sanjeev latkar writes parents child case love guide  sakal
सप्तरंग

ध्रुवचा कोंडमारा का झाला?

ध्रुव विचित्र आणि काहीशा विकृत मुलांमध्ये अडकला होता. आईबाबा ध्रुवला खूप ओरडले असते...

संजीव लाटकर

ध्रुव विचित्र आणि काहीशा विकृत मुलांमध्ये अडकला होता. आईबाबा ध्रुवला खूप ओरडले असते...

ध्रुव विचित्र आणि काहीशा विकृत मुलांमध्ये अडकला होता. आईबाबा ध्रुवला खूप ओरडले असते किंवा त्याच्यावर हात उचलला असता तर ध्रुव कदाचित जास्तच कोशात गेला असता; पण आई-बाबांनी केलेल्या प्रेमामुळे आणि दाखवलेल्या समजूतदारपणामुळे ध्रुव निश्चिंत झाला. शेवटी न राहवून ध्रुवने आईला मिठी मारली आणि आईच्या कुशीत शिरून तो हमसाहमशी रडायला लागला...

ध्रुवने खूप संतापजनक वर्तन केलेले असूनसुद्धा त्याचे आई आणि बाबा दोघेही शांत राहण्याची पराकाष्ठा करत होते... पण त्यांना शांत राहणे खूप कठीण जात होते. क्लासचे संचालक निघून गेल्यानंतर तीन तास उलटले; पण ध्रुव अजिबात दाद देत नव्हता. आई-बाबांनी त्याला अनेक प्रश्न अनेकदा विचारले. पण ध्रुवने तोंड उघडलेच नाही.

तू क्लासला का गेला नाहीस?

तू किती दिवसांपासून क्लासला जात नाहीस?

क्लासला जातो असे सांगून तू कुठे जात होतास?

तुझ्याबरोबर कोण असायचे?

त्या मित्र-मैत्रिणींची नावे आम्हाला सांग!

तू रोज घरातून डबा न्यायचास. तो तू कुठे खायचास?

तू आमच्याकडून रिक्षासाठी पैसे घ्यायचास, ते तू कशावर खर्च करायचास?

तू शाळेतही गेलेला नाहीस... शाळेतून शिक्षकांनी आम्हाला केलेला फोनही तुझ्याच फोनवर आला का?

शाळेत तुला कोणीच काही विचारले नाही का?

तू घरी येऊन घरचा अभ्यास करायचास... तो कुठला होता?

तुझ्याकडचा मोबाईल तू मघापासून आम्हाला दाखवत का नाहीस?

तुझ्या मोबाईलचा पासवर्ड काय?

तू आम्हाला कधीच कशाची कल्पना का दिली नाहीस?

तुला कोणती अडचण होती का?

कुणी तुला क्लासमध्ये किंवा शाळेमध्ये धमकावले का?

कुणी मारले का?

तू कुणाशी वाईट वागलास का?

तू चोऱ्यामाऱ्या केल्यास का?

तुझा बुडालेला अभ्यास भरून कसा निघणार?

तुला काही टेन्शन आहे का?

तू सिगारेट पितोस का?

तू सिनेमाला जाऊन बसत होतास का?

जसे सुचतील तसे प्रश्न आई-बाबा विचारत होते. ध्रुव त्यावर काहीच बोलत नव्हता. शेवटी दोघेही कंटाळले. बाबा म्हणाले, की तू जोपर्यंत खरं बोलत नाहीस, आम्हाला सर्व काही सांगत नाहीस, तोपर्यंत मी जेवणार नाही! त्यावर आईसुद्धा लगेच म्हणाली, की मीही जेवणार नाही...

ध्रुव त्याच्या रूममध्ये बसून होता. आई-बाबा इतर कामांना लागले, पण जेवायचे कोणी नाव घेत नव्हते. आई मध्येच ध्रुवाच्या रूममध्ये जाऊन त्याला म्हणाली, की तुला भूक लागली असेल तर जेवून घे. अन्न अजून गरम आहे...

पण ध्रुव जेवायला उठला नाही. बहुधा तो कसलातरी विचार करत असावा. पण दुसरीकडे त्याला खूप भूकही लागली होती, शिवाय जेवणात त्याच्या आवडीचे पदार्थही होते. जसजशी भूक वाढत गेली तसतसा ध्रुवचा न बोलण्याचा निग्रह ढासळत गेला.

शेवटी न राहवून त्याने आईला मिठी मारली आणि आईच्या कुशीत शिरून तो हमसाहमशी रडायला लागला. बाबा जवळच होते. दोघांनी त्याला थोपटल्यावर, त्याच्या डोक्यावरून हात फिरवल्यावर ध्रुव खूपच रडायला लागला. नंतर तो बराच वेळ रडत राहिला...

क्लासच्या संचालकांचे म्हणणे खरे होते! आई-बाबा ध्रुवला खूप ओरडले असते किंवा त्याच्यावर हात उचलला असता तर ध्रुव कदाचित जास्तच कोशात गेला असता; पण आई-बाबांनी केलेल्या प्रेमामुळे आणि दाखवलेल्या समजूतदारपणामुळे ध्रुव निश्चिंत झाला.

त्याला बहुदा असे वाटले, की आपण आई-बाबांशी बोलायला पाहिजे. आई-बाबा माझेच आहेत, ते मला मारणार नाहीत. ते मला ओरडणार नाहीत. ते मला क्षमा करतील. माझ्यावर असेच प्रेम यापुढेही करतील, या विश्वासाने ध्रुव बोलू लागला...

खूप खोलवर अशा तणावांमधून आणि मानसिक उलथापालथीमधून सध्या जात होता... आधी ध्रुव शाळेत जायचा बंद झाला. शाळेत ध्रुवचा ग्रुप हा तसा उनाड मुलांचा होता. ध्रुव स्वतः अभ्यासू वृत्तीचा किंवा मेहनती नव्हता.

परीक्षेत कसेबसे पास व्हायचे, एवढेच त्याचे उद्दिष्ट असायचे आणि परीक्षेच्या काही दिवस आधी अभ्यास केल्यावर आपण सहज पास होतो, हे त्याच्या लक्षात आले होते. त्यावरून त्याचे आई-बाबा त्याला नेहमी बोलायचे; पण ध्रुव त्याकडे कानाडोळा करायचा. आई-बाबांनाही वेळ नव्हता. त्यामुळे तेही अगतिक असायचे. एक ना एक दिवस त्याला शहाणपण सुचेल आणि तो अभ्यास करू लागेल, या आशेवर तेही दिवस ढकलत होते.

पण तसे झाले नाही. ध्रुव विचित्र आणि काहीशा विकृत मुलांमध्ये अडकला. ते कोणाच्या तरी घरी अभ्यासाच्या नावाने जात. मोबाईलवर अश्लील चित्रफिती बघत. त्यातल्या एका आडदांड आणि आक्रमक वृत्तीच्या मुलाने ध्रुवला त्रास द्यायला सुरुवात केली.

एक दिवस त्याने ध्रुवला शारीरिकदृष्ट्या त्रास दिला, ज्यामुळे ध्रुवला खूप लाज वाटली. इतर मुलं हा प्रकार एन्जॉय करत होती. नंतर ती मुलं ध्रुवला चिडवू लागली. हे चिडवणे लैंगिक स्वरूपाचे होते, जे ध्रुवला सहन झाले नाही. तोच ग्रुप क्लासमध्येही यायचा.

तेथेही त्यांचे गुपचूप चिडवणे सुरूच असायचे. अशा परिस्थितीत ध्रुवचा खूपच कोंडमारा सुरू झाला. काही दिवस हे सर्व सहन करून ध्रुव थकला. त्याचे कशातच लक्ष लागेना. त्याची अभ्यास करण्याची इच्छा पूर्णपणे गेलीच; पण क्लासला किंवा शाळेला जाऊच नये, असे त्याला वाटू लागले. या घटनेच्या मुळाशी होते त्याचे अश्लील चित्रफिती बघणे...

तू आमचे नाव सांगितलेस तर आम्हीही तुझे नाव सांगू, अशी धमकीच या ग्रुपने दिल्यामुळे तो हा विषय कोणाशीही बोलू धजत नव्हता. आपण कोणाकडेही तक्रार केली तर आपल्याच अंगाशी येईल, असे त्याला वाटले.

आई-बाबांना तरी कसे सांगायचे? ते आपल्यालाच ओरडतील! शिवाय आपण ज्या वाईट गोष्टी केल्या आहेत, त्या उघड होतील, अशी भीतीही त्याला वाटत होती. म्हणून तो दोन्ही ठिकाणी म्हणजे शाळा आणि क्लासमध्ये जाईनासा झाला.

आई-बाबांना त्याने असे भासवले, की सर्व काही नियमितपणे सुरू आहे. ध्रुव रोज निघायचा. बसने कुठेही फिरायचा. बराच वेळ बसमध्ये काढल्यानंतर तो कुठल्या तरी सार्वजनिक बागेत बसायचा. कधीकधी तो मॉलमध्ये गेला, तर कधीकधी चित्रपटगृहांसमोर त्याने वेळ काढला.

खूप चालून, खूप फिरून तो थकायचा. मग कुठेतरी बसून डबा खायचा. पण कधीकधी लोक त्याला हटकायचे. कारण त्याच्या पाठीवर दप्तर असायचे आणि अंगावर शाळेचा युनिफॉर्म... शाळेचा युनिफॉर्म घातल्याशिवाय बाहेर पडणे शक्य नव्हते. कारण आपण आधी क्लासला आणि मग परस्पर शाळेला जात आहोत, असे भासवणे गरजेचे होते.

कुणी ओळखीचे भेटेल, अशी भीती असायची. म्हणून तो गॉगल आणि टोपी घालायचा. शक्यतो अपरिचित एरियात वेळ काढायचा; पण तिथे भीतीही वाटायची. त्याला एवढे समजत होते की आपले हे बिंग किंवा गुपित एक दिवस फुटणार.

क्लासमधून किंवा शाळेमधून निरोप जाणार; पण तोपर्यंत तरी त्याला सर्व त्रासातून सुटका हवी होती. आजचे संकट तो उद्यावर ढकलत राहिला, कारण त्याला शाळेत किंवा क्लासमध्ये जाण्याच्या असह्य त्रासापासून सुटका हवी होती. हे सगळे पुढे कुठे जाणार, या सगळ्याचा शेवट काय होणार याची त्याला फिकीर नव्हती...

ध्रुव आईच्या मांडीवर झोपी गेला. कुणालाच जेवणाची इच्छा उरली नव्हती. ध्रुव ज्या त्रासातून गेला, त्या त्रासाची कल्पना आल्यामुळे आई-बाबा खूप दुःखी झाले होते. आपले मुलाकडे दुर्लक्ष झाले, आपला त्याच्याबरोबरचा संवाद कमी पडला असेही त्यांना वाटत होते. क्लासच्या संचालकांशी बोलून बाबांना धीर आला...

संचालक म्हणाले, की ‘‘मुलं कधीकधी सर्व कोंडमारा एकट्याने सहन करतात. पालकांना सांगण्याचे टाळतात; पण यापुढे तुम्ही काळजी घ्या. मी माझ्या क्लासमध्ये योग्य ती कारवाई करेनच, पण तुम्ही शाळेत जाऊन मुख्याध्यापकांना भेटा, जेणेकरून ध्रुवला यापुढे सुरक्षित वाटेल. शाळाही नक्की कारवाई करेल. एक-दोन मुलांमुळे ध्रुवचे किंवा इतर मुलांचे नुकसान व्हायला नको...’’

ध्रुववर जशी वेळ आली तशी इतर मुलांवर अजिबात येता कामा नये, असा निग्रह त्यावेळी आई-बाबांनी एकमेकांशी बोलताना केला. दुसऱ्याच दिवशी, म्हणजे सोमवारी दोघांनीही रजा घेतली आणि ठरल्याप्रमाणे दोघेही मुख्याध्यापकांना भेटायला गेले...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China: चीनमध्ये प्रदर्शित होणार पहिला भारतीय चित्रपट; तमिळच्या रहस्यपटाचा परदेशात डंका

Maharashtra Assembly Election 2024 Result : शिवसेना, राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेसला अधिक मते; मात्र, त्या तुलनेत काँग्रेसने जागा कमी जिंकल्या

''बिहारमध्ये नितीश कुमारांना भाजपने शब्द दिला होता, पण महाराष्ट्रात तसं काही नाही'' केंद्रातील नेत्याचं विधान

WI vs BAN: वेस्ट इंडिजचा तब्बल २०१ धावांनी विजय अन् WTC पाँइंट्स टेबलमधील अखेर शेवटचं स्थान सोडलं

Chief Minister : आमचाच नेता ‘सीएम’ व्हायला हवा! एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांत रस्सीखेच

SCROLL FOR NEXT