गजामामाची सायकल घरासमोर येऊन थांबली आणि घंटी वाजली की समजायचं पत्र आलं. सुखदुःखाच्या गाठोड्याचं ओझं गजामामा रोज वागवत होता...
गजामामाची सायकल घरासमोर येऊन थांबली आणि घंटी वाजली की समजायचं पत्र आलं. सुखदुःखाच्या गाठोड्याचं ओझं गजामामा रोज वागवत होता. गावात काही वर्षांपूर्वी फोन आले आणि गजामामाच्या पिशवीतलं व्यथा वेदनांचं ओझं कमी झालं. त्यानंतर मोबाईल हे शक्तिशाली माध्यम विकसित होत असतानाच पत्र आणणारा मामाही वयस्कर होत गेला. एक दिवस तो सेवानिवृत्त झाला हे कोणालाही कळलं नाही; पण ज्या काळात ही माध्यमं नव्हती तेव्हा गजामामाच्या सायकलीच्या घंटीचा आवाजच शक्तिशाली होता...
गजानन गुरव यांना जाऊन आता बरीच वर्षे झाली. पोस्टमन होते. सांगली जिल्ह्यातील एका खेडेगावात पत्र वाटायचे. गावाच्या पूर्वेला येरळा नदी. पश्चिमेला सात मैलांवर सागरोबाचा डोंगर. गाव तसं मराठी कादंबरीत असतं तसंच. राजेशाही असताना सातारा जिल्ह्यातील औंध नावाच्या संस्थानात हे गाव होतं. त्यामुळे थोडेफार संस्थानी संस्कार गावात होते. औंधच्या राजाला जवळून पाहिलं असं सांगणारी माणसं माझ्या बालपणी होती. त्याच गावात गजामामा नावाचा गरीब माणूस गावची पत्रं वाटत असे.
डोक्यावर टोपी, पांढरा शुभ्र शर्ट, पांढरी विजार अशा वेशातील मामा आजही तसाच डोळ्यासमोर दिसतो. भल्या पहाटे उठून घागर घेऊन तो नदीवर पाणी आणायला जायचा. सकाळी भेटेल त्या प्रत्येकाला कापऱ्या आवाजात ‘नमस्कार’ म्हणायचा. त्याची ती खासियत होती. १० वाजले की जवळच्या गावातील डाक घेऊन जायचा. दुपारच्या वेळेस पुन्हा डाक घेऊन परत यायचा. आमची शाळा दुपारी जेवायला सुटलेली असायची, तेव्हा तो येताना दिसायचा. गजामामाची सायकल घरासमोर येऊन थांबली की समजायचं पत्र आलं. पोस्ट कार्ड पाठवण्याचा काळ होता तो. गजामामा पिशवीतलं पत्र काढून द्यायचा. त्याच्या पिशवीत किती जणांची सुखदुःख होती त्यालाच ठाऊक. ते सुखदुःखाच्या गाठोड्याचं ओझं तो रोज वागवत होता. त्याच्याकडच्या पोतडीत जशा आनंदाच्या बातम्या असत, तसं कुण्या लेकीनं सासुरवासाची कहाणीही सांगितलेली असे. अगदी २५-३० मैलांवरचा पाहुणाही पत्र पाठवूनच खबरबात कळवायचा. वाहनं नव्हती. त्यामुळे दोन दोन महिने अगदी जवळ राहणारे पाहुणेही एकमेकांना भेटत नव्हते. मुंबईला असणारे चाकरमानी वर्ष वर्ष गावाकडं यायचे नाहीत. त्यामुळे त्यांचे आईवडील वाट बघायचे त्यांचं पत्र घेऊन येणाऱ्या गजानन गुरव यांची.
कधी कधी पोरांच्या मनीऑर्डरी यायच्या. काही वेळा अशी वेळ असायची, की घरात एक रुपयाही नसायचा. त्याच वेळी गजामामा यायचा आणि चाकरमानी मुलांच्या आईला सांगायचा, ‘‘पोरानं पैसे पाठवल्याती आणि कार्डबी आलंय.’’ त्या वेळी ती माउली म्हणायची, ‘‘मामा, तुम्ही आज देवासारखं आला बघा.’’ ते ऐकून गुरव मामा फक्त स्मित करायचे.
सकाळी लवकर गजामामाचा दिवस सुरू व्हायचा. गावातील सगळी पत्रं गोळा करून ते सायकलीवरून मोठं पोस्ट ऑफिस असणाऱ्या गावात जायचे. तिथून आणलेली पत्रं आमचं गाव व जोडलेली इतर गावं आणि वस्त्यांवर पोहोच करायचे. एवढा प्रवास ते सायकलीवरून करायचे; पण त्यांना थकलेलं मी कधीच पाहिलं नाही. दिवसभर किमान ३० किलोमीटर प्रवास व्हायचा. ते केवळ पत्रं वाटत नव्हते, तर निरक्षर लोकांची पत्रं वाचायचे आणि कोणी पत्र लिहायला सांगितलं तर लिहायचेही. वाईट बातमी घेऊन आलेली तार वाचल्यावर ते एखाद्या तत्त्वज्ञानी माणसासारखं सांत्वनही करायचे, असे गजामामा. ‘‘सगळ्याच गोष्टी आपल्या हातात नसतात’’ म्हणायचे.
गावात काही वर्षांपूर्वी फोन आले. फोन आल्यावर लोकं फोनवर एकमेकांशी बोलू लागली. खुशाली कळवू लागली. फोनचा काळ आला आणि गजामामाच्या पिशवीतलं व्यथा-वेदनांचं ओझं कमी झालं. सुखदुःख लिहून सांगण्याचा काळ गेला, ते बोलून सांगण्याचं मशीन आलं. मग मामाच्याही सायकलच्या फेऱ्या कमी झाल्या. त्याचा प्रत्येक घराशी संपर्क कमी होत गेला. काही काळ गेला आणि मोबाईल आला, लोक खूपच जवळ आले. खिशातल्या मोबाईलनं माणसांना एकमेकांशी जोडलं. मग तर गावात एकदोन पत्रं किंवा काही नोटिसा असंच पोस्टानं येऊ लागलं. निरोप पाठवण्यासाठीची ही शक्तिशाली माध्यमं विकसित होत असतानाच रोज सकाळी मावळत्या दिशेला जाऊन पत्र आणणारा मामाही वयस्कर होत गेला. एक दिवस सेवानिवृत्त झाला. तो सेवानिवृत्त झाला हे कोणालाही कळलं नाही. त्याने सेवानिवृत्त व्हायच्या दिवशी काय विचार केला असेल? हेही समजून घेता आलं नाही. त्याच्या नोकरीच्या शेवटच्या दिवशीच्या भावना काय असतील असा प्रश्न पडतो. लोकांना त्याची सेवानिवृत्ती समजली नाही, कारण तो आता बाजूला पडत गेला होता, संपर्क क्षेत्राच्या बाहेर गेला होता.
आज गावाकडं काहीही घडलं तर ते गावात माहीत व्हायच्या अगोदर आम्हाला २५० मैलांवर कळतं. काही वेळा तर गावातील घटना आम्ही फोन करून गावात कळवतो. असा आहे आजचा काळ आणि या काळातील संपर्क माध्यमांची ताकद; पण ज्या काळात ही माध्यमं नव्हती, तेव्हा गजामामाच्या सायकलीच्या घंटीचा आवाजच शक्तिशाली होता.
गजामामा आणि त्यानं केलेली गावाची सेवा आज या माध्यमांच्या आणि ब्रेकिंग न्यूजच्या जमान्यात आठवत राहते. आज मुंबईवरून आई-वडिलांशी मोबाईलवरून व्हिडीओ कॉल करून खुशाली सांगणारी लेक आहे. दिल्लीत नोकरीत असलेला मुलगा वडिलांच्या खात्यावर तिथं पैसे भरतो आणि वाऱ्याच्या हजारपट गतीने पैसे आल्याचा संदेश वडिलांना येतो. वाहनं आली, जीवन गतिमान झालं. या सगळ्या पार्श्वभूमीवरही उन्हातान्हात सायकलीवरून पत्र वाटणारा गजमामा डोळ्यासमोर उभा राहतो.
हा गजामामा आज नाही. गेला तो. तो गेला, त्याचा काळ गेला. आमचं खेडं बदललं. चांगले रस्ते आले. जीवनात गती आली. जिरायती शेती बागायती झाली. कधी तरी घरातील अडगळ बघताना जुनी पत्रं सापडतात. ती पत्रं बघताना गजामामा, त्याची सायकल, दारात वाजणारा घंटीचा आवाज याची आठवण येते आणि सगळा ब्लॅक ॲण्ड व्हाईट जमाना डोळ्यासमोर येतो...
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.