सुनीता भोसले Sakal
सप्तरंग

पारधी मुलांसाठी 'ती' वसतिगृह मागते आहे...

लग्नाच्या मांडवाबाहेर पत्रावळी टाकलेल्या होत्या आणि तीएकच उष्टी पत्रावळ ती मुलगी आणि काही कुत्री ओढत होती.

हेरंब कुलकर्णी

लग्नाच्या मांडवाबाहेर पत्रावळी टाकलेल्या होत्या आणि तीएकच उष्टी पत्रावळ ती मुलगी आणि काही कुत्री ओढत होती. ती मुलगी पत्रावळीतली बुंदी गोळा करून नंतर एका प्लॅस्टिकच्या पिशवीत ठेवायची. एका दगडाखाली ती पिशवी तिनं ठेवली होती. कुत्र्यांनी ती पिशवीही पळवली. मुलीला रडू फुटलं. शेवटी लग्नघरातल्यांना दया आली आणि त्यांनी तिला पुन्हा बुंदी दिली. लहानपणी तिचा जन्म झाल्यावर तिला कुत्र्यानं पळवलं होतं.

वडिलांचा, काकांचा खून झाला तेव्हा रोज दोन वेळा गावात भीक मागून तिला जगावं लागलं होतं. असं जिणं इतरांच्या वाट्याला येऊ नये म्हणून पारध्यांच्या आणि भटक्या-विमुक्तांसाठीच्या कामात तिनं स्वतःला झोकून दिलं. इतकं विदारक आयुष्य ज्यांच्या वाट्याला आलं होतं त्यांचं नाव सुनीता भोसले (९५२७२३८६८८).

त्या पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील. महाराष्ट्र फाउंडेशनचा या वर्षीचा पुरस्कार त्यांना मिळाला आहे. सुनीता यांची शाळा सहावीत सुटली. त्या अकरा वर्षांच्या असताना त्यांच्या आईनं त्यांना एकनाथ आवाड यांच्या अधिवेशनाला नेलं होतं.‘माझ्या मुलीला कार्यकर्ता करायला किती पैसे लागतील?’ असा भाबडा प्रश्न आईनं आवाड यांना विचारला. आवाड यांनी सुनीता यांना लगेच कार्यकर्ता करून टाकलं. वयाच्या अकराव्या वर्षी श्रीगोंदा ते नांदेड या पदयात्रेत सुनीता सहभागी झाल्या होत्या. त्या पदयात्रेत आवाड यांनी सुनीता यांना पहिली चप्पल घेऊन दिली.

लहान असताना सुनीता यांना फ्रॉक घ्यायचा होता. पैसे नव्हते. त्यांच्या भावानं त्यासाठी मेलेल्या शेळीचं कातडं विकून बहिणीला फ्रॉक घेतला. लहानपणी इतकं विदारक आयुष्य जगूनसुद्धा नोकरी करावी, शहरात कुठं तरी सुखानं जगावं असं मात्र सुनीता यांना वाटलं नाही. आपल्या वाट्याला आलं ते इतरांच्या वाट्याला येऊ नये, पारधी मुलांना शिक्षण मिळावं, अत्याचार थांबावेत यासाठी पारधीसमूहासाठी पूर्ण वेळ काम करण्याचा निर्णय सुनीता यांनी घेतला.

पारधीसमूहाचे प्रश्न मांडताना सुनीता म्हणतात : ‘‘भ्रष्टाचार करून तिजोऱ्या लुटणारे समाजात प्रतिष्ठित असतात; पण केवळ पोटातल्या भुकेसाठी भाकरीची, धान्याची चोरी करणारे पारधी मात्र या व्यवस्थेत गुन्हेगार ठरतात. पोलिसांच्या खोट्या गुन्ह्यांनी, कोर्टकचेरीनं पारधी समाज उद्ध्वस्त केला आहे. खरे गुन्हेगार सापडले नाही तर या समूहातल्यांना तुरुंगात डांबलं जातं. मग अशांच्या पत्नींना घरातलं सामान, शेती विकून वकिलांची फी चुकती करावी लागते व नवऱ्याला तुरुंगातून सोडवून आणावं लागतं. त्यात मुलांचं शिक्षण बाजूला राहतं. मुलींचा बालविवाह करून द्यावा लागतो. यातून हा समूह अजून गर्तेत जातो आहे. पोलिसभरतीसाठी तीन वेळा प्रयत्न केलेल्या एका तरुणाला पोलिसांनी दरोड्याच्या गुन्ह्यात तुरुंगात डांबलं. गुन्हा सिद्ध न झाल्यानं ९० दिवसांनी सोडलं; पण त्या काळात त्याला रेल्वेच्या पोलिसभरतीचा कॉल आला तर तुरुंगात असल्यामुळे तो जाऊ शकला नाही व गुन्हे दाखल झाल्यानं पोलिसही होऊ शकला नाही.’’

सहावीत शिक्षण सुटलेल्या तरुणाला प्रोत्साहन देऊन सुनीता यांनी ‘यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठा’तून पदवीधर केलं आणि त्याला नंतर पोलिसांनी दरोड्याच्या गुन्ह्यात अडकवलं. पारधी तरुणांचं भवितव्य उद्ध्वस्त केलं जात असल्याचं सांगताना सुनीता यांच्या डोळ्यांत पाणी येतं.

पारधीसमूहातील जात पंचायतीनं आणि अंधश्रद्धांनी महिलांचं आयुष्य अधिक दुःखी झालं आहे. पावित्र्याच्या अवास्तव कल्पना आणि बाळंतपणातल्या अमानुष पद्धती यांतून महिलांचं जगणं गुलामीचं झालं आहे. या अंधश्रद्धांविरुद्ध सुनीता यांनी अनेक ठिकाणी संघर्ष केला. जातव्यवस्थेतील, विवाहसंस्थेतील जाचक अटी स्वीकारायच्या नाहीत असा निर्धार करून त्या अविवाहित राहिल्या.

पारध्यांंवरच्या अत्याचाराची अनेक प्रकरणं त्यांनी हाताळली. अरुणा काळे या महिलेवर थेट दरोड्याचा गुन्हा दाखल करून तिला कोठडीत मारहाण करण्यात आली होती. त्यात तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी आंदोलनं करण्यात आली. चोरीच्या खोट्या आरोपांमुळे तुरुंगात गेलेल्या पारधी-महिला, बलात्कार या विषयांवर सुनीता यांना अनेक वेळा आंदोलन करावं लागलं आहे.

सुनीता सांगतात : ‘‘एका महिलेनं सावकाराच्या त्रासाला कंटाळून पोलिस स्टेशनमध्ये विष घेतल्यावर ‘हृदयविकाराच्या धक्क्यानं निधन झालं,’ असा खोटा अहवाल पोलिसांनी तयार केला. याप्रकरणी संबंधितांवर गुन्हा दाखल होण्यासाठी थेट आदिवासीमंत्र्यांपर्यंत जावं लागलं.’’

सहावी शिकलेल्या सुनीता यांनी कायद्यातील कलमांचा कष्टपूर्वक अभ्यास केला आहे. पोलिसांनी चुकीची कलमं लावली असतील तर सहकाऱ्यांच्या मदतीनं त्या तक्रारी तयार करून घेतात व संघर्ष करतात. जातीचे दाखले मिळत नसल्यामुळे पारधी समूहाला शासकीय योजनांचा लाभ प्राप्त होत नाही. यासंदर्भात सुनीता यांनी वेगळं आंदोलन केलं. दौंडच्या तहसीलदार कार्यालयासमोर पारधी आणि भिल्ल यांची ७० पालं त्यांनी टाकली. आठ दिवस सगळे जण मुला-बाळांसह तिथंच राहिले. शेवटी, प्रशासन नमलं. जातीचे दाखले देण्यात आले. ‘‘शिरूर तालुक्यात मात्र प्रशासनानं प्रत्येक वस्तीवर दाखले घरपोच केले,’’ असं सुनीता यांनी सांगितलं.

पारध्यांच्या उदरनिर्वाहासाठी गायरान जमिनीवर त्यांनी पारध्यांचं अतिक्रमण घडवलं आणि पारधी आता शेती करत आहेत. सुनीता यांनी पारधी मुलांच्या शिक्षणावर सध्या लक्ष केंद्रित केलं आहे.

सुनीता म्हणाल्या : ‘‘निरक्षर राहिल्यानंच पारध्यांचा छळ झाला आहे, तेव्हा नव्या पिढीनं शिकून या व्यवस्थेला जाब विचारायला हवा. पूर्वी मी पोटासाठी भीक मागितली, आता मी शिक्षणासाठी भीक मागते आहे.’’

सहावीनंतर सुटलेलं शिक्षण पूर्ण करून त्या पदवीधर झाल्या. असं शिक्षण सुटलेल्या पंधरापेक्षा जास्त पारधी तरुण-तरुणींना त्यांनी ‘यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठा’त शिक्षण घेण्यास प्रोत्साहन दिलं. ते आज पदवीधर आहेत. शाळेत जाणाऱ्या मुलांना त्या शालेय साहित्य देतात. शाळेत न जाणारी मुलं शोधायची आणि शाळेत दाखल करायची हे तर त्यांचं सतत सुरू असणारं काम आहे.

सुनीता म्हणाल्या : ‘‘आता एकच स्वप्न आहे...पारधीसमूहाचं जगणं बदलायचं असेल तर त्यांच्या पुढच्या पिढ्या शिकायला हव्यात. त्यासाठी पारधी मुला-मुलींसाठी एक वसतिगृह काढायचं आहे. एक गरीब पारधी नातेवाईक जमीनही द्यायला तयार आहे. सरकारकडे मागणी करून मी थकून गेले.’’

पुणे जिल्ह्यातील दातृत्ववान व्यक्तींनी मदत केली तर सुनीता यांना अपेक्षित असलेलं पारध्यांसाठीचं वसतिगृह उभं राहू शकेल. पारध्यांची पुढची पिढी नवं जीवन जगू शकेल...

(सदराचे लेखक हे शिक्षण व सामाजिक चळवळींत कार्यरत असून विविध विषयांवर लेखन करतात.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prakash Ambedkar: “सध्या धर्म नव्हे, आरक्षण संकटात”; ओबीसींनी वंचितसोबत राहण्याचं आंबेडकरांचं आवाहन

Rahul Gandhi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही स्मृतिभ्रंशाचा आजार; आता ते आमचेच भाषण चोरत आहेत

Rajnath Singh : राहुल गांधी तुम्ही, आता जातगनणेची "ब्लु प्रिंट' जनतेसमोर आणाचं

ST Passengers : लालपरीच्या प्रवाशांत तीन वर्षांत ५० हजाराने वाढ; पुणे विभागाला आणखी १६० बसची आवश्यकता

Pakistan Army: पाकिस्तानच्या लष्करी तळावर दहशतवादी हल्ला! ७ सैनिक ठार, १५ जखमी

SCROLL FOR NEXT