GD Bapu Lad sakal
सप्तरंग

क्रांतिअग्रणी बापू

दक्षिण महाराष्ट्रातील कुंडल हे गाव क्रांतिकारी विचारांचे गाव म्हणून इतिहासात प्रसिद्ध आहे. ग. दि. माडगूळकर, व्यंकटेश माडगूळकर यांनी त्यांच्या साहित्यात कुंडलविषयी अनेक ठिकाणी लिहिले आहे.

संपत मोरे

ब्रिटिशांच्या विरोधातील पुण्यातील एका मोठ्या मोर्चात जी. डी. बापू सहभागी झाले आणि शिक्षण की स्वातंत्र्य, असा प्रश्न निर्माण झाल्यावर अगोदर देशाची मुक्ती आणि मग शिक्षण असा निर्धार करून ते थेट चळवळीत उतरले. स्वातंत्र्यानंतर १९५७ सालचा अपवाद वगळता त्यांना इतर निवडणुकांत यश मिळाले नाही; पण लोकांच्या प्रश्नांवरील रस्त्यावरच्या लढाईत मात्र बापू नेहमीच जिंकत राहिले.

दक्षिण महाराष्ट्रातील कुंडल हे गाव क्रांतिकारी विचारांचे गाव म्हणून इतिहासात प्रसिद्ध आहे. ग. दि. माडगूळकर, व्यंकटेश माडगूळकर यांनी त्यांच्या साहित्यात कुंडलविषयी अनेक ठिकाणी लिहिले आहे. याच कुंडलमधील क्रांतिकारी चळवळीबद्दल ‘मंतरलेले दिवस’मध्ये ग. दि. माडगूळकर यांनी लिहिले आहे. या गावातील तरुणाईने त्या काळात ब्रिटिशांच्या विरोधात चळवळ कशी उभारली याचे वर्णन त्यात आहे. या चळवळीतीलच एक नायक होते जी. डी. लाड. एका सामान्य कुटुंबातील या तरुणाने पुढे आपल्या कर्तृत्वाने ‘क्रांतिअग्रणी’ हा किताब मिळवला. महाराष्ट्रात हा किताब एकाच व्यक्तीला मिळाला आहे.

बापू एका सामान्य कुटुंबातील होते. आपल्या मुलाने शिक्षण घ्यावे आणि नोकरी करावी अशी आई-वडिलांची इच्छा, पण तो काळ स्वातंत्र्य चळवळीचा. कुंडल गावात या चळवळीचे लोण आलेले. या गावातील आप्पासाहेब लाड यांनी गावात तरुणाईला देशभक्ती, राष्ट्रप्रेम हा गोष्टीचे धडे द्यायला सुरुवात केलेली. क्रांतिसिंह नाना पाटील यांचाही झंझावात सुरू झालेला. या विचाराने जी. डी. बापूंसारखे तरुण प्रभावित न होतील तर नवल. ते आणि त्यांच्यासोबतचे अनेक तरुण देशाच्या मुक्तीसाठी वेडे झाले. एकत्र येऊन विचार करू लागले.

निपाणीच्या शिक्का शाळेत अध्ययन करून स्वातंत्र्य चळवळीचे वेड डोक्यात घेऊनच बापू आयुर्वेद शिकण्यासाठी पुण्यात गेले. सगळा कोर्स पूर्ण केला असता तर डॉक्टर झाले असते; पण पुढे वेगळ्याच घटना घडणार होत्या. पुण्यातील ब्रिटिशांच्या विरोधातील एका मोठ्या मोर्चात ते सहभागी झाले आणि शिक्षण की स्वातंत्र्य, असा प्रश्न निर्माण झाल्यावर अगोदर देशाची मुक्ती आणि मग शिक्षण असा निर्धार करून ते थेट चळवळीत उतरले.

सातारा जिल्ह्यात क्रांतीसिंह नाना पाटील यांनी जे प्रतिसरकार उभारले होते, त्या सरकारच्या माध्यमातून ब्रिटिशांची सत्ता खिळखिळी केली जात होती. पुणे उत्तर, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर जिल्ह्यांतील पूर्व भागात या सरकारची कामगिरी सुरू होती. कुंडल ही प्रतिसरकारची राजधानी. या गावातील घरटी माणूस या ना त्या कारणाने ब्रिटिश सत्तेच्या विरोधातील लढाईत सहभागी होता. जी. डी. बापू लाड या सरकारच्या अनेक कामांत अग्रभागी राहिले.

ज्या ब्रिटिश सत्तेशी दोन हात करायचे त्यांच्याजवळ आधुनिक हत्यारे होती, तशी हत्यारे या क्रांतिकारी लोकांकडे नव्हती. शत्रूशी लढायचे कसे हा प्रश्न बापू आणि त्यांचे सहकारी यांच्यापुढे उभा राहिला. तेव्हा त्यांनी सुरुवातीला ब्रिटिशांना फितूर असलेल्या धनदांडग्या लोकांच्या बंदुकी हिसकावून आणल्या. पुढे त्यांनी व क्रांतिवीर नागनाथ अण्णा नायकवडी यांनी गोव्याला जाऊन आधुनिक पिस्तूल आणल्या आणि आपल्या साथीदारांना दिल्या. त्यामुळे सर्वांमध्ये आत्मविश्वास आला.

सातारा प्रतिसरकारचा अभ्यास करताना या सरकारने निर्माण केलेले स्वतंत्र न्यायदान मंडळ आणि स्वतःची तुफान सेना याविषयी अप्रूप वाटते. ज्या भागात या सरकारचा प्रभाव होता, त्या भागात स्वतंत्र न्यायमंडळे स्थापन केली होती. त्या भागातील न्याय स्वतः प्रतिसरकारचे लोक करत असत. बापू या न्यायमंडळाचे शिल्पकार होते, असे त्यांचे सहकारी कॅप्टन रामभाऊ लाड यांनी म्हटले आहे.

त्यांनी लिहिलेल्या व्यक्तिचित्रणात्मक पुस्तकात त्यांनी ‘याच तुफान दलाच्या अधिपत्याखाली ओगलेवाडी-कराडपासून आटपाडीपर्यंत शेकडो न्यायालये स्थापन केली गेली. शेकडो न्यायनिवाडे दिले गेले. विशेषतः स्त्रियांबाबतच्या तक्रारी किंवा मातब्बर मंडळींकडून होणारे त्यांच्यावरील जुलूम याला पायबंद घालण्यात शंभर टक्के यश आले होते. बायाबापड्या जी. डी. बापूंच्या नावाने ओव्या गात होत्या. प्रतिसरकारच्या कामकाज पद्धतीविषयी लोकांत समाधान निर्माण झाले होते. क्रांतिकारकांबद्दलचा जिव्हाळा वाढला होता.

सरकारधार्जिणे लोक तोंडे काळी करून बसले होते. समाजकंटकांनी जी. डी. बापू नावाचा धसका घेतला. सातारची भूमी भूमिगतांना अनुकूल होती. भूमिगत उघड माथ्याने गावभर मिरवत. बापूंच्या नेतृत्वाखाली असलेल्या कार्यक्षेत्रात ब्रिटिश सरकारचे राज्य संपले होते. गुंडपुंड, चोर, दरोडेखोर, लुटारू नेस्तनाबूत झाले, असे म्हटले आहे. आपल्या ज्येष्ठ सहकाऱ्याबद्दल त्यांनी आत्मीयतेने लिहिले आहे.

बापूंचे १९४२च्या आसपासचे जीवन ब्रिटिश सरकारविरोधी मोहिमांनी भरलेले आहे. प्रतिसरकारच्या पुढे पैशांची गरज निर्माण झाली तेव्हा खानदेशातील क्रांतिवीर उत्तमराव पाटील यांच्या मदतीने सांगली जिल्ह्यातील क्रांतिकारकांनी धुळे जिल्ह्यातील चिमठाणे येथे जाऊन सरकारी खजिना घेऊन जाणारी गाडी लुटली. तो आगळा, रोमहर्षक प्रसंग देशाच्या इतिहासाने सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवला आहे. जी. डी. बापू, नागनाथ अण्णा, धोंडीराम बापू, सावळाराम एडके यांची त्या वेळीची कामगिरी क्रांतिलढ्यातील सर्वांत धाडसी कामगिरी आहे.

देशाला स्वातंत्र्य मिळाले आणि काँग्रेसच्या काही चुकीच्या धोरणांना विरोध करत एक मोठा गट काँग्रेसमधून बाहेर पडला. या गटाने आळंदी येथे एक बैठक घेऊन शेतकरी कामगार पक्षाची (शेकाप) स्थापना केली. या स्थापनेप्रसंगी बापू उपस्थित होते. शेकापच्या स्थापनेनंतर या पक्षाच्या प्रचारासाठी त्यांनी राज्यभर दौरे केले.

पक्ष तळागाळातील लोकांच्यात रुजवण्यासाठी त्यांनी खूप मेहनत घेतली. ते फर्डे वक्ते होते. क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या भाषणाचा त्यांच्यावर प्रभाव असल्याने तशीच लोकप्रिय भाषणे बापू करत. काही काळातच ते शेकापचे राज्याचे नेते म्हणून उदयास आले.

निवडणुकांच्या राजकारणाबाबत त्यांची एक भूमिका होती. आपल्या पक्षाचा विचार लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी म्हणून ते निवडणुकांकडे बघत असत. त्यांनी एकूण आठ निवडणुका लढवल्या. त्यापैकी १९५७ सालचा अपवाद वगळता त्यांना इतर निवडणुकांत यश मिळाले नाही. एक वेळा विधानसभा आणि एक वेळा विधान परिषदेत त्यांना संधी मिळाली.

विधान परिषदेत विरोधी पक्षनेता म्हणूनही काम करण्याची संधी मिळाली. त्यांना १९६२, १९६७, १९७८, १९९० या विधानसभा निवडणुकीत अपयश आले. १९९६ च्या लोकसभा निवडणुकीतही त्यांना अपयश आले. आयुष्यात एवढे पराभव पचवलेल्या बापू यांनी लोकांच्या प्रश्नांवर लढणे सोडले नाही. त्यांच्यातील लढाऊ नेता निवडणुकीत पराभूत झाला; पण लोकांच्या प्रश्नांवरील रस्त्यावरच्या लढाईत मात्र ते विजयी राहिले, नेहमी जिंकत राहिले.

राजकारणात पराभव होत असतात, राजकीय अपयश येत असते, राजकीय अपयशाने कधी हताश व्हायचे नसते, हाच धडा बापूंच्या जीवनचरित्रातून नव्या राजकीय कार्यकर्त्यांना शिकता येईल. कोणताही पराभव तुम्हाला संपवू शकत नाही; पण तुम्ही झुंजार असायला हवे. संकटांशी दोन हात करण्याची जिगर तुमच्यात हवी. काही पराभवसुद्धा देखणे असतात.

काही पराभवात मोठी संधी असते, हेच क्रांतिकारकारांच्या चारित्रातून शिकता येईल. इंग्रजी सत्तेला सळो की पळो करून सोडणारी ही माणसे होती. ही माणसे पराभवाला घाबरणारी नव्हती. ब्रिटिशांच्या रोखलेल्या संगिनींकडेसुद्धा आव्हान देणाऱ्या नजरेने बघणारे बापू होते...

आयुष्यात पाच पराभव झालेल्या क्रांतिअग्रणी जी. डी. बापू लाड यांचे नाव पराभवाने विस्मृतीत गेले नाही, तर महाराष्ट्र शासनाने ‘महाराष्ट्राचे शिल्पकार’ हे पुस्तक प्रकाशित करून त्यांच्या स्मृती जतन केल्या आहेत हे आपण लक्षात घेतले पाहिजे!

(लेखक ‘मुलुखमाती’ या गाजलेल्या पुस्तकाचे लेखक असून, ग्रामसंस्कृतीवर भाष्य करणारे भाष्यकार आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुण्यात विजयी मिरवणूक काढण्यास सक्त मनाई; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: माहीम मतदारसंघात चोख सुरक्षा व्यवस्था

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

Versova Assembly Constituency Result: भारती लव्हेकर विरुद्ध हारून खान

SCROLL FOR NEXT