Tiger sakal
सप्तरंग

‘माया’ची आई ‘लीला’

२००८ च्या एप्रिलमध्ये ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील राहण्याची असलेली सर्व ठिकाणे बंद करण्यात आली. त्यानंतर नागपूरच्या पर्यटकांसाठी जवळचे असणारे व्याघ्र प्रकल्पाचे कोलारा प्रवेशद्वार सुरू झाले.

अवतरण टीम

- संजय करकरे

२००८ च्या एप्रिलमध्ये ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील राहण्याची असलेली सर्व ठिकाणे बंद करण्यात आली. त्यानंतर नागपूरच्या पर्यटकांसाठी जवळचे असणारे व्याघ्र प्रकल्पाचे कोलारा प्रवेशद्वार सुरू झाले. टप्प्याटप्प्याने जंगलात प्रवेश करणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढत गेली. वाघांची संख्याही वाढली. व्याघ्रदर्शन सहजतेने होऊ लागले. ‘पांढरपवनी फिमेल’ अर्थात ‘लीला’ वाघिणीचा काळ त्याच सुमाराचा आहे. ‘लीला’ सातत्याने पर्यटकांना दर्शन देत असे. तिचा काळ २०१० ते २०१२ असा अल्पच राहिला; परंतु त्यातही ती पर्यटकांच्या गळ्यातील ताईत बनली होती.

ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील ते दिवस कमालीचे वेगळे होते. पर्यटकांच्या भरमसाट जिप्सी नव्हत्या. वाघांची संख्या मर्यादित होती. जंगलातील व्याघ्र दर्शनाचा काळ साधारण मार्चनंतरच सुरू व्हायचा. उन्हाळ्यात रस्त्याच्या कडेला असलेल्या सिमेंटच्या बशीच्या आकाराच्या पाणवठ्याच्या जवळ वाघ दिसायचे. पावसाळा आणि हिवाळ्यात जंगल जरी सुरू असले, तरी त्या दिवसात वाघ फारच कमी दिसायचे.

सकाळी मोहर्लीच्या मुख्य प्रवेशद्वारातून जंगलात आल्यावर खातोडा गेट पार करून ताडोबा परिक्षेत्रात प्रवेश व्हायचा. मोहर्ली ते खातोडापर्यंत सहसा व्याघ्रदर्शन क्वचितच व्हायचे. खातोडानंतर मात्र प्रत्येक जण  गाडीच्या खिडकीतून बाहेर डोकावण्याचा प्रयत्न करायचे. सकाळी सहा वाजता जंगलात प्रवेश केल्यानंतर दहा वाजेपर्यंत भ्रमंती व्हायची. त्यानंतर ताडोबाच्या कॅन्टीनमध्ये जाऊन नाश्ता, जेवण अथवा सोबत आणलेल्या डब्यांचा आस्वाद घेतला जायचा.

दुपारी तीन वाजता पुन्हा जंगलात प्रवेश करून सायंकाळी बाहेर पडता यायचे. ज्यांचे राहण्याचे आरक्षण असायचे त्यांना ताडोबा तलावाच्या शेजारी असलेल्या डॉरमेट्री, जिप्सी हट, चितळ शेड अथवा व्हीआयपी विश्रामगृह अशी मोजक्याच ठिकाणी प्रवेश मिळायचा. जंगलाच्या आत राहण्याचा, जंगल अनुभवायचा एक कमालीचा आगळावेगळा आनंद देणारा तो काळ होता.

२००८ च्या एप्रिल महिन्यात ताडोबातील राहण्याची असलेली सर्व ठिकाणे बंद करण्यात आली. मोहर्ली येथूनच सकाळी प्रवेश घेणे, फिरणे आणि दहा वाजेपर्यंत जंगलाच्या बाहेर पडणे, दुपारी परत जंगलात प्रवेश करून सायंकाळी बाहेर जाणे असा दिनक्रम सुरू झाला. त्यानंतर नागपूरच्या पर्यटकांसाठी जवळचे असणारे व्याघ्र प्रकल्पाचे कोलारा प्रवेशद्वार सुरू झाले.

टप्प्याटप्प्याने जंगलात प्रवेश करणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढत गेली. वाघांची संख्याही वाढली. व्याघ्रदर्शन सहजतेने होऊ लागले. ताडोबाची ख्याती सातासमुद्रापार गेली. महत्त्वाचे म्हणजे, त्या वेळेस ताडोबाचे जंगल फिरण्यासाठी खिशाला परवडणारे होते.

आज मी ज्या वाघिणीची गोष्ट सांगणार आहे तिचा काळ त्याच सुमाराचा  आहे. मला आठवते, २०१० च्या डिसेंबरमधील शेवटचा आठवडा होता. कोलारा येथील छावा रिसॉर्टचे नुकतेच उद्‍घाटन झाले होते. या रिसॉर्टमध्ये आमचे रत्नागिरीचे एक सर मुक्कामाला आले होते. सायंकाळच्या फेरीत मी सरांसोबत जंगलात प्रवेश केला. त्या वेळेस जंगलात खासगी गाड्या नेण्यास मुभा होती.

साहजिकच नागपूरहून भाड्याने आणलेल्या एका गाडीतून आम्ही जंगलात फिरत होतो. हिवाळ्याचे दिवस असल्याने जंगल खूपच छान वाटत होते. ताडोबा तलाव, जामुनझोरा, पांढरपवनी इत्यादी नेहमीची ठिकाणे बघून आमची ‘तवेरा’ गाडी काळा आंबा रस्त्याला लागली तेव्हा सायंकाळचे पाच वाजले होते. दिवस लहान असल्याने सूर्य मावळतीला कलला होता. उंच साग, आईन झाडातून एक तिरपा कवडसा गाडीवर पडत होता.

काळा आंबा पाणवठा येण्याच्या अलीकडेच रस्त्यावरून दूरवरून काहीतरी चालत येत असल्याचे माझ्या लक्षात आले. मी ड्रायव्हरच्या बाजूला बसलो असल्याने त्याला गाडी थांबवायला सांगितले. काही क्षणातच रस्त्यावरून वाघ आमच्याच दिशेने येत असल्याचे माझ्या लक्षात आले. वाघ बघितल्यानंतर गाडीतील सर्व जण थरारून गेले. जंगलात पहिल्यांदाच ते वाघ बघत होते.

आमची एकटीच गाडी रस्त्यावर होती. वाघ निवांतपणे चालत आमच्या दिशेने आला. तो जसजसा जवळ येऊ लागला तसा जंगलात पहिल्यांदाच आलेला गाडीचा चालक अस्वस्थ झाला. त्याने घाबरून त्याच्या बाजूची खिडकीची काच वर ओढून बंद केली. मी गाडीच्या बाहेर खिडकीतून डोकावत वाघाची छबी टिपण्याचा प्रयत्न करत होतो. वाघ जवळ आल्यानंतर आम्ही गाडी आणखी मागे घेतल्यानंतरही तो निवांतपणे आमच्या दिशेने चालत होता.

आम्ही गाडी ५० फुटांपेक्षा मागे घेऊनही तो रस्ता सोडायला तयार नव्हता. इतक्यात मागून एक वाहन येऊ लागल्यानंतर वाघ विचलित झाला आणि रस्त्याच्या डाव्या बाजूला फायर लाईनवर शिरून जंगलात दिसेनासा झाला. ती एक वाघीण होती. पांढरपवनी परिसरात दिसणारी ती वाघीण होती. तिला ‘पांढरपवनी फिमेल’ म्हटले जात असे. काही जणांनी तिला ‘लीला’ असे नाव दिले होते.

तो काळ असा होता की वाघांना फारशी नावे दिली जात नसत. त्या वेळी सरसकट वाघ दिसत नसल्याने गाईडही त्यांना नाव देत नसे. काही मोजक्याच आणि सातत्याने दिसणाऱ्या वाघांना त्यांचा स्वभाव, शरीरावरील पट्ट्यानुसार नावे देण्यात आली होती. त्या वेळी या वाघिणीचा एक सोबती पांढरपवनीच्या परिसरात दिसत असे. त्याच्या चेहऱ्यावरील काळ्या रेघांमुळे त्याला ‘डब्ल्यू’ नावाने संबोधले जात होते.

मी या नर वाघाला पांढरपवनी तलावाच्या बांधावर दूरवरूनच बघितले होते. एकदा तो दाट झाडीत पहुडलेला होता. त्याची सोबती ‘लीला’ मात्र सातत्याने या परिसरात पर्यटकांना दर्शन देत असे. २०११ च्या एप्रिल महिन्यात आंबेपाट नावाच्या पाणवठ्यावर भरदुपारी, तापलेल्या उन्हात मी या वाघिणीला पुन्हा खूपच जवळून बघितले. रस्त्यापासून आत असलेल्या या पाणवठ्यावर जाणे गाड्यांना खूपच अवघड आहे. दोन-तीन गाड्या तिथे थांबल्या होत्या.

पाणवठ्याजवळ पाणी प्यायला येणारे अनेक पक्षी आम्ही बघत असतानाच मागच्या बाजूने भेकराने जोरदार अलार्म कॉल केला. बंद गाडीत घामाने थपथपत असतानाच अचानक उजव्या बाजूने हीच वाघीण बेधडकपणे कोणाची तमा न बाळगता पाण्यावर उतरली. पाणी पिण्याच्या अगोदर शांतपणे तिने गाड्यांकडे एक नजर वळवली. त्यानंतर हळूच पाण्यात उतरली.

सर्वप्रथम ती पाण्यात बसली. त्यानंतर निवांतपणे आमच्याकडे नजर रोखत साधारण सात मिनिटे जिभेने लपलप करत पाणी पीत राहिली. या वेळेस मला तिच्या चेहऱ्याचा क्लोजअप फोटो टिपता आला. १२ मिनिटे ती आमच्या समोर पाणी पीत राहिली. ज्या वेगाने ती आमच्या समोरच्या रंगमंचावर अवतरली होती त्याच गतीने तिने एक्झिटही घेतली.

‘लीला’ वाघिणीची आई ताडोबातील सुप्रसिद्ध ‘पूछकटी’ किंवा ‘कॅटरिना’ होती. ‘कॅटरिना’ वाघिणीने २००७ ते २००९ पर्यंत मोठी धमाल उडवून दिली होती. तिला असलेल्या दोन पिल्लांपैकी एक पिल्लू म्हणजे ही पांढरपवनीची वाघीण ‘लीला’. २०१० च्या सुमारास ‘डब्ल्यू’ नावाच्या नरापासून ‘लीला’ला चार पिल्ले झाली. त्या पिल्लांचे ‘माया’, ‘छाया’ ‘लता’ आणि ‘पांडू’ असे नामकरण केले गेले होते. चेहऱ्यावर ‘एम’ आकाराचा पट्टा असल्याने ‘माया’ नाव पडले.

‘पांडू’ हे नाव नर पिल्लाला त्याच्या घाबरट स्वभावामुळे गाईडनी दिले होते. गाड्या दिसल्यानंतर तो पटकन तेथून पळून जात असे. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील पांढरपवनीचा हा सर्व परिसर सर्वाधिक पर्यटकांचा आवडता आहे. भरपूर पाणी व चितळ, सांबर, रानडुक्कर व अन्य प्राणी यांची चांगली संख्या असल्याने ताडोबामध्ये येणारा प्रत्येक पर्यटक या परिसराला भेट देतोच.

साहजिकच त्या परिसरात दिसणारे वाघ सर्वाधिक प्रसिद्ध झालेले आपल्याला लक्षात येईल. त्याच सुमारास ‘लीला’ वाघीण प्रसिद्ध झाली. तिला झालेल्या चार पिल्लांपैकी ‘माया’ वगळता बाकीच्यांचे पुढे काय झाले याची माहिती उपलब्ध नाही. त्या पिल्लांपैकी ‘माया’ वाघिणीने ताडोबाच्या इतिहासात मात्र एक दशक गाजवले.

‘लीला’ वाघिणीचा काळ २०१० ते २०१२ असा अल्पच राहिला. त्या वेळेस पर्यटकांच्या गळ्यातील ताईत बनलेल्या ‘लीला’ वाघिणीचा अंत २०१२ च्या ऑक्टोबर महिन्यात झाला. १ ऑक्टोबरला जंगल पर्यटकांसाठी खुले झाल्यावर पहिल्याच आठवड्यात वाघई नाल्यातील पाण्यात तिचा मृतदेह सापडला. पर्यटकांनी ही माहिती प्रशासनाला दिल्यानंतर तिचे शवविच्छेदन झाले.

त्या वेळेस ती गर्भवती होती व तिच्या पोटात चार पिल्ले होती. सर्पदंशामुळे तिचा मृत्यू झाल्याचे शवविच्छेदन अहवालातून पुढे आले. तिच्या मृत्यूनंतर अल्पावधीतच तिची मुलगी ‘माया’ने आपल्या आईच्या क्षेत्रात बस्तान बसवले. त्यानंतरचे पुढचे दशक ‘मायाजाल’ने व्यापलेले आपल्या लक्षात येईल.

sanjay.karkare@gmail.com

(लेखक निसर्ग अभ्यासक आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT