध या धर्मांशी संबंधित पुरातत्त्वीय पुरावे पुढील काही लेखांतून बघू या.

-आनंद कानिटकर

(सदराचे लेखक हे सांस्कृतिक वारसा-अभ्यासक आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jaykumar Gore won Man Assembly Election 2024 Result: जयाभाऊचा विजयाचा चाैकार! माण-खटावमध्ये प्रभाकर घार्गे यांचा माेठा पराभव

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महायुतीचे नेते पत्रकार परिषद घेणार

Mahad Assembly Election 2024 result live : महाड विधानसभेत भरत गोगावलेंची सरशी ! ठाकरे गटाच्या स्नेहल जगतापांचा दणदणीत पराभव

Konkan Region Assembly Election Result 2024: राणे बंधूंनी तळकोकण राखले; भास्कर जाधव यांनी थोडक्यात गुहागर जिंकले

Sanjay Gaikwad won Buldana Vidhan Sabha: दोन शिवसेनेत कडवी झुंज! संजय गायकवाडांचा निसटता विजय, उद्धवसेनेच्या जयश्रींनीची तगडी फाईट

SCROLL FOR NEXT