पुण्याहून मी पहाटे पाच वाजता शेगावला गजानन महाराजांच्या दर्शनासाठी, तिथलं व्यवस्थापन पाहण्यासाठी पोहोचलो. माझ्याबरोबर ‘सकाळ’ कार्यालयातील अनेक सहकारी होते. आराम करून पुन्हा सकाळी नऊनंतर बाहेर पडायचं होतं. सगळे आपापल्या खोलीत आराम करत होते. मला काही झोप येईना. खिडकीतून येणारी थंड हवा अंगाला सुखद गारवा देत होती.
मी उठलो आणि भक्तनिवासापासून पुढं चालत निघालो. गजानन महाराजांच्या मंदिरातून येणाऱ्या मधुर संगीताचा ध्वनी सकाळी-सकाळी मंत्रमुग्ध करत होता. थोडं पुढं गेल्यावर एक महिला रस्ता झाडत झाडत ओवी म्हणत असलेली दिसली.
पहिली माझी ओवी गं
गजानन महाराजाला
बाबा झाले सर्वांचे
मानवता दिली समाजाला
तिचं गाणं सुरू होतं. मी अगदी जवळ गेलो. तितक्या सकाळी त्या महिलेला फोन आला. ती फोनवर बोलत होती. एक मुलगी कॉलेजच्या गणवेशात होती. ती त्या महिलेच्या जवळ आली. तिनं त्या महिलेच्या हातातला झाडू घेतला आणि झाडायला लागली. त्या महिलेचं बोलणं सुरू असतानाच, ती त्या मुलीला ओरडली. म्हणाली, ‘अगं बाई, तुझे कपडे खराब होतील ना. कशाला झाडू घेतलास हातात.’ ती मुलगी तिच्या आईचं ऐकत नव्हती.
त्या महिलेनं त्या मुलीच्या हातातील झाडू घेतला. ती मुलगी ओरडली, ‘आई, तू अशीच करतेस गं, मग खूप वेळ होतो.’ ती महिला म्हणाली, ‘तू आल्यावर बोलतच नाहीस. आली की कामाला लागतेस.’ त्या दोघींमधला संवाद मी ऐकत होतो. मी त्या दोघींजवळ जात, त्यांना विचारलं, ‘तुम्ही सेवेकरी आहात का?’ ती महिला अगदी स्पष्टपणे म्हणाली, ‘हो माऊली’.
तुमच्याबरोबर या कोण आहेत. ती महिला म्हणाली, ‘ही माझी मुलगी आहे.’ मी, ती महिला आणि ती मुलगी असे आम्ही तिघं रस्त्यावर बोलत उभं होतो.
साधी-भोळी माणसं, या माणसांना जसं निसर्गानं छळलं, त्याहून अधिक छळलं माणसांनी. आता ही वैतागलेली माणसं गजानन महाराजांच्या छत्रछायेखाली आलीत. ही महिला कुठून आली, तिचं गाव कुठलं आणि आता सगळी परिस्थिती काय आहे, यावर आम्ही बोलत होतो.
मी ज्या महिलेशी बोलत होतो, तिचं नाव राधाबाई जाधव. शेगावपासून अगदी चाळीस किलोमीटर अंतरावर राधाबाईचं गाव. सतत नापिकी, कर्जबाजारी आणि तीन मुली झाल्या म्हणून राधाबाईच्या नवऱ्यानं आत्महत्या केली. मुली अभ्यासात हुशार. सगळ्यांत मोठी मुलगी शोभा, जी राधाबाईबरोबर माझ्याशी बोलत होती. ती गजानन महाराज संस्थानच्या इंजिनिअरिंग कॉलेजात सध्या दुसऱ्या वर्षाला शिकते.
दुसरी मुलगी बारावीला आहे. ती शेगावलाच गजानन महाराज संस्थानच्या कॉलेजात शिकते. तिसरी बहीण त्याच गजानन महाराज संस्थानच्या दवाखान्यात उपचार घेते. तिला तीन वर्षांपासून गंभीर आजारानं ग्रासलं आहे. मी बोलतं केल्यावर राधाबाई मला सारं काही सांगायला लागल्या.
शेगावच्या गजानन महाराजांच्या मंदिरांचं एक अद्भुत व्यवस्थापन आहे, एवढं मी ऐकलं होतं; पण, हजारो माणसांच्या हाताला काम देत त्यांच्या घरांची चूल पेटवत, त्यांच्या घरातल्या प्रत्येक माणसाची काळजी घेणारं हे संस्थान आहे, अशी ओळख मी आता नव्यानं करून घेतली होती.
राधाबाई म्हणाल्या, ‘आमच्या गावात पंचवीस जण सेवेकरी म्हणून निवडले गेले. त्यांच्या कुटुंबांची पूर्ण खाण्याची, राहण्याची, आरोग्याची, शिक्षणाची सगळी जबाबदारी गजानन महाराज संस्थानानं घेतली.’ मी त्यांना म्हणालो, ‘तुम्ही त्या बदल्यात किती दिवस काम करता.’ त्यावर राधाबाई म्हणाल्या, ‘महिन्यातून पाच दिवस. आसपासच्या सगळ्या गावांतून असे गरजवंत असणारे पंचवीस जण येथे सेवेकरी म्हणून नियुक्त झाले होते.
वर्षभराचं धान्य, दवाखाना, मुलांचं शिक्षण आणि थोडंबहुत मानधन या स्वरूपात चालणारं हे काम माझ्यासारख्या अनेक राधांना जीवदान देणारं ठरलंय. माझी मोठी मुलगी शोभा प्रचंड हुशार. शाळेतल्या बाईंना माझी मुलगी गणितात हुशार आहे, तिला इंजिनिअरिंगला नंबर लावण्यासाठी प्रयत्न करा, असं सांगितलं. मी कधी गावाच्या बाहेर गेले नव्हते. गावातलं शिक्षण झालं, की मुलांचं शिक्षण थांबतं, असं आमचं पिढ्यानपिढ्या सुरू होतं.
गावातल्या काही ओळखीतल्या लोकांनी मला शेगाव संस्थानबद्दल सांगितलं होतं. तिथं मी माझ्या परिस्थितीबद्दल सांगितलं. महाराजांबद्दल आदरभाव होता, प्रचंड भीती होती. नेहमी मी दर्शनाला जायचे; पण, तिथं जाऊन आपण कधी सेवेकरी होऊ, असं वाटलं नाही. मी पहिल्यांदा सेवेकरी म्हणून इथं रुजू झाले. त्यानंतर आपसूकपणे माझ्या मुलीचा शिक्षणाचाही मार्ग मोकळा होत गेला. तिचा शाळेत पहिला नंबर कधी हुकला नाही.
मी जेव्हा पाच दिवस इकडे असते, तेव्हा कॉलेज भरण्यापूर्वी ती मला भेटायला येते. मला कामात मदत करते. तिलाही इथं सेवा करायला आवडतं.’ मी म्हणालो, ‘तुमची दुसरी मुलगी कुठं आहे, ती काय शिकते.’ राधाबाई काहीतरी बोलणार इतक्यात त्यांना भरून आलं. त्यांनी अश्रूंना वाट मोकळी करून दिली. थोड्या वेळानं शांत झाल्यावर त्या काहीतरी बोलणार इतक्यात त्यांची मुलगी शोभा म्हणाली, ‘माझ्या बहिणीला गंभीर आजार झालाय.
आम्ही संस्थानात येण्यापूर्वी ती मेली म्हणून तिला सोडून दिलं होतं; पण, संस्थानच्या नवीन झालेल्या दवाखान्यानं तिला जीवदान दिलंय. आता दवाखान्यात ती उपचार घेते. ती अजून पूर्णपणे बरी झाली नाही. मी शोभाला म्हणालो, ‘‘तुला आता मोठं होऊन काय करायचंय.’ ती म्हणाली, ‘महाराज ठरवतील काहीतरी, तेच मी करणार आहे.’ तिच्या बोलण्यातला साधेपणा, कमालीचा आत्मविश्वास तिथल्या वातावरणाचाही भाग होता.
त्या दोघीजणी दवाखान्याच्या दिशेनं निघाल्या. मीही रस्त्यानं चाललो होतो. अमेरिकेसारखे चकाचक रस्ते, दवाखाना, शिक्षणव्यवस्था हे या संस्थानचं वैशिष्ट्यं होतं. असं उत्तम नियोजन राज्यातल्या कुठल्या देवस्थानाचं असेल तरच नवल! त्या संस्थानात दिशादर्शक बोर्डची संख्या आणि त्यावर लिहिलेला मजकूर कमालीचा विचार करायला भाग पाडणारा आहे.
ज्या शंकर पाटील यांनी हे सगळं उभं केलं, त्यांचा हा वारसा आता त्यांची मुलं पुढं चालवतात. त्यांचं ना कुठं नाव, ना कुठं फोटो. त्या मंदिरात कुठल्याही राजकारण्याचा हस्तक्षेप नाही. त्यामुळे हे मंदिर, इथलं व्यवस्थापन देशासाठी व्यवस्थापनाचा धडा देऊ पाहतं. असं तिथली परिस्थिती पाहून वाटत होतं. आम्ही तिघं दवाखान्यात पोहोचलो. आपल्या आईला पाहून त्या बेडवर पडलेल्या मुलीला रडायला आलं. त्या मुलीला माझी ओळख करून दिली.
मी तिच्या तब्येतीची खुशाली विचारली. तिथं असलेल्या बोर्डवर नजर टाकली. एखाद्या टॉपच्या दवाखान्यात नसेल, इतकी छान व्यवस्था त्या दवाखान्यात होती. सगळं काही मोफत. त्या बोर्डवर आज दाखल असलेल्या रुग्णांची संख्या साडेचारशे होती. जे काम सरकारी यंत्रणा, दवाखान्यानं करायला पाहिजे, ते काम गजानन महाराज संस्थानच्या वतीनं तिथल्या मंडळींनी केलं होतं.
केवळ राधाबाई, शोभा आणि तिच्या तीन मुलींना इथल्या सुविधा मिळत नव्हत्या, तर संस्थानच्या दृष्टिकोनामुळे आसपासच्या कितीतरी खेडेगावांतल्या लोकांच्या आयुष्याचं सोनं झालं होतं. हे सारं काही केवळ एका बुलडाणा जिल्ह्यापुरतं मर्यादित नव्हतं, तर हा सेवाभावी वारसा देशाच्या कानाकोपऱ्यांत जाऊन पोहोचला आहे.
गरिबांच्या मुलांना हवं ते मोफत शिक्षण, आसपासच्या सगळ्या माणसांना मोफत आरोग्य, खाण्याची, राहण्याची मोफत व्यवस्था हे सारं काही एखाद्या रामराज्यासारखंच होतं. खरंतर हे सुंदर मॉडेल आहे. हे मॉडेल विकसित राज्यांतल्या प्रत्येक ठिकाणी तिथल्या शासनानं राबवणं अपेक्षित आहे. मात्र, तसं होताना दिसत नाही.
एखादं संस्थान जेव्हा लाखो माणसांच्या उपयोगाला येतं; तेव्हा समजायचं, की ते संस्थान समाजाच्या उपयोगाचं, भल्याचं आहे. गजानन महाराजांच्या शेगावात हा अद्भुत चमत्कार घडतोय. राधाबाई, शोभा आणि मी, आम्ही तिघंही बोलत होतो. त्या दोघीजणी मला संस्थानच्या चांगुलपणाचे सगळे दाखले देत होत्या. मी त्या संस्थानाला राज्यातल्या इतर संस्थानांशी जोडत होतो. त्याचा कुठंही जाडजोड लागत नव्हता.
मी शोभाला विचारलं, ‘तुला नोकरीच्या निमित्तानं मुंबई, पुण्याला यायचं का? मी तुला मदत करू शकतो, मला नक्की सांग.’ तेव्हा शोभा म्हणाली, ‘मला पुण्या, मुंबईला यायचं नाही. माझ्या वडिलांनी ज्या नापिकी होणाऱ्या शेतीमुळे आत्महत्या केली, त्या शेतीत मला अनेक प्रयोग करून सोनं काढायचंय. इथल्या शेतकऱ्यांना आधार द्यायचाय.’
शोभानं मला संस्थानाच्या पाणी प्रयोगाविषयी सांगितलं. अवघा महाराष्ट्र आज दुष्काळाच्या खाईत आहे; पण, संस्थाननं केलेल्या पाण्याच्या अनेक प्रयोगांमुळे तिथं बारमाही पाणी मिळतं, सारी शेती पाण्याखाली आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कधीच भासत नाही. हे जर एखादं संस्थान करू शकत असेल, तर बाकी महाराष्ट्रातल्या संस्थांना, लोकांना, सरकारला का जमत नाही? हा प्रश्नच होताच.
मी त्या दवाखान्यातून भक्त निवासाकडे निघालो. सकाळी मला माझ्या सगळ्या सहकाऱ्यांबरोबर त्या मंदिराचं सगळं नियोजन, तिथं चालणारं काम, अगदी बारकाईनं पाहायचं होतं. राधाबाई आणि शोभाचा निरोप घेऊन मी निघालो. तेव्हा राधाबाई म्हणाली, ‘‘तुम्ही चांगलं काम करा. महाराज तुमच्या पाठीशी असतील.’
मी जाताना माझ्या मनात विचार येत होता, ‘कुठलीही स्वार्थी भावना न ठेवता भक्ती, सेवाभाव, सहकार्याच्या माध्यमातून एखादं काम हातात घेतलं, तर आयुष्य कसं सोन्यासारखं होतं. प्रत्येक क्षण सुखद होऊन जातो. मी आणि माझे सहकारी दोन दिवस गजानन महाराज संस्थान परिसर फिरलो. तिथले सगळे प्रयोग बारकाईनं पाहिले. असे प्रयोग अन्य कुठंही होत नाहीत. हे प्रयोग सगळीकडे करायचे असतील, तर सेवाभाव, भक्ती आणि सहकार्य खूप आवश्यक आहे, बरोबर ना...?
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.