स्त्री शिक्षण Sakal
सप्तरंग

‘ती’च्या मनातलं : स्त्री शिक्षणाचं स्वप्न

आज २६ फेब्रुवारी... भारतातील पहिल्या महिला डॉक्टर आनंदी जोशी यांची पुण्यतिथी.

रसिका आगाशे

आनंदीबाईंना शिक्षणाची गोडी लागावी म्हणून प्रसंगी त्यांच्यावर हात उगारणारे गोपाळराव! त्या काळात ते आपल्या बायकोनं शिकावं म्हणून धडपडत होते. आनंदीबाईही जिद्दीने उभ्या राहिल्या आणि शिकल्या. आपल्या महाराष्ट्रात सावित्रीबाई, फातिमा, आनंदी या बायकांनी पाहिलेलं सुंदर स्वप्न आहे. ते विशाल आहे, रंगीबेरंगी आहे.

आज २६ फेब्रुवारी... भारतातील पहिल्या महिला डॉक्टर आनंदी जोशी यांची पुण्यतिथी. १८८७ मध्ये त्यांचं निधन झालं. पहिलं मूल दगावल्यानंतर, स्वतः डॉक्टर होण्याचा प्रवास हा अत्यंत नाट्यमय आणि खडतर होता. डॉक्टर होण्याचं स्वप्न हे त्या काळात पडलेलं एक अवघड स्वप्न होतं. यात त्यांच्या पतीची साथ, खरंतर आग्रह हाही महत्त्वाचा घटक. त्यानंतर इतक्या वर्षांत स्त्री शिक्षणात झालेली समाजाची प्रगती तपासून घ्यायलाच हवी.

माझ्या मुलीला सांभाळणाऱ्या ताई, माझ्यापेक्षा फारतर वर्षभराने मोठ्या असतील. त्यांचे लग्न सतराव्या वर्षी झालं. त्यांच्या मुलीचं अठराव्या (असं म्हणताना त्या का हसतात कोण जाणे) आणि आता तिला एक मूल आहे. म्हणजे वयाच्या ३८/३९ व्या वर्षी त्या आज्जी आहेत. शिकण्याची अजूनही इच्छा आहे. अशी अनेक उदाहरणं आजही, २१ व्या शतकातही आपल्या आसपास आहेत. यात त्यांची आर्थिक स्थिती, जात या सगळ्या बाबी महत्त्वाच्या आहेतच.

शिक्षण घेऊन, डॉक्टर, इंजिनिअर झालेल्या आणि फक्त चूल-मूल करणाऱ्या मुलीही माझ्या परिचयाच्या आहेत. एवढेच कशाला, ज्या नाट्यशिक्षण संस्थेत मी शिक्षण घेतलं, त्यात मुळात मुली कमी. ज्या आहेत त्यातल्याही अनेक लग्नानंतर संपूर्णपणे गायब होतात. तरी बरं, अलीकडे हिंदी चित्रपटांमध्ये लग्न झालेल्या हिरोइन्स अजूनही मुख्य भूमिका करत आहेत, नाहीतर लग्न झालं की करियर संपलं, असाच काहीसा सूर होता!

अजून एक उदाहरण... माझ्या ओळखीच्या दोन मुली आहेत, ‘उच्च’वर्गीय! शिक्षणाची अजिबात गोडी नाही. कसंतरी रडतखडत शिक्षण पूर्ण केलं. कारण त्याशिवाय लग्न होणार नाही. त्यांच्यासाठी जगात सर्वात मोठं स्वप्न म्हणजे ‘लग्न’. आणि यात फक्त त्यांचा दोष नाही. आत्ताच्या या कॅपिटॅलिस्ट जगात, लग्न सोहळा दिमाखदार, महागडा असला पाहिजे हे ओरडून सांगितलं जात आहे. एकीकडे मुलीचं लग्न केलं तर आपली जबाबदारी संपली, असं पालकांना वाटतंय. तिथे लहानपणापासूनच आपलं लग्न भव्य व्हावं, हे मुलींचं स्वप्न बनत चाललं आहे.

कोणी काय स्वप्न बघावं, हे आपल्या हातात नसतं. (असं मानायची प्रथा आहे; पण या जाहिरात युगात आपण सगळ्यांची स्वप्न ठरवत आहोत.) आपली स्वप्नं आपल्या आसपासचा समाज ठरवत असतो. म्हणून तर शिक्षण पूर्ण करून अमेरिकेत सेटल होण्याचं स्वप्न अजूनही अनेक भारतीय बघत असतात. तरेतऱ्हेची मलमं वापरून गोरं होण्याची स्वप्न अनेक मुली बघत असतात. आपापल्या जीवनाचं सार्थक हे घर ‘विकत’ घेऊन, ‘मुलाबाळांसकट’ राहण्यातच आहे हे तर सार्वजनिक स्वप्न आहे.

ज्या समाजात शिक्षण का घ्यायचं, याचं उत्तर चांगली नोकरी मिळवण्यासाठी आहे, तिथे स्त्री शिक्षण का गरजेचं आहे, हा कळीचा प्रश्न होऊन बसतो. एका बाजूला ‘मुलगी शिकली, प्रगती झाली’, ‘एक स्त्री शिकली तर संपूर्ण परिवार शिक्षित होतो’ असे सुविचार रिक्षांच्या मागेही वाचायला मिळत आहेत. पण स्त्री कितीही शिकली तरी लग्न, घर, परिवार, या तिच्याच जबाबदाऱ्या आहेत हा विचार बदलत नाही.

इतक्या वर्षांत काहीच बदललं नाही, असं अजिबात नाही. आज मुक्तपणे माझ्यासारख्या अनेकींना त्यांचे विचार व्यक्त करता येत आहेत, हे सत्य आहेच. पण लॉकडाऊननंतर अनेक नववी-दहावीतल्या मुली शाळेत येणं बंद झालं. कॉलेजात येणाऱ्या अनेक मुली अचानक, मंगळसूत्र, टिकली लावून येऊ लागल्या. हेही तितकंच विदारक सत्य आहे. मुलगी अशिक्षित असेल, तर तिची लग्नाच्या बाजारात किंमत नाही, जास्त शिकली असेल तर तितका शिक्षित मुलगा शोधणं दुरापास्त होतं आहे. दोघंही नोकरी करत असतील तर मुलाचा पगार हा मुलीपेक्षा जास्त असला पाहिजे (!) अशा विविध अटींच्या मागे-पुढे स्त्री शिक्षणाचं महत्त्व किती आहे, हे जरा लक्षपूर्वक बघितलं पाहिजे.

आणि म्हणून मला आनंदीबाई महत्त्वाच्या वाटतात. त्यांना शिक्षणाची गोडी लागावी म्हणून प्रसंगी त्यांच्यावर हात उगारणारे गोपाळराव (यावरही खरंतर चर्चा झाली पाहिजे!) यांना त्या काळात त्यांना आपल्या बायकोनं शिकावं हे स्वप्न पडलं होतं, हे जास्त महत्त्वाचं वाटतं. आणि त्या स्वप्नासाठी धडपडत, जिद्दीने उभी राहिलेली आनंदी!

आपल्या महाराष्ट्रात सावित्रीबाई, फातिमा, आनंदी या बायकांनी पाहिलेलं हे स्त्री शिक्षणाचं स्वप्न आहे. आणि स्त्री शिक्षण कशासाठी, तर स्त्री या व्यक्तीच्या विकासासाठी असं जोवर त्याचं उत्तर होत नाही, तोवर पदव्या या दागिन्यांसारख्या मिरवल्याच जाणार आहेत. शिक्षण हे मानवी मनाला पडलेलं एक सुंदर स्वप्न आहे. ते विशाल आहे, रंगीबेरंगी आहे. आणि त्याचा सातत्याने पाठपुरावा करत राहणं, हे आपल्या हातात आहे.

beingrasika@gmail.com

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बाळासाहेबांची मोठी भूमिका, पंतप्रधानांचा थेट सदानंद सुळेंना फोन... सुप्रिया सुळेंनी सांगितला लग्नाचा 'तो' किस्सा!

Share Market Opening: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात मोठी घसरण; सेन्सेक्स- निफ्टी लाल रंगात

'राज्यात पुन्हा महायुतीचीच सत्ता येणार, ते कोणी माई का लालही रोखू शकणार नाही'; अजितदादांचा कोणाला इशारा?

Gold Price: ओमान, यूएई, कतार आणि सिंगापूरच्या तुलनेत भारतात सोन्याचे भाव कमी; काय आहे कारण?

Mumbai Traffic: मुंबईच्या रस्ते वाहतुकीत उद्यापासून बदल, जाणून घ्या महत्त्वाची बातमी

SCROLL FOR NEXT