घड्याळाला चिकटलं म्हणून तुम्हाला अभ्यासात यश मिळेल याची खात्री नसते. घड्याळातल्या वेळेचा आपण कशा पद्धतीने उपयोग करून घेतो, वेळेचा आपण कसा विचार करतो यावर अभ्यासातलं आणि परीक्षेतलं यश अवलंबून असतं. परीक्षेला तीन महिने आहेत असं उत्तर जेव्हा मुलं देतात, तेव्हा साहजिकच तीन महिने हा कालखंड त्यांना खूप मोठा वाटतो. म्हणूनच मुलं रिलॅक्स असतात.
अरे! अभ्यासाला लागा!! परीक्षा जवळ आलीय, हे वाक्य घराघरांत पालकांकडून शंभर वेळा तरी घोकलं जातं... कधी प्रेमाने, कधी रागाने, कधी हट्टाने; तर कधी त्राग्याने... पण या वाक्याचा मुलांवर खरोखरच परिणाम होतो का? हे मात्र आपण पाहिलेले नाही. मुलं खेळायला बाहेर पडतात, टाईमपास करतात, टीव्ही बघतात किंवा मित्र-मैत्रिणींमध्ये वेळ अक्षरशः वाया घालवतात... तेव्हा तेव्हा हे वाक्य आवर्जून उच्चारलं जातं; पण अशा मुलांच्या बाबतीत परीक्षा खरोखरच जवळ येते का? अनेक मुलं परीक्षेच्या जवळ जायला घाबरतात. त्याचा परिणाम म्हणजे परीक्षेतसुद्धा ती घाबरलेली असतात. परीक्षा शक्यतो रद्द व्हावी किंवा पुढे ढकलली जावी अशी त्यांची मनोमन इच्छा असते!
म्हणजे खऱ्या अर्थाने अनेक मुलं परीक्षेपासून सर्व दृष्टीने लांब असतात. अशा मुलांना जेव्हा आपण परीक्षेला बसायला भाग पाडतो, तेव्हा त्या मुलांचा रिझल्ट काय येणार, हे आपल्याला ठाऊकच असतं. खरी गंमत पुढे असते. मी मुलांच्या कार्यशाळा घेतो आणि त्यांना विचारतो, की परीक्षेला किती दिवस आहेत? त्या वेळेला येणारी मुलांची उत्तरं गमतीशीर असतात. अजून तीन महिने आहेत असं सांगताना बहुतेक मुलं खूप रिलॅक्स मूडमध्ये असतात. म्हणजे त्यांना असं वाटतं, की परीक्षेला अजून भरपूर वेळ आहे. मी केवळ मुलांच्या नव्हे, तर पालकांच्याही कार्यशाळा घेतो आणि पालकांना जेव्हा विचारतो, की मुलांच्या परीक्षा कधी आहेत, तेव्हा पालकही त्याच रिलॅक्स मूडमध्ये सांगतात, ‘‘अजून तीन महिने आहेत! भरपूर वेळ आहे!!’’ पालकांना किंवा मुलांना अभ्यासाचं वेळापत्रक कसं आखलं जातं हेच माहिती नसतं आणि हे माहिती नसल्यामुळे त्यांना परीक्षा जवळ आहे की लांब हेच लक्षात येत नाही.
मी एका कार्यशाळेत जेव्हा विचारलं, की परीक्षेला किती वेळ आहे रे मुलांनो? तेव्हा मी वर म्हटल्याप्रमाणे, तीन महिने आहेत, असं उत्तर मिळालं. ही कार्यशाळा दहावीच्या मुलांची होती. मग मी मुलांना विचारलं, की तुम्ही रोज किती तास अभ्यास करता? त्यावरसुद्धा वेगवेगळी उत्तरं आली. कोणी म्हणालं रोज दोन तास, कोणी म्हणालं तीन तास, कोणी चार तास अभ्यास करत होतं; तर कोणी पाच तास आपण अभ्यास करतो असं सांगितलं. साधारणपणे सरासरीने तीन ते चार तास अभ्यास करणाऱ्यांची संख्या ही लक्षणीय होती. काही मुलं मात्र सहा ताससुद्धा अभ्यास करणारी होती. प्रश्न हा तासाचा नाहीय. तुम्ही घड्याळाला चिकटला म्हणून तुम्हाला अभ्यासात यश मिळेल याची खात्री नसते. घड्याळातल्या वेळेचा आपण कशा पद्धतीने उपयोग करून घेतो, वेळेचा आपण कसा विचार करतो, यावर अभ्यासातलं आणि परीक्षेतलं यश अवलंबून असतं. परीक्षेला तीन महिने आहेत, असं उत्तर जेव्हा मुलं देतात, तेव्हा साहजिकच तीन महिने हा कालखंड त्यांना खूप मोठा वाटतो. म्हणूनच मुलं रिलॅक्स असतात. मुलंच कशाला, पालकसुद्धा रिलॅक्स असतात, पण तीन महिन्यांचा कालखंड हा खूप फसवा आहे. या तीन महिन्यांमध्ये आपण मुलांची झोप, मुलांचे खाणे-पिणे, प्रवास, शाळा-क्लास या सर्व गोष्टी गृहीत धरलेल्या असतात. म्हणजे प्रत्यक्षात मुलं जो सरासरीने तीन ते चार तास अभ्यास करतात, तोच आपल्याला गृहीत धरायला पाहिजे.
तीन महिने म्हणजे नव्वद दिवस आणि तीन तास अभ्यास म्हणजे २७० तास मुलांना उपलब्ध असतात. या २७० तासांमध्ये मुलांचा अभ्यास पूर्ण होणं शक्य आहे का? यात विविध प्रश्नपत्रिका सोडवणे, त्या पुन्हा वाचणे, रिविजन करणे, प्रश्नोत्तर वाचन, आवश्यक तेवढी पुस्तकं आणि संबंधित अभ्यास साहित्य वाचन, स्वतःच्या नोट्सचं वाचन हे सर्व गृहीत धरलं तर २७० तास कसे पुरणार? अनेक मुलांनी त्यांचे धडेही पूर्ण वाचलेले नसतात. दहावीला सर्व पुस्तकांमधले मिळून १०० पेक्षा जास्त धडे आहेत. आपण विचार करा, २७० तासांमध्ये १०० पेक्षा जास्त धड्यांचा सर्वांगीण अभ्यास कसा शक्य आहे? सरासरीने प्रत्येक विषयाच्या किमान दोन ते तीन प्रश्नपत्रिका तर सोडवायलाच हव्यात. जोवर सराव होत नाही, तोवर प्रत्यक्ष परीक्षेत उत्तम प्रकारे उत्तर पत्रिका कशा लिहून होतील? परीक्षेचा मूलमंत्र म्हणजे सराव आहे आणि हा सराव करायला भरपूर अवधी लागतो. शेवटच्या तीन किंवा दोन महिन्यांत जागं होऊन सराव करता येत नाही आणि केवळ सरावात कमी पडलेली मुलं ही परीक्षेतसुद्धा कमीच पडतात असा शिक्षकांचा अनुभव आहे!
परीक्षा म्हणजे काय, हे न कळल्याचा हा परिणाम आहे. अनेक मुलांना असं वाटतं, की आपण पुस्तकं वाचायची, फार तर पुन:पुन्हा पुस्तकं वाचायची किंवा गाईड वाचायची. परीक्षेत जाऊन पेपर सोडवायचा आणि परत यायचं. अनेक मुलांचं लक्ष परीक्षा पूर्ण कधी होतेय आणि आपली त्यातून सुटका कधी होतेय याकडे असतं. कारण त्यांना परीक्षेत रस नसतो. मुळात त्यांना अभ्यासात रस नसतो. अभ्यासात रस नसला की परीक्षेतही रस नसणार हे ओघानंच आलं. अभ्यासात रस नसणारी मुलं ही वेगळं काही तरी करतात का? तर असंही मुळीच नव्हे. अभ्यासातला जो चॅलेंज आहे, जे आव्हान आहे ते अनेक मुलांना नकोसं वाटतं किंवा कंटाळवाणं वाटतं. त्यांना ज्या विषयांमध्ये रस असतो ते विषय अभ्यासाला नसतात. उदाहरणार्थ क्रिकेट, गप्पा, खेळ वगैरे. साहजिकच केवळ करावा लागतो म्हणून ते अभ्यास करतात! त्यांना अभ्यासाची आवड असेलच असं नाही. अभ्यास न आवडणाऱ्या मुलांपासून जसा अभ्यास लांब असतो, तशीच परीक्षाही लांब असते... परीक्षा केवळ तारखेने जवळ येते, पण परीक्षेपासून अशा मुलांचं मानसिक अंतर हे खूप मोठं असतं.
केवळ पुस्तकं वाचून परीक्षा देता येत नाही. परीक्षा हे एक तंत्र आहे. अभ्यास हा त्याचा गाभा आहेच, पण आपण केलेल्या अभ्यासाचं सादरीकरण कसं करायचं, हे आपल्याला परीक्षेमुळे कळतं. सराव हा कुठल्याही परीक्षेचा गाभा असतो. हा सराव मुलं जेवढा जास्त करतील, तेवढी त्यांना परीक्षा सोपी जाते. खेळ असो, नाटक असो, सिनेमा असो, गाणं असो, आपलं रोजचं काम असो... सगळ्या बाबतीत सराव हा लागतोच. ‘प्रॅक्टिस मेकस् मॅन परफेक्ट’ ही म्हण जन्माला येण्याचं कारणच सराव आहे. सरावामुळे आपण त्या गोष्टीच्या इतके जवळ जातो, इतके अंतरंगात जातो, की आपल्यापासून ती गोष्ट वेगळी असूच शकत नाही. आपल्याकडून ती सहजपणे होते. वेगात होते. अचुकतेने होते. ही सहजता येण्यासाठी आपल्याला सराव आवश्यक असतो आणि सरावासाठी वेळ आवश्यक असतो. परीक्षेचा अभ्यास वेळेवर सुरू करून उत्तम मार्क मिळवणारी मुलं ही प्रत्येक विषयाच्या प्रश्नपत्रिकेचा उत्तम सराव करतात हे त्यामागचं सत्य आहे. कारण त्यांच्या हातात सरावासाठी वेळ असतो. परीक्षा अशा मुलांच्या नेहमीच जवळ असते, हे वेगळं सांगायला हवं का?
sanjeevlatkar@hotmail.com
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.