adhantar andharat books sakal
सप्तरंग

अधांतर अंधारातील कवीची झुंज

कवी महेश केळुसकर यांच्या ‘अधांतर अंधारात’ या संग्रहातील प्रत्येक कवितेमागे एक भूमिका आहे. स्पष्ट, सडेतोड, प्रामाणिक आणि आवाहन करणारी. ती प्रचारकी नाही.

अवतरण टीम

- समरेंद्र निंबाळकर

कवी महेश केळुसकर यांच्या ‘अधांतर अंधारात’ या संग्रहातील प्रत्येक कवितेमागे एक भूमिका आहे. स्पष्ट, सडेतोड, प्रामाणिक आणि आवाहन करणारी. ती प्रचारकी नाही. बदलत्या वास्तवाचे भीषण तुकडे केळुसकरांनी या कवितांमधून पकडले आहेत. कवी स्वतः भवतालाशी आणि जगण्यातल्या संघर्षात, दोन हात करतो आहे. प्रवाहाविरु जाऊन!

‘सिर्फ हंगामा खडा करना मेरा मकसद नही है, मेरी कोशिश ये है की ये सुरत बदलनी चाहिये...’ दुष्यंतकुमार यांच्या ओळींचा आठव ‘अधांतर अंधारात’ हा महेश केळुसकर यांचा कवितासंग्रह वाचताना येतो. या कवितांचे आव्हान तेच आहे, जे बिघडलेय ते निर्भीडपणे दाखवायचे आणि ते बदलले पाहिजे, म्हणून आंतरिक हाक वाचकाला/समाजाला द्यायची. प्रत्येक कवितेमागे एक भूमिका आहे. स्पष्ट, सडेतोड, प्रामाणिक आणि आवाहन करणारी. ती प्रचारकी नाही.

‘They are the Unacknowledged legislators of the world’ असे प्रख्यात इंग्रजी कवी शेली, स्थितीगतीचे वास्तव वस्तुनिष्ठ दर्शन घडवणाऱ्या कवींबद्दल म्हणून गेलाय. केळुसकर यांची कविता याच मूलगामी परिवर्तनशील जागतिक कविकुळाशी नाते सांगणारी आहे. ‘एक तुतारी द्या मज आणुनी... फुंकिन जी मी स्वप्राणाने’ हा केशवसुत यांचा बाणा जपलाय या कवितेत. कशासाठी?

तर, ‘प्राप्त काल हा विशाल भूधर, सुंदर लेणी तयात खोदा’ ही या कवितांच्या लढण्याचीही प्रेरणा आहे! ‘अधांतर अंधारात’ हे शीर्षक मुळात खूप विचार करायला लावणारे आहे. अधांतर अंधारात कोण आहेत? असा प्रश्न काही विचारू शकतील. ‘आहे रे’ आणि ‘नाही रे’ वर्गातील भीषण दरी ज्यांनी पाहिली आहे त्यांना अधांतर अंधारात कोण आहेत, हे सांगावे लागणार नाही.

व्यवस्थेचे फायदे मिळवून सुशेगाद असलेल्यांना कदाचित अंधाराचा प्रत्यय येणारही नाही. ते म्हणतील, सेन्सेक्स वाढतोय, समृद्ध रस्ते, महामार्ग तयार होत आहेत, परदेशी गाड्यांची वेगवेगळी डिझाईन येत आहेत, ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था होत आहे वगैरे वगैरे... काय उगाचच अंधार अंधार म्हणून ओरडता?

...पण जागतिकीकरणानंतर आजचे वास्तव काय आहे? पिचलेल्या, शोषण झालेल्या समाजाचे प्रश्न म्हणून शिल्लक आहेतच ना? त्यांचे स्वरूप बदलले आहे. पारंपरिक मूल्य चौकट बदलून जात आहे. लाईफचा इव्हेंट आणि जगण्याचे सेलिब्रेशन यापलीकडे काही अर्थ उरलेत का? खूप खा, खूप फिरा, खूप प्या, खूप वस्तू विकत घ्या, खूप ‘एसआयपी’ वाढवा, खूप मोठे घर घ्या किंवा मुलांना अमेरिकेत पाठवण्यायोग्य करा आणि इकडे गुमनामित मरून जा...

या सगळ्या वेगात आणि धबडग्यात स्वतःचे आणि भवतालाचे भान आहे का आपल्याला? असे अंगावर येणारे प्रश्न ही कविता विचारते. बदलत्या वास्तवाचे भीषण तुकडे या कवितांमधून पकडले आहेत. समकालीन प्रश्न आणि त्यांचा सोलीव गाभा अलगद उचलण्याचे काम या कविता करतात. हादरवणारा भवताल कवीने ठायी ठायी कवितेत पेरलाय. बारुद पेरल्यासारखा.

कवीच्या मनात होणारे स्फोट, हा उद्रेकाचा लाव्हारस कवितेत घेऊन येतो तेव्हा हा संघर्ष फक्त एका वर्गापुरता किंवा शोषित वर्गाचा न राहता तो सर्वव्यापक होत जातो. दारिद्र्य, युद्धखोरी, सत्ता लालसा, नफेखोरी, पर्यावरणाचा नाश, चंगळवाद आणि मूल्यहीनता, धार्मिक तेढ, आत्मकेंद्रित जगणे या समस्या देश काल ओलांडून जातात या कवितेतून. या समकालीन संवेदना जेवढ्या लोकल आहेत तितक्याच ग्लोबलही. हेच या कवितेचे मोठे यश आहे.

काळाचे म्हणाल तर धार्मिक श्रद्धा वगैरेला ओलांडून या रचना लीलया पार जातात. मग ‘प्रिय येशू’ या कवितेत ती आर्तता अशी उमटते :

‘हे आकाशातल्या बापा मला क्षमा कर

तुला क्रूसावर चढवताना त्यांनी जे खिळे ठोकले

त्यातला एक मीच होतो एवढंच कन्फेशन द्यायचं होतं!’

कवी स्वतःला खिळा म्हणतोय. जो येशूच्या शारीर मृत्यूचे कारण बनला आहे. आत्मा विकलेले खिळे हेच संस्कृती खिळखिळे करण्याचे साधन असतात, हे भयंकर सत्य टोचणी लावून जाते.

पण मग या अंधारात कवीला उजेड कुठे दिसतो? याचा शोध याच संग्रहात घेतला जातो. कविमित्र कविवर्य अशोक नायगावकर यांना उद्देशून लिहिलेल्या कवितेत शेवटी कवी म्हणतो :

‘ही पणती येथे कोपऱ्यात एखादी

सांत्वनास नाही कोणी माझ्या गावा’

नायगावकर ज्या जीवनसन्मुखतेचा उच्चार करतात, ती कवीला आश्वासक वाटते. ज्या शब्दांमध्ये शाश्वत जीवन आहे, प्रेम आहे, दया आहे, संघर्ष आहे, परिवर्तनाची आस आहे, ते ते कवीला सहधर्मी वाटते. ‘सुरेखा’ ही सुरेखा पुणेकर यांच्यावरील व्यक्तिचित्रणात्मक कविता, कलाकाराची एकाकी घुसमट दर्शवणारी आहे. ही अस्वस्थ अवस्था आणि तिचे टोकदार स्वगत मुळातून वाचावे इतके प्रखर आणि प्रसरणशील झाले आहे.

कवितेची भाषा भाव व्यक्त करणारी अस्सल आहे. कोणताही बोटचेपेपणा अथवा गुळमुळीतपणा कुठेच जाणवत नाही. या कविता मुक्तशैलीत जरूर आहेत; पण त्यात एक आंतरिक लय आहे. नाद आहे. समूळ सादरीकरणाच्या या कविता आहेत. जागोजागी कवितेत केलेले भाषेचे, उच्चाराचे प्रयोग घुमत राहतात. घुमटातून आवाज आल्यासारखे निनादत राहतात. कोकणातला पिकलेला काटेरी फणस घमघमावा तसे वाटत राहते.

कवीकडून एका कार्यक्रमात यातील काही कविता ऐकल्या तेव्हाच याचा प्रत्यय आला होता. ही आगळीवेगळी ‘देशी’ कविता महेश केळुसकर यांनी स्वतःच्या आवाजात व शैलीत व्हिडीओ करून रसिकांना उपलब्ध करून द्यावी, अशी आग्रहाची मागणी करावीशी वाटते.

महेशजींना जेव्हा वीस-पंचवीस वर्षांपूर्वी बालगंधर्वला ‘पुणे फेस्टिवल’मध्ये किंवा १२ मार्चला ‘टिळक स्मारक’मध्ये ‘झिनझिनाट’ किंवा ‘रात्री बेरात्रीचे भास’ या कविता म्हणताना ऐकले तेव्हा आणि अगदी अलीकडे ‘अधांतर अंधारात’मधील कविता सादर करताना ऐकले तेव्हाही कवितेचे रसिक थरारून जाताना पाहिले आहेत. विंदा करंदीकरांसारखं अजब phonetics लाभलेला हा एक दुर्मिळ कवी आहे.

केळुसकर हे ‘कवितेच्या महाराष्ट्रात’ (हा त्यांचाच शब्द आहे) सुपरिचित आहेतच. १९८६ मध्ये त्यांचा ‘मोर’ हा संग्रह आला. त्यानंतर ‘पहारा’ हा राजकीय कवितासंग्रह १९९६ मध्ये आला. मग आणखी सात संग्रह २०२२ पर्यंत आले. जवळपास ४० वर्षे सातत्याने बहुपेडी कविता केळुसकर लिहीत आहेत, ही समीक्षकांनी दखल घेण्याची गोष्ट आहे.

११८ पानांच्या ‘शब्दालय’ प्रकाशन प्रकाशित या नव्या संग्रहाचे वैशिष्ट्य हे की इतक्या वर्षांनीदेखील कवीने त्याचा सच्चेपणा टिकवला आहे. तो या काळाशी, प्रश्र्नांशी सुसंगत आहे. कवी स्वतः भवतालाशी आणि जगण्यातल्या संघर्षात, दोन हात करतो आहे. प्रवाहाविरुद्ध जाऊन!

‘बुडती हे जन न देखवे डोळा’ हा जिता शब्द मांडण्याची तुकोबांची प्रेरणा, संग्रहाच्या पहिल्याच पानावर आविष्कृत होत जाते. हे निबीड... हे राकट... हे भीषण... हे दांभिक... हे अंगावर येणारे वर्तमान, हाच अधांतर अंधार आणि दाहक काळ! या काळ्या अंधारात... केळुसकरांच्या कविता आपला भेदक डोळा रोखून आपल्या समोर उभ्या आहेत.

samarnimbalkar@gmail.com

(लेखक कविता, ललित व कथा अशा साहित्यप्रकारांत लेखन करीत असतात.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT