religious riots sakal
सप्तरंग

धार्मिक दंगलींची ‘डिजिटल’ प्रयोगशाळा

दोन-पाच अल्पवयीन मुलांनी समाजमाध्यमांवर ‘आक्षेपार्ह स्टेटस ठेवलं,’ या कारणानं कोल्हापुरात सहा ते सात जूनअखेर तणावग्रस्त परिस्थिती निर्माण झाली. सात जूनला दंगा झाला.

सम्राट फडणीस samrat.phadnis@esakal.com

दोन-पाच अल्पवयीन मुलांनी समाजमाध्यमांवर ‘आक्षेपार्ह स्टेटस ठेवलं,’ या कारणानं कोल्हापुरात सहा ते सात जूनअखेर तणावग्रस्त परिस्थिती निर्माण झाली. सात जूनला दंगा झाला. अल्पसंख्य समाजाला लक्ष्य करण्यात आलं. जमाव जमवून घोषणाबाजी झाली. मोडतोड झाली. दोन दिवसांतल्या या घडामोडींची छायाचित्रं, व्हिडिओ राज्यभर पसरले.

हा धार्मिक दंगा आहे, हे कुणी न सांगताही समाजमाध्यमांमधून सगळीकडे समजलं. त्याआधी, ता. २९ मार्चला रामनवमीच्या आदल्या रात्री बुलढाण्यातल्या मोताळा इथं धार्मिक तणाव निर्माण झाला. हाणामारी झाली. तालुक्याच्या ठिकाणची ही घटना रामनवमीच्या दिवशीच समाजमाध्यमांतून दिसायला लागली. त्याच दिवशी आणि रामनवमीला, ता. २९ आणि ता. ३० मार्चला छत्रपती संभाजीनगरात दंगा झाला. दिशाभूल करणारा व्हिडिओ हे त्या दंगलीमागचं कारण.

हा व्हिडिओ, प्रत्यक्ष दंगलीचे व्हिडिओ आणि छायाचित्रं समाजमाध्यमांवर दिसत राहिली. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात अहमदनगरमधली (अहिल्यानगर) शांतता बिघडली. याच जिल्ह्यातल्या शेवगावात धार्मिक तेढ निर्माण झाली. ता. १३ मे रोजी अकोल्यात दंगा झाला. समाजमाध्यमांवरची आक्षेपार्ह पोस्ट हे या दंगलीचं कारण. ता. १९, ता. २० मे रोजी जळगावात धार्मिक स्थळावर दगडफेक झाली. ही घटना एका कॉलनीपुरती मर्यादित. ती समाजमाध्यमांद्वारे राज्यात पोहोचली.

दंगलींमधली साम्यस्थळं

वरवर तपासल्या तर मार्च ते जून या चार महिन्यांत सात ठिकाणी धार्मिक दंगे, धर्माच्या नावावर दगडफेकीच्या घटना दिसतात.

या साऱ्या घटनांमध्ये विलक्षण साम्यस्थळं आढळतात. एकतर या घटना घडलेली ठिकाणं महानगरं किंवा बहुसांस्कृतिक शहरं नाहीत. या शहरांमधून गेल्या दोन दशकांत मुंबई, पुणे अथवा देशाच्या अन्य भागांत रोजगारासाठी झालेलं स्थलांतर आकड्यांमध्ये मोजलं गेलं नसलं तरी ठळकपणे दिसणारं.

याचा दुसरा अर्थ, या शहरांमधल्या रोजगाराच्या संधी आक्रसत आहेत. सन २०११ नंतर जनगणना झालेली नसली तरी या शहरांमधली लोकसंख्या असामान्य पद्धतीनं वाढते आहे असं ढोबळ चित्र दिसत नाही. अशा परिस्थितीत ‘बाहेरच्यांनी’ येऊन रोजगार, निवास हिरावला आहे, अशी परिस्थिती या शहरांमध्ये नाही. वर्षानुवर्षं त्याच पद्धतीनं जीवन जगणारी ही शहरं-गावं आहेत. अशाच शहरा-गावांमध्ये धार्मिक तणाव निर्माण झाला.

या साऱ्या दंग्यांमध्ये इंटरनेट वापरून मोबाईलद्वारे समाजमाध्यमांवर विष पसरवलं गेलं. मध्यम आकाराची शहरं-गावं, तिथं समाजमाध्यमांद्वारे सातत्यानं निर्माण होत गेलेली टोकाची धर्मभावना आणि समाजमाध्यमांद्वारेच पसरवल्या गेलेल्या धार्मिक द्वेषाच्या घटना यांचं पर्यवसान दंगलीत झाल्याचं या सर्व घटनांमध्ये जाणवतं. पोलीस, प्रशासन आणि राज्य सरकारचे प्रतिनिधी यांनी गेल्या चार महिन्यांमध्ये वेळोवेळी सांगितलेल्या घटनाक्रमामध्ये अशी विलक्षण साम्यस्थळं आढळतात.

समाजमाध्यमांनी केलेला गुणाकार

तणाव पसरवण्यासाठी समाजमाध्यमांचा होणारा वापर तसा दीड दशक जुना आहे. आज नामोनिशाणीही नसलेल्या ‘ऑर्कुट’चा वापर झाल्याचं उदाहरण महाराष्ट्रात आहे. आजचं चित्र ऑर्कुटकाळाच्या हजारो पट पुढं गेलेलं आहे आणि त्यासाठी अवघा दशकभराचा काळ लागला. त्यातही गेल्या सहा वर्षांत, भारतात डिजिटल-क्रांती घडल्यानंतरच्या काळात, अशा घटनांच्या प्रचाराचा गुणाकार झाला.

या गुणाकाराच्या शिक्षणात शासन-प्रशासन-पोलीस एका मर्यादेपलीकडे पोहोचलेले नाहीत. गुणाकार करून समाजस्वास्थ्य बिघडवणारे घटक मात्र प्रमुख भूमिकेत शिरले आहेत. महाराष्ट्रातल्या धार्मिक तणावाच्या गेल्या चार महिन्यांतल्या घटनांत समाजमाध्यमांनी केलेला गुणाकार तीन ठिकाणी स्पष्ट दिसतो :

1) पहिला घटक म्हणजे आशय (कंटेन्ट) निर्मिती. छायाचित्रं, व्हिडिओ, ऑडिओ अशा स्वरूपांतून माहितीचा विपर्यास करून प्रचारकी, धर्मभावना भडकवणारी आशयनिर्मिती करण्यात समाजमाध्यमांची भूमिका मोठी राहिली.

2) दुसरा घटक आहे प्रसाराचा. स्टेटस, रील्स, पोस्ट यांद्वारे आशय झटपट हजारो लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम समाजमाध्यमांनी केलं.

3) तिसऱ्या घटकामध्ये परिणामाचा समावेश होतो. माहिती की अपमाहिती की खोटेपणा याची कोणतीही खातरजमा करून न घेता हजारो लोकांच्या मोबाईलपर्यंत पोहोचणाऱ्या आशयानं धार्मिक पातळीवर द्वेष, अविश्वासाची खोल दरी निर्माण केली.

समाजमाध्यमांनी केलेला हा गुणाकार त्या त्या खासगी कंपनीचे ग्राहक वाढवत असला तरी प्रत्यक्षात नागरिकांमधली परस्परसामंजस्याची भावना संपवत चालला आहे.

समाजातली वाढती धार्मिक दरी

फक्त गेल्या चार महिन्यांतल्या घटनांकडे पाहिलं तर परिणामांमध्ये समाजातली भयावह दरी स्पष्टपणे दिसते आहे. कुटुंबांच्या व्हॉट्सअॅप समूहांवरील चर्चा असोत, मित्रपरिवारातल्या समूहांवरील चर्चा असोत, त्यांना धार्मिक रंग क्षणात येतो आहे. एखादं छायाचित्र, व्हिडिओ आणि त्यावरच्या टीका-टिप्पणीतून वर्षानुवर्षांचे संबंध संपुष्टात येत आहेत. हा प्रकार समाज म्हणून अत्यंत नवा आहे हे लक्षात घेतलं पाहिजे.

किरकोळ कारणावरून शेजाऱ्यांमधले, कौटुंबिक अथवा मैत्रीचे संबंध दुखावले जाणं ही गोष्ट समाजाला सरावाची. या दुखावल्या जाण्यात समोरासमोरचा अनुभव होता. समाजमाध्यमांद्वारे, आभासी समूहांद्वारे दुखावलं जाताना केवळ लिखित शब्द अथवा निर्जीव छायाचित्र अथवा डिजिटल व्हिडिओ पुरेसा ठरतो आहे. बरं, या आशयाचा रोजच्या जगण्याशी संबंध असो-नसो त्याचा परिणाम होतो आहे. ‘मोबाईलवर दिसतं आहे, तेच सत्य’, असं मानणारा एक मोठा वर्ग बघता बघता तयार केला गेला आहे.

हा वर्ग तयार करण्यामागं राजकीय हितसंबंध आहेतच; त्याचबरोबर हा वर्ग ज्या समाजमाध्यमांवर पोसला जातोय, त्या खासगी कंपन्यांना कोणताच धक्का बसत नाही हे लक्षात घेतलं पाहिजे. समाजात जाती-धर्मानुसारच्या वस्त्या आहेत. त्या गाव-खेड्यांमध्ये आहेत, शहरांमध्ये आहेत आणि अगदी महानगरांमध्येसुद्धा आहेत. त्या सत्यापासून पळ काढण्यात काही अर्थ नाही. या वस्त्यावस्त्यांमधले परस्परसंबंध अगदीच सलोख्याचे, आत्मीयतेचे आहेत असं समजायचंही कारण नाही. एक अदृश्य तणाव गेली कित्येक वर्षं वसाहतींमध्ये-वस्त्यांमध्ये नांदतो आहे. हा तणाव बटबटीतपणे व्यक्त करण्याला मर्यादा आहेत. त्या मर्यादा समाजमाध्यमांद्वारे उद्ध्वस्त झाल्या आहेत.

आपण सारे प्रयोगशाळेत...

समाजमाध्यमांवरच्या विखारी पोस्ट आणि जाहीर सभांमधली विषारी भाषणं यांमध्ये तिळमात्र फरक नाही. सभांमधली भाषणं तिथं उपस्थित जनसमुदायापुरती मर्यादित होती आणि आहेतही. समाजमाध्यमांवर या भाषणांच्या कित्येक चित्रफितींची निर्मिती, भाषणांचं थेट प्रक्षेपण विखाराचं पुनःपुन्हा सादरीकरण आहे. या वारंवारच्या सादरीकरणातून ते पाहणाऱ्या, वाचणाऱ्याच्या मेंदूमध्ये एकप्रकारची हिंसा जन्म घेऊ शकते.

डिजिटल आणि समाजमाध्यमांमध्ये अशी दूर राहून माणसाला हिंसक बनवण्याची अचाट क्षमता आहे. ती क्षमता धार्मिक दंग्यांतून प्रकट होते आहे. या प्रकारच्या डिजिटल-हिंसेतून पसरवल्या जाणाऱ्या दहशतीचा लाभ घेणारी राजकीय व्यवस्था भारतात, महाराष्ट्रात आहेच. अशा प्रकारच्या डिजिटल-हिंसाचारातून होणारं राजकीय ध्रुवीकरण राजकारण्यांच्या लाभाचं असतं. त्याहीपुढं जाऊन डिजिटल-हिंसाचाराला थेट रस्त्यावर उतरवून पुन्हा त्याचं डिजिटल रूपांतरण करण्याचा नवा प्रयोग अलीकडे आकाराला आला. त्याचा विचार राजकारणापलीकडे जाऊनच करावा लागेल.

धार्मिक, जातीय चष्म्यातून या प्रयोगावर व्यक्त होण्यानं काही साध्य होणारं नाही. त्याच्याविरुद्ध टोकाला जाऊन, डिजिटल-हिंसाचाराची मुळं शोधून ती नष्ट करावी लागणार आहेत. हा आपल्या धर्माचा, तो परक्या जातीचा या भूमिकेनं कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, अकोल्यातल्या घटनांकडे पाहून झालंय. त्यातून नव्या हिंसाचारापलीकडे काही हाती लागलेलं नाही.

मोबाईलवरचा हिंसाचार दारात

शासन-प्रशासन आणि पोलीस या तीन घटकांवर येत्या काळात नव्या तंत्रज्ञानानं अधिक जबाबदारी येतेय. आर्टिफिशिअल इंटेलिजन्सवर आधारित मोबाईल अॅप्स वापरून कुणाच्याही आवाजात काहीही रेकॉर्ड करता येतं किंवा कोणत्याही व्हिडिओला कुणाचाही चेहरा चिकटवता येतो. घडवू पाहत असलेला तणाव किती तीव्र हवा, हे समाजकंटक आधीच ठरवू शकतात, असा काळ फार दूर नाही. हव्या त्या प्रकारचे व्हिडिओ तयार करून ते पसरवले जाऊ शकतात आणि हवा तो राजकीय-सामाजिक दुष्परिणाम घडवून आणता येऊ शकतो, असं तंत्रज्ञान मोबाईलवरही फुकटात उपलब्ध होऊ शकतं आहे.

त्याची जाणीव वरील तिन्ही घटकांना आहे का हा प्रश्न कोल्हापूरच्या निमित्तानं उपस्थित झाला आहे. आकाशात ढग किती, कधी येतील हे जवळपास अचूकपणे सांगणारं हवामानशास्त्र विकसित झालं; पण धोका दर्शवणाऱ्या घटना डोळ्यांसमोर घडत असूनही आणि समाजमाध्यमांवर पसरत असूनही ‘दंगा होऊ शकतो’ याचा अंदाज शासन-प्रशासन आणि पोलिसांना आला नाही. हे दुर्लक्ष होतं की सोय की अज्ञान, या खोलात जावं लागेलच; शिवाय भविष्यातल्या धोक्यांपासूनही सावध राहावं लागेल. अन्यथा, धार्मिक दंग्यांतून निर्माण होणारा हिंसाचार मोबाईलवरून उतरून घराच्या दारात उभा राहील...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT