धाकट्या मुलीने तिला पैसे मोजताना पाहिले, म्हणून मोठ्या मुलीनेच पैसे चोरल्याचा त्यांचा ठाम विश्वास होता. खरेच तिने पैसे चोरले होते, की आणखी काय? याबद्दलची ही गोष्ट...
- संजीव लाटकर
वेगवेगळ्या समस्या घेऊन पालक भेटायला येतात. त्यातलेच एक दाम्पत्य, त्यांना दोन मुली. मोठ्या लेकीने घरातूनच तीन हजार रुपये चोरल्याचे दु:ख ते घेऊन आले होते. धाकट्या मुलीने तिला पैसे मोजताना पाहिले, म्हणून मोठ्या मुलीनेच पैसे चोरल्याचा त्यांचा ठाम विश्वास होता. खरेच तिने पैसे चोरले होते, की आणखी काय? याबद्दलची ही गोष्ट...
पालक कधीकधी खूप व्यथित आणि दुःखद अंतकरणाने भेटायला येतात. म्हणजे त्यांना बोलायचं खूप असतं; पण सुचत काहीच नाही. शब्दांची जुळवाजुळव करण्यामध्ये त्यांना वेळ लागतो. आपली समस्या बोलायची कशी, सांगायची कशी याचाही संकोच असतो. आई-बाबा दोघेही आले असतील तर एकमेकांकडे आधी पाहतात. मग एकमेकांना खुणावतात; तरीही बोलण्याची हिंमत करत नाहीत. अशा वेळी मलाच सुरुवात करावी लागते. असंच एक पालक जोडपं त्यांची समस्या घेऊन आलं होतं. समस्या त्यांच्या मोठ्या मुलीची होती.
‘‘कोणत्या समस्येसाठी भेटायला आला आहात?’’ मी विचारलं. माझ्या प्रश्नाची दोघेही जणू वाटच पाहत होते. मुलीचे बाबा बोलू लागले, ‘‘कसं सांगावं समजत नाही; पण आमच्या मोठ्या मुलीने घरात चोरी केली आहे आणि वर ती खोटंही बोलतेय. तिने चोरी केली, हे आम्हाला पक्कं माहिती आहे, पण ती चोरी केल्याचं कबूलही करत नाहीये...’’मुलीच्या आईच्या डोळ्यात पाणी आलं. ‘‘आमची मुलगी चोरी करेल, असं कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं. तिला आम्ही काहीही कमी पडू दिलेलं नाही. ती जे जे मागते, ते ते सर्व आम्ही तिला ऐपत नसतानाही देतो. तिच्या गरजा खूप वाढताहेत... तिचं थोडक्यात समाधान होतच नाही... नोकरीनिमित्त आम्ही दोघेही बाहेर असतो. त्यामुळे घरात सगळ्या वस्तू उघड्यावर असतात. कपाटसुद्धा आम्ही लॉक करत नव्हतो. कारण मुलांना काही इमर्जन्सीमध्ये गरज लागली, तर कपाट ओपन असावं अशी आमची कल्पना होती... पण तिने कपाटातून थोडेथोडके नव्हेत, तर तीन हजार रुपये रोख चोरले आहेत...’’
मी एकच प्रश्न विचारला.
‘‘तुम्ही ठाम निष्कर्ष काढला आहे, की तुमचा केवळ संशय आहे?’’
बाबा म्हणाले, ‘‘नाही, आमची खात्री पटली आहे. कारण धाकट्या मुलीने तिला गुपचूप नोटा मोजताना पाहिलं. तिने तिला विचारलंही की, दीदी हे कसले पैसे आहेत? त्यावर तिने डोळे वटारून तिला गप्प राहायला सांगितलं आणि धाकटीला धमकावून ती तातडीने बाहेर पडली. त्या दिवशी ती खूप उशिरा घरी आली. जेवलीही नाही. सर्व मित्र-मैत्रिणींनी बहुधा बाहेर पार्टी केली असावी. दुसऱ्या दिवशी मी खण चेक केला, तेव्हा पैसे गायब असल्याचं माझ्या लक्षात आलं. मी घर डोक्यावर घेतलं; पण पैसे मिळाले नाहीत. शेवटी माझा रुद्रावतार पाहून धाकटीने तिची दीदी घरात नसताना, सगळा घटनाक्रम मला सांगितला...’’
‘‘तुम्ही पैशांबद्दल विचारलं तेव्हा मोठी तुम्हाला काय म्हणाली?’’ मी विचारलं.
‘‘तिच्यावर काहीच परिणाम झालेला नव्हता. खांदे बेफिकिरीने उडवून ती म्हणाली की, मला काय माहिती! तुम्हीच खर्च केले असतील... तुमचे पैसे... तुम्हाला सांभाळता येत नाहीत? माझ्याकडून ५० रुपये हरवले तर किती आरडाओरडा करता! आता तर तीन हजार हरवले आहेत... असं म्हणून ती तिच्या रूममध्ये निघून गेली... खरं सांगू का? जास्त वाईट याचं वाटलं, की तिला काहीही वाईट वाटलेलं नाही.. की तिच्या चेहऱ्यावर कुठे अपराधी भाव नाही... आपण चूक केल्याची जाणीव नाही...’’, हे सांगताना आईचे डोळे पुन्हा पाणावले.
‘‘कुठून असल्या घाणेरड्या सवयी शिकतात मुलं? आपल्याच घरात चोरी? मी तिला खडसावून विचारलं, की धाकटीने तुला नोटा मोजताना पाहिलं आहे... तर ती म्हणाली की माझ्या पॉकेट एक्स्पेंसचं सेविंग केलं मी. त्या नोटा होत्या. इतका निर्ढावलेपणा? ही म्हणजे हद्द झाली! कधी कधी वाटतं की पोलिस कम्प्लेंट करावी आणि सरळ तिला पोलिसांच्या हवाली करावं. तिथे तरी ती तोंड उघडेल... चोरी केली ती केली आणि कबूलही करत नाही? ही एक चोरी उघड झाली म्हणून आम्हाला कळलं तरी... पण यापूर्वी तिने किती चोऱ्या केल्या असतील, तुम्हीच सांगा! घरात चोऱ्या केल्या असतीलच, बाहेरही चोऱ्या केल्या असतील. आपल्या पोटी एक चोर जन्माला यावी, यासारखं दुःख नाही तुम्हाला सांगतो...’’ बाबा हताश होऊन म्हणाले.
ती दोघेही दुःखात असल्यामुळे मी थोडा वेळ शांततेत जाऊ दिला आणि मग म्हणालो, ‘‘तुम्हाला पोलिसात कम्प्लेंट करायची असेल तर करू शकता... तो तुमचा निर्णय आहे; पण तुमच्या मुलीला त्यामुळे किती मानसिक धक्का बसू शकतो, याचीही कल्पना करा. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कृपा करून अजूनही ठाम निष्कर्षाला येऊ नका, कारण कदाचित ते तीन हजार रुपये तुम्हाला इथे-तिथे सापडू शकतात. तुमचा केवळ असा तर्क किंवा संशय आहे की तिनेच पैसे चोरले; पण तुम्ही लगेच अशा निष्कर्षाला किंवा तर्काला येऊ नका की, ती चोर आहे. तुम्ही तिच्याकडे चोर म्हणून बघू लागला, तर तुमच्या या कलुषित दृष्टिकोनामुळे आणि बसलेल्या स्टॅम्पमुळे ती खरोखरच चोर होऊ शकते. किंबहुना, तिला विश्वास देण्याची हीच वेळ आहे, की तू एक चांगली मुलगी आहेस आणि तू चोरी करणे शक्यच नाही. तुला आम्ही खूप चांगल्या संस्कारात वाढवलं आहे. आमचा तुझ्यावर अजिबात संशय नाही. कदाचित आमच्याकडूनच पैसे गहाळ झाले असतील. असं सांगण्याने तिच्यावर अधिक चांगला परिणाम होईल, जो तुम्हाला हवा आहे. तुम्ही आरोप केला तर ती डिफेन्सिव्ह होईल, बचावात्मक पवित्रा घेत ती स्वतःला डिफेंड करत राहील. स्वतःचं स्वतःशी समर्थन करत राहील आणि अशा पद्धतीने ती केलेल्या चुकीवर पांघरूण तर टाकेलच, पण यापुढेही ती अशाच पद्धतीचा अवलंब करेल. यातून काय साध्य होईल? तुम्ही तिला निगेटिव्ह झोनमध्ये ढकलण्याऐवजी पॉझिटिव्ह झोनमध्ये राहू दिलं पाहिजे... समजा तिने चोरी केली असेल, तर तिच्या आता हे लक्षात आलंय की तुम्हाला सगळं कळलं आहे. त्यामुळे काय होईल? फार तर ती सावध होईल. तिच्या मनातले चोरीचे विचार पूर्णपणे जातील का? तर नाही जाणार... तुम्हाला तिचे मित्र-मैत्रिणी कोण, तिच्या सवयी काय आहेत, ती कुठे जाते-येते, ती कसा खर्च करते, या सगळ्याची माहिती असायला हवी...’’
माझ्या म्हणण्यावर दोघेही विचारात पडले. मी त्यांना एकच प्रश्न विचारला, ‘‘तुमच्या थोरल्या लेकीच्या स्वभावात बदल व्हायला नेमकी कधी आणि कशी सुरुवात झाली ते सांगाल का?’’ या प्रश्नावर दोघांनी एकमेकांकडे पाहिलं आणि आई धाय मोकलून रडू लागली. आई का रडली? थोरल्या लेकीच्या स्वभावात बदल नेमका कशामुळे झाला? कथित चोरीचं पुढे काय झालं? ते आपण पुढल्या भागात वाचू...
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.