Tiger sakal
सप्तरंग

बलवान ‘छोटा मटका’

२०१६ मध्ये छोटी ताराला ‘मटकासुर’पासून दोन पिल्ले झाली. तो काळ ‘मटकासुर’ या अतिशय प्रसिद्ध आणि पर्यटकांना आकर्षित करणाऱ्या वाघाचा होता.

अवतरण टीम

- संजय करकरे

२०१६ मध्ये छोटी ताराला ‘मटकासुर’पासून दोन पिल्ले झाली. तो काळ ‘मटकासुर’ या अतिशय प्रसिद्ध आणि पर्यटकांना आकर्षित करणाऱ्या वाघाचा होता. ‘मटकासुर’चा बछडा म्हणून त्याचे नाव ‘छोटा मटका’ आणि दुसऱ्याचे ‘छोटी तारा’चे पिल्लू म्हणून ‘ताराचंद’ असे दिले गेले. ‘मटकासुर’, ‘छोटी तारा’ आणि त्यांची दोन बोल्ड नर पिल्ले २०१६ ते २०१८ पर्यंत पर्यटकांच्या गळ्यातील ताईत बनली होती. दरम्यान ‘ताराचंद’चा अपघाती मृत्यू झाला. त्यानंतर ‘छोटा मटका’ने आपल्या बलवानपणाचे दर्शन वेळोवेळी पर्यटकांना दाखवले...

बऱ्याच वेळा एखाद्या व्यक्तीचे नाव वेगळे असते; पण ती समोर आल्यावर त्या नावाचा आणि तिच्या व्यक्तिमत्त्वाचा काहीही संबंध नसल्याचे जाणवते. म्हणजेच नावानुसार जी प्रतिमा आपण आपल्या मनात निर्माण करतो त्याला छेद देणारे, त्याचे व्यक्तिमत्त्व असू शकते. आज ज्या वाघाबद्दल जाणून घेणार आहोत त्याच्या नावाची आणि त्याच्या व्यक्तिमत्त्वाची अशीच गल्लत होऊ शकते.

अनेक वाघांना अशी नावे मिळाली आहेत, की जी त्यांची व्यक्तिमत्त्वे, त्यांचा आकार आणि भारदस्तपणाला छेद देतात. माझ्या नजरेसमोर आता दोन वाघांची उदाहरणे आहेत. पहिला म्हणजे, कान्हा व्याघ्र प्रकल्पातील ‘मुन्ना’ नर वाघ. आपण त्याच्या नावावर गेलो तर एखादा लहान चणीचा, नाजूक असा वाघ आपल्या नजरेसमोर येईल. प्रत्यक्ष बघितले तर त्याचा जबरदस्त आकार आणि भारदस्तपणा त्याच्या नावाला पूर्णपणे छेद देणारा आहे.

असाच दुसरा वाघ म्हणजे ‘छोटा मटका’, जो आजच्या कथेचा नायक आहे. भले याचे नाव ‘छोटा’ असेल, तरीही प्रचंड भारदस्त शरीर, रुंद खांदे, समोरील पायांचा जाडा पंजा असा की, एका फटक्यात आपल्या शिकारीला तो सहज लोळवू शकेल... छोटा या शब्दाशी आणि या वाघाच्या शरीराची तुलना करणे गैरच ठरेल. हा भारदस्तपणा त्याला त्याच्या वडिलांकडून मिळाला आहे. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील सुप्रसिद्ध ‘मटकासुर’ या वाघाचा तो वंशज आहे.

‘छोटी तारा’ आणि ‘मटकासुर’ यांच्या पोटी जन्मलेला हा ‘छोटा मटका’. २०१६ मध्ये ‘छोटी तारा’ला दोन पिल्ले झाली. दोन्ही नर. हा काळ ‘मटकासुर’ या अतिशय प्रसिद्ध आणि पर्यटकांना आकर्षित करणाऱ्या वाघाचा होता. साहजिकच ‘मटकासुर’ आणि ‘छोटी तारा’ अन् त्यांची दोन नर पिल्ले २०१६ ते २०१८ पर्यंत पर्यटकांच्या गळ्यातील ताईत बनली होती.

या वाघांचे क्षेत्र ‘माया’ या सुप्रसिद्ध वाघिणीला लागूनच असल्याने आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ‘मटकासुर’ आणि ‘माया’ यांचा संसार व्यवस्थित सुरू असल्यामुळे प्रत्येक जण आपापली हद्द सांभाळून राहत होता.

‘छोटा मटका’ व्याघ्र प्रकल्पाच्या दप्तरी T १२६ या नावाने ओळखला जातो. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील ताडोबा वनपरिक्षेत्रातील जामनी परिसरात ‘छोटी तारा’ने या दोघांना मोठे केले. खासकरून जामनी तलावाच्या परिसरात तसेच अंधारी नदीच्या सुरू होणाऱ्या सांडव्यावर या दोघांना हजारो पर्यटकांनी बघितले आहे.

हे दोघेही मोठे होत गेले तसतसे त्यांनी आपले क्षेत्र ताडोबा तलावापर्यंत म्हणजेच आपल्या वडिलांच्या हद्दीपर्यंत मिळवले होते. मी या दोघाही भावांना जामनी तलावाच्या परिसरात शिकार करताना, चितळांच्या मागे धावताना, सांबराच्या पिल्लाला पकडण्याचा अयशस्वी प्रयत्न करताना बघितले आहे.

२०१८ च्या हिवाळ्यातील गोष्ट. जामनी तलावात चितळाच्या कळपामागे धावणारे हे दोघेही खरे तर तेव्हा १३ ते १४ महिन्यांचे होते; तरीही दुरून ते पूर्ण वाढ झालेले वाघ वाटत होते. केवळ त्यांच्या लहान चेहऱ्याकडे बघून त्यातील अल्लडपणा आणि कमी वय दिसायचे. मात्र, इतक्या लहान वयात हे दोघेही स्वतंत्रपणे शिकार करण्यास तयार झाले होते. साधारण अर्ध्या तासात खाली बसून केवळ तीन ते चार फूट पुढे सरकत, गवताचा आधार घेत ते चितळाच्या कळपाकडे सरकले होते.

मात्र, अचानक तलावाच्या एका बाजूने, त्यांची आई चालत आल्यामुळे चितळांचा कळप जोरदार अलार्म कॉल करून पळून गेला. हिवाळ्यामध्ये या दोघांना ताडोबा तलावातील पाण्यात निवांत पहुडलेले बघितले होते. तलावाच्या काठावर असलेल्या जांभळाच्या झाडाच्या बुडाशी हे दोघेही वाघ निवांत बसले होते. पर्यटकांच्या गाड्या संपूर्ण रस्त्यावर लागलेल्या होत्या. एवढ्या गर्दीचा व गोंधळाचा या दोघांवर काहीही परिणाम होत नव्हता. या वेळी या दोघांच्याही गळ्यात रेडिओ कॉलर लावलेली होती.

वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने वाघांचा अभ्यास करण्यासाठी जो प्रकल्प सुरू केला होता त्यात या दोघा वाघांचा समावेश होता. नर वाघ आपल्या हद्दीतून बाहेर पडून कुठे जातात, कसे जातात, यासह विविध माहिती मिळवण्याच्या अनुषंगाने या दोन्ही पिल्लांची निवड झाली होती. २०१७ मध्ये ते प्रौढ व्हायच्या आधीच त्यांना बेशुद्ध करून त्यांच्या गळ्यात कॉलर टाकण्यात आली होती. साहजिकच हे दोघेही ‘पट्टेवाले’ वाघ ताडोबाच्या क्षेत्रामध्ये प्रसिद्ध झाले. या सुमारास या दोन भावांच्या एकमेकांवरील विश्वासाची, त्यांचे घट्ट नाते दर्शवणारी घटना पर्यटकांनी अनुभवली...

३ ऑक्टोबर २०१८ चा दिवस होता. पार्क सुरू होऊन अवघे काही दिवस झाले होते. तेव्हा पर्यटकाच्या एका गाडीला ‘छोटा मटका’ जखमी झालेला दिसला. त्याच्या पोटाला मोठी जखम झालेली होती. जामनी तलावाच्या ओव्हरफ्लोच्या खालच्या व कोसेकनाल रस्त्याच्या बाजूला तो जखमी अवस्थेत होता. त्याच्याजवळच त्याची आई ‘छोटी तारा’ व भाऊ ‘ताराचंद’ही होते. ही जखम या वाघाला रानडुकराची शिकार करताना झाली असावी. ‘छोटा मटका’ थकलेला होता.

जखमेमुळे त्याला चालणेही अवघड झाले होते. पर्यटकांनी ही माहिती व्याघ्र प्रकल्पाला दिल्यानंतर वेगाने हालचाली झाल्या. व्याघ्र प्रकल्पाचे कर्मचारी आणि डॉक्टर जंगलात आले. सुमारे ५० जणांची टीम त्याला बेशुद्ध करण्यासाठी प्रयत्न करत होती. मात्र, हे करत असताना वन कर्मचाऱ्यांना ‘ताराचंद’ने मोठा अडसर केला. तो ‘छोटा मटका’च्या अतिशय जवळ सतत उभा राहिला.

आपल्या भावाला जणू त्रास देण्यासाठी हा प्रयत्न होत असल्याचे त्याच्या हालचालीतून जाणवत होते. जवळ येणाऱ्या वन कर्मचाऱ्यांना तो आपले आक्रमक रूप दाखवून दूर जाण्यास बजावत होता. व्याघ्र प्रकल्पाने तिथे हत्ती आणून ‘छोटा मटका’च्या आईला आणि ‘ताराचंद’ला दूर करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना यश आले नाही. सुमारे सहा-सात दिवस प्रयत्न सुरू होते, असे ताडोबाचे तत्कालीन वनपरिक्षेत्र अधिकारी जी. एस. दाभाडे यांनी सांगितले. दाभाडे आता सेवानिवृत्त होऊन औरंगाबादमध्ये स्थायिक झाले आहेत.

आपल्या भावाबद्दल दृढ प्रेम व्यक्त करणारा आणि सतत त्याच्यासोबत सावलीसारख्या वावरणाऱ्या या ‘ताराचंद’ वाघाचा मृत्यू मात्र अत्यंत खेदजनक असा झाला. हे दोन्ही नर वाघ २०१८ नंतर आईपासून वेगळे झाल्यावर आपले क्षेत्र मिळवण्यासाठी धडपडू लागले होते. साहजिकच या परिसरात असणाऱ्या मोठ्या नर वाघांनी या नवख्या आणि नुकत्याच वयात पदार्पण केलेल्या दोघांना येथून हद्दपार केले.

‘ताराचंद’ला मोहर्ली कोरमधूनही बाहेर ढकलले व तो बफर क्षेत्रात आला. या बफर क्षेत्रातील भामडेळी गावाजवळ एका शेतात या वाघाचा वीज प्रवाहात मृत्यू झाला. तरुण वयात पदार्पण करणाऱ्या या नर वाघाबाबत घडणारा हा प्रकार दुःखद म्हणावा लागेल. दुसरीकडे तारुण्यात पदार्पण केलेल्या ‘छोटा मटका’ने बाजूच्या क्षेत्रात असलेल्या ‘माया’ वाघिणीकडे आपला मोर्चा वळवला. तिच्यासोबत त्याने मिलनाचे काही प्रयत्नही केले.

मात्र आपल्या वडिलांच्या सोबत असलेल्या या वाघिणीने या नवख्या वाघाला दाद दिली नाही. दोन-तीन वेळा ‘माया’ने ‘छोटा मटका’ला चांगलेच फटकारलेही होते. यावेळी ‘माया’ला ‘मटकासुर’पासून पिल्ले होती. या सर्व प्रकारामुळे ‘छोटा मटका’ने आपला परिसर सोडून खडसंगी बफर क्षेत्रातील अलिझंझा, नवेगाव परिसरात आपला मुक्काम हलवला.

मात्र येथे पुन्हा त्याला ‘मोगली’ या मोठ्या नराशी दोन हात करावे लागले. बघता बघता ‘छोटा मटका’ या परिसरात स्थिरावला आणि पर्यटकांना बिनधास्त दर्शन देणारा एक नवा वाघ या बफर क्षेत्रात उदयास आला. छोटा मटका आता ‘CM’ म्हणूनही ओळखला जाऊ लागला होता...

(पूर्वार्ध)

ताजा कलम...

चार दिवसांपूर्वी, १४ नोव्हेंबरला एक घटना समोर आली. ताडोबाच्या खडसंगी बफर क्षेत्रातील वाहनगाव परिसरात दोन वाघांच्या वर्चस्वाच्या लढाईत एका मोठ्या नर वाघाचा मृत्यू झाला. मृत्यू झालेला वाघ ‘बजरंग’ या नावाचा, साधारण १० वर्षांहून मोठा असणारा मोहर्लीच्या परिसरातील होता. ‘बजरंग’ला मोहर्लीतून एका तरण्याबांड नर वाघाने हाकलले.

अखेर हा ‘बजरंग’ ताडोबाच्या उत्तर भागाकडील या वनपरिक्षेत्रात दाखल झाला होता; पण येथेही त्याला त्याच्याहून अधिक बलवान असलेल्या दुसऱ्या नर वाघाने यमसदनी धाडले. त्याला मारणारा नर वाघ दुसरा-तिसरा कोणी नसून आपल्या आजच्या कथेचा नायक ‘छोटा मटका’ असल्याचे समजते.

(लेखक निसर्ग अभ्यासक आहेत.)

sanjay.karkare@gmail.com

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: अमित शहांनी केले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे अभिनंदन

Shirdi Assembly Election 2024 Final Result Live: शिर्डीत विखे पाटलांनी राखली जागा! सोळाव्या फेरीनंतर काँग्रेसच्या घोगरेंचा पराभव निश्चित

Kolhapur South Assembly Election 2024 Results : कोल्हापुरात बंटी नाही, आता महाडिक पॅटर्न! ऋतुराज पाटलांचा पराभव करत अमल महाडिकांचा दणदणीत विजय

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: सुनील शेळके १ लाख २ हजार ९६७ मतांनी आघाडीवर

Eknath Shinde Reaction : एकनाथ शिंदेंची विजयानंतर पहिली प्रतिक्रिया, लाडक्या बहिणींमुळे...

SCROLL FOR NEXT