vat savitri pooja sakal
सप्तरंग

विषमता वटसावित्रीच्या पूजेतली!

एका सोहळ्याला मी निघालो होतो. ठाणे स्टेशनला पोहोचलो. मात्र रेल्वेच्या उशिरानं कहर केला होता. दोन-अडीच तास रेल्वेची वाट बघायची म्हणजे परीक्षाच होती.

संदीप काळे sandip.kale@esakal.com

एका सोहळ्याला मी निघालो होतो. ठाणे स्टेशनला पोहोचलो. मात्र रेल्वेच्या उशिरानं कहर केला होता. दोन-अडीच तास रेल्वेची वाट बघायची म्हणजे परीक्षाच होती.

एका सोहळ्याला मी निघालो होतो. ठाणे स्टेशनला पोहोचलो. मात्र रेल्वेच्या उशिरानं कहर केला होता. दोन-अडीच तास रेल्वेची वाट बघायची म्हणजे परीक्षाच होती. रेल्वे वेळापत्रकाच्या झगमगणाऱ्या बोर्डवरून माझी नजर काही अंतरावरच्या मेणबत्त्यांकडे गेली. त्याच्या आजूबाजूला चार-पाच महिलांचा घोळका प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये काहीतरी भरून, त्या पिशव्या त्या मेणबत्तीने बंद करायचा प्रयत्न करत होता.

मी जवळ गेलो, पाहतो तर काय, त्या महिला एका कॅरिबॅगमध्ये वटपौर्णिमेचं सगळं साहित्य भरत होत्या. त्यांच्या पोशाखावरून त्यांचं दारिद्र्य जाणवत होतं. मी मनात विचार केला, त्या सर्व महिलांशी जाऊन थेट बोलावं. परंतु थेट सुरुवात केली, तर त्या घाबरतील, बोलणार नाहीत, म्हणून मी त्यांच्या बाजूच्या एका बाकावर जाऊन बसलो.

त्या महिलांचा संवाद कानावर येत होता. ज्या महिला घोळका करून बसल्या होत्या, त्यांमध्ये एकीच्याही कपाळावर कुंकू नव्हतं. ज्या एका आजीच्या कपाळावर कुंकू होतं, ती महिला आपल्याला कोणी काही बोलेल का, आपली कोणी तक्रार करेल का, आपल्या वस्तू कोणी घेईल का, यावर लक्ष ठेवून होती. ज्या महिला काम करत होत्या, त्यांतली एक स्त्री म्हणाली, ‘‘बाई रात्री इथं झोपायचं कसं, पावसाची रिपरिप सुरू आहे. कालच्यासारखं पोलिसांनी हाकललं म्हणजे पंचाईतच.’’ दुसरी महिला तिला म्हणाली, ‘‘पांडुरंग आहे सोबतीला. कशाला काळजी करतेस?’’ पहिली पुन्हा म्हणाली, ‘‘कालपण पंढरीचा पांडुरंग होता ना?’’ ती बोलणारी एकदम शांत झाली. सर्व महिला एकमेकींशी बोलत होत्या, त्यांच्या प्रत्येक संवादामध्ये कोणाची तरी आठवण, काळजी सातत्याने जाणवत होती.

एक छोटा मुलगा त्या आजीला ‘आजी गावाकडं कधी जायचं?’ असं विचारून भंडावत होता. शेवटी ती आजी चिडली आणि त्याला म्हणाली, ‘‘तुला येऊ नको म्हटलं होतं ना..!’’ मी त्या आजीच्या जवळ गेलो आणि तिला म्हणालो, ‘‘आजी, वटसावित्रीच्या पूजेची जोरदार तयारी झालेली दिसते. तुम्ही काय मुंबईमधल्याच काय?’’ आजी म्हणाल्या, ‘‘आम्ही मूळच्या नगरच्या आहोत. आता राहतो पुण्यात’’ मी म्हणालो, ‘‘मग तुम्ही वटपौर्णिमेचं साहित्य विकण्यासाठी मुंबईत आलात का?’’ आजी म्हणाल्या, ‘‘मुंबई माझ्यासाठी नवीन नाही. अनेक वेळा सण-उत्सवांच्या निमिताने छोट्या-छोट्या वस्तू विकण्यासाठी मी मुंबईला येते.’’ आम्ही बोलत असताना चार-पाच पोलिस तिथं आले आणि म्हणाले, ‘‘उचला हे सगळं सामान, भररस्त्यात अशी मेणबत्ती लावून बसलात! एखादा माणूस पळताना पडेल, जळेल, मरेल... तुम्हाला कळत नाही का?’’ आजी शांतपणे म्हणाल्या, ‘‘दोन मिनिटं द्या साहेब. सगळं बंद करते.’’ तिच्या एका बोलण्याने रागात आलेले पोलिस एकदम गार झाले.

मी आजीला म्हणालो, ‘‘हा लहान मुलगा कोण?’’ आजी म्हणाल्या, ‘‘नातू आहे माझा. येऊ नकोस म्हटलं तरी आला. आता म्हणतोय, पुण्याला जायचं.’’ ‘‘पुण्यात तुम्ही कुठे राहता?’’ आजी म्हणाल्या, ‘‘वाघोलीमध्ये.’’ ‘‘तुमच्या घरी कोण असतं?’’ आजी म्हणाल्या, ‘‘माझे यजमान, मला नऊ मुली आहेत. त्या लग्न होऊन आपापल्या घरी गेल्या. दोघींचा संसार संपला कारण त्यांच्या नवऱ्याचं निधन झालं, त्या माझ्याजवळ आहेत.’’ नऊ मुली म्हटल्यावर माझ्या चेहऱ्यावर आश्चर्याचे भाव आले. आजी म्हणाल्या, ‘‘मुलगा होईल याची वाट बघितली होती; पण झालाच नाही.’’

मी ज्या आजींशी बोलत होतो, त्यांचं नाव हौसाबाई राजाराम झिंगाडे. लहान वयात त्यांचं लग्न झालं. लगेच मांडीवर मुलगी आली. त्यांच्या घरातला प्रत्येक पुरुष दारू पिणारा. जावईही तसेच निघाले. सर्व मुलींची लग्नं हौसाबाईंनी कष्टातून केली. ‘‘कर्त्या पुरुषाने घरात काही आणून देणं तर सोडाच, पण तो शुद्धीवर राहून, नुसतं सोबत राहिला तरी बरं वाटायचं,’’ आजी बोलत होत्या. मी आजीला मध्येच म्हणालो, ‘‘तुम्ही इतर महिलांना तोच नवरा सात जन्म मिळावा यासाठी लागणारं साहित्य त्यांच्यापर्यंत नेता. तुमच्या वटपौर्णिमेचं काय?’’ आजी हसल्या आणि म्हणाल्या, ‘‘लग्नानंतर दोन वर्षं वटसावित्रीची पूजा केली. पुन्हा जो नवरा याच जन्मात नको होता, तो पुढच्या जन्मी कशाला, म्हणून मी पुन्हा वटसावित्रीची ना कधी पूजा केली, ना कधी वडाच्या झाडाला फेऱ्या मारल्या.’’

मी आजीला म्हणालो, ‘‘आताही तुमचे यजमान तसंच वागतात का?’’ आजी मान हलवत म्हणाल्या, ‘‘ज्या दिवशी माणूस मरतो, त्याच दिवशी त्याचा वाईट स्वभाव त्याचं शरीर सोडतो, त्यांचंही तसंच आहे. आता नवऱ्याच्या हाता-पायांत फार ताकद नाही. त्याला दारू मिळाली नाही की त्याला मरायला होतं. पूर्वी फक्त दारू पाहिजे होती. आता उतार वयात माझीही सोबत हवी असते. हाता-पायांतली ताकद संपली की, आपल्या माणसांची किंमत कळते.

उमेदीच्या काळात नवऱ्याला कधी भान नव्हतं, सासरा कधी शुद्धीवर नव्हता, सासू शुद्धीवर होती; पण तिला वंशाचा दिवा पाहिजे होता. त्या दिव्यासाठी माझं शरीर जिवंतपणी इतकं जळालं की, आता जगण्यासाठी उत्साहाचं तेल फार कमी शिल्लक आहे. मी पुढे येऊन काहीतरी करायला पाहते, तेव्हा शारीरिक व्याधी मला त्रासून सोडतात.’’ मी म्हणालो, ‘‘तुम्हाला हे बोलणं येतं कुठून?’’ आजी म्हणाल्या, ‘‘माझं माहेर वारकरी, घरात वारी, पोथीवाचन, भजन-कीर्तन हे सतत चालायचं. ही शिकवण मला घरातच मिळाली.’

मी घड्याळाकडे पाहिलं, गाडीची वेळ होत होती. आमच्या ‘यिन’मधील विरोधी पक्षनेत्या समृद्धी ठाकरे मला भेटायला आल्या होत्या. त्या सगळ्या महिलांची मी त्यांच्याशी ओळख करून दिली. मी हौसा आजींचा निरोप घेऊन निघालो. मी फ्लॅटफॉर्मवर येऊन थांबलो. समृद्धी म्हणाल्या, ‘‘तुम्ही नेहमीसारखं हसतमुख दिसत नाहीत.’’ मी ‘असं काही नाही’ असं म्हणालो. मी विचार करत होतो. आपली समाज व्यवस्था कशी आहे? लवकर लग्न, विधवा झाल्यावर लग्न करायचं नाही, पुरुषसत्ताक समाजाच्या इशाऱ्यावर स्त्रियांनी सातत्यानं नाचायचं. हौसाबाई आपल्या नवऱ्याला सोडून, दुसऱ्यांना त्यांचा नवरा त्यांना सात जन्म मिळावा, यासाठी वटसावित्रीच्या पूजेचं साहित्य तयार करताना दिसतात. त्यांना मात्र त्यांचा नवरा नको आहे. त्यांच्यासोबत असणाऱ्या एकीलाही नवरा नाही. त्या मात्र इतरांना त्यांचा नवरा त्यांना सात जन्म मिळावा यासाठी आग्रही आहेत. कसं हे सामाजिक चित्र? किती ही विषमता? किती हा गंभीर विषय? मी निघालो. माहीत नाही हौसा आजी आणि त्यांच्यासोबत असणाऱ्या सगळ्यांना आयुष्यात समानतेने चालणाऱ्या रुळाची गाडी कधी मिळेल ते !

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting:मनसेला बसणार धक्का? एकमेव आमदार राजू पाटील पिछाडीवर

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: राहुरी विधानसभा मतदारसंघात प्राजक्त तनपुरे ३४९ मतांनी आघाडीवर

Shiv Sena Shinde Vs Thackeray: गद्दारीचा आरोप झालेल्या शिंदे सेनेला मतदारांची साथ! ठाकरेंची सेना पिछाडीवर; जाणून घ्या आकडेवारी

सोलापूर जिल्ह्यात ‘हे’ उमेदवार आघाडीवर! भाजपचे ५, राष्ट्रवादी काँग्रेस १, शेकाप १, ‘तुतारी’चे २, उठाबा शिवसेना १, पोस्टल मतांची मोजणी पूर्ण, आता फेऱ्यांना सुरवात

Maharashtra Assembly Election Result : भाजप 100 जागांवर आघाडीवर, सलग तीन निवडणुकांमध्ये केले शतक पार

SCROLL FOR NEXT