Surya Tiger sakal
सप्तरंग

‘सूर्या’चा दरारा

ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील ‘माया’ वाघिणीचा बछडा ‘सूर्या’ उमरेडच्या जंगलात दाखल झाला होता.

अवतरण टीम

- संजय करकरे

उमरेड करंडला वनपरिक्षेत्रात ‘सूर्या’ला मी एकदाच ओझरते बघितले. चांगले छायाचित्र काही टिपता आले नाही. थेट पर्यटकांकडे बघणारा, आपल्या वडिलांची काहीशी छबी असणारा, गळ्याकडील भागात फुललेले केस असणारा ‘सूर्या’ मला कमालीचा भावला. काही वेळा तो शूर योद्ध्यासारखा भासतो, तर कधी-कधी दाक्षिणात्य चित्रपटातील व्हीलनही वाटतो. उमरेडमध्ये ‘सूर्या’ने त्याचा दरारा स्थापित करून वर्चस्व मिळवले आहे. साधारण २०१९ पासून आजवर त्याचेच राज्य आहे.

ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील ‘माया’ वाघिणीचा बछडा ‘सूर्या’ उमरेडच्या जंगलात दाखल झाला होता. उमरेडचे जंगल गाठायला ‘सूर्या’ने वर्धा आणि नागपूर जिल्ह्यातील प्रादेशिक विभागाच्या जंगलांना पार करून उमरेडच्या जंगलात प्रवेश केला. एका जंगलातून दुसऱ्या जंगलात जाण्यासाठी सलग जंगलांची का आवश्यकता आहे, हे वाघांच्या या हालचालींमुळे अधोरेखित होते.

जंगलांना जोडणारे हे कॉरिडॉर अनेक वेळा महामार्ग, कालवे, रेल्वे मार्ग अथवा विविध विकास कामांमुळे खंडित होण्याची मोठी भीती असते. असे तुकडे तुकडे झालेले जंगल मग वन्यप्राण्यांना आणि विशेषतः वाघांच्या दीर्घकालीन संवर्धनाला धक्के देणारे असतात. अशा तुटलेल्या जंगलांमुळे प्राण्यांचे इनब्रीडिंग होण्यासाठीही कारणीभूत ठरण्याचा धोका असतो.

विदर्भातील बहुतांश व्याघ्र प्रकल्प सलग जंगलांनी जोडलेले आहेत. त्यामुळे नागझिरा जंगलातील वाघ उमरेडच्या जंगलात, ताडोबाचा वाघ नवेगावच्या जंगलात किंवा नवेगावचा वाघ पेंचच्या जंगलात बघायला मिळतो. व्याघ्र संवर्धनासाठी जंगलांची सलगता अत्यंत महत्त्वाची असते.

२०१९ च्या अखेरीस नागपूर जिल्ह्यातील उमरेड करंडला अभयारण्यात दाखल झालेल्या ‘सूर्या’ने या जंगलात असलेल्या ‘सी२’ या नर वाघाला पिटाळून आपला दरारा स्थापित करून वर्चस्व मिळवले. या सुमारास कोरोनाच्या काळात अभयारण्य पर्यटकांसाठी बंद असल्याने या वाघाची फारशी माहिती बाहेर आली नाही.

नोव्हेंबर २०२० मधील एका घटनेने मात्र ‘सूर्या’ वाघाने असा काही दणका दिला की सारे जंगल थरारून गेले आणि या घटनेचा मी साक्षीदार ठरलो.

२० नोव्हेंबरला सकाळी साडेनऊ वाजता पेंच व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्रसंचालक रविकिरण गोवेकर यांचा फोन आला. उमरेड जंगलात एक वाघ मृत्युमुखी पडला असून आपण तिथे सोबत जाऊ, असे त्यांनी सांगितले. यापूर्वीही उमरेड तसेच अन्य व्याघ्र प्रकल्पात वाघाचा मृत्यू झाल्यावर राष्ट्रीय व्याघ्र प्राधिकरणाचा एक प्रतिनिधी या नात्याने वाघाचे शवविच्छेदन व इतर सर्व सोपस्कार पार पडेपर्यंत घटनास्थळावर मी उपस्थित राहिलो आहे.

गोवेकर यांच्यासोबत उमरेडच्या जंगलात गाडीने पोहोचल्यावर ‘तास’ या क्षेत्रात आम्ही पोहोचलो. गाडी एका ठिकाणी लावून साधारणतः आठ-दहा मिनिटे जंगलात पायी चालून एका नाल्यात उतरलो. नोव्हेंबर महिना असल्याने नाल्यात पाणी वाहत होते. नाल्याच्या वरच्या बाजूला साधारण पन्नास फूट आत झुडपात एक वाघीण मेली होती.

जागेचे दृश्य अत्यंत वेदनादायी होते. जंगलाचा हा उमदा प्राणी अंग दुमडून पालथा विचित्र अवस्थेत पडला होता. या वाघिणीच्या छातीकडील काही भाग खाल्लेला होता आणि सर्वात त्रासदायक आणि थरकाप उडवणारे दृश्य म्हणजे या वाघिणीच्या पोटातील चार अर्भके वेगवेगळ्या ठिकाणी पडलेली होती.

नाल्यामध्ये दोन वाघांमध्ये झटापट झाल्याच्या खुणा दिसत होत्या. वाळूत रक्त सांडले होते. रक्त वाळून ते तपकिरी रंगाचे झाले होते. नर वाघाचे पंजे आजूबाजूला दिसत होते. वाघिणीला मारल्यावर तिला ओढत वरच्या बाजूला झुडपात नेले होते. यावेळी तिचा गर्भपात होऊन पोटातील बछडे बाहेर पडलेले लक्षात येत होते. या वाघिणीचा जीव घेणाऱ्या वाघाने तिचा काही भाग खाल्लाही होता.

एका वाघाने दुसऱ्या वाघाला मारून, त्याला अथवा तिला खाल्ल्याची काही उदाहरणे आहेत. या घटनेचा करताकरविता होता ‘सूर्या’. तारणा परिसरातील या वाघिणीला ‘सूर्या’च्या या कृत्याला सामोरे जावे लागले. ही वाघीण गर्भवती असल्याने मिलनास उत्सुक असलेल्या ‘सूर्या’ला तिने विरोध केला असावा आणि चिडलेल्या ‘सूर्या’ने तिचा बळी घेतला. वाघिणीच्या मानेवर खोल दाताच्या जखमाही स्पष्टपणे दिसत होत्या.

याच जंगलातील मन हेलावणाऱ्या दुसऱ्या घटनेचाही मी साक्षीदार ठरलो. यावेळेस ‘सूर्या’ने उमरेड रेंजमधील ‘कॉलरवाली’ वाघिणीच्या पिल्लांना लक्ष्य केले. ही घटना जानेवारी २१ मधील आहे. एका नर वाघाकडून या वाघिणीला तीन बछडे झाले होते.

‘सूर्या’ने आपली हद्द वाढवत उमरेड वनपरिक्षेत्रात शिरकाव केल्यावर ही वाघीण आपल्या पिल्लांना ‘सूर्या’पासून वाचविण्यासाठी अभयारण्याच्या बाहेरील बाजूस काही काळ घालवू लागली होती; पण आपला वंश वाढवण्यासाठी उत्सुक असलेल्या ‘सूर्या’ने तीन-साडेतीन महिन्यांच्या या तीन पिल्लांना एका रात्रीतच लोळवले होते.

या लहान पिल्लांचे अक्षरशः तुकडे केले होते. करंडला बीटमध्ये ही घटना घडली होती. दाट झाडीमध्ये पाण्याच्या आसपास या पिल्लांचे तुकडे मिळाले. एका पिल्लाला तर अर्धवट खाल्लेही होते. या लहान पिल्लांचा एकेक तुकडा गोळा करावा लागला होता. एका मृत पिल्लाचा चेहरा ज्यावेळेस मी हातात घेतला तेव्हा मी नखशिकांत थरारून गेलो होतो. नर वाघाच्या पंजाच्या खुणा यावेळी ठिकठिकाणी उमटलेल्या होत्या.

‘सूर्या’ इतका क्रूर कसा होऊ शकतो, असा प्रश्न मला वारंवार पडला. आपली हद्द वाढवणे व ती टिकवण्यासाठी दुसरा प्रतिस्पर्धी तयार होऊ नये यासाठी अशा प्रकारची वर्तणूक मार्जार कुळातील अगदी पाळीव मांजरांपासून ते जंगलातील वाघापर्यंत बघायला मिळते. अशा प्रकारच्या घटना जंगलात अधूनमधून घडतच असतात. मग Survival for the fittest हा निसर्गाचा नियम येथे लक्षात येतो.

उमरेडचे वनपरिक्षेत्र अधिकारी आर. बी. निंबेकर २०१८ ते २३ पर्यंत येथे कार्यरत होते. ते सांगतात, कित्येक वेळा मी या वाघाला बघितले आहे. प्रत्येक वेळी तो अतिशय शांतपणे वागत असल्याचे आम्ही बघितले. कधीही आमच्या कर्मचाऱ्यांच्या अथवा पर्यटकांच्या मागे तो गेल्याचे आम्ही बघितले नाही. कधी कधी तो आपला चेहरा पर्यटकांसमोर त्रासिक होऊन दर्शवत असे, पण या वाघाचा शांतपणा आम्हाला भावला होता.

उमरेडमध्ये आलेला ‘सूर्या’ वाघ खऱ्या अर्थाने रमला तो ‘फेरी’ नावाच्या वाघिणीसोबत. ही वाघीण या अभयारण्याच्या कुही वनपरिक्षेत्रात आहे. या क्षेत्रात ‘सूर्या’ आणि ‘फेरी’ ही जोडी पर्यटकांना कायम आकर्षित करत आहे. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील ‘मटकासुर’ या वाघाचे जबरदस्त जीन्स घेऊन आलेल्या ‘सूर्या’ने ‘फेरी’सोबत संसार थाटल्यावर या वाघिणीने पाच पिल्लांना जन्म दिला.

वाघांच्या आयुष्यात पाच पिल्ले होणे ही अनोखी घटना समजली जाते. सर्वसाधारणपणे दोन ते चार पिल्ले होतात; पण या जोडप्याला पाच पिल्ले झाली आणि ही पिल्ले ‘फेरी’ने सूर्याच्या छायाछत्रात यशस्वीपणे मोठीही केली. यानंतर पुन्हा ‘सूर्या’पासून तिला चार पिल्ले झाली आहेत. आज ही पिल्ले ‘फेरी’सोबत कुही परिक्षेत्रात बघायला मिळतात.

उमरेड अभयारण्यातील कुही तसेच उमरेड वनपरिक्षेत्रात ‘सूर्या’ने जम बसवला. या जंगलातील तिसऱ्या वनपरिक्षेत्रात म्हणजे पवनीमध्ये मात्र त्याला वर्चस्व गाजवता आले नाही. पवनीच्या काही भागात तो येऊन गेला, पण तेथे त्याला फारसे यश मिळाले नाही.

आज ‘सूर्या’ आपले राज्य टिकवून आहे. मध्यंतरी ‘सावकार’ नावाच्या एका नर वाघाने त्याच्या हद्दीत घुसखोरी केली होती. यावेळी या दोघांची लढाई झाल्याचे तेथील गाईड आणि पर्यटक सांगतात. ‘सूर्या’ या लढाईत जखमीही झाला होता; पण काही दिवसानंतर ‘सावकार’ जखमी होऊन मृत्यू झाल्याचे समोर आले.

माझी आणि ‘सूर्या’ची कुहीच्या क्षेत्रात एकदाच ओझरती भेट झाली. मला त्याचे चांगले छायाचित्र काही टिपता आले नाही. केवळ दुसऱ्यांनी काढलेल्या सुंदर छायाचित्रावरच मला समाधान मानावे लागले आहे. थेट पर्यटकांकडे बघणारा, आपल्या वडिलांची काहीशी छबी असणारा, गळ्याकडील भागात फुललेले केस असणारा सूर्या मला कमालीचा भावला आहे.

काही वेळा मला तो शूर योद्ध्यासारखा भासतो तर कधी कधी मला तो दाक्षिणात्य चित्रपटातील व्हीलनही वाटतो. मात्र त्याची प्रिय सखी ‘फेरी’च्या दर्शनाने मात्र मी कमालीचा सुखावलो आहे. पुढच्या भागात आपण या ‘फेरी’बद्दल बोलूया.

(उत्तरार्ध)

(लेखक निसर्ग अभ्यासक आहेत.)

sanjay.karkare@gmail.com

छायाचित्रे : गजेंद्र बावणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis: ''मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत मी नाही'', देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान; तावडेंच्या भूमिकेनंतर स्पष्टच बोलले

'प्रेमाची गोष्ट' मालिकेतून लोकप्रिय अभिनेत्याची अचानक एक्झिट; आता 'हा' अभिनेता साकारणार भूमिका

Uddhav Thackeray Mumbai: ठाकरेंचा गड खालसा करण्यात येणार का भाजपला यश? मोदी शहांसह डझनभर मंत्री मुंबईत

Devendra fadnavis: योगींच्या 'बटेंगे तो कटेंगे'ला देवेंद्र फडणवीसांचे समर्थन, म्हणाले- हा तर देशाचा इतिहास

Latest Maharashtra News Updates : पवारांसोबत जाण्याची वेळ येणार नाही, महायुतीला बहुमत मिळेल-एकनाथ शिंदे

SCROLL FOR NEXT