Children Sakal
सप्तरंग

पालक म्हणून मी काय करू...?

तसं आता या उदाहरणाला शहरी-ग्रामीण अशा विभागणीत बसवणं अशक्य आहे. झालंय असं, की ही विभागणी भौतिक सुविधांबाबतीत कायम आहे आणि तंत्रज्ञानाच्या पातळीवर पुसट होत गेली आहे.

सम्राट फडणीस samrat.phadnis@esakal.com

तसं आता या उदाहरणाला शहरी-ग्रामीण अशा विभागणीत बसवणं अशक्य आहे. झालंय असं, की ही विभागणी भौतिक सुविधांबाबतीत कायम आहे आणि तंत्रज्ञानाच्या पातळीवर पुसट होत गेली आहे. म्हणजे इंटरनेटद्वारे जे जग शहरी घरांमध्ये शिरलं, तेच ग्रामीण घरांमध्येही. भले रस्ते, पाणी, वीज, शिक्षण, आरोग्य अशा मूलभूत सुविधांबाबत अद्याप दरी असेल; मात्र इंटरनेटवर दिसणाऱ्या जगात सारं काही समान चित्र बनतं आहे.

उदाहरण म्हणून ग्रामपंचायतीच्या हद्दीतलं घर घेऊ. शाळेतून परत आलेलं, बारा-चौदा वर्षे वयाचं पौगंडावस्थेत पोहोचलेलं मूल घरी आहे. हे मूल दहापैकी नऊ वेळा संध्याकाळी सातच्या सुमारास मोबाइलमध्ये डोळे लावून बसलेलं दिसेल. रात्रीचं जेवण होईपर्यंत ही अवस्था काही संपणार नाही. बहुतांश वेळा जेवल्यानंतरही...एरव्ही रात्री नऊच्या सुमारास पांघरूण घेऊन गाढ झोपी जाणारी गावं रात्री मोबाइलमध्ये डोळे गच्च खुपसून बसलेली दिसतील. घर जसं अपवाद नाही; तसं गावचे पारही.

विद्यमान परिस्थितीही धूसर

बरं, मोबाइल नको हे शाळेत कानीकपाळी ओरडून सांगायचं, तर कोरोना महासाथीची दोन वर्षे सारा अभ्यासक्रम मोबाइलवर शिकवला गेलेला. मुलं गेमिंगसाठी, मनोरंजनासाठीच मोबाइल वापरतात म्हणावं, तर मग २०२०, २०२१ मध्ये अभ्यासासाठीच तर मोबाइल वापरला गेला होता. मोबाइल आणि एकूण तंत्रज्ञान वापराबाबत विशेषतः सहा ते पंधरा वर्षे वयाच्या मुला-मुलींच्या बहुतांश पालकांच्या मनामध्ये विलक्षण गोंधळ आहे. हा गोंधळ कधी तक्रारीच्या स्वरूपात व्यक्त होतो. कधी घरात धाकधपटशा दाखवून व्यक्त होतो. कधी नुसतीच हतबलता व्यक्त केली जाते.

मुलांच्या हातात तंत्रज्ञान द्यावं की नको, दिलं आणि मुलं तंत्रज्ञानाच्या आहारी गेली तर काय करायचं, नाही दिलं आणि मागं पडली तर काय करायचं अशा कात्रीत पालक मंडळी सदैव अडकलेली आहेत. ज्या काळातून समाज जातो आहे, त्या काळाच्या पुढं पाहिलं, तर आता किंचितशा लोकसंख्येकडं असलेलं नवं तंत्रज्ञान उद्या आणखी सोपं होऊन कोट्यवधी हातांमध्ये जाणार आहे.

आज जी मुलं आहेत, ती पिढी उद्याचे पालक असणार आहेत. अशा कालखंडात तंत्रज्ञानाकडं बघावं कसं हा घरोघरीचा गंभीर प्रश्न होऊन बसला आहे. केवळ शिक्षण क्षेत्रापुरता हा प्रश्न मर्यादित राहिलेला नाही. समाजशास्त्रज्ञ, तंत्रज्ञ, मानसोपचारतज्ज्ञ, वैद्यक अशा अनेकविध घटकांसह जागतिक स्तरावर संस्थात्मक पातळीवरही हा काळजीचा विषय आहे. पुढचं नेमकं काही दिसत नाही आणि विद्यमान परिस्थितीही धूसर, असा हा गोंधळ आहे.

तंत्रज्ञानानं आणलेलं सपाटीकरण

‘शाळकरी वयात गॅजेट्स वापरण्याने मुलांच्या सांस्कृतिक मूल्यांवर मोठा परिणाम होतो. गॅजेट्सचं व्यसन लागलेल्या मुलांमध्ये सामाजिक संवादाची उणीव भासू लागते. विकासाच्या या टप्प्यावर ही मुले एकटी राहू इच्छितात. त्यांना घरी एकट्यानं बसून गेम खेळणं अधिक आवडतं. घराबाहेर पडून मुलांमध्ये मिसळून राहणं त्यांना आवडत नाही...’ हे वर्णन एका संशोधनपर निबंधातलं आहे. हा निबंध जवळपास प्रत्येक समूहाला लागू पडेल.

निबंध आहे इंडोनेशियातला. तिथल्या मुस्लिम समाजातल्या एका विशिष्ट समुदायातल्या मुलांबद्दलचा. त्याचे निष्कर्ष वाचताना तो इंडोनेशियातच नव्हे, तर प्रत्येक ठिकाणी जसाच्या तसा कॉपी-पेस्ट करून वापरता येईल, अशी आजची परिस्थिती आहे.

तंत्रज्ञानानं, विशेषतः मोबाइलद्वारे इंटरनेट प्रत्येक गावात-गल्लीत आणि घरात पोहोचत असताना एकप्रकारचं सपाटीकरण दिसतं आहे. हे सपाटीकरण अनुभवाच्या पातळीवरचं आहे. उदाहरणार्थः एखादा मोबाइल गेम लाँच होतो आणि कोट्यवधी मोबाइलवर पोहोचतो. त्या गेमचं कोट्यवधी लोकांना अक्षरशः व्यसन लागतं. त्यांना हा गेम समान अनुभव मिळवून देतो. या अनुभवाला भौगोलिक सीमा नसतात. सांस्कृतिक बंध नसतात आणि नैतिक बंधनंही.

एखादी वेबसीरिज रातोरात कोट्यवधी प्रेक्षकांना समान अनुभव देतो आणि एक ट्रेन्ड जन्माला येतो. अवघ्या दहा वर्षांपूर्वी असा ट्रेन्ड, सामूहिक कल निर्माण करणं कौशल्याचं आणि जिकिरीचं काम होतं. आज ते काम सहजासहजी होतं आहे. हे कल समाजात तत्कालीन स्वरूपाचे बदल घडवतात. बदलाचं स्वरूप कधी भाषिक असतं. कधी पेहरावाचं असतं.

कधी पारंपरिक समजुतींना धक्का देणारं तर कधी कवटाळणारं असतं. ‘हम आपकें हैं कौन’सारख्या चित्रपटाचं शहरी ते ग्रामीण भागापर्यंत झिरपत जाणं आणि त्यातून लग्नसमारंभाचा एक नवा कल निर्माण होणं यासाठी वर्षभराचा कालावधी लागला होता. मोबाइलच्या आजच्या काळात हा कल रातोरात येतो आणि त्याची जागा नवा कलही तितक्याच जलदतेनं घेतो.

संपूर्णतः अनोळखी मूल्यं झपाट्यानं येतात आणि ती संस्कृतीचा तत्कालीन भागही बनून जातात. शाळकरी मुलांबाबत पालकांना काळजी वाटत असते, ती अशा सांस्कृतिक मूल्यांच्या लाटांची. खरंतर मूल्यं रुजण्यासाठी दीर्घ काळ लागतो. तथापि, तंत्रज्ञानाच्या तीव्र रेट्यांमध्ये मूल्यांची अदलाबदलही वेगानं होऊ शकते का, हा समाजशास्त्रीयदृष्ट्या सर्वांत कळीचा मुद्दा आहे.

आधी कुटुंबावर आणि त्यातून मुलांवर तंत्रज्ञानाच्या वापराचे परिणाम होत आहेत, याबद्दल शंका नाही. हे परिणाम नकारात्मकच आहेत, असं मानण्याचंही कारण नाही. तंत्रज्ञान वापरातले दोष दूर करत राहणं अत्यंत आवश्यक आहे.

माहितीची समृद्धता ते निद्रानाश

संयुक्त राष्ट्रसंघानं चार वर्षांपूर्वी विशेषतः विकसनशील देशांमधल्या कुटुंबांवर तंत्रज्ञान वापराचा काय परिणाम होतोय, याचा अभ्यास केला. त्यात सर्वांत पहिला परिणाम घरकामातून स्त्रीच्या मुक्तीचा नोंदवला होता. तंत्रज्ञानामुळं कुटुंबातल्या स्त्रीची सतत घरकामाला जुंपून घेण्यापासून मुक्ती होत असल्याचं या अभ्यासात मांडलं होतं. ग्रामीण भागात तंत्रज्ञानामुळं शेतकऱ्याला अधिक उत्पादनासाठी मदत होत असल्याचं निरीक्षण नोंदवलं होतं.

त्याचबरोबर आजच्या समाजातलं कुटुंब तंत्रज्ञानामुळं माहितीनं अधिक समृद्ध होत असल्याचंही म्हटलं होतं. अभ्यासासाठी विकसनशील देशांमधला ग्रामीण भाग अभ्यासकांनी प्राधान्यानं विचारात घेतला होता. मुलांच्या शिक्षणात तंत्रज्ञानाचा वाटा वाढत असल्याचंही संयुक्त राष्ट्रसंघाचं मत होतं. एकीकडं तंत्रज्ञानाची ही सकारात्मक बाजू आहे.

दुसरीकडं, चारच वर्षांपूर्वी ‘ऑर्गनायझेशन फॉर इकॉनॉमिक को-ऑपरेशन अँड डेव्हलपमेंट’ (ओईसीडी) या जागतिक पातळीवरच्या संघटनेनं मुलांवर तंत्रज्ञानातून होणाऱ्या दुष्परिणामांचा अभ्यासही मांडलेला. त्यामध्ये निद्रानाशाच्या विकारापासून ते सामाजिक वर्तणुकीवर होणाऱ्या गंभीर परिणामांबद्दल ‘ओईसीडी’नं चर्चा केली होती.

पालक म्हणून जबाबदारी

संयुक्त राष्ट्रसंघ, ओईसीडी या आणि अशा अनेक जागतिक संस्था, शैक्षणिक संस्था, अभ्यासक तंत्रज्ञान वापराचा मुलांवर होणारा परिणाम अभ्यासत आहेत. या अभ्यासातून समोर येणाऱ्या निष्कर्षांमध्ये एकच समान धागा आहे. तो म्हणजे, पालकांनी विशेष वेळ देऊन, प्रयत्नपूर्वक या वापरावर नियंत्रण ठेवलं पाहिजे. तंत्रज्ञान नाकारण्यानं प्रगती खुंटेल हे निश्चित. ते नियंत्रणात ठेवून वापरणं मुलांच्या प्रगतीसाठी पूरक ठरतं, असं सारे अभ्यास अहवाल सांगतात.

अर्थातच, त्यासाठी आधी पालकांना तंत्रज्ञानात गती मिळवावी लागेल. ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’च्या जमान्यात वावरताना ‘मला हे काही कळत नाही, आमच्या मुलाला कळतं,’ हा भाबडेपणा चालणारा नाही. ‘मला कळतं आणि त्यातलं जे आवश्यक ते मुलाला आम्ही सांगतो,’ हा पालकांचा दृष्टिकोन असावा लागेल. पालक तंत्रज्ञानापासून एक पाऊल मागं राहिले, तर मूल दहा पावलं पुढं निघून गेलेलं असू शकतं, इतका तंत्रज्ञानाला वेग आहे, हे समजून घेतलं पाहिजे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पोस्टल मतांच्या मोजणीला सुरुवात; हडपसर मधून चेतन तुपे आघाडीवर

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: ज्योती गायकवाड आघाडीवर

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

IND vs AUS: जसप्रीत बुमराहने दिवसाच्या पहिल्याच चेंडूवर घेतली विकेट अन् केला १७ वर्षात कोणाला न जमलेला पराक्रम

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

SCROLL FOR NEXT