नुसता आंब्यांच्या झाडांना मोहोर आलेला पाहून जर तुम्हीही माझ्यासारखेच खुश होत असाल, आणि तुमच्या चेहेऱ्यावर मस्त स्मितहास्य उमटत असेल तर हा लेख नक्कीच तुमच्यासाठी...
उन्हाळ्याची सुट्टी आणि आंब्यांची चाहूल आणि ओढ एकत्रच लागते...नुसते आंबा म्हटले तरी त्याची गोड चव जिभेवर रेंगाळत राहते आणि गोड गोड वास नाकात दरवळतो...माझ्या पाहणीत क्वचितच एखाद दुसरी व्यक्ती आली जिला आंबा आवडत नाही...प्रत्येकाच्या आठवणी तशा वेगवेगळ्या असतात...तशाच माझ्या या दोन अक्षरांवर रेंगाळणाऱ्या आठवणी लिहिण्याचा एक प्रयत्न आज करते आहे...
आठवण १:
माझ्या लहानपणी, उन्हाळ्याची सुट्टी लागली रे लागली की, आम्ही सगळे आमच्या गावी आज्जी आजोबा काका काकूंकडे जायचो...आमच्या घरात मी सर्वात लहान म्हणून स्पेशल लाड व्हायचे, पण त्यातही काकांचा माझ्यावर चा जीव थोडा जास्तीच...आंब्यांचा सिझन सुरू झाला की लगेचच मला आंबे हवे असायचे, हिशोबाच् आणि माझा काही संबंध नव्हता न तेव्हा..बालहट्ट..काका आठवड्याच्या बाजारातून येताना माझ्यासाठी गुपचूप आंबे आणायचे, आणि संध्याकाळी जेवण झाल्यावर सगळे टीव्ही समोर बसले की हळूच मला सर्वात मागे बोलवायचे, मस्तपैकी माझ्या फ्रॉक वर टॉवेल टाकून, धुतलेल्या आंब्याच्या फोडी एक एक करून मला आनंदाने खाऊ घालायचे...आजवर कितीही आंबे खाल्ले तरीही ती गोडी परत मिळणार नाही...काका जाऊन आता २ वर्षे झाली, पण तरीही प्रत्येक वेळेस आंबा म्हटले की काकांचा चेहरा डोळ्यासमोरून हलत नाही...
आठवण २:
माझ्या दिदिसमोर घडलेला, पण तिने मला सांगताना माझ्याही मनाच्या कोपऱ्यात तसाच उमटून राहिला ...शिरूर ला असताना दीदी माझ्या आई बरोबर बाजारात गेली होती, आई तिला आंबे घेवून परत पाठवणार होती आणि ती स्वतः पुढे इतर वस्तु खरेदी करून मग घरी येणार होती. आंब्यांच्या जागोजागी राशी लावून विक्रेते आंबे विकत होते...दूरवर एका फळवाल्या च्या जवळ एक बाई कडेवर एक मूल आणि हाताला एक मूल घेवून रेंगाळत होती ... तिने विक्रेत्याला आंब्याचा भाव विचारला, विक्रेत्याने भाव सांगितला...चव पाहू म्हणून तिने हात पुढे केला, आंब्याचा रस त्याने हातावर पिळला...तसा तिने लगेच कडेवरच्या लेकराला तो रस पाजला...तशीच पुढच्या विक्रेत्याकडे जावून पुन्हा तीच पद्धत आणि आता हाताला पकडलेल्या मोठ्या मुलाला पाजला...आणि काहीही न घेता तशीच पुढे निघून गेली ....तिच्या लेकरांना तिने आंब्यांची चव अशी चाखू घातली...
अशा वेळी मनात येते, की देव कसलाच भेदभाव नको ना रे ठेवू, निसर्ग तुझीच तर ही माणसे, तुझाच हा निसर्ग मग मिळू देत की सर्वांना सगळे...का उगा हात पसरणे?...हे ईश्वरा सर्वांचं कल्याण कर, रक्षण कर, ...आठवत राहते ही प्रार्थना...
आठवण ३:
माझ्या बहिणीच्या सासरी, आंब्यांची खूप मोठी बाग आहे. दर वर्षी तिचे सासरे म्हणजेच माशेरे आबा आठवणीने आमच्यासाठी सुद्धा आंबे पाठवायचे, किती ते प्रेम सर्वांसाठीच...शेतकरी खरंच राजा असतो मनाने!
नुकतेच त्यांचे देहावसान झाले, त्यांच्या चांगुलपणा बाबत बोलताना अनेकांचे अश्रू थांबत नव्हते ...यातच सारे आले..असो...
आठवण ४:
आंबा आपल्याकडे वैशाख शुद्ध तृतीया म्हणजेच अक्षय तृतीया पासून खाण्यास योग्य असे मानतात...आणि दैव योगाने मला माझा मुलगा चि. अवनीश ही याच दिवशी जन्मला....आणि तोही माझ्यासारखाच आंब्यासाठी नेहेमीच तयार असणारा, उन्हाळ्याची सुटी खास आंब्यासाठी वाट पाहणारा..हा योगायोग समजावा की अजून काही, माहिती नाही.
- संध्या मोहोळ, पुणे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.