Tiger Rudar sakal
सप्तरंग

सौम्य ‘रुद्र’

आपल्या आजच्या कथेच्या नायकाचे नाव आहे, ‘रुद्रा’... ‘रुद्रा’ मोठा होत गेला तसा त्याच्या स्वभावातील बेधडकपणा आणि आव्हाने स्वीकारण्याचे कसब समोर येऊ लागले.

अवतरण टीम

- संजय करकरे

आपल्या आजच्या कथेच्या नायकाचे नाव आहे, ‘रुद्रा’... ‘रुद्रा’ मोठा होत गेला तसा त्याच्या स्वभावातील बेधडकपणा आणि आव्हाने स्वीकारण्याचे कसब समोर येऊ लागले. तो साधारण आठ वर्षांचा असावा. सध्या तो ऐन तारुण्यात आणि जोमात आहे. चांगलाच भारदस्त आहे... ताकदवान आहे. मात्र, ज्या पतीने तो आपली जागा सोडत आहे ते सारे अकल्पित आहे. जवळपास ताडोबाचे जंगल त्याने बऱ्यापैकी पालथे घातले आहे. ऐन तारुण्यातील त्याची पायपीट पाहून एक कोडेच पडते.

ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील कोळसा रेंजमधील सुप्रसिद्ध ‘शिवणझरी’ वाघिणीच्या पोटी २०१६ मध्ये ‘त्या’चा जन्म झाला. व्याघ्र प्रकल्पाच्या दप्तरी तो ‘टी १०३’ नावाने ओळखला जातो. ‘शिवणझरी’ला चार पिल्ले होती. त्यात तीन नर व एक मादी होती. तीन नरांपैकी दोघांनी आपले साम्राज्य निर्माण केले. कोळसा रेंजमधून मोहर्ली आणि नंतर ताडोबामध्ये दाखल झालेला आजच्या गोष्टीतील आपला वाघ केवळ दोन वर्षे आपले अस्तित्व टिकवून होता.

नर वाघांच्या साम्राज्यात जो ताकदवान, बलवान राहील तो आपले वर्चस्व निर्माण करील, असे गणित आहे. मात्र, आपल्या कथानायकाला एका ठिकाणी स्थिर होण्याची फारशी संधीच मिळाली नाही. सुप्रसिद्ध ‘माया’ वाघिणीच्या एकमेव पिल्लाला मारल्यामुळे तो कुप्रसिद्ध झाला.

आपल्या कथेचा नायक असलेल्या या वाघाचे नाव आहे ‘रुद्रा’. नावाप्रमाणेच तो काहीसा रुद्र दिसतो. बलदंड शरीरयष्टी, भक्कम पंजा व काहीसा काळसर रंगाचा चेहरा असलेला ‘रुद्रा’ ताडोबाच्या रेंजमध्ये काही काळच आपले अस्तित्व टिकवून होता. या परिसरात सातत्याने नर वाघांच्या धुमश्चक्रीत त्यालाही हे मैदान येथून सोडावे लागले. त्याहून अधिक ताकदवान असणारे वाघ या क्षेत्रात असल्याने त्याला ताडोबातून बाहेर पडावे लागले.  आता ‘रुद्रा’ वाघ व्याघ्र प्रकल्पाच्या मामला बफर जंगलात असल्याचे सांगितले जाते.

‘शिवणझरी’ वाघिणी प्रसिद्ध असल्याने ती कोळसा परिसरात आपल्या पिल्लांसह कायम पर्यटकांना दर्शन देत असे. साहजिकच पिल्लांनाही पर्यटकांची सवय झालेली होती. ‘रुद्रा’ जसजसा मोठा होऊ लागला तसा त्याच्या स्वभावातील बेधडकपणा आणि आव्हाने स्वीकारण्याचे कसब समोर येऊ लागले. कोळसा परिसरात गव्याच्या मागे धावत असतानाही अनेक पर्यटकांनी त्याला पाहिले आहे.

‘रुद्रा’चा भाऊ ‘ताला’... दोघेही वयात आल्यावर आपले अस्तित्व निर्माण करायला धडपडत होते. हे दोघेही नर आईपासून स्वतंत्र झाल्यावर त्यांनी कोळसा क्षेत्राला लागूनच असलेल्या मोहर्ली वनपरिक्षेत्रात प्रवेश केला. ताज्या दमाचे हे नर मग आपले अस्तित्व दाखवायला लागले. मात्र त्या परिसरात असणाऱ्या अधिक अनुभवी वाघांनी त्यांना या क्षेत्रात स्थिरावू दिले नाही.

साहजिकच यानंतर दोन्ही वाघांनी ताडोबा तसेच कोलारा बफर क्षेत्रात कसाबसा प्रवेश करून आपले अस्तित्व टिकवण्याचा प्रयत्न सुरू केला. या सुमारासच या दोघांनीही आपले स्वतंत्र अस्तित्व निर्माण केले. आपल्या कथेचा नायक ‘रुद्रा’ यानंतर ताडोबाच्या कोअर क्षेत्रात हळूहळू शिरला. साधारणतः २०२० च्या सुमारास त्याने ताडोबामध्ये जम बसवण्यास सुरुवात केली.

या परिसरात त्या वेळेस ताकदवान आणि वर्चस्व असणाऱ्या ‘मटकासूर’ वाघाला आव्हान देऊन त्याने आपले क्षेत्र निर्माण केले. या वेळेस ‘रुद्रा’ने ‘छोटी तारा’ वाघिणीसोबत मिलन करून पिल्लांनाही जन्म दिला. त्याच सुमारास त्याचा भाऊ ‘ताला’नेही जवळच्या क्षेत्रातच आपले स्थान निर्माण केले होते. ‘ताला’ने ‘माया’ वाघिणीसोबत मिलन करून आपला संसारही थाटला होता.

हे दोन बंधू आपापले क्षेत्र सांभाळून ताडोबाच्या कोअर क्षेत्रामध्ये पर्यटकांना हमखास दर्शन देत होते. साधारण २०२० पासून गेल्या वर्षीपर्यंत यांचे अस्तित्व ताडोबाच्या पर्यटन क्षेत्रात होते. त्यानंतर आपला नायक ‘रुद्रा’ येथे आलेल्या दुसऱ्या नर वाघामुळे परागंदा झाला.

गेल्या वर्षीचा फेब्रुवारी महिना होता. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात जिल्हा परिषदेच्या शाळेच्या विद्यार्थ्यांच्या जंगल फेऱ्या सुरू होत्या. बफर क्षेत्रात राहणाऱ्या या विद्यार्थ्यांना आमच्यामार्फत ताडोबा प्रकल्पाची सफारी घडविण्यात येत होती. त्यासाठी व्याघ्र प्रकल्पाने सातत्याने आम्हाला सहकार्य केले आहे. व्याघ्र प्रकल्पाच्या दोन मिनी बस खास विद्यार्थ्यांना राखून ठेवण्यात आल्या होत्या.

त्यामुळे गेल्या वर्षी तीन हजारांहून स्थानिक विद्यार्थ्यांना आमच्यामार्फत या जगप्रसिद्ध व्याघ्र प्रकल्पात भ्रमंती करता आली. मिनी बसमधून भ्रमंती करत असताना सकाळच्या फेरीत ९७ क्रमांकाच्या पाणवठ्यावर काही गाड्यांना ‘रुद्रा’चे दर्शन झाले होते. साहजिकच या मिनीबसचे चालक संदीप व सूरज यांनी दुपारच्या फेरीत आपल्या गाड्या या पाणवठ्याकडे घेतल्या होत्या.

त्या दिवशी जंगलात गाड्या कमी असल्याने आमच्या दोन्ही मिनीबस पाणवठ्यावर थांबून होत्या. अचानक भेकरचा अलार्म कॉल झाला आणि डाव्या बाजूच्या बांबूंतून  मोठा वाघ पाण्यावर आला. मिनीबसकडे बघतच काहीशी नाराजी व्यक्त करत त्याने पाण्यात प्रवेश केला. सुरुवातीला गुडघ्याभर पाण्यात थांबून तो मनसोक्त पाणी प्यायला. त्यानंतर आरामात पाण्यात बसला.

पाण्यात बसलेला असतानाही त्याचे संपूर्ण लक्ष आमच्या दोन्ही गाड्यांकडे होते. काही मिनिटांतच झटक्यात पाण्यातून बाहेर पडून तो जवळच्याच बांबूमध्ये शिरून गायबही झाला. एवढा मोठा व दांडगा वाघ जवळून पाहून सर्व शाळकरी मुले थरारून गेली होती. त्यांच्या प्रतिक्रिया कमालीच्याच होत्या. मुलांचा आवाज वाढू लागल्यावर आम्ही गाड्या तिथून बाहेर काढल्या. नंतरच्या फेऱ्यांतही याच वाघाने पुन्हा एकदा दर्शन दिले.

या वेळेस रस्त्याच्या कडेला फायर लाईनजवळील एका झाडाचा वास घेत तो थांबला होता. कदाचित मादीने या झाडावर आपली ‘हद्द’ केल्याने त्याचा वास घेऊन तो तेथे उभा होता. वास घेऊन झाल्यावर ‘रुद्रा’ने आपली मोठी जीभ बाहेर काढून ‘फ्लेमेन डिस्प्ले’ केला. वाघ अन्य वाघाचा अथवा वाघिणीच्या मूत्राचा वास घेतल्यावर अशा पद्धतीने आपला चेहरा करतो. हा वास झाडावर, झुडपांवर असतो.

वाघ तोंड आ वासून, खालच्या दोन दातांमधून आपली जीभ बाहेर काढून मदगंध घेत असतो. या प्रक्रियेत त्याला मादी माजावर आली किंवा नाही याचा अंदाज येतो. नर तसेच मादी वाघ असा चेहरा करून प्रतिक्रिया देतात. मार्जार, श्वान तसेच अनेक पाळीव प्राण्यांमध्येही या पद्धतीचा अवलंब केल्याचे बघायला मिळते. या काळातच ‘ताला’पासून ‘माया’ला पिल्ले झाली होती. मात्र सुरुवातीपासून एकच पिल्लू ‘माया’सोबत दिसत होते.

ते एकमेव पिल्लू ताडोबातील अनेक पर्यटकांनी आपल्या कॅमेऱ्यात चित्रबद्ध केले होते. ‘माया’ आणि या लहान पिल्लाचा खेळ, त्याची आईसोबत असणारी लगट अत्यंत मनमोहक अशीच होती. या ‘माया’च्या क्षेत्रातच ‘रुद्रा’चाही वावर असल्याने ती सातत्याने आपल्या या एकमेव पिल्लाला वाचवण्यासाठी धडपड करत होती. ताडोबा तलावाच्या मागच्या बाजूला तसेच ताडोबा कॉलनीच्या परिसरातच आपल्या पिल्लाला घेऊन ती अधिक काळ व्यतीत करत होती.

साधारण गेल्या वर्षी मार्चपर्यंत हे सुरू होते. त्यानंतर मात्र ‘माया’चे हे एकमेव पिल्लूही दिसेनासे झाले. असे सांगितले जाते, की एप्रिलच्या सुमारास ‘रुद्रा’ने या पिल्लाला मारले असावे. कारण त्यानंतर काही काळ त्याने ‘माया’शी सलगी वाढविण्याचा प्रयत्न केला. पर्यटकांनी दोघांनाही एकत्रित बघितले होते. उन्हाळ्यानंतर पावसाळ्यात पर्यटनाचा हंगाम संपल्यावर ‘रुद्रा’ या परिसरातून गायब झाला.

या परिसरात ‘मोगली’ नावाचा चांगलाच बलदंड वाघ दाखल झाल्याचे गाईड सांगतात आणि ‘रुद्रा’ तिथून निघून गेला. ‘रुद्रा’ नेमका कुठे गेला, हे पावसाळ्यात स्पष्ट होत नव्हते. मात्र, ताडोबा व मोहर्ली कोअर क्षेत्र पार करून तो आगरझरी तसेच मामला बफर क्षेत्रात दिसू लागला.

मामला येथील गाईड सुनील रोडावर सांगतो, की २१ तसेच २२ नोव्हेंबरला आम्हाला अचानक एक नर वाघ आमच्या क्षेत्रात दिसून आला. त्या दिवशी मी दुपारच्या सफारीवर होतो. आमच्या जंगलात ‘ज्युनियर बजरंग’ आणि ‘गौरी’ नावाची वाघीण आहे. ते ज्या ठिकाणी दिसतात तिथे मी पर्यटकांना घेऊन फिरत होतो. रस्त्याच्या कडेला जंगलात आतल्या बाजूला एक वाघ झोपलेला दिसला.

काही वेळानंतर तो उठून रस्त्यावर चालू लागला. पुढे गेल्यावर त्याने झाडाचा वास घेत ‘फ्लेमेन डिस्प्ले’ केला. हा वाघ नंतर आम्हाला ‘रुद्रा’ असल्याचे कळले. यापूर्वी कधीही तो आमच्या क्षेत्रात दिसला नव्हता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मैनापूर रस्त्यावर खडीचा नाला आहे तिथेही याच वाघाचे पुन्हा दर्शन झाले. या ठिकाणी त्याने पाळीव जनावर मारले होते. त्यामुळे सलग तीन-चार दिवस त्याचे दर्शन या परिसरात झाले.

त्यानंतर मात्र पुन्हा हा वाघ अद्याप दिसला नाही. आमच्याच जंगलातील मसाळ कुटी, वरवट कुटी तसेच आगरझरी पट्ट्यातील जो भाग आहे त्या भागात ‘रुद्रा’चे अस्तित्व असावे, असे वाटते. अलीकडेच गावकऱ्यांना एक मोठा नर वाघ पर्यटन क्षेत्राच्या बाहेर दिसल्याची माहिती आहे. कदाचित तो हाच वाघ असावा, असेही सुनील म्हणाला. ‘रुद्रा’चे वय आता साधारण आठ वर्षांचे असावे.

हा वाघ सध्या ऐन तारुण्यात आणि जोमात आहे. तो चांगला भारदस्त आहे. ताकदवान आहे. मात्र, ज्या पद्धतीने तो सर्वत्र फिरत आहे, जागा सोडत आहे ते अकल्पित आहे. दुसऱ्या नर वाघाशी तो फार पंगा घेत नाही. कोळसा परिसरातील जंगलातून सुरू झालेला त्याचा प्रवास मोहर्ली, ताडोबा या क्षेत्रातून कोलारा, आगरीझरी आणि मामला परिसरात होत गेलाय.

म्हणजेच जवळपास ताडोबाचे जंगल त्याने बऱ्यापैकी पालथे घातले आहे. ऐन तारुण्यात त्याला ही पायपीट का करावी लागते, हे मला पडलेले कोडे आहे. या ‘रुद्रा’चा रुद्रावतार कधीही अन्य नर वाघांसोबत दिसला नाही. मला तो कायम सौम्यच वाटत आहे. प्रत्येक वेळेस कदाचित अन्य वाघांसमोर त्याला माघार घ्यावी लागली असावी, असे वाटते.

sanjay.karkare@gmail.com

(लेखक निसर्ग अभ्यासक आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: निकालाचे कौल मानण्यास संजय राऊतांचा नकार

IND vs AUS: 'मी तुझ्यापेक्षा फास्ट बॉलिंग करतो...', मिचेल स्टार्कची हर्षित राणाविरुद्ध स्लेजिंग; पाहा Video

Maharashtra Assembly Election 2024 : शिवसेना अन् राष्ट्रवादी नक्की कुणाची? निवडणूक आयोग, विधानसभा अध्यक्षानंतर आता जनतेचा फैसला

Election Results 2024: खरी राष्ट्रवादी कुणाची आज महाराष्ट्र ठरवणार! आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार शरद कोण आघाडीवर?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मनसेला बसणार धक्का? एकमेव आमदार राजू पाटील पिछाडीवर

SCROLL FOR NEXT