ramchandra tukaram patil Biographer sakal
सप्तरंग

उपेक्षितांचा चरित्रकार!

रामचंद्र तुकाराम पाटील यांनी शालेय जीवनातच स्वातंत्र्य चळवळीत काम केले. त्यानंतर शिक्षकाची नोकरी पत्करून इंग्रज सत्तेविरुद्ध बंड केले.

संपत मोरे

रामचंद्र तुकाराम पाटील यांनी शालेय जीवनातच स्वातंत्र्य चळवळीत काम केले. त्यानंतर शिक्षकाची नोकरी पत्करून इंग्रज सत्तेविरुद्ध बंड केले. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ते पुन्हा शिक्षकी पेशात रमले. शिक्षणाधिकारी झाले. याच काळात त्यांनी अनेकांचे चरित्र पुस्तकरूपाने प्रसिद्ध केले. अतिशय परिश्रम करून त्यांनी अंधारात जाणाऱ्या गोष्टी उजेडात आणल्या. अनेक माणसं उपेक्षित राहिली असती, त्यांची नोंद रा. तु. यांनी घेतली; पण अनेक उपेक्षित गोष्टी उजेडात आणणारा हा चरित्रकार स्वत: मात्र उपेक्षितच राहिला...

कडेगावपासून पाच-सहा किलोमीटरवर असलेल्या तडसर या गावात बसून रामचंद्र तुकाराम पाटील यांनी अनेक महत्त्वाची पुस्तके लिहिली; मात्र त्यांच्या कामाचे योग्य ते मूल्यमापन झाले नाही. सांगली जिल्ह्यातल्या तडसर गावातील शाळेत शिकणारे रामचंद्र वयाच्या तेराव्या वर्षी स्वातंत्र्य चळवळीकडे आकर्षित झाले.

गावात स्वातंत्र्य चळवळीचे वातावरण होते. कायदेभंगाची चळवळ अगदी खेड्यात आलेली. काही लोक महात्मा गांधींचा पोहोचलेला संदेश प्रमाण मानून कायदेभंग करत होते, प्रभातफेऱ्या निघत होत्या, वातावरण भारलेले होते. या देशभक्तीच्या वातावरणाने रामचंद्र यांनीही प्रभातफेरीत भाग घ्यायला सुरुवात केली.

१९३० नंतरचा सगळा काळ त्यांना नंतरच्या आयुष्यात आठवत असे. भेटल्यावर जर त्यांना या काळाबद्दल कोणी विचारले, तर ते खूप गोष्टीवेल्हाळपणे सगळे प्रसंग आणि घटना अन्वयार्थसहित सांगत.

देश इंग्रजी सत्तेच्या गुलामीतून मुक्त व्हावा म्हणून तेव्हाच्या काँग्रेस पक्षाने लढा पुकारला होता. काँग्रेसमध्ये प्रवेश करून या लढ्याला पाठिंबा देणे ही मोठी गोष्ट होती; पण काँग्रेसमध्ये प्रवेश करणे म्हणजे सरकारी अवकृपा ओढवून घेणे, असे व्हायचे;

पण कसलीही पर्वा न करता विद्यार्थी असतानाच रामचंद्र पाटील यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश करत देशाच्या मुक्तीलढ्यात अधिकृत पाऊल टाकले. ते आसपासच्या गावात जाऊन काँग्रेसचा विचार लोकांना सांगू लागले. सभासद नोंदणी करू लागले. शिक्षण घेत असतानाच त्यांनी काँग्रेस प्रचारकार्याला स्वतःला वाहून घेतले...

माणसाच्या आयुष्यात अनेक वळणे येतात. त्याचा माणसाच्या आयुष्यावर परिणाम होतो. शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांना प्राथमिक शिक्षकाच्या नोकरीचा कॉल आला. एका बाजूला काँग्रेस चळवळ आणि दुसऱ्या बाजूला नोकरी अशा दुहेरी मानसिकतेत असलेल्या रामचंद्र पाटील यांना स्वातंत्र्य चळवळीत कार्यरत असलेल्या ज्येष्ठ सहकाऱ्यांनी नोकरी करत चळवळीला मदत करण्याचा सल्ला दिला... मग ते गावातील शाळेत शिक्षक म्हणून नोकरी करू लागले.

नोकरी करताना चळवळीला मदत करत. ते सरकारी शिक्षक असल्याने त्यांच्याकडे पोलिसांचे लक्ष नसे. या काळात रात्री भूमिगत सैनिकांना जाऊन भेटणे, त्यांच्या आगामी मोहिमांबद्दल चर्चा करणे, असा त्यांचा दिनक्रम सुरू होता.

शाळेत मुलांना इंग्रजी राजवटीच्या काळ्या कारभाराबाबत सांगत, ब्रिटिश राजवटीचा अन्याय त्यांच्यासमोर मांडत असतानाच देशासाठी घरदार सोडून लढणाऱ्या क्रांतिकारकांची चरित्रे, त्यांचा त्याग विद्यार्थ्यांना सांगून त्यांच्या मनात देशभक्ती आणि स्वातंत्र्यप्रेम निर्माण करत होते.

तेव्हा सर्व शाळांत इंग्लंडच्या राजाचा वाढदिवस साजरा केला जात असे. मुख्याध्यापकाच्या खोलीत तो फोटो होता. विद्यार्थ्यांना तो राजाचा फोटो काढताना फोडायला सांगितला. एका विद्यार्थ्याला गुरुजींना काय म्हणायचे, हे समजले होते.

त्याने फोटो सरळ वरून खाली टाकला आणि फुटला. सत्ता इंग्रजांची. फोटो फुटला ही बाब खूप गंभीर होती. प्रकरण तालुक्याला गेले. मुख्याध्यापकांकडे चौकशी करायला वरचे अधिकारी येऊ लागले. विद्यार्थी म्हणाले, ‘चुकून झाले.’ मात्र काही विद्यार्थ्यांना पकडून नेले आणि सोडून दिले.

याच घटनेच्या आसपास आपली नोकरी सोडून रामचंद्र तुकाराम पाटील हे भूमिगत झाले. नोकरी सोडून थेट प्रतिसरकारच्या लढ्यात सहभागी होण्याचा निर्णय घेतला. बघता बघता एक शिक्षक आतील प्रेरणेने क्रांतिकारी दिशेने गेला होता.

आपल्या नोकरीत असलेला एक शिक्षक नोकरी सोडून प्रतिसरकार चळवळीत गेला आहे, याचा सरकारी अधिकाऱ्यांना खूप राग आला, त्यांनी त्याला पकडण्यासाठी जंग जंग पछाडले; पण त्या मोठमोठ्या सह्याद्रीच्या रांगा आणि ते शेकडो मैल पसरलेले रान, यात कुठे शोधणार; पण एका क्षणी त्यांना अटक झाली. दोन महिने तुरुंगात काढावे लागले. पुन्हा सुटका झाल्यावर दोन वर्षे त्यांनी भूमिगत म्हणून काम केले. तेव्हाही वॉरंट होते.

ब्रिटिश सत्तेचा जोर ओसरला. देशाला स्वातंत्र्य मिळाले आणि त्यानंतर ते पुन्हा शिक्षक म्हणून रुजू झाले. त्यांची काँग्रेस पक्षाचे खानापूर तालुका अध्यक्ष म्हणून निवड झाली. काँग्रेस पक्षाची काही धोरणे न पटल्याने काँग्रेस सोडून शेतकरी कामगार पक्षात गेले. नोकरी सांभाळून शेकापचे काम करू लागले. बीए आणि बी.एड्‌.ची पदवी मिळवली. माध्यमिक शिक्षक आणि एक दिवस सांगली जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी झाले.

एका खेड्यात जन्म घेतलेल्या रामचंद्र तुकाराम पाटील नावाच्या माणसाच्या अफाट आयुष्याची कथा इथं संपत नाही. शिक्षक, पुन्हा चळवळ, पुन्हा काँग्रेस तालुका अध्यक्ष, पुन्हा माध्यमिक शिक्षक, शिक्षणाधिकारी असा हा प्रवास...

शिक्षणाधिकारी म्हणून निवृत्त झाल्यावर त्यांनी लिखाण सुरू केले. हे त्यांच्या आयुष्यातले महत्त्वाचे काम आहे. तडसर गावात त्यांनी परखड प्रकाशन सुरू केले. या प्रकाशनाच्या माध्यमातून एकूण सात पुस्तके लिहिली. त्यांचे स्वातंत्र्य चळवळीतील सहकारी वसंतराव दादा पाटील, यशवंतराव चव्हाण, स्वामी रामानंद भारती, क्रांतिसिंह नाना पाटील यांची चरित्रे त्यांनी लिहिली.

सोबत त्यांनी पाखंडवादाचा पहिला धडा, समाजवादाचा ओनामा, बुरखाहरण, सांगली - साताऱ्याचे राजकारण, विसाव्या शतकाआरंभीचा महाराष्ट्र अशी पुस्तके लिहिली. आयुष्यातले पहिले पुस्तक त्यांनी वयाच्या ६८ व्या वर्षी लिहिले.

आपल्या चरित्र लिखाणाबद्दल त्यांनी म्हटले आहे, ‘‘चरित्र नायकाच्या हयातीत चरित्र प्रसिद्ध करीत नाहीत- कारण त्या कोणाही व्यक्तीची स्तुतिस्तोत्रे गाऊन मला काही मिळवायचे नसते. कोणा मोठ्या व्यक्तीस प्रसिद्धी देऊन त्याच्या ऋणातून मुक्त व्हावे, अशा प्रकारची कृतज्ञतेची भावना वगैरे माझ्यासारख्या पाखंडी माणसाच्या मनाला कधीही शिवत नाही.

शिवाय कोणाही व्यक्तीचे खाते बंद झाले (अवतार समाप्ती झाली), म्हणजे त्या व्यक्तीच्या कर्तबगारीचा गुण-दोषाचा ताळेबंद तयार करणे सोयीचे होते. यशवंतराव चव्हाण व वसंतराव दादा हे हयात असतानाच त्यांच्याबद्दल पुस्तक रूपाने काही प्रसिद्ध करावे, असे खूप वाटले.

थोडे थोडे लिहून ठेवलेही; पण त्या दोघांच्या मृत्यूनंतरच ते प्रसिद्धीला गेले. त्यामुळे क्रियापदांच्या वर्तमानकाळाचे भूतकाळात रूपांतर करावे लागले. नाना पाटील व स्वामीजींच्या हयातीत मी कधी काळी पुस्तक लिहून प्रसिद्ध करीन, ही कल्पना स्वप्नातही डोकावली नव्हती.’’

रामचंद्र तुकाराम पाटील हे आपले लिखाण रा. तु. पाटील या नावाने प्रसिद्ध करत. लोक त्यांना भाऊ म्हणत. सांगली आणि सातारा जिल्ह्यांत त्यांचे खूप चाहते होते. त्यांच्याबद्दल लोकांना आदर होता. यशवंतराव चव्हाण, वसंतराव दादा पाटील, नाना पाटील हे मोठे नेते. या सर्व नेत्यांना गुरुस्थानी असलेल्या स्वामी रामानंद भारती यांच्यासोबत त्यांनी काम केले होते.

या नेत्यांचा जडणघडणीचा काळ त्यांनी पाहिला होता, काही ठिकाणी सोबत केली होती; पण पुढे हे नेते मोठे झाल्यावर त्यांच्याकडे जाऊन कसलीही मागणी त्यांनी केली नाही किंवा जुन्या पुण्याईच्या बळावर त्यांनी काहीही मिळवण्याचा प्रयत्न केला नाही. आयुष्यभर त्यांनी बाणेदारपणा सोडला नाही.

रा. तु. पाटील यांनी केलेले लेखन खूप महत्त्वाचे होते. अतिशय परिश्रम करून त्यांनी अंधारात जाणाऱ्या गोष्टी उजेडात आणल्या. अनेक माणसं उपेक्षित राहिली असती, त्यांची नोंद रा. तु. यांनी घेतली; पण शोकांतिका एकच, अनेक उपेक्षित गोष्टी उजेडात आणणारा हा चरित्रकार मात्र उपेक्षित राहिला आहे.

(लेखक ‘मुलुखमाती’ या गाजलेल्या पुस्तकाचे लेखक असून, ग्रामसंस्कृतीवर भाष्य करणारे भाष्यकार आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुण्यात विजयी मिरवणूक काढण्यास सक्त मनाई; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: माहीम मतदारसंघात चोख सुरक्षा व्यवस्था

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

Versova Assembly Constituency Result: भारती लव्हेकर विरुद्ध हारून खान

SCROLL FOR NEXT