dr prakash tupe 
सप्तरंग

चंद्रभेट (डॉ. प्रकाश तुपे)

डॉ. प्रकाश तुपे

भारताचं अवकाशयान उद्या (सोमवार, ता. 15 जुलै) पहाटे चंद्राच्या भेटीस निघत आहे. यावेळची ही भेट दुसरी असून ती पहिल्या चांद्रयानाच्या भेटीपेक्षा वेगळी आहे. अकरा वर्षापूर्वी राबविलेल्या चांद्रयान-1 मोहिमेत यानानं चंद्राभोवती शंभर किलोमीटर्स उंचीवरून फेऱ्या मारल्या होत्या. या वेळच्या चांद्रयान-2 मोहिमेत मात्र यानाचा एक भाग हळुवारपणे चंद्रावर उतरवण्याचा प्रयोग केला जाणार आहे. एवढंच नव्हे, तर चंद्राच्या पृष्ठभागावर एक छोटीशी बग्गीदेखील (रोव्हर) चालवली जाणार आहे. या वेळच्या मोहिमेचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे चांद्रयान-2 यान अशा ठिकाणी उतरवलं जाणार आहे, की जिथं यापूर्वी कोणीही अवकाशयान उतरवलेलं नव्हतं. चांद्रयान-2 अवकाशयानातला विक्रम नावाचा एक भाग (लॅंडर) चंद्राच्या दक्षिण ध्रुव प्रदेशाजवळ उतरवला जाणार आहे. आत्तापर्यंत तीनच देशांनी चंद्रावर यानं उतरवलीत आणि तीदेखील चंद्राच्या विषुववृत्ताजवळच्या परिसरात. भारत हा असा एकमेव देश आहे, की जो दक्षिण ध्रुवानजीकच्या काहीशा अनोळखी आणि अंधाऱ्या जागेवर यान उतरवून इतिहास घडवणार आहे. भारताची चांद्रयान-2 मोहीम यशस्वी झाली, तर चंद्रावर यान उतरवणारा भारत चौथा देश ठरेल, एवढंच नव्हे, तर दक्षिण ध्रुवानजीक यान उतरवणारा तो पहिला देश असेल.

इस्रो ही भारताची अवकाश संशोधन संस्था स्थापून 50 वर्षं झालीत. तेव्हापासून इस्रो स्वतःच्या हिमतीवर काही आगळं-वेगळं करून जगाचं लक्ष वेधून घेत आहे. अमेरिका आणि रशिया गेल्या साठ वर्षांपासून अवकाश क्षेत्रात कार्यरत आहेत. या देशांच्या मांडीस मांडी लावून बसण्यासाठी इस्रोची धडपड सुरू आहे. याच पार्श्‍वभूमीवर इस्रो चंद्र, मंगळ, शुक्र आणि सूर्य मोहिमा आखत आहे. अमेरिका आणि रशियानं चंद्राकडचं लक्ष काढून घेतल्यावर तब्बल चाळीस वर्षांनी आपण चांद्रयान-1 मोहीम राबवली. या मोहिमेचं प्रमुख वैशिष्ट्य ठरलं ते म्हणजे भारताची चांद्रमोहीम पहिल्याच प्रयत्नात यशस्वी झाली. एवढंच नव्हे, तर फार तुटपुंज्या आर्थिक बळावर आपण चंद्राला गवसणी घातली. या मोहिमेत 34 किलो वजनाची एक कुपी अंतराळातून चंद्रावर टाकण्यात आली होती. आता मात्र इस्रो चांद्रयान-2 मोहीम राबवून हळुवारपणे चंद्रावर उतरण्याचा प्रयत्न करत आहे.

बारा वर्षांपासून वेध
बारा वर्षांपूर्वी चांद्रयान-2 मोहिमेस तत्कालीन पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी हिरवा कंदील दाखवला होता. त्यांनी त्यांच्या रशिया भेटीत भारत आणि रशिया यांनी संयुक्तपणे चांद्रमोहीम राबवावी असं सुचवलं होतं. त्यानुसार इस्रो मुख्य यान बनवणार होती आणि चंद्रावर उतरणारा भाग (लॅंडर) आणि बग्गी (रोव्हर) रशियाची रॉस्कोमॉस संस्था बनवणार होती. मात्र, रशियाच्या मंगळ मोहिमेच्या अपयशानंतर त्यांनी सन 2015 मध्ये भारताच्या चांद्रमोहिमेस साह्य करण्यास असमर्थता दाखवली. यामुळं भारतानं चांद्रयान-2 मोहीम संपूर्णपणे स्वतःच्या हिमतीवर राबवण्याचा निर्णय घेतला. इस्रोनं अवघ्या तीन-चार वर्षांत चांद्रयानाचे तीनही भाग संपूर्णपणे भारतीय तंत्रज्ञान वापरून तयार केले. यासाठी त्यांनी 620 संस्था, 500 विद्यापीठं आणि 120 खासगी कंपन्यांचं साह्य घेतलं.

कशी असेल मोहीम?
चांद्रयान-2 मोहिमेसाठी लागणारा मुख्य भाग (ऑरबायटर) 2,389 किलो वजनाचा आहे. हा भाग चांद्रयान-1 प्रमाणंच चौकोनी आकाराचा असून तो चंद्राभोवती 100 किलोमीटर्स उंचीवरून फिरत राहील. यानापासून अलग होऊन चंद्रावर उतरणारा भाग म्हणजे लॅंडर 1,471 वजनाचा असेल. या भागास भारताच्या अंतराळ कार्यक्रमाचे जनक असलेले विक्रम साराभाई यांचं नाव दिलं आहे. चंद्रावर फिरून तिथल्या पृष्ठभागाचं निरीक्षण करण्यासाठीचा विक्रम भाग म्हणजे ब्रीफकेसच्या आकाराची 27 किलो वजनाची, सहा चाकी बग्गी (रोव्हर) आहे. चंद्राभोवती फिरणाऱ्या ऑरबायटर भागावर विविध प्रकारची सहा उपकरणं बसवलेली आहेत. यामध्ये अनेक प्रकारचे कॅमेरे, खनिज आणि पाणी शोधणारी उपकरणं आणि वातावरणाचा अभ्यास करणाऱ्या यंत्रणाचा समावेश आहे. चंद्रावर उतरणाऱ्या लॅंडरवर तापमान आणि कंप मोजणाऱ्या यंत्रणा आणि तिथल्या प्लाझ्मा इलेक्‍ट्रॉनची मोजमाप करणारी यंत्रणा आहे. चंद्रावर फेरफटका मारण्यासाठीच्या बग्गीवर म्हणजे यांत्रिक मोटारवर तिरंगा आणि अशोकचक्र आहे. या बग्गीवर थ्रीडी कॅमेरा, स्पेक्‍ट्रोस्कोप, स्पेक्‍ट्रोमीटर्स यासारख्या यंत्रणा आहेत. या बग्गीस "प्रग्यान' असं नाव देण्यात आलं आहे. संपूर्ण चांद्रयान बनवण्यासाठी सहाशे कोटी रुपये खर्च आला आहे. उड्डाणावेळी चांद्रयानाचं वजन 3,877 किलो असेल आणि ते अंतराळात प्रक्षेपित करण्यासाठी जीएसएलव्ही मार्क थ्री नावाचा अग्निबाण वापरला जाईल. हा अग्निबाण 4 मीटर उंचीचा आणि साडेसहा टनी वजडनाचा असून, त्याची किंमत 370 कोटी रुपये आहे. या अजस्त्र अग्निबाणास "बाहुबली' नावानं सध्या ओळखलं जातं.

उड्डाणास सज्ज
चांद्रयानाचे तिन्ही भाग आता सर्व चाचण्या होऊन श्रीहरीकोटा इथल्या उड्डाणस्थानावर पोचलेत. सर्वांची एकत्रित जुळणीदेखील पूर्ण झाली असून चांद्रयान-2 आता उड्डाणास सज्ज झालं आहे. उद्या (सोमवार, 15 जुलै) पहाटे 2.51 वाजता चांद्रयान-2 प्रक्षेपित केलं जाईल. काही कारणास्तव प्रक्षेपण लांबल्यास पुढील दहा मिनिटांतच चांद्रयानाचं उड्डाण होणं आवश्‍यक आहे. कारण त्यानंतर उड्डाणास महिनाअखेरपर्यंत वाट पाहावी लागेल, असं इस्रोच्या शास्त्रज्ञांनी सांगितलं आहे. उड्डाणानंतर चांद्रयान 15 दिवस पृथ्वीभोवती फिरताना त्याची कक्षा वाढवत नेईल आणि त्यानंतर ते चंद्राच्या प्रवासास निघेल. पुढील पाच दिवसांत ते चंद्राच्या परिसरात पोचेल आणि चंद्राच्या कक्षेत शिरून त्याभोवती फिरू लागेल. यान चंद्राभोवती 27 दिवस फिरत राहील आणि त्यानंतर मोहिमेचा महत्त्वाचा टप्पा सुरू होईल.

चंद्राभोवती 100 किलोमीटर्स उंचीवरून भ्रमण करणाऱ्या चांद्रयान-2 यानापासून "विक्रम' नावाचा भाग अलग होऊन चंद्राकडं झेपावेल. हा प्रयोग इस्रो प्रथमच करत असल्यामुळं शास्त्रज्ञ काहीसे धास्तावलेत. "विक्रम' चंद्रावर उतरण्यासाठी 15 मिनिटं लागतील आणि एवढ्या वेळात बंदुकीच्या गोळीच्या वेगापेक्षा पंधरा पट जास्त वेगानं झेपावणारं "विक्रम' चंद्रापर्यंत पोचेपर्यंत त्याचा वेग कमी झाला तरच ते न आदळता हळुवारपणे चंद्रावर उतरणार आहे. मुख्य यानापासून सुटून "विक्रम' सुमारे 10 मिनिटांत चंद्रापासून 7.5 किलोमीटर्स अंतरावर पोचेल. पुढील 38 सेकंदांत त्याचा वेग ताशी 330 किलोमीटर्स होऊन ते चंद्रापासून 5 किलोमीटर्स उंचीपर्यंत पोचेल. त्या पुढील काही सेकंदांत चंद्राकडं झेपावताना विक्रमचा वेग कमी होताना ते चंद्राच्या पृष्ठभागाचं निरीक्षण घेत राहील. चंद्रापासून तीन- चारशे मीटर्स उंचीपर्यंत पोचल्यावर विक्रम उतरण्याच्या नियोजित जागेविषयी निर्णय घेईल. जागानिश्‍चितीनंतर अवघ्या 13 सेकंदांत विक्रमवरची पाच इंजिन्स पाच सेकंदांसाठी चालू होऊन विक्रम हळुवारपणे चंद्रावर उतरेल. विक्रमचे चार पाय चांद्रभूमीवर टेकल्यावर इंजिन्स बंद होऊन चांद्रयान स्थिरावेल. त्यानंतर पंधराव्या मिनिटात विक्रम आजूबाजूच्या परिसरातली छायाचित्रं घेऊन ते पृथ्वीकडं पाठवेल. असा हा पंधरा मिनिटांचा चंद्रावर उतरण्याचा थरार शास्त्रज्ञ अनुभवतील आणि पहिलं छायाचित्र पृथ्वीवर पोचताच इस्रोसह संपूर्ण भारतीय जनता आनंदात बुडून जाईल.

"प्रग्यान' बग्गीचा प्रवास
चांद्रयानावरचा विक्रम भाग चंद्राच्या दक्षिण ध्रुवापासून 600 किलोमीटर्स अंतरावरच्या दोन विवरांच्या मधल्या प्रदेशात उतरणार आहे. त्याच्या पोटातली प्रग्यान नावाची बग्गी यानंतर चांद्रभूमीवर उतरवली जाईल. ती पुढचे पंधरा दिवस चंद्रावरची माती (रेगोलिथ) आणि इतर मूलद्रव्यं यांची निरीक्षणं घेईल, तसंच आजूबाजूच्या हवामानाचं विश्‍लेषण करील. ही सर्व निरीक्षणं पृथ्वीकडं पाठवली जातील. चांद्रयान चंद्राच्या दक्षिण ध्रुवानजीक उतरवण्याचं प्रमुख कारण आहे. तिथं असणाऱ्या विवरांमध्ये सूर्यप्रकाश फारशा प्रमाणात पोचत नसल्यानं कदाचित तिथं पाणी असू शकतं. तसंच चंद्राच्या जन्मापासूनची मूलद्रव्यं आणि इतर घटक पदार्थ तिथं त्यांच्या मूळ स्वरूपात सापडण्याची शक्‍यता आहे. थोडक्‍यात, या भागाचा अभ्यास म्हणजे चंद्राचा आणि सौरमालेतल्या इतर ग्रहगोलांच्या जन्माचा अभ्यास, असं शास्त्रज्ञ मानतात. यामुळं चंद्राच्या दक्षिण ध्रुवानजीक उतरून तिथली निरीक्षणं घेऊन जगात कोणीही केली नाही अशी कामगिरी इस्रोचे शास्त्रज्ञ करण्याच्या प्रयत्नात आहेत. आपण सर्व भारतीय त्यांना त्यांच्या कार्यात सुयश चिंतू या!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Parliament Session: संसदेचे हिवाळी अधिवेशन 25 नोव्हेंबरपासून, 'या' मुद्द्यांवरुन होणार घमासान

Olympic 2036 च्या आयोजनासाठी भारत सज्ज; IOC कडे पत्र पाठवून व्यक्त केली यजमानपदाची इच्छा

Nagpur AIIMS Recruitment: नागपूर एम्समध्ये विविध विभागांसाठी ‘ग्रुप-ए’ पदांची थेट भरती, पगार २ लाख रुपये; असा करा अर्ज

Gold Investment : महिला आणि संपत्ती: तरुणींमध्ये सोन्यात गुंतवणूक करण्याचा वाढता कल

Latest Marathi News Updates live : जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा रक्षक अन् दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु

SCROLL FOR NEXT