dr shrikant karlekar 
सप्तरंग

वादळानंतरचा किनारा (डॉ. श्रीकांत कार्लेकर)

डॉ. श्रीकांत कार्लेकर

कोकण किनाऱ्याला आवर्ती किंवा चक्रीवादळाचा तडाखा बसणं ही तशी दुर्मीळ घटना असली, तरी ती अशक्य नक्कीच नाही हे ‘निसर्ग’ या विध्वंसक वादळानं दाखवून दिलं आहे. या वादळाची वैशिष्ट्यं, त्याचे भौगोलिक परिणाम, त्यातून काय बोध घ्यायचा, भविष्यात काय होऊ शकतं आदी गोष्टींचा वेध.

कोकण किनाऱ्याला आवर्ती किंवा चक्रीवादळाचा तडाखा बसणं ही तशी दुर्मीळ घटना असली, तरी ती अशक्य नक्कीच नाही हे जून महिन्यात आलेल्या ‘निसर्ग’ या विध्वंसक वादळानं दाखवून दिलं आहे! आग्नेय अरबी समुद्रात केरळनजीक ३१ मे रोजी कमी दाबाचं क्षेत्र तयार होण्याची शक्यता हवामान खात्यानं आपल्या हवामान अंदाजात वर्तवली होती. त्याप्रमाणे ३१ तारखेला हिंदी महासागराच्या या भागांत कमी दाबाचे क्षेत्र तयार झालं; पण पुढच्या दोन दिवसांत त्याची तीव्रता इतकी वाढली, की त्याचं रूपांतर चक्रीवादळात होईल अशी शक्यताही हवामान खात्यानं वर्तवली होती. एक जूनला कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता वाढल्यानंतरचा चक्रीवादळाचा संभाव्य मार्गही सांगण्यात आला.
प्राथमिक अंदाजानुसार हरिहरेश्वर आणि दमण या दरम्यानच्या प्रदेशातून तीव्र चक्रीवादळ उत्तर कोकणच्या किनारपट्टीला धडकण्याची शक्यता वर्तवण्यात आली. पहिल्या अंदाजाप्रमाणं चक्रीवादळ मुंबईच्या उत्तरेकडे जाणं अपेक्षित होतं. मात्र, दुसऱ्या दिवशी या संभाव्य मार्गात बदल होऊन वादळ मुंबईच्या दक्षिणेला अलिबागजवळ सरकलं. तीन जूनला त्यात आणखी बदल होऊन चक्रीवादळ रायगड जिल्ह्यातल्या मुरुडजवळ किनारपट्टीला धडकेल, अशी शक्यता वर्तवण्यात आली. हवामान खात्यानं दोन जूनला चक्रीवादळाच्या मार्गाचा जो अंदाज दिला होता, त्यापेक्षा तीन जूनला दिलेल्या अंदाजातला संभावित मार्ग अलिबागच्या सुमारे ५० किलोमीटर दक्षिणेला होता. रडारच्या नोंदीवरून चक्रीवादळानं या नव्या मागपिक्षाही थोडे दक्षिणेकडून जमिनीवर प्रवेश केल्याचं दिसून आलं.

या आवर्ताच्या डोळ्याचा विस्तार चाळीस ते सत्तर किलोमीटर होता. या चक्रीवादळाचं एकूण आयुष्य केवळ चार दिवसांचं होतं. या चार दिवसांत दुपारी साडेबाराच्या सुमाराला यातल्या वाऱ्यांचा वेग ताशी ९० ते १२० किलोमीटरपर्यंत पोचला आणि हे ‘निसर्ग’ वादळ अतितीव्र आवर्ताच्या श्रेणीपर्यंत पोचलं. तीन जूनला दुपारी तीन वाजेपर्यंत रत्नागिरी जिल्ह्याच्या उत्तरेकडच्या कर्दे-मुरुडपासून केळशी-बाणकोटपर्यंतचा आणि रायगड जिल्ह्याच्या दक्षिणेकडच्या हरिहरेश्वर-श्रीवर्धनपासून आक्षी-नागावपर्यंतचा जवळजवळ दोनशे किलोमीटरचा किनारा मुसळधार पावसानं आणि वेगवान वाऱ्यानं अक्षरशः झोडपून काढला. किनारा ओलांडून जमिनीवर प्रवेश केल्यानंतर हे वादळ पुणे, नगर, नाशिक या मार्गानं पुढं गेले आणि त्याची तीव्रताही कमी झाली.
हे वादळ दुर्मीळ अशामुळे होतं, की मुळात केरळनजीक सुरुवात होऊन उत्तरेकडे सरकणाऱ्या या वादळाला वातावरणाच्या वरच्या थरात वायव्येकडून येणाऱ्या जोरदार वाऱ्यांनी महाराष्ट्राच्या किनारपट्टीकडे वळवलं. अशा घटना फारच दुर्मीळ असल्यामुळे पश्चिम किनाऱ्यावर येऊ शकणाऱ्या भविष्यातल्या संभाव्य वादळांचा अभ्यास करताना त्याचा विचार करावाच लागेल. आवर्ती वादळांनी त्यांचा मार्ग असा अचानक बदलला, तर ती कशी आणि कोणत्या मार्गानं जाऊ शकतील त्याचा अंदाज घेऊन लोकांना सतर्क करावं लागेल.

काही विशिष्ट गुणधर्मामुळंच ही वादळं इतकी विध्वंसक बनतात. यातला वाऱ्याचा वेग ताशी १८० ते ४०० किलोमीटर असतो. या वादळाबरोबरच भरतीच्या महाकाय लाटा तयार होतात आणि भरपूर पाऊसही पडतो. यातल्या अतिशय कमी वायुभारामुळे समुद्राची पातळी उंचावते. आकार, विस्तार, वाऱ्याचा वेग, पर्जन्यमान आणि टिकून राहण्याचा कालखंड या सर्वच बाबतीत या वादळात भरपूर विविधता आढळून येते. यांचा सरासरी वेग ताशी १८० किलोमीटर तरी असतोच. समुद्रावर त्यांचा वेग आणि तीव्रता नेहमीच जास्त असते. मात्र, किनारा ओलांडून जमिनीच्या दिशेनं येताना ही वादळं सामान्यतः दुर्बळ आणि क्षीण होतात. किनारी प्रदेशात ती नेहमीच संहारक ठरतात. यांचा केंद्रबिंदू हा अतिशय कमी वायुभाराचा प्रदेश असतो.
वातावरणात उष्ण आणि आर्द्र हवेचा पुरेसा आणि सततचा पुरवठा हे त्यांच्या निर्मितीमागचं मुख्य कारण आहे. जिथं ६० ते ७० मीटर खोलीपर्यंत २७ अंश सेल्सिअस एवढं तापमान असतं, अशा उष्ण कटिबंधीय, उबदार समुद्रपृष्ठावर त्यांचा जन्म होतो. समुद्रपृष्ठाच्यावर ९ हजार ते १५ हजार मीटर उंचीवर प्रत्यावर्ती अभिसरण असलं, तर अशी चक्रीवादळं तयार होण्याची प्रक्रिया सुलभ होते.

‘निसर्ग’ वादळाचे किनाऱ्यावर झालेले परिणाम बघण्याआधी ही किनारपट्टी कशी आहे ते समजून घेणं गरजेचं आहे. कोकण किनारा मुख्यतः खडकाळ किनारा (रॉकी शोअर) आहे .अनेक भूशिरं, समुद्रकडे, समुद्रगुहा, मोठमोठ्या खडकांच्या आणि दगडांच्या राशी, लाटांनी घासून बनवलेले तटीय मंच आणि वाळूच्या छोट्या छोट्या पुळणी यांनी बनलेला हा विलक्षण सुंदर किनारा आहे. दर सहा तासांनी येणाऱ्या भरती आणि ओहोटीमुळे इथल्या खाड्या आणि पुळणी आपलं जीवनचक्र सारखं बदलत असतात. भरतीच्या वेळी नदीमुखात घुसणारं पाणी, तीस तीस किलोमीटर अंतर कापून नदीत घुसतं. त्याबरोबर अनेक सागरी जीवही प्रवास करतात. भरतीच्या वेळी पुळणी पाण्याखाली जाऊ लागतात. ओहोटीच्या वेळी पुढच्या सहा तासांत पाणी पुन्हा वेगानं समुद्राच्या दिशेनं उतरू लागतं. दर वर्षीच्या पावसाळ्यात तर लाटा विध्वंसक बनतात आणि ओहोटीच्या पाण्याला जबरदस्त ओढ असते.

वेंगुर्ल्यापासून बोर्डीपर्यंत भरतीच्या वेळी पाण्याची पातळी दीड मीटरपासून सहा मीटर इतकी उंच होत जाते. पावसाळ्यात भरतीचे प्रवाह ओहोटी प्रवाहाइतकेच वेगवान असू शकतात, शिवाय ते पाण्यात भोवरेही निर्माण करतात. या भोवऱ्यांच्या जागाही बदलत राहतात. या किनाऱ्यावर उत्तर दक्षिण दिशेनं लाटांची दिशा, उंची आणि वेग यांत ऋतूनुसार खूप बदल होत असतात. मॉन्सूनच्या आधी आणि मॉन्सूननंतरच्या काळात म्हणजे फेब्रुवारी ते मे आणि ऑक्टोबर ते जानेवारी या काळात वायव्य व पश्चिम दिशेकडून साधारणपणे ३ ते ८ नॉट (ताशी ७ ते १८ किलोमीटर) वेगानं येणाऱ्या दोन मीटर उंचीच्या लाटा, मॉन्सूनमध्ये नैऋत्येकडून १४ नॉट (ताशी ३२ किलोमीटर) वेगानं वाहतात. त्यांची उंची ५ ते ७ मीटर इतकी वाढते. या काळात सगळीकडेच समुद्र खवळलेला असला, तरी श्रीवर्धनच्या दक्षिणेला तो अधिक धोकादायक असतो. कारण या किनऱ्यावर भूशिरं आणि समुद्रकडे संख्येनं जास्त आहेत.

दर सहा तासांनी येणाऱ्या भरती-ओहोटीतली तफावत (टायडल रेंज) तेरेखोलपासून रत्नागिरीपर्यंत दीड ते दोन मीटर, त्यानंतर रेवसपर्यंत दोन ते साडेतीन मीटर आणि त्यापुढे बोर्डीपर्यंत साधारणपणे सहा मीटर इतकी वाढत जाते. किनाऱ्याच्या रचनेनुसार (कॉन्फिगरेशन) यात थोडाफार बदलही होतो. याचा अर्थ असा, की तेरेखोलपासून रत्नागिरीपर्यंतच्या किनाऱ्यावर भरती-ओहोटीचा परिणाम कमी आणि लाटांचा जास्त असतो. त्यापुढे बोर्डीपर्यंत लाटांचा परिणाम कमी होऊन भरती-ओहोटीचा परिणाम वाढत जातो. याच कारणामुळे पालघर, डहाणू बोर्डीचा किनारा भरती-ओहोटीच्या काळात जास्त धोकादायक असतो. याचा अर्थ असा नाही, की इतरत्र तो कमी असतो. प्रत्येक ठिकाणी या काळात, विशेषतः पावसाळ्यात पाण्याखाली असलेल्या पुळणीवर आणि खाडीत तयार झालेले भोवरे, प्रवाह, ओहोटीच्या वेळी समुद्राच्या दिशेनं परत जाणारं वेगवान पाणी यामुळे कमी-अधिक फरकानं हा धोका सर्वत्र असतोच. याबरोबरच किनाऱ्याला समांतर वाहणारे तटवर्ती प्रवाहही असतात.

कोकण किनऱ्यावर आढळणाऱ्या पुळणी (बीचेस) खूपच वैविध्यपूर्ण आहेत. पावसाळ्यात सर्वच पुळणींची अतोनात क्षती होते आणि त्या अरुंद होतात. बऱ्याचशा पुळणी या वाळूच्या आहेत. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग इथल्या पुळणीवर वेगवेगळ्या खडक आणि खनिजांपासून बनलेली काळ्या, लालसर आणि पांढ-या रंगाची; पण लाटांबरोबर वेगानं समुद्राच्या दिशेनं सरकत जाणारी वाळू आढळते.
कोकण किनाऱ्यावर लांब रुंद असे सागरतट मंच असून, त्यांच्या जमिनीकडच्या, डोंगर पायथ्याच्या बाजूंवर मोठमोठ्या शिळा आणि दगडांचा खच पडलेला दिसतो. लाटांच्या सदैव चालू असलेल्या माऱ्यामुळे हे दगड फुटून, विदीर्ण होऊन सर्वत्र पसरलेले दिसतात. भरतीच्या वेळी वर आलेलं पाणी या मंचावर ठिकठिकाणी साठून राहतं. बोर्डी, डहाणू, पालघर भागात विस्तीर्ण खडकावर वाळू आणि चिखलयुक्त मातीत खारफुटीची झाडं वाढलेली दिसतात. सगळ्या किनाऱ्यावर बेसाल्ट-लाटेराईट- ग्रॅनाइट खडकांत उंचच उंच समुद्रकडे आणि अरुंद; पण खोल गुहा दिसतात. पावसाळ्यात लाटांची उंची आणि प्रभाव वाढल्यामुळे हे कडे आणि गुहा अधिक धोकादायक बनतात.
‘निसर्ग’सारख्या उष्ण कटीबंधीय वादळांनंतर किनऱ्यावरच्या पुळणी, खाड्या, वाळूच्या टेकड्या आणि किनारा समीप समुद्रपृष्ठ, त्याचं तापमान, तटीय प्रवाह आणि समुद्रबूड जमीन (कॉन्टिनेन्टल शेल्फ) आणि त्याचा उतार यावर नेहमीच परिणाम होतात. किनारा, खाड्या आणि नजीकचा समुद्रतळ या भागातल्या गाळाच्या प्रमाणात वाढ होणं किंवा झीज होऊन गाळ कमी होणं किंवा इतरत्र वाहत जाणं असे अनेक भूरूपिक (जिओमॉर्फिक) बदल होतात. असे बदल लगेचच किंवा काही दिवसांनी दिसू लागतात.
वर्ष २००९ च्या १० आणि ११ नोव्हेंबर या दिवशी अरबी समुद्रात आलेल्या आणि ज्यानं महाराष्ट्राच्या किनाऱ्याला ताशी ८० किलोमीटरच्या वेगानं तडाखा दिला. फयान वादळाच्या वेळी आणि त्यानंतर त्याचे असेच परिणाम झाल्याचं नंतरच्या अभ्यासांत लक्षात आलं होतं. वर लिहिलेल्या परिणामांपैकी काही परिणामांबरोबरच इतरही काही बदल झाले होते. वादळाच्या वेळी वेगवान वाऱ्यांमुळे समुद्रपृष्ठाच्या तापमानात मोठी घट झाली होती. समुद्रतळ ढवळला गेल्यामुळे उथळ समुद्रतळावरचे गाळ, अन्नद्रव्यं (न्यूट्रिअंट्‍स) समुद्रपृष्ठाच्या दिशेनं वर आली होती आणि समुद्रातल्या हरितद्रव्यांत (क्लोरोफिल) मोठी वाढ झाली होती.

‘निसर्ग’ वादळाचा किनाऱ्याजवळ येतानाचा वेग ताशी १२० किलोमीटरपर्यंत पोचला होता. त्यामुळे निर्माण झालेल्या लाटा आणि महाउर्मि (सर्ज) खूपच मोठ्या आणि तीव्र होत्या. हवामान खात्याच्या माहितीनुसार या महाउर्मींची उंची दीड ते दोन मीटर इतकी होती. वादळानंतर लगेचच दिसलेला परिणाम म्हणजे रत्नागिरीपासून अलिबागपर्यंतच्या किनाऱ्यावर, अलिबाग, नागाव, काशीद, मुरुड, हरिहरेश्वर, गुहागर, वेळणेश्वर, गणपतीपुळे, रत्नागिरी अशा अनेक ठिकाणी अनेक प्रकारच्या पदार्थांचे तरंगणारे गोळे, सिगारेटची थोटकं, प्लॅस्टिकच्या पिशव्या आणि वस्तू असे अनेक पदार्थ किनाऱ्यावरच्या पुळणींवर मोठ्या प्रमाणात वाहून आल्या आहेत. काही ठिकाणी मासे मरून पडल्याच्या घटना समोर येत आहेत.

किनाऱ्याला ‘निसर्ग’ वादळाचा तडाखा बसला. त्यानंतर गेल्या काही दिवसांत अनेक ठिकाणाहून, वैयक्तिक संपर्कातून आणि स्थानिक वर्तमानपत्रांतल्या बातम्या यांतून खूप माहिती मिळाली. त्यावरून या किनाऱ्यावर कोणते जाणवणारे आणि दिसणारे बदल झाले आहेत, त्याची थोडीफार कल्पना येऊ शकते. अनेक ठिकाणी पुळणींची मोठ्या प्रमाणावर क्षती झाली असून, ती गोव्यापर्यंतच्या किनारपट्टीवर दिसून येते. वाळूच्या टेकड्यावरची आणि पुळणींवरील वाळू बरेच अंतर जमिनीच्या दिशेनं उडत आली आहे. अनेक घरं आणि नारळी पोफळीच्या बागा असलेल्या भागापर्यंत ही वाळू आल्याची निरीक्षणं स्थानिकांनी मांडली आहेत. नदीमुखं आणि खाड्यांतही गाळसंचय वाढलाअसून येत्या पावसाळ्यांत त्याविषयी अधिक स्पष्टता येईल, असंही एक मत आहे. किनाऱ्यावरच्या वस्त्या, तिथली रं, इतर इमारती, नारळ, आंबा, सुपारी पोफळीची झाडं यांचं किती अतोनात नुकसान या वादळामुळे झालं आहे ते सर्वांना विदित आहेच; पण स्वच्छ, सुंदर पुळणीनी पर्यटकांना आनंद देणारा किनाराही या संकटातून सुटलेला नाही.

वैयक्तिक संपर्कातून जी माहिती मिळाली त्यानुसार, रायगड जिल्ह्यातलं काशीद आणि नांदगावजवळच्या पुळणीवरची वाळू निघून गेल्यामुळे त्याखाली असलेले खडकांचे भाग ज्याला सागर तट मंच (शोअर प्लॅटफॉर्म) म्हणतात, ते काही ठिकाणी उघडे पडले. आडगाव, दिवेआगर, आरावी भागांत पुळणीवरचे करळ खडक (बीच रॉक) वाळू उडून गेल्यामुळे उघडे पडले. केळशी, आंजर्ल्याच्या किनाऱ्यावर चिखलाचे गोळे दिसू लागले, तर अनेक ठिकाणी खाडीत असलेल्या खारफुटीच्या झाडांवर डांबर चिकटलेलं आढळून आलं जे कदाचित दूर समुद्रातून तिथं आलं असावं. दिवेआगरसारख्या दोन भूशिरांच्या (हेडलॅंड्स) दरम्यान असलेल्या बंदिस्त किनारपट्टीलगत वादळाचा परिणाम जास्त प्रकर्षानं झाला. अनेक ठिकाणी पुळणीवर सागरी शैवाल (सी विड्स) वनस्पती सर्वत्र पसरलेली आढळून आली. किनाऱ्यावर इतरही अनेक दुर्गम आणि अस्पर्शित भागांत अशा तऱ्हेचे परिणाम झाले असण्याची शक्यता आहेच.

किनारपट्टीवर झालेल्या वर सांगितलेल्या बदलांचा परिणाम खूप दूरगामी असतो. झालेली झीज भरून यायला आणि अनावश्यक गाळसंचय कमी व्हायलाही बराच काळ लागतो. या वादळानंतर समुद्रातल्या हरितद्रव्याचं बदललेलं प्रमाण, समुद्रबूड जमिनीवर आणि तिच्या उतारावर झालेले बदल, सागर तट प्रवाहांत (शोअर करंट्स) अल्पकालीन आणि दीर्घकालीन होणारे बदल अशा अजूनही अनेक प्रकारच्या परिणामांची आज आपल्याला पूर्ण माहिती झालेली नसली, तरी त्याविषयी माहितीही लवकरच उपलब्ध होईल हे नक्कीच.

उत्तर हिंदी महासागरात, भारताच्या पश्चिम किनाऱ्यांवर उष्ण कटिबंधीय आवर्ती वादळांचे कसे आणि किती प्रकारचे परिणाम होतात याविषयी खूपच कमी माहिती आज आपल्याकडे आहे. त्यामुळे अशा वादळांनंतर प्रत्यक्षदर्शींकडून मिळणारी माहिती संकलित करून तिचा भविष्यात अशा वादळांचा सामना करण्यासाठी आणि किनारारक्षणासाठी नक्कीच उपयोग करून घेता येईल यात शंका नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hatkanangale Assembly Election 2024 Results : हातकणंगले मतदारसंघात महायुतीच्या अशोकराव मानेंनी 46 हजार 397 मतांनी मिळवला विजय

राष्ट्रपती बनण्याचं स्वप्न पाहणाऱ्या अभिजीत बिचुकलेंना आमदारही बनता येईना ; निवडणुकीत मिळालेल्या मतांचा आकडा वाचून बसेल धक्का !

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: पराभवानंतर काँग्रेसमध्ये वादाची ठिणगी, राजीनाम्याची केली मागणी

Dilip Sopal won Barshi Assembly Election : बार्शीमध्ये दिलीप सोपलचं! शिवसेना शिंदेच्या राजेंद्र राऊतचा पराभव

Rais Shaikh Won In Bhiwandi East Assembly Election : भिवंडी पूर्वेत रईस शेख विजयी; शिवसेनेच्या संतोष शेट्टींचा मोठ्या फरकाने पराभव

SCROLL FOR NEXT