मावळतं वर्ष जनरेटिव्ह प्री-ट्रेन्ड् ट्रान्स्फॉर्मर्स (जीपीटी) या तंत्रज्ञानाच्या प्रभावानं भारलेलं होतं. मशिन लर्निंग, आर्टिफिशिअल इंटेलिजन्स, जीपीटी, ऑटोमेशन हे परवलीचे शब्द होते. नवनवी अॅप्स तयार झाली. साधं छायाचित्र चकचकीत करून चेहरे बदलून घेता यायला लागलं. व्हिडिओंचं किंवा छायाचित्रांचं मॉर्फिंग हे एरवी कौशल्याचं काम. ते एका क्लिकवर होऊ लागलं. ‘जीपीटी’ चॅटच्या स्वरूपात आलं आणि आशयात आमूलाग्र बदलाची चाहूल लागली.
सत्य-असत्य यांच्यातल्या सीमा साफ धुऊन काढणारं तंत्रज्ञान मोबाईलवर येऊ लागलं. रशिया-युक्रेन यांच्या युद्धानं तंत्रज्ञानाचं संहारक, विदारक स्वरूप पुनःपुन्हा जगाला दाखवलं आणि त्याच वेळी समाजमाध्यमांमधून युक्रेनियन नागरिकांनी त्यांची बाजू आक्रमकपणे वापरून तंत्रज्ञानाचंच दुसरंही रूप दाखवून दिलं. इस्राईल-हमास संघर्षातही तंत्रज्ञान मध्यवर्ती भूमिकेत राहिलं.
रोजच्या जगण्यातलं डिजिटायझेशन वाढतं ठेवणारं हे वर्ष होतं. नाकारण्याचा पर्याय अधिकाधिक संकुचित होण्याची ही सुरुवात आहे. तंत्रज्ञान नाकारणं हा शहाणपणा नव्हे. तथापि, कोणतं तंत्रज्ञान कोणत्या कारणासाठी स्वीकारतोय याचा सारासार विचार न होऊ देता पर्याय संकुचित होत आहेत.
तंत्रज्ञानाबद्दलची साशंकता हा मानवी स्वभाव. नावीन्याबद्दलची उत्सुकता असली तरी ती स्वीकारताना संभ्रम राहणं हा मानवी गुण. या स्वभावाला आणि गुणाला जागत आपण सारे नव्या प्रकारच्या तंत्रज्ञानांना सामोरे जात आहोत. आपल्या भविष्याबद्दलची हुरहूर मनात घेऊन हा प्रवास सुरू आहे.
पुढच्या जगाची चाहूल...
इंटरनेट, मोबाईल, जीपीटी, आर्टिफिशिअल इंटेलिजन्स हे सारे या प्रवासातले टप्पे आहेत. गेल्या दोन दशकांमधली वाटचाल पाहिली तर, संवादविकासाच्या एका नव्या वळणावर आपण उभे आहोत हे स्पष्ट दिसतं. या वळणानंतरचा टप्पा कुठला याबद्दल संदिग्धता आहे. संदिग्धतेच्या पडद्यापलीकडं पाहण्याचा प्रयत्न वर्षभर ‘चाहूलखुणा’ या सदरातून करण्यात आला. आजपर्यंत काय घडलं हे समजून घेत घेत पुढं काय घडू शकतं याचा अंदाज बांधण्याचा हा प्रयोग.
तंत्रज्ञान आपल्या आसपास असतं. मोटारी बनवणं हे तंत्रज्ञान आणि घरातलं पाणी आणखी स्वच्छ, सुरक्षित करणारा फिल्टर हेही तंत्रज्ञान. आवाज न करता धावणारी ई-व्हेईकल म्हणजे तंत्रज्ञान आणि एकापाठोपाठ एक सुरू-बंद होणारे वाहतूकनियंत्रक सिग्नल हेही तंत्रज्ञानच. गेल्या दशकभरात या साऱ्या तंत्रज्ञानांमध्ये डिजिटल घटक येऊ लागला आणि या साऱ्यांचं केंद्रीकरण होऊ लागलं.
केंद्रीकरणातून निर्माण होणारं उत्पादन अधिक उपयोगी ठरू लागलं. उदाहरणार्थ : पेट्रोल-डिझेलच्या मोटारी ई-मोटारींमध्ये रूपांतरित होऊ लागल्या. मोटारी सेमीकंडक्टरद्वारे अधिक सेवा देणाऱ्या ठरू लागल्या. वेग, सरासरी इंधनवापर यापलीकडे जग गेलं. रेडिओ, संगीत वगैरे मामुली ठरतील, अशा नव्या सेवा मोटारींमध्ये आल्या. नकाशांद्वारे अंतर समजू लागलं. वाहतूककोंडी दिसू लागली.
अगदी पुढच्या चौकातला सिग्नल ओलांडला तर त्याच्या पुढच्या चौकातला किती सेकंदांत हिरवा होईल, हेही समजण्यापर्यंत तंत्रज्ञान पोहोचतं आहे. याच वर्षी भारत सरकारच्या स्टार्टअप विभागानं ‘कार-अॅज-अ-सर्व्हिस’ या नावानं स्पर्धा आयोजित केली, तेव्हा सादर झालेल्या नावीन्यपूर्ण संकल्पना पुढच्या जगाची चाहूल देणाऱ्या होत्या.
ई-व्हेईकल ही फक्त सुरुवात आहे. डिजिटली जोडली गेलेली हायड्रोजनवर धावणारी मोटार पुढच्या दशकभराचं आकर्षण असणार आहे. स्वच्छ इंधनाकडे हा बदल नेतो आहे.
एक उत्पादन...अनेक सेवा
नवी स्वप्नं घेऊन तंत्रज्ञानाकडे पाहणारे स्टार्टअप आता स्थिरावत आहेत. सन २०१५ ते २०२२ पर्यंत स्टार्टअपची मोठी लाट भारतात होती. या लाटेतून अनेक नव्या कंपन्या उदयाला आल्या. बऱ्याचशा बुडाल्या. स्टार्टअपबद्दलचा उत्साह कमी झालेला नाही. मात्र, त्यामधली गुंतवणूक अधिक सावधपणे आणि गंभीरपणे होते आहे. येत्या वर्षात हे गांभीर्य वाढत जाईल आणि स्टार्टअप हा हौशी व्यवसाय न राहता त्याला व्यावसायिक स्वरूप येईल.
सर्वसाधारण स्थिरावलेले उद्योग ज्या गोष्टी करू धजावत नाहीत त्या करण्याचं काम स्टार्टअप करतं. त्यामुळे, त्यात नावीन्य असतं. उत्साह असतो. पैसाही पाण्यासारखा वाहतो. नव्या वर्षात या वाहण्याला आवर घातला जाईल असं नाही. खर्चाबरोबरच उत्पन्नाकडे स्टार्टअपचं जग अधिक जोमानं वळेल असं दिसत आहे. त्याचे काही परिणाम स्वाभाविक आहेत.
उदाहरणार्थ : स्टार्टअप बाजारपेठेतल्या खऱ्या गरजा पूर्ण करणारं आहे का, तसंच उत्पादनाचा दर्जा, बाजारपेठेतली मागणी, कर्मचाऱ्यांची क्षमता, नावीन्यपूर्ण संकल्पना स्वीकारण्याची त्यांची तयारी असे अनेक घटक येत्या वर्षात स्टार्टअपसोबत चर्चेत येतील. स्टार्टअप ते व्यावसायिक उद्योग हा प्रवास अधिक जलद होईल.
डिजिटायझेशनमुळे सेवाक्षेत्रांचा विस्तार होण्याच्या कालखंडात आपण आहोत. एक उत्पादन आणि अनेक सेवा अशी रचना डिजिटायझेनमुळे नवे आकार घेत राहील. आपण मोटारींचं उदाहरण पाहिलं. संवादासाठीच्या मोबाईलचं उदाहरण हाताशी आहेच. स्मार्ट टीव्ही घरी रुळले आहेत. अशा अनेक उत्पादनांमधलं डिजिटायझेशन नव्या वर्षात आकार घेत राहील. नोकरी-व्यवसायाच्या ठिकाणी अशी उत्पादनं हाताळणं, त्यांचं काम शिकणं आणि त्यांची उपयुक्तता पूर्णांशानं वापरात आणणं हे आव्हान असणार आहे.
आरोग्यक्षेत्रात अशा बदलांना गेल्या पाच वर्षांत वेग आला आहे. रुग्णालयांमध्ये देता येणारी सारी सेवा घरीच मिळवता आली तर यंत्रणांवरचा मोठा ताण कमी होईल. त्यादृष्टीनं संशोधन, त्याचं व्यावसायिक उपयोगात रूपांतर असा प्रवास सुरू आहे. अशा वेळी रुग्णालयातला कर्मचारी, अधिकारी म्हणून केवळ दरवाजातून आत आलेला रुग्णच नव्हे तर, घरी असलेला रुग्णही तितकाच महत्त्वाचा राहणार आहे. अतिदक्षता विभागासारखा प्रकार उद्या घरांमध्ये उभा केला जायला सुरुवात झाली तर आश्चर्य वाटायला नको.
तंत्रज्ञानातला ‘माणूसपणा’...
डिजिटायझेशनमुळे सारी उपकरणं परस्परांशी जोडलेली आहेत. उपकरणं इंटरनेटद्वारे हाताळता येत आहेत. व्हिडिओद्वारे रुग्णांवर लक्ष ठेवता येत आहे. खोलीमधल्या स्वच्छतेची तपासणी उपकरणं करत आहेत. रुग्णाची देखरेख दूरस्थ पद्धतीनं करता येईल अशी सारी व्यवस्था आज तयार आहे. अत्यवस्थ रुग्ण वगळता इतरांसाठी उद्या ही व्यवस्था महत्त्वाची ठरणार आहे.
आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (एआय) सगळ्या क्षेत्रांत हात-पाय पसरेल असं आपण वर्षभर वाचत आलो आहोत. मोबाईलवरची अॅप्स ही गंमत राहिलेली नाही. आर्थिक, व्यावसायिक, व्यावहारिक उपयोगांमध्ये मोबाईल अपरिहार्य आहे. आगामी वर्षांत मोबाईलवर एआय अॅप्लिकेशन्सची संख्या वाढत जाईल. उदाहरणार्थ : तुमची रोजची कामं नोंदवून ठेवण्याची डायरी एआयमध्ये रूपांतरित होईल.
तुमची उत्पादनक्षमता किती, किती टक्के गोष्टी तुम्ही ठरवून करता, तुमचा वेळ कुठं जातो इत्यादी माहिती एआय नोंदवून ठेवेल आणि तुम्हाला तुमचाच वेगळा चेहरा दिसू लागेल. या साऱ्या बदलांचा झपाटा मोठा आहे. तंत्रज्ञानातले हे बदल स्वीकारण्याचा आग्रह सर्व स्तरांतून होत राहणार. सरकार नावाच्या यंत्रणेला तंत्रज्ञानातल्या बदलांची सर्वात शेवटी चाहूल लागण्याचा एक काळ होता.
जगभरातली आजची सरकार नावाची व्यवस्था स्वतःला हव्या त्या तंत्रज्ञानासाठी आग्रही आहेच; शिवाय भविष्यातल्या तंत्रज्ञानाची चाहूल घेऊन त्यानुसार स्वतःच्या व्यवस्थेत बदल करणारीही आहे. न्यायालयांपासून ते रोजंदारीवरच्या कामापर्यंत सगळीकडे तंत्रज्ञानाचा आग्रह धरला जाणार आहे. या तंत्रज्ञानातला माणूसपणा शोधण्याची जबाबदारी पुढच्या वर्षातल्या आपल्या कृतींवर आहे. तंत्रज्ञान स्वीकारताना त्यामागचा मानवी चेहरा हरवू न देण्यासाठी झगडण्यात आगामी वर्ष महत्त्वाचं ठरेल.
(हे साप्ताहिक सदर आता समाप्त होत आहे.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.