Tarpan Foundation Sakal
सप्तरंग

..आहे ‘तर्पण’ म्हणून..!

माझे काका प्रल्हाद होगे-पाटील यांनी सेवानिवृतीनंतर परभणी जिल्ह्यातल्या झरी येथे त्यांच्या शेतीत खूप छान प्रयोग केले. ते प्रयोग पाहण्यासाठी मी झरीला गेलो होतो.

संदीप काळे sandip.kale@esakal.com

माझे काका प्रल्हाद होगे-पाटील यांनी सेवानिवृतीनंतर परभणी जिल्ह्यातल्या झरी येथे त्यांच्या शेतीत खूप छान प्रयोग केले. ते प्रयोग पाहण्यासाठी मी झरीला गेलो होतो. झरीवरून परभणीला आलो. ट्रेनला खूप वेळ होता. मंगेश नावाचा माझा मित्र महिला व बालकल्याण विभागात आहे. मंगेशला भेटावे आणि पुढे मुंबईला निघावे, हा बेत मी केला. मंगेशच्या कार्यालयात गेलो. मंगेशची मिटिंग सुरू होती. त्याच्या कार्यालयात मी मंगेशची वाट पाहत बसलो. माझ्या बाजूला एक युवक बसला होता. तोही मंगेशला भेटायला आला होता. आमची ओळख झाली आणि गप्पाही सुरू झाल्या. तो युवक वेगळंचं ‘रसायन’. त्याच्या आयुष्याचा थक्क करणारा वेगळा इतिहास आहे.

मी ज्या युवकाशी बोलत होतो, त्याचे नाव नारायण दत्ता इंगळे (९५५२७४७८७४). मुंबईच्या ‘तर्पण’ फाऊंडेशनचे परभणी आणि हिंगोली या दोन जिल्ह्यांसाठी नारायण काम पाहतो. ‘तर्पण’ फाऊंडेशनने अठरा वर्षें पूर्ण झालेल्या पाचशे पाच तरुणांना त्यांच्या पुढील आयुष्यात पूर्णपणे उभे करण्यासाठी पुढाकार घेतलाय. ती संख्या अजून वाढत आहे. जे ‘तर्पण’मध्ये आहेत, ज्यांना ‘तर्पण’ ने काहीतरी दिले, असे अनेक जण ‘तर्पण’मध्ये काम करून आपले योगदान देतात. त्यामध्ये नारायण हासुद्धा एक आहे. ‘तर्पण’ने जे केले होते, खरं तर ते एका सरकारने करणे अपेक्षित होते. मला नारायणचा मागचा इतिहास जाणून घ्यायचा होता. नारायण यांचा मागील आठवीस वर्षांचा प्रवास मी हळूहळू नारायण यांच्याकडून समजून घेतला.

नारायणचे वडील लहानपणी वारले आणि आई टीबीने गेली. गावात साऱ्या जणांनी टीबी रुग्णाच्या घरचा म्हणून नारायणला झिडकारले. या वातावरणात नारायणने बीड जिल्ह्यातले जोडवाडी गाव सोडले. तेव्हा घरी एक लहान भाऊ सहा वर्षांचा होता. कुठे रेल्वे स्टेशन, कुठे फुटपाथ, वाटेल तिथे, नारायण भिक मागून खायचा. पोलिसांनी परतूर रेल्वे स्टेशनवर नारायणला पकडून रिमांड होममध्ये टाकले आणि तिथून नारायणच्या आयुष्यात चांगली किरणे पडायला लागली.

आपल्या आयुष्याची करुण कहाणी नारायण मला सांगत होता. आमचे बोलणे सुरू असताना मंगेश आला. तोही आमच्या गप्पांमध्ये सहभागी झाला. नारायण पुढे सांगू लागला. माझ्या भावाला थोडे कळायला लागले आणि त्यानेही गाव सोडले. जमेल तिथे, जमेल तसे, भावांनी दिवस काढले. तब्बल २२ वर्षांनंतर तो मला भेटला. त्याला मी जेव्हा पहिल्यांदा मिठी मारली, तेव्हा आम्ही दोघेही खूप रडत होतो. ज्याला हातावर घेऊन वाढवले तो त्या दिवशी माझ्या बरोबरीचा वाटत होता. माझ्यावर समाजातल्या त्या प्रत्येक घटकाने आपल्या सोईने वाटेल तसे शिक्के मारले. ते सर्व ‘शिक्के’ मला पुसून काढायचे होते. त्यासाठी मी खूप मेहनत केली. पुढे अभियांत्रिकीला प्रवेश घेताना मला जात आडवी आली. मलाच माहिती नाही मी कोणत्या जातीचा, प्रवेश घेताना जात सांगू कशी? परभणीत मला ज्या महाविद्यालयात प्रवेश घ्यायचा होता. त्या प्राचार्य शरद शिंदे सर यांना माझ्या मेहनतीवर विश्वास होता. त्यांनी सर्व बाजूंनी खिंड लढवली आणि अनाथ प्रमाणपत्रावर मला प्रवेश दिला.

अभियंता झाल्यावर मी नाशिकच्या सातपूर भागात पवार इलेक्टो सिस्टीम येथे सहाय्यक अभियंता या पदावर सहा महिने काम केले. माझे मन त्या कामात लागेना. ‘एमपीएससी’ची परीक्षा मला द्यायची होती, त्याला वेळ मिळायचा नाही. मी नाशिकचा जॉब सोडला. पुण्यात मित्राकडे राहिलो, छोटे- छोटे काम करीत ‘एमपीएससी’चा आभ्यास करायला लागलो. अनाथासाठी एक टक्का आरक्षण होते, त्यात फॉर्म भरला, प्रचंड अभ्यास केला आणि ‘एमपीएससी’ पास झालो. कधी चहाची टपरी टाकली, कधी पेपर वाटले. घरून बाहेर पडल्यापासून ते ‘एमपीएससी’ च्या माध्यमातून अधिकारी होईपर्यंतचा थरारक प्रवास नारायण मला सांगत होता. आणि मी आणि मंगेश आम्ही दोघेही शांतपणे ऐकत होतो.

मंगेशचा निरोप घेऊन आम्ही दोघेही मुंबईत जाणाऱ्या रेल्वे गाडीत बसलो. टीसीच्या मदतीने दोघांची जागा जवळजवळ घेतली. ‘तर्पण’चा प्रवास आणि ‘तर्पण’ ने सुरू केलेल्या सामाजिक कामाबाबत नारायण माझ्याशी भरभरून बोलत होता. नारायण बोलत असताना मध्ये-मध्ये आई-बाबा असे, आई-बाबा तसे असा उल्लेख करायचा. मी नारायणला म्हणालो, हे आई-बाबा कोण आहेत, ज्यांचा तू वारंवार उल्लेख करतोस. नारायण म्हणाला, ज्यांनी ‘तर्पण’ च्या माध्यमातून शेकडो आनाथ मुलांचे पालकत्व स्वीकारले. आम्ही सारी मुलं, श्रीकांत भारतीय आणि श्रेया भारतीय यांना आई-बाबा म्हणतो. मला आश्चर्य वाटले. मी नारायणला म्हणालो, ‘तर्पण’ नेमके काय करते. नारायण म्हणाला, ज्यांना कुणीही नाही असे अनाथ, ज्यांनी आयुष्याची अठरा वर्षें बालगृहात काढली अशी अनाथ मुलं, त्यांची जेवणे, राहणे, क्लास अशी सर्व व्यवस्था आणि त्यांच्या नोकरीसाठी प्रयत्न करण्याचे काम ‘तर्पण’ करीत असते. जे अनाथ आहेत. माझ्यासारखे शेकडोजण ‘तर्पण’ ला पूर्णवेळ देत आहेत. ‘तर्पण’ला घेऊन रात्री गप्पा मारत- मारत झोप कधी लागली कळलेच नाही.

सकाळी-सकाळी गाडी कल्याणच्या जवळजवळ आली होती. मी डोळे चोळत बाहेर पाहिले तर खूप जोराचा पाऊस पडत होता. मी नारायणला म्हणालो, मराठवाड्याचा माणूस आणि मराठवाड्याच्या माणसाचा आवाज मुंबईत वेळेत पोहचत नाही हे आमचे दुर्दैव आहे. नारायण ही माझ्या हो मध्ये हो घालत होता. दीड तास एका जागेवर आम्ही थांबलो आणि पुन्हा गाडी निघाली. सीएसटीला पोहचायला अकरा वाजायला आले. या प्रवासामध्ये ‘तर्पण’, अनाथांच्या समस्या, एमपीएससी करताना प्लान बी किती महत्त्वाचा आहे. असे अनेक विषय मी नारायणकडून समजून घेतले. सीएसटीवर उतरल्यावर आम्ही दोघेही ‘तर्पण’च्या कार्यालयात पोहचलो. ‘तर्पण’ सेतू सृजन हेतू असे कार्यालयाच्या बाहेर लिहिले होते. ‘तर्पण’चे संस्थापक, एमडी श्रीकांत भारतीय यांची आणि माझी नारायणने ओळख करून दिली.

मी ओमप्रकाश शेट्टे सर, यांच्याकडून श्रीकांत यांच्याविषयी खूप ऐकले होते. पण भेट झाली नव्हती, आज पहिल्यांदा त्यांची भेट झाली. प्रचंड ऊर्जा, सतत सकारात्मकता, त्यांच्यात होती. अभिजित पवार सर यांची नेहमीची टॅगलाईन ‘लोकांचे आशीर्वाद घेण्यासाठी काम करायचे’ हा विचार रुजवण्यासाठी श्रीकांत यांचा जन्म झाला, असे त्यांच्या अनेक सुरू असलेल्या कामावरून दिसत होते. श्रीकांत म्हणाले, ‘तर्पण’ हा प्रोजेक्ट माझ्या आयुष्यातला खूप ‘हळवा’ कप्प्पा आहे. मला आजही आठवते, देवेद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना अमृता नावाच्या एका अनाथ मुलीचा पात्र असूनही एमपीएससीला नंबर लागला नाही. मी अमृताला देवेंद्र फडणवीस यांच्याकडे घेऊन गेलो. अमृता प्रकरण खूप गंभीर होते. देवेंद्रजी यांनी अनाथांचा पूर्ण विषय समजून घेऊन अनाथांसाठी एमपीएससीमध्ये तातडीने एक टक्का आरक्षण दिले. नारायण त्या आरक्षणाचा पहिला लाभार्थी युवक. अमृताच्या विषयानंतर मी अनाथ या विषयावर खूप रिसर्च केले आणि त्यातून ‘तर्पण’ फाऊंडेशन पुढे आले. श्रीकांत यांनी मन हेलावून सोडणारे अनेक विषय मला सांगितले. आज राज्यामध्ये सुरू असलेले ‘तर्पण’ येत्या काही दिवसांत देशातल्या प्रत्येक राज्यात भरारी घेणार होते.

‘तर्पण’च्या सीईओ सारिका महोत्रा (८६०५६९७७७३) यांच्याकडूनही या अनाथ मुलांच्या संगोपनाबाबत मी विस्ताराने बोललो. सारिका म्हणाल्या, या मुलांना थोडे बळ जरी दिले तरी ही मुले आकाशाला गवसणी घालतील एवढी ताकद या मुलांमध्ये आहे. श्रेया भारतीय म्हणाल्या, ही मुले जेव्हा मला आई म्हणून प्रेमाने हाक मारतात ना, तेव्हा मातृवाची श्रीमंती किती मोठी असते हे कळते. हे काम करताना खूप समाधान मिळते. तर्पण’ चे काम करणाऱ्या सर्वांविषयी किती लिहावे. तेही एका लेखात शक्य नव्हते. मी ‘तर्पण’ च्या कार्यालयातून निघालो. आहे ‘तर्पण’ मधून आज शेकडो अनाथांना आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी हत्तीचे बळ मिळाले आहे. ‘तर्पण’ आणि ‘तर्पण’साठी झटणाऱ्या शेकडो हातांना बळ देण्यासाठी तुम्हाला-आम्हाला हातभार लावावा लागेल, हो ना.!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dolly Chaiwala: डॉली चायवाला भाजपचा स्टार प्रचारक! नागपूरमध्ये केला महायुतीसाठी प्रचार

SA vs IND: 23 Six, 17 Fours! जोहान्सबर्गच्या मैदानात सॅमसन-तिलकचं वादळ; भारताचं द. आफ्रिकेला तब्बल 284 धावांचं लक्ष्य

SA vs IND: संजू सॅमसनने तिसऱ्या शतकासह रचला इतिहास! तिलक वर्मानेही ठोकली सलग दुसरी Century

Assembly Elections: २४ ते ३० मतदारसंघ महत्त्वाचे! दोन्ही आघाड्यांना बंडाचा फटका बसणार,'शांती' यज्ञासाठी पळापळ सुरू

Dhruv Rathee: ध्रुव राठीचं चॅलेंज आदित्य ठाकरेंनी स्वीकारलं! ‘मिशन स्वराज’साठी शेअर केली मुद्द्यांची यादी

SCROLL FOR NEXT