dr prakash tupe 
सप्तरंग

चंद्र(मोहीम) आहे साक्षीला... (डॉ. प्रकाश तुपे)

डॉ. प्रकाश तुपे

सबंध भारताचं नव्हे, तर जगाचं लक्ष असलेल्या ‘चांद्रयान-२’ मोहिमेतलं वैज्ञानिक नाट्य नुकतंच पार पडलं. ‘ऑर्बिटर’मधून विक्रम लँडर बाहेर आला आणि त्यानं काही टप्पेही योग्यपणे पार पडले. शेवटच्या दोन-तीन किलोमीटर भागात मात्र काही त्रुटी झाल्या. हे सगळं नक्की काय झालं आणि या मोहिमेचा पुढचा भाग कसा असणार आदींविषयी मीमांसा.

भारतीय अवकाश संशोधन संस्था (इस्रो) शनिवारी (ता. सात) पहाटे एक ऐतिहासिक कामगिरी पार पाडणार होती, त्यांनी प्रक्षेपित केलेलं चांद्रयान-२ चंद्राभोवती फिरत असून, त्यातला ‘विक्रम’ नावाचा एक भाग चंद्रावर उतरवला जाणार होता. चंद्राच्या दक्षिण ध्रुवानजीक विक्रमला उतरवण्याचा प्रयत्न इस्रो करणार असल्यानं या भागात यान उतरवणारा पहिलाच देश म्हणून भारत ओळखला जाणार होता. कदाचित याचमुळे सर्व जगाचं लक्ष चांद्रयान-२ मोहिमेकडे लागलं होतं.

बंगळूर इथल्या चांद्रयान-२ मोहिमेच्या नियंत्रण कक्षात शास्त्रज्ञ आणि वार्ताहर यांनी शुक्रवारी मध्यरात्री एकच गर्दी केली होती. या मोहिमेविषयी सामान्यजनांमध्ये देखील प्रचंड उत्सुकता निर्माण झाली असल्यानं त्यांनी टीव्हीसमोर गर्दी केली होती. एखाद्या क्रिकेट सामन्यावेळी जेवढी उत्सुकता निर्माण होती, तेवढीच उत्सुकता आबालवृद्धांमध्ये निर्माण झाली असल्यानं त्यांनी टीव्हीसमोर ठाण मांडलं होतं. चांद्रयानाच्या ‘ऑर्बिटर’ भागातून ‘विक्रम’ नावाचा भाग चंद्राकडं पाठवला जाणार होता. त्यावेळी त्याचा वेग ताशी सहा हजार किलोमीटर्स एवढा प्रचंड होता. मात्र, अवघ्या पंधरा मिनिटांत विक्रमचा वेग शून्य करून तो अलगदपणे चंद्रावर उतरवण्याचं आव्हान इस्रोच्या शास्त्रज्ञांपुढे होतं. विक्रमच्या या पंधरा मिनिटांच्या चंद्राकडच्या प्रवासास ‘फिफ्टीन मिनिट्स‌ ऑफ टेरर’ म्हणजे पंधरा मिनिटांचा थरार म्हणून शास्त्रज्ञ संबोधत होते. या पंधरा मिनिटांच्या प्रवासावर संपूर्णपणे संगणकाचे नियंत्रण असणार होतं, कारण पृथ्वीवरच्या शास्त्रज्ञांचे संदेश चंद्रावर तत्काळ पोचणं शक्‍य नव्हतं. या पंधरा मिनिटांत चार टप्प्यांमध्ये वेग नियंत्रित करणाऱ्या मोटारी चालू-बंद होऊन विक्रम हवा तसा फिरवून चंद्रावर उतरवला जाणार होता. यापूर्वी चंद्रावर उतरवलेली यानं विषुववृत्ताच्या भागात उतरवली होती. भारत मात्र काहीशा अनोळखी अशा ध्रुवीय प्रदेशानजीक विक्रमला उतरवून इतिहास घडवणार होता.
विक्रमच्या चंद्रावतरणाचे साक्षीदार होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी ऐंशी शालेय विद्यार्थ्यांसोबत इस्रोच्या नियंत्रणकक्षात जातीनं हजर होते. विक्रमला ऑर्बिटरपासून अलग करण्याची वेळ जवळ येऊ लागल्यावर नियंत्रण कक्षातलं वातावरण काहीसं गंभीर होऊ लागलं. सर्व शास्त्रज्ञ आपल्या समोरच्या संगणकावर नजर ठेवून सर्व काही ठीकठाक असल्याची खात्री करून घेऊ लागले. तो क्षण आला आणि विक्रम यानापासून अलग झाल्याची घोषणा पहाटे १.३८ वाजता झाली. सर्व शास्त्रज्ञांनी टाळ्या वाजवून विक्रमला शुभेच्छा दिल्या. चंद्रभूमीपासून ३५ किलोमीटर उंचीवर असलेल्या विक्रमनं आपल्या नियोजित जागेकडे झेपावताना वेग कमी करण्यासाठी पाचापैकी दोन थ्रस्टर चालू केले. विक्रम अवघ्या दहा मिनिटांत चांद्रभूमीपासून ७.४ किलोमीटर उंचीवर पोचलं आणि त्याचा वेग दहापटीनं म्हणजे ताशी सहाशे किलोमीटर एवढा कमी झाला. चंद्रावर उतरताना त्यानं पहिले दोन टप्पे ठरल्याप्रमाणं पार पाडले आणि आता तिसरा म्हणजे ‘फाइन ब्रेकिंगचा’ टप्पा सुरू झाला. यावेळी विक्रमचा वेग ताशी १८७ किलोमीटर एवढा कमी झाला होता. आता विक्रम चंद्राशी समांतर स्थितीतून उभ्या स्थितीत येऊन आणखी वेग कमी करणार होतं. चांद्रभूमी अवघी दोन-तीन किलोमीटरवर असताना काहीतरी विपरीत घडलं आणि विक्रमची मार्गक्रमणा दाखविली जाणारी संगणकावरील हिरवी रेष नियोजित रेषेवरून हटलेली दिसू लागली. काही क्षणांतच ही रेषा थांबली म्हणजेच विक्रमचा नियंत्रण कक्षेशी संपर्क तुटला. संगणकावरचा नकाशा, अंतर आणि वेगाचे आकडे थांबलेले पाहून नियंत्रण कक्षातलं वातावरण एकदम गंभीर झालं. सर्वच शास्त्रज्ञांच्या चेहऱ्यावर काळजी दिसू लागली. काहीतरी विपरीत घडल्याची जाणीव शास्त्रज्ञांना झाली. चांद्रभूमी अवघी २.१ किलोमीटर्स अंतरावर असताना बरोबर १.५१ वाजता विक्रमचा नियंत्रण कक्षाशी संपर्क तुटला, नक्की काय झालं याचा अंदाज येईना. काही वेळातच इस्रोचे अध्यक्ष के. सिवन आपल्या जागेवरून उठून पंतप्रधानांकडं गेले आणि त्यांना विक्रमच्या संपर्क बिघाडाची माहिती दिली. अखेरीस सिवन यांनी विक्रमच्या तुटलेल्या संपर्काविषयीची घोषणा केली आणि आम्ही सर्व डेटा तपासून नक्की काय झालं असावं याचा अभ्यास करू असं जाहीर केलं.

केवळ ६१ मोहिमांना यश
भारताची दुसरीच चांद्रमोहीम किंचित प्रमाणात अपयशी ठरली. मात्र, यामुळं शास्त्रज्ञांनी फारसं निराश होण्याचं कारण नाही. कारण चंद्राच्या बाबतीत असं घडतंच असा इतिहास सांगतो. गेल्या साठ वर्षांत एकूण १०९ मोहिमा पाठवल्या गेल्या आणि त्यामध्ये अवघ्या ६१ मोहिमांना यश मिळालं. अवकाश मोहिमांचा ‘श्री गणेशा’ अमेरिका आणि रशिया यांनी केला होता आणि त्यांनादेखील सुरवातीच्या काळात अपयशांना सामोरं जावं लागलं होतं. चंद्राकडची पहिली यशस्वी मोहीम रशियानं सहा प्रयत्नांनंतर १९६९ मधल्या ल्युना प्रकल्पाद्वारे राबवली होती. जपानच्या १९९० मधल्या चांद्रमोहीम यानाचा संपर्क तुटल्यानं मोहीम फसली होती. अगदी सहाच महिन्यांपूर्वी इस्रायलनं पाठवलेल्या यानातला लॅंडर चंद्रावर हळुवारपणे न उतरता वेगानं कोसळला होता. कदाचित याचमुळं अमेरिकेच्या नासा या अवकाश संशोधन संस्थेनं इस्रोनं राबवलेल्या चांद्रयान-२ मोहिमेचं कौतुक केलं. ‘भारताची ‘चांद्रयान-२’ मोहीम नक्कीच प्रेरणादायी असून, आम्ही इस्रोबरोबर सूर्यमालेतील ग्रहांच्या मोहिमा राबवण्यास इच्छुक आहोत,’ असं नासानं म्हटलं.

विक्रमशी संपर्क तुटल्यावर इस्रोच्या शास्त्रज्ञांनी याच मोहिमेतल्या ‘ऑर्बिटर’ भागाकडे लक्ष वळवलं. ऑर्बिटर चंद्राभोवती शंभर किलोमीटर उंचीवरून फेऱ्या मारत आहे. या यानावरच्या कॅमेऱ्याच्या साह्यानं विक्रमचा ठावठिकाणा शोधण्याचा प्रयत्न इस्रोच्या शास्त्रज्ञांनी केला. विक्रम ज्या ठिकाणी उतरणार होतं, त्या जागेच्या जवळच एक अनोळखी वस्तू ऑर्बिटरनं टिपली. शास्त्रज्ञांच्या मते, ‘ही वस्तू विक्रमच आहे. मात्र, आम्हाला आता तरी फक्त ‘थर्मल इमेज’ मिळाली असून, अजून काही काळ निरीक्षण केल्यावर आम्ही खात्रीनं सांगू शकू, की ती वस्तू विक्रमच आहे आणि ती कुठल्या स्थितीत आहे.’ काही शास्त्रज्ञांच्या मते, ‘ऑर्बिटरनं घेतलेलं छायाचित्र विक्रमचंच असून, विक्रम सुस्थितीत असून, चांद्रभूमीवर कललेल्या स्थितीत उभा आहे. मात्र, त्याच्या संपर्क यंत्रणेत बिघाड झाल्यानं त्याचं कार्य बंद पडलेलं असावं.’
इस्रोचे शास्त्रज्ञ विक्रमच्या अपयशांची कारणं शोधत आहेत. काहींच्या मते, ‘संपर्क यंत्रणेच्या बिघाडामुळं शेवटच्या दोन मिनिटांचा डेटा आपल्याला मिळाला नाही. विक्रम यानानं त्याचं काम यशस्वीरित्या पूर्ण केलं असून, ते चांद्रभूमीवर सुस्थितीत असेल.’ काही शास्त्रज्ञ असंही म्हणत आहेत, ‘शेवटच्या टप्प्यात थ्रस्टरच्या चुकीमुळं विक्रमचा तोल बिघडून ते वेगानं चंद्रावर आपटलं असावं.’ काही जण म्हणत आहेत, की ‘विक्रमच्या बांधणीतच चूक असल्यानं ते स्वतःचा तोल न सावरता आपटलं असावं.’ पुढच्या काही काळात या सर्व शक्‍यतांचा अभ्यास करून विक्रमची संपर्क यंत्रणा का बिघडली असावी याचं उत्तर मिळू शकेल.

ऑर्बिटर योग्य स्थिती
विक्रम जरी अपयशी झालं असलं, तरी ‘चांद्रयान-२’चं ‘ऑर्बिटर’ यान सुस्थितीत असून, ते पुढची सहा-सात वर्षं चंद्राभोवती फिरत राहून त्याची निरीक्षणं घेत राहील. ऑर्बिटर चंद्राचा थ्रीडी नकाशा काढणं, चंद्रावरची विविध मूलद्रव्यं आणि पाणी याचा शोध घेणं, चंद्राभोवतालच्या वातावरणाचा अभ्यास यासारखी कामं पुढच्या काही वर्षांत पूर्ण करेल. यासाठी ऑर्बिटरवर विविध प्रकारची आठ संयंत्रं बसवलेली आहेत, याचमुळं ‘चांद्रयान-२’ मोहीम संपूर्णपणे फसलेली नसून, ती तिचं ९५ टक्के नियोजित काम पूर्ण करेल.

इस्रोच्या निराश झालेल्या शास्त्रज्ञांना पंतप्रधानांसह विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी दिलासा दिला आहे. पंतप्रधानांनी त्यांना सांगितलं, की ‘देश तुमच्याबरोबर आहे. अडथळ्यामुळे निराश होऊ नका, नवी पहाट लवकरच होईल.’ कदाचित याच भावनेमुळे इस्रोचे शास्त्रज्ञ आता जोमानं कामाला लागले असून, ते लवकरच विक्रमशी यशस्वी संपर्क साधतील अशी आशा करू या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Parliament Session: संसदेचे हिवाळी अधिवेशन 25 नोव्हेंबरपासून, 'या' मुद्द्यांवरुन होणार घमासान

Olympic 2036 च्या आयोजनासाठी भारत सज्ज; IOC कडे पत्र पाठवून व्यक्त केली यजमानपदाची इच्छा

Nagpur AIIMS Recruitment: नागपूर एम्समध्ये विविध विभागांसाठी ‘ग्रुप-ए’ पदांची थेट भरती, पगार २ लाख रुपये; असा करा अर्ज

Gold Investment : महिला आणि संपत्ती: तरुणींमध्ये सोन्यात गुंतवणूक करण्याचा वाढता कल

Latest Marathi News Updates live : जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा रक्षक अन् दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु

SCROLL FOR NEXT