'तुम्ही नियमित रोजनिशी लिहिताय. तुमची ती अत्यंत खासगी बाब आहे. एखाद्या दिवशी तुम्हाला त्यातला एक किस्सा मित्राला किंवा मैत्रिणीला दाखवायचाय. डायरी त्यांच्याकडं देत त्यांना तुम्ही सांगताय, की अमूक पान क्रमांक वाच..त्यांनी तेवढंच पान वाचलं आणि तुम्हाला डायरी परत दिली...आता कल्पना करा, की ही डायरी तुमच्या नकळत सारीच्या सारी डायरी कॉपी झालीय.
तुमच्या माघारी त्या डायरीतलं प्रत्येक पान वाचलं जातंय. अमूक पानाच्या मागं-पुढं तुम्ही तुमच्या मनातलं लिहिलेलं सारं वाचलं जातंय...मेंदूच्या लहरींचा अभ्यास करून माणसाच्या मनातले विचार शोधणं म्हणजे अमूक पान वाचणं आणि त्यावर आधारित अल्गॉरिदम म्हणजे सारी डायरी वाचणं...कल्पना करा, तुमची डायरी सरकार किंवा खासगी कंपनीच्या ताब्यात आहे...''
विचार नियंत्रण दृष्टीपथात
इराणी-अमेरिकी लेखिका नीता फरहानी यांच्या ‘ द बॅटल फॉर युअर ब्रेनः डिफेंडिंग द राईट टू थिंक फ्रीली इन द एज ऑफ न्युरोटेक्नॉलॉजी'' या सध्या गाजत असलेल्या पुस्तकातलं हे वर्णन. नीता फरहानी या मज्जासंस्थेच्या, मेंदूच्या अभ्यासक आहेत. त्याहूनही अधिक म्हणजे तंत्रज्ञानाचा मानवी मेंदूवर होणारा परिणाम, मानवी जगण्यातलं खासगीपणाचं महत्व, या खासगीकरणाचा व्यापार हा त्यांचा अभ्यासाचा विषय. त्यामुळंच, त्या पुस्तकाचं शीर्षकच ‘तुमच्या मेंदूसाठीची लढाई ’असं त्या निवडतात.
माणसाला विचार करण्याचं स्वातंत्र्य अबाधित राखावं लागेल; कारण तंत्रज्ञान फार विलक्षण वेगानं विचारांना नियंत्रित करतं आहे, असा इशारा त्या देतात. फरहानी यांचं विवेचन हॉलिवूडमधला धडाकेबाज सायन्स फिक्शन वाटू शकतं. तथापि, न्युरोटेक्नॉलॉजीचा झपाट्यानं होणारा विकास, खासगी कंपन्यांची नफेखोरी आणि सरकारी यंत्रणांचंव'' विचार नियंत्रणा'' चं स्वप्नं यांच्यात ताळमेळ घातला, तर विचार करता येण्यासाठीही झगडा द्यावा लागेल, अशी परिस्थिती अशक्य नाही हे लक्षात येतं.
स्वातंत्र्याचा शेवटचा किल्ला
फरहानी म्हणतात, ज्या न्युरोसायन्सनं आपल्याला आपल्याच अंतरंगात डोकावता आलं, तेच विज्ञान कंपन्या, सरकार आणि ज्यांना आपल्या मनाबद्दल देणं - घेणं नाही अशांनाही अंतरंगात डोकावू देतं आहे. अमेरिकी राज्यघटना, राज्य-केंद्रीय कायदे किंवा आंतरराष्ट्रीय करार आपल्याच मेंदूचा आपल्याला प्राथमिक अधिकार देताहेत. पारदर्शी मेंदूकडं आपण झपाट्यानं प्रवास करतो आहोत.
लगेच उद्या नव्हे, पण लवकरच शास्त्रज्ञ, डॉक्टर्स, सरकार आणि कंपन्या आपल्या मेंदूमध्ये आणि मनामध्ये हवं तेव्हा डोकावू शकतील. स्वातंत्र्याचा शेवटचा किल्ला, आपले मानसिक खासगीपण, ढासळून पडेल, अशा भविष्याकडं आपण वाटचाल करतो आहोत.
अल्गॉरिदमकडे वाटचाल
फरहानी यांचं पुस्तक वैद्यकशास्त्र, तंत्रज्ञान, नफेखोरी आणि सरकारी धोरणांवर भाष्य करणारं आहे. वरवर ते एकांगी वाटण्याचा धोका आहे; तथापि तंत्रज्ञानाचं मानवी जगण्यातलं वाढतं अवकाश पाहता त्यांचा इशारा गांभीर्यानं घेण्याची गरज आहे. हातातला मोबाईल प्रत्येक क्षणी सोबत आहे.
या मोबाईलवर केलेलं प्रत्येक कृत्य नोंदवलं जात आहे. प्रत्येक व्यक्तीच्या बारीकसारीक हालचालींची काळजीपूर्वक नोंद होतं आहे. जन्मापासून छायाचित्रांचं डिजिटायझेशन होत आहे. हावभावांची रेखा न् रेखा पिक्सलमध्ये रुपांतरित होते आहे.
आर्थिक नोंदींची तर चर्चाच नको, इतक्या तपशीलात त्याची दखल घेतली जात आहे. वैद्यकीय कारणांसाठी अनेक स्वरूपाच्या नोंदी आपण सारेच करतो आहोत. या साऱ्या माहितीवर (डेटा) प्रक्रिया करत राहिलं, तर सामुहिक पातळीवर माणसाच्या स्वभावाचा सर्वसाधारण अल्गॉरिदम ही अशक्यप्राय बाब राहिलेली नाही. फरहानी म्हणतात, त्याप्रमाणं एखाद्या पानावरची माहिती वाचणं आणि अख्खी डायरी वाचणं यातला फरक म्हणजे आपली एखादी नोंद होणारी क्रिया आणि सततच्या नोंदी.
जागतिक आर्थिक मंचानं (वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम) या आठवड्यात ग्राहकाच्या गोपनीयतेबद्दलचं तंत्रज्ञान आणखी कसं सुरक्षित करता येईल, याबद्दल लेख प्रसिद्ध केलाय. त्यामध्ये गोपनीयतेचा आग्रह धरतानाच माहिती किंवा डेटा सामुहिकरित्या संस्था-संघटनांना वापरता आला पाहिजे, असंही विधान या लेखात आहे.
त्यामध्ये आरोग्य, आर्थिक, सामाजिक कल्याण, आर्थिक विकास, गुन्हेगारी प्रतिबंधक, शिक्षण आणि ग्राहक संरक्षण या विषयांचा डेटा संस्थांना सामुहिकरित्या वापरता आला पाहिजे, असं लेखात म्हटलंय. असं केल्यानं अनेक क्षेत्रांना लाभ होईल ही भूमिका त्यामागं आहे. असा डेटा वापरायला देण्यापूर्वी गोपनीयतेसाठीच्या तंत्रज्ञानात सामुहिकरित्या सुधारणा केली पाहिजे, असाही मुद्दा इथं मांडलाय.
अंधारात आपलं चाचपडणं
हा मंच प्रामुख्यानं व्यावसायिकांच्या, उद्योगांच्या लाभासाठी काम करतो. नव्या सूचना, सल्ला अथवा तंत्रज्ञानाचाही उद्योगांच्या वाढीच्या अनुषंगानं मंच विचार करतो. डेटाच्या गोपनीयतेचं तंत्रज्ञान विकसित होण्यातली सर्वात मोठी पायरी म्हणजे व्यक्तिगत ओळख नष्ट करून अन्य साऱ्या बाबींचा समावेश डेटामध्ये करणं. हा प्रयोग जगभरात अनेक ठिकाणी सुरू आहे.
विशेषतः युरोपात त्यातही ब्रिटननं त्याबद्दल संसदीय पातळीवर समित्या स्थापन करून काम सुरू केलं आहे. भारतात कोरोना महासाथीच्या काळात डेटाच्या गोपनीयतेची आणि नागरिकांच्या खासगीपणाच्या अधिकाराची चर्चा झाली. त्यानंतर हा विषय आपल्याकडं अधूनमधून डोकावून जातो. वेगवेगळ्या कंपन्या, सरकार हजारो मार्गांनी प्रत्येक क्षणी गोळा करत असलेली माहिती, आपला डेटा कोण वापरतं याबद्दल आपण अंधारात आहोत.
गोपनीयतेचं भविष्य
इंटरनेट, मोबाईल रूजत असतानाच्या काळात १९९८ मध्ये अमेरिकेत ग्राहकांच्या गोपनीयतेचं भविष्य काय असेल, असं सर्वेक्षण केलं गेलं. त्याचा अभ्यास आजही इंटरनेटवर सविस्तर उपलब्ध आहे. तोपर्यंत तिथंही गोपनीयेतबद्दल दोन मतप्रवाह होते. खासगीपणा, गोपनीयता हा एकविसाव्या शतकातल्या पहिल्या दशकात कळीचा मुद्दा ठरेल, जसा कामाच्या ठिकाणची परिस्थिती हा विसाव्या शतकाच्या सुरुवातीचा प्रमुख मुद्दा होता असं मानणारा एक गट होता.
गोपनीयता हा मुद्दाच नाही कारण ग्राहकांना त्यामध्ये रस नाही असं मानणारा दुसरा गट होता. सर्वेक्षणात समोर आलं, की तेव्हा लोकांना टेलिमार्केटिंग त्रासदायक वाटू लागलं होतं आणि ते त्यांच्या खासगी आयुष्यात डोकावणं वाटत होतं. आज आपण २०२३ च्या शेवटाकडं आलो आहोत. पंचवीस वर्षांच्या काळात खासगी आयुष्य, गोपनीयता याबद्दलची मतं आता तितकी प्रगल्भतेकडं चालली आहेत. ती प्रौढ झाली नसली, तरी किमान त्यादृष्टीनं वाटचाल होते आहे.
येत्या दशकभरात आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) चा प्रवेश सर्व क्षेत्रांमध्ये होऊ घातलेला आहे. अगदी सुरुवातीला उल्लेख केला, तसा तो न्युरोटेक्नॉलॉजीतही आहे. आपलं भावविश्व कुणाच्या नियंत्रणाखाली द्यायचं नसेल, तर आपली माहिती, आपल्याबद्दलचा डेटा, आपलं आयुष्य याचं किती व्यापारीकरण होऊ द्यायचं, याबद्दलची स्पष्टता यायला लागेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.