सप्तरंग

देशप्रेमी पैलवान

परशुराम घार्गे हे त्या काळातील नावाजलेले पैलवान. त्यांनी आसपासची अनेक कुस्ती मैदाने गाजवत मोठमोठ्या मल्लांना धूळ चारली

संपत मोरे

परशुराम घार्गे हे त्या काळातील नावाजलेले पैलवान. त्यांनी आसपासची अनेक कुस्ती मैदाने गाजवत मोठमोठ्या मल्लांना धूळ चारली

परशुराम घार्गे हे त्या काळातील नावाजलेले पैलवान. त्यांनी आसपासची अनेक कुस्ती मैदाने गाजवत मोठमोठ्या मल्लांना धूळ चारली. हा माणूस स्वातंत्र्य चळवळीत आला. लाल मातीत सराव करून मिळवलेली ताकद त्यांनी स्वातंत्र्यलढ्यासाठी देण्याचा निर्धार केला.

१९४२च्या चळवळीत वडूजच्या मामलेदार कचेरीवर परशुराम घार्गे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा निघालेला. एकाएकी गोळीबार सुरू झाला. परशुराम घार्गे यांच्या दिशेने गोळ्या झाडल्या. घार्गे यांच्या हातात तिरंगा झेंडा होता. ते धारातीर्थी पडले; पण हातातील झेंडा सोडला नाही...

सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील पुसेसावळी हे गाव अनेक गोष्टींसह भेदिक कार हैबती बाबा यांचे गाव म्हणूनही पूर्वीच्या काळी प्रसिद्ध. सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील काही गावे आणि सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यातील काही गावांच्या बाजाराचे ठिकाण पुसेसावळीच.

या गावापासून काही अंतरावर असणारे जयरामस्वामीचे वडगाव. तशी या सांगली-सातारा जिल्ह्यात वडगाव नावाची बरीच गावे आहेत; पण या गावात जुन्या काळातील साधू जयरामस्वामींची समाधी आहे. त्यावरून या वडगावला ते नाव मिळाले.

याच गावाच्या परिसरात मी आहे. सोबत आहे नेहमीचा सोबती प्रसाद यादव सोन्या. या गावाच्या आसपास पारगाव. एकेकाळी सगळ्या हिंदुस्थानात हे गाव प्रसिद्ध होतं ते कुस्तीमुळे; पै. नाथा पारगावकर, महिपती पारगावकर यांच्यासारख्या नामांकित पैलवानांमुळे.

या शिवारात आले की पारगाव आणि त्या गावातील कर्तबगार माणसांची आठवण येतेच. पुण्याला या रोडने जाताना पारगाव फाटा आला की नाथा मास्तर आणि हिंदकेसरी मारुती माने यांच्यात झालेल्या लढतीची गोष्ट आठवते आप्पांनी सांगितलेली.

नाथा मास्तर यांचे चाहते आजही खेडोपाडी भेटतात. जयरामस्वामीचे वडगाव सतराव्या शतकात प्रसिद्ध होते, संत बहिणाबाई यांच्यामुळे. या गावात काही काळ त्यांनी वास्तव्य केलेले. बहिणाबाईंची गाथा वाचताना या गावाची आठवण येतेच.

भारताचा स्वातंत्र्यलढा सुरू असताना या गावातील पैलवान परशराम घार्गे यांना ब्रिटिश सरकारच्या विरोधात निघालेल्या मोर्चात हौतात्म्य आले. त्यांच्यासोबत अजून आठ वीराना मोर्चात हौतात्म्य आलेले. त्यात वडगावमधील चौघे होते. देशाच्या स्वातंत्र्य चळवळीत आहुती देणारे हे गाव.

प्रतिसरकारचा रोमांचकारी इतिहास वाचताना परशुराम घार्गे यांच्या बलिदानाची घटना जेव्हा समोर येते तेव्हा ब्रिटिश सत्तेची चीड येते. ब्रिटिश सरकारची राजवट उलथून टाकण्यासाठी लढणारी ही माणसे उन्मत्त पोलिसांनी टिपून मारली. परशुराम घार्गे हे त्या काळातील नावाजलेले पैलवान होते. त्यांनी आसपासची अनेक कुस्ती मैदाने गाजवत मोठमोठ्या मल्लाना धूळ चारलेली. हा माणूस स्वातंत्र्य चळवळीत आला.

लाल मातीत सराव करून मिळवलेली ताकद त्यांनी स्वातंत्र्यलढ्यासाठी देण्याचा निर्धार केला. सुरुवातीला त्या भागात जे भूमिगत यायचे त्यांना मदत करण्याचे काम करायचे. हे गाव भूमिगत लोकांसाठी माहेर झालेले. या गावात भूमिगत सैनिकांना खुप सुरक्षित वाटत होते. भूमिगत मंडळींचे स्वातंत्र्य चळवळीबाबतचे विचार ऐकून गावातील तरुण पोरंही पेटून गेली होती. प्रत्येकाला या लढ्यात आपण जावे, असे वाटत होते, जो तो आपापल्या परीने योगदान देत होता.

सन १९४२ मध्ये देशभर ब्रिटिश सत्तेच्या विरोधात वणवा पेटला. दक्षिण सातारा जिल्ह्यातील तासगाव, इस्लामपूरला मोर्चे निघाले. तासगावच्या मोर्चाचे नेतृत्व केले कृष्णराव कुऱ्हाडे यांनी. हा मोर्चा यशस्वी झाला; पण इस्लामपूरला गोळीबार झाला. स्वातंत्र्य चळवळीतल्या वीरांना बलिदानाची आहुती द्यावी लागली. अनेकांना रक्त सांडावे लागले.

वडूजच्या मामलेदार कचेरीवर मोर्चा निघाला, हा मोर्चा परशुराम घार्गे यांच्या नेतृत्वाखाली निघालेला. आम्ही कचेरीवर तिरंगा झेंडा फडकवणार, असे म्हणत सगळे मोर्चेकरी शांत बसलेले. तेवढ्यात एकाएकी गोळीबार सुरू झाला. परशुराम घार्गे यांना टार्गेट केले, तर लोक पांगतील म्हणून त्यांच्या दिशेने गोळ्या झाडल्या.

घार्गे यांच्या हातात तिरंगा झेंडा होता. पोलिसांनी घार्गे यांच्यावर गोळ्या झाडल्या. ते धारातीर्थी पडले; पण हातातील झेंडा सोडला नाही. याचवेळी जयराम स्वामींच्या वडगावातील रामू सुतार, किसन भोसले, सिदू पवार, खाशाबा शिंदे, आनंदा गायकवाड हे तरुण हुतात्मा झाले.

बलभीम खटावकर, बाळकृष्ण खटावकर हे पुसेसावळीचे दोघे तरुण आणि श्रीरंग शिंदे हे उंचीठाणे येथील सहकारी यांना हौतात्म्य आले. या वेळी अनेकांना गोळ्या लागल्या. ते जखमी झाले. भारत देश स्वतंत्र झालाय, त्यासाठी शेकडो लोकांनी आपले आयुष्य दिले.

हुतात्मा परशुराम घार्गे यांना दोन मुलं. थोरले संपतराव. वडिलांचा लढाऊ वारसा चालवण्यासाठी सैन्यात गेले. घरी परतत असताना त्यांचे अपघाती निधन झाले. दुसरे वसंतराव घार्गे. शिक्षक म्हणून अनेक वर्षे तालुक्यात काम केले. गावाच्या पंचक्रोशीत हायस्कूल सुरू केले. हायस्कूलला मान्यता मिळावी म्हणून ते मुंबईला गेले.

तेव्हा वसंतराव दादा पाटील मुख्यमंत्री होते. त्यांनी परशुराम घार्गे यांच्या पत्नी हिराबाई घार्गे यांना पाहिले आणि म्हणाले, ‘‘अरे, बाळा आईला कशाला एवढ्या लांब घेऊन आला आहेस.’’ दादांनी घरी निघालेल्या शिक्षण सचिवांना बोलावून घार्गे यांच्या शाळेस तात्काळ मान्यता दिली. हा सगळा प्रसंग सांगताना वसंतराव घार्गे यांच्या डोळ्यात पाणी आले.

वसंतदादा पाटील भूमिगत असताना या भागात राहिलेले होते. यशवंतराव चव्हाण, किसन वीर, पांडू मास्तर ही सगळी माणसे वडगावच्या शिवारात राहिली होती. त्यांचे मित्र परशुराम घार्गे गेले; पण त्यांनी या कुटुंबाला कधीही अंतर दिले नाही. १९५७ मध्ये खटाव विधानसभा मतदारसंघात काँग्रेसकडून यशवंतराव चव्हाण यांनी हिराबाई परशुराम घार्गे यांना उमेदवारी दिली होती. त्याही आठवणी वसंतराव सांगत होते.

वसंतराव गुरुजी आता थकले आहेत; पण जेवढे जमेल तेवढे सामाजिक काम करतात. हुतात्म्यांच्या स्मृती जपण्यासाठी त्यांनी गावकऱ्यांच्या सहकार्याने अनेक कार्यक्रम घेतले आहेत. दरवर्षी ते कार्यक्रम घेतात.

वसंतराव यांच्या वडगाव येथील घरातूनच देशाच्या स्वातंत्र्यचळवळीची रणनीती आखली. यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील या नेत्यांनी इथूनच अनेक देशहिताचे निर्णय घेतले. माजी मुख्यमंत्री ए. आर. अंतुले यांच्यापासून ते आर. आर. आबा पाटील यांच्यापर्यंतचे नेते या घरात येऊन गेलेत. या परिसरात फिरताना आजही तो इतिहास आठवतो. जागा होतो.

आपल्यासमोर उभा राहतो. कधीकाळी मंतरलेला हा परिसर. घराघरात बायकोला ‘कारभारणी सोडलाय मी आता सगळा धंदा सोराज्य मिळवायचं औंदा,’ असे सांगणारा स्वराज्यासाठी वेडा झालेला नवरा शाहीर शंकरराव निकम यांच्या कवनातून भेटत होता. आणि देशासाठी लढायला निघालेल्या नवऱ्याला भाकरी बांधून देणारी बायकोही भेटत होती. अनेक हात राबत होते स्वराज्यासाठी आणि स्वातंत्र्यासाठी. शेकडोंची नावही माहिती नाहीत इतिहासाला.

वसंतराव गुरुजींच्या पाया पडलो. हुतात्मा परशुराम यांचे रक्ताचे वारसदार. त्यांना वडिलांचा चेहराही आठवत नाही. मामलेदार कचेरीवर वडील देशाचा तिरंगा लावायला गेले आणि हुतात्मा झाले. आईने सांभाळ केला. दोन्ही मुलं शिकवली. पतीचा वारसा या मातेने अखंड चालवला. विधानसभेच्या आखाड्यात लढत दिली. सातारा जिल्ह्याला अभिमान वाटावा अशी आदर्श माता हिराबाई घार्गे...

जयरामस्वामीचे वडगाव सोडले. चोराडे आले. तिथून कराडच्या रोडने निघालो. रायगाव फाट्यावर आलो. पावसाची मोठी चळक आली. पुढे जाईल तसा पाऊस कमी झाला. पाऊस पडत होता; पण आज पावसाचे काही वाटत नव्हते. परशुराम घार्गेचे सुपुत्र वसंतराव गुरुजी यांनी सांगितलेल्या आठवणीत हरवून गेलेलो. इतिहासातील अनेक गोष्टी वसंतरावांनी आम्हाला सांगितल्या होत्या...

(लेखक ‘मुलुखमाती’ या गाजलेल्या पुस्तकाचे लेखक असून, ग्रामसंस्कृतीवर भाष्य करणारे भाष्यकार आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महाराष्ट्रामधील मतमोजणीपूर्वी नवी दिल्लीतील भाजप मुख्यालयात जिलेबी बनवण्याची तयारी सुरु

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: राज्यात मतमोजणीला सुरवात

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

SCROLL FOR NEXT